Wednesday, May 26, 2010

दुसरा वाढदिवस



    २४मे ला ब्लॉगचा दुसरा वाढदिवस होता. ब्लॉगवरचं दुसरं वर्ष कसं होतं याचा सहजच मनाशी आढावा झाला. यावर्षी कितीतरी मराठी ब्लॉगर्सशी मैत्री झाली. ब्लॉगर मेळावे, इ-सभा आणि व्यक्तिगत पातळीवरही ब्लॉगर्सचा परस्परसंवाद या वर्षी वाढल्यासारखा वाटतो. मागच्या वर्षीच्या तुलनेत आता ‘मराठी ब्लॉगर परिवार’असं काही आहे असं वाटतंय. कदाचित असा परिवार पूर्वीही असेल आणि मला त्याची कल्पना नसेल, किंवा तेंव्हा थोडा विस्कळित असेल. 
   ब्लॉग हे मराठीमध्ये तुलनेने नवीन माध्यम आहे, आणि हळुहळू ते बाळसं धरतंय. त्याचा आवाका, शक्तीस्थानं आणि मर्यादा यांचा आपल्याला अजून अंदाज येतोय. मराठी ब्लॉगलेखनाचं स्वरूप, दर्जा, ब्लॉगकडून अपेक्षा याविषयी गेल्या काही दिवसात नीरजाच्या आणि वटवट सत्यवानाच्या पोस्टच्या निमित्ताने भरपूर लिहिलं गेलंय. त्यात अजून भर टाकण्यासारखं माझ्याजवळ काही नाही.
    माझ्या ब्लॉगवरच्या लेखनाच्या स्वरूपात बदल झालाय. अगदी सुरुवातीच्या पोस्ट या वहीतलं लिखाण ब्लॉगवर पुन्हा उतरवणं या स्वरूपाच्या होत्या. दोन वेळा हाताखालून गेल्यामुळे त्याच्या मांडणीमध्ये जास्त नेमकेपणा होता, लांबीही जास्त होती. भाषेचा बाज काहीसा वेगळा होता. हळुहळू पोस्टची लांबी कमी झालीय. फोटोचा, दुव्यांचा वापर वाढलाय. लिहिण्यातला प्रवाहीपणा वाढल्यासारखा वाटतोय. स्वतःचं नसलेलं लिखाण इथे न टाकण्याचा माझा मूळ बेत होता. पण कवितांच्या वहीमधून हळुहळू माझे आवडते कवी इथे दिसायला लागलेत. आपले नसलेले फोटो, चित्रं न टाकण्याचं मात्र एक ऍन फ्रॅंकचा अपवाद सोडल्यास जमलंय. नेहेमीच्या मराठी अनुभवविश्वाबाहेरचं काही मांडता आलं तर बघावं अशी एक इच्छा होती. फुटकळ अनुवादांमधून ती काही अंशी का होईना पण साधता येते आहे असं वाटतंय. फुकटात जागा मिळते आहे म्हणून वाट्टेल ते (महेंद्र काका, मला उगीचच तुमच्या ब्लॉगवर टीका केल्यासारखं वाटतंय हे लिहिताना ... तुमच्या ब्लॉगचं नाव बदला प्लीज :D ), लिहिणं टाळायचं, जे जालावर उपलब्ध आहे, त्याची द्विरुक्ती टाळायची असं एक धोरण होतं. तरीही थोड्याफार ‘टाईमपास’ पोस्ट झाल्यात. पण एकंदरीत स्वतःच्या मनाला भिडणारं, आपल्याला परत कधी वाचावंस वाटेल असं लिहायचं हे बर्‍यापैकी जमलंय असं वाटतंय.
    दोन वर्षात पन्नास -पंचावन्न पोस्ट म्हणजे मी अजूनही ‘स्लो ब्लॉगर’च आहे. अर्थात ब्लॉगला सुरुवात करताना याची कल्पना होती. माझ्या कामाचं स्वरूप बैठं आहे, आणि कामानिमित्त‘व्हर्च्युअल टीम’ मध्येच बहुधा आठवडेच्या आठवडे संवाद असतो. त्यामुळे हाडामांसाच्या माणसांशी प्रत्यक्ष बोलणं, लॅपटॉपच्या बाहेरच्या खर्‍याखुर्‍या जगाकडे बघणं ही प्रायॉरिटी होती. आणि लिहिल्यापेक्षा जास्त वाचणं ही सुद्धा. त्यामुळे साधारण दोन आठवड्याला एक पोस्ट झाली तरी मी सुखी आहे. ब्लॉगवरच्या प्रतिक्रियांना आवर्जून उत्तरं लिहिणं हे मात्र ‘ब्लॉगेटिकेट्स’ मधून शिकलेय.
    ब्लॉग दोन वर्षांचा झाल्यासारखा वाटतोय का तुम्हाला? ‘मोठा’ झाल्यावर त्याने अजून काय काय करायला हवं असं तुमचं मत आहे? आणि हो, वर वाढदिवसाचा केक ठेवलाय :)

26 comments:

आनंद पत्रे said...

गौरी, खुप शुभेच्छा. एकच इच्छा आहे, पोस्ट करण्याची वारंवारता वाढव ;-)

केक साठी धन्यु!

Gouri said...

आनंद, सूचनेवर तातडीने कार्यवाही केली आहे :D

आळश्यांचा राजा said...

तुम्हारा ब्लॉग जिये हजारों साल, साल के दिन हो पचास हजार!
(एक वर्ष म्हणजे एक मॅन इयर - वाचकसंख्या लक्षात घेतली तर असं होणं अवघड नाही!)

आढावा मस्त!

हेरंब said...

गौरी, डब्बल अभिनंदन आणि डब्बल शुभेच्छा !! अशीच मस्त लिहीत रहा !! आणि आनंद म्हणाला तसं वारंवारता वाढव प्लीज :) ..
आज तुझ्या चक्क दोन पोस्ट्स एका दिवसात बघून एकदम मस्त वाटलं.. :) स्कॉलर आणि राक्षसावरही कमेंटलोय.

~G said...

don menbattya havya na dusra vadhdiwas mhanje! :)

भानस said...

गौरी, अभिनंदन!!! अजून येऊ देत गं. :) आणि केकही मस्त.

Gouri said...

@ आळश्यांचा राजा, अरे तुझ्याकडून काही सूचनाही अपेक्षित आहेत - काय सुधारता येईल याविषयी.

Gouri said...

@ हेरंब, अरे एका दिवसात - एका तासात २ पोस्ट म्हणजे मला स्वतःलाच धक्का होता ... गेला महिनाभर इकडे फिरकता आलं नाहीये ना, त्यामुळे खूप लिहायचं साठलंय. त्याचा परिणाम. जास्त लिहायचा प्रयत्न करते - पण गतीमंत, मतीमंद असतात ना, तसं आपण लेखणीमंद आहोत असं मी स्वीकारून टाकलंय.

Gouri said...

@ G, ही घे दुसरी मेणबत्ती :D


()
||
||
||
||

Gouri said...

@ भाग्यश्री, तुमच्या सगळ्यांकडे बघून आता नियमित पोस्टणं शिकायला पाहिजे.

Raj said...

हार्दिक अभिनंदन. ह्यापी बड्डे. :)
तुझे पोस्ट नेहेमी काहीतरी वेगळे सांगतात
त्यामुळे आवर्जून वाचण्यासारखे असतात.
कीप इट अप.

Pankaj - भटकंती Unlimited said...

तुमच्या हॅप्पी बड्डेच्या शुभेच्छा!! असाच फुलत रहा... स्कॉलरसारखा किंवा राक्षसासारखा...

Gouri said...

@ राज,धन्स.

@ पंकज, स्कॉलरसारखं काही आपल्यला झेपणारं नाही बघ ... ब्लॉगसुद्धा राक्षसासारखाच वागणार. थोडी मनमानी, थोडी अनियमितता, आणि काहीसा लहरीपणा :D

tanvi said...

अभिनंदन ब्लॉगचे आणि तुझेही.... :)

पोस्टच्या वारंवारतेबद्दल मी नाही बोलणार काही... मी स्वत;च तुझ्या अनियमिततेला धरलेय सद्ध्या :)...
पण मनातले विचार मनात न ठेवता इथे येउ देत ....

पुढच्या वाटचालीकरता अनेक अनेक शुभेच्छा....

kirti said...

Gauri,
wish you all the best. happy blogging .
your blog is a pleasure to read ,I appreciate your effort to keep it impeccably marathi.Also, the philosophy you have mentioned about how you wanted your blog to be speaks a lot about the thought
you have given to it.
keep writing. ( no progress for me in writing in marathi :( )

Gouri said...

@ तन्वी, धन्स गं ... कासवाच्या गतीने का होईना, पण लिहित रहायचं असा विचार आहे. लिहायला आवडतं, त्यामुळे ते सुटणार नाही - पण सगळ्या प्रायॉरिटी आणि वेळ यांच गणित या बाबतीत काही जुळत नाही.

Gouri said...

@ कीर्ती, शुभेच्छांसाठी धन्यवाद. ब्लॉग आवडला, काय लिहिलंय, का लिहिलंय ते पोहोचलं अशी प्रतिक्रिया वाचली म्हणजे लिहायला हुरूप येतो. मराठी लिहायला सुरुवातीला थोडा सराव करावा लागेल, पण नंतर अवघड नाही.

Mahendra Kulkarni said...

दोन वर्ष!! अभिनंदन. पण एक बाकी खरंय थोडी फ्रिक्वेन्सी वाढवा पोस्टची. :)

अपर्णा said...

गौरी मी तशीही हा महिना नव्हते आणि आले तर तू टकाटक तीन पोश्टा...लगे रहो...
वा.दि.हा.हा.शु....आढावा अगदी हटके आहे...:)

Gouri said...

अपर्णा, अगं गेले दोन महिन्यतले ड्राफ्ट काल - परवा पब्लिश केलेत त्यामुळे एकदम २४ तासात ३ पोस्टांचा विक्रम झालाय ... आता नवीन लिहायचंय, त्यामुळे पुन्हा जुन्याच गतीने येणार पोस्टा :D

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

ब्लॉगच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मस्त मस्त पोस्ट येऊ देत!

Anagha said...

हे माझं तुला इतकं उशिरा अभिनंदन! अगदी 'better late than never' च्या स्टाइलमध्ये! :) आणि आपण लिहित गेलो कि हळूहळू केव्हढा फरक दिसतो नाही का आपल्याच लिखाणात? :) आणि तो शिळा केक पण खाल्ला बरं का मी! छान होता!

Gouri said...

अनघा, अगं मुंबईतच आहेस ना? आज रात्रभर वाचत बसली आहेस का? आवर्जून जुन्या पोस्टांवरसुद्धा तुझ्या प्रतिक्रिया बघून फार छान वाटलं.

Anagha said...

अगं, ऑफिसमध्ये फुल नाइट चालू होती...मग मध्येच तुझं लिखाण हा एक छानपैकी ब्रेक झाला!! :)

Gouri said...

अनघा, ह्म्म ... तुमचे पण नाईट आऊट असतात वाटतं ऑफिसमध्ये. माझा अनुभव असा आहे, की असं थांबावं लागलं, म्हणजे प्रत्यक्ष काम थोडंच होतं ... बराचसा वेळ कसली ना कसली वाट बघण्यातच जातो. माझ्या कितीतरी पोस्टा अश्या लेट सिटिंगमध्येच लिहिलेल्या आहेत :)

Gouri said...

कांचन, very very sorry. तुझ्या प्रतिक्रियेला उत्तर द्यायचं राहून गेलं :(