Thursday, May 27, 2010

वैशाख पौर्णिमा

घाबरू नका ... मी यापुढे दिवसाला तीन पोस्ट लिहायला सुरुवात करणार नाहीये ... ही पोस्ट २ महिन्यांपासून ड्राफ्ट म्हणून पडून आहे योग्य मुहुर्ताची वाट बघत ... आज फक्त ती प्रकाशित केलीय वेळेचं औचित्य साधून.

*************************************************************
    वैशाख वणव्याने तप्त झालेल्या धरतीवर आपल्या सौम्य शीतल चांदण्याची वृष्टी करणारा पौर्णिमेचा चंद्र. जे परिपूर्ण असतं, ते सुंदर असतं, आनंदी असतं. पौर्णिमेच्या चंद्रासारखं. एका तपश्चर्येची पूर्तता होण्यासाठी याहून सुयोग्य वेळ कुठली असणार?    
    सत्य शोधायला महालाबाहेर पडलेला, अपार करुणेने भरलेला तो राजपुत्र. सत्य शोधायला त्याने सर्व मार्ग अवलंबले. देहदंडन करून बघितलं, वेगवेगळे गुरू करून बघितले. त्याला सत्य सापडलं ते स्वतःच्या आत शोधल्यावरच. आयुष्य हे दुःखाने भरलेलं आहे. या दुःखाचं मूळ तृष्णा आहे. ही तृष्णा विझवून टाका, दुःख आपोआप दूर जाईल. वैशाख पौर्णिमेला त्याला हे गूढ उकललं. आयुष्यभर ज्याचा ध्यास होता, ते सत्य सापडण्याच्या क्षणी तो म्हणतो ...

अनेक जाति संसारं संधाबिस्सं अनिब्बस्सं
गहकारक गवेसन्तु, दुक्ख जाति पुन: पुन:
गहकारकं दिठ्ठोसि पुन गेह न काहसि
सब्बा ते फासुका भग्गा गहकूटं विसङ्गमत्
विसंङ्खारगतं चित्तं तण्हानं खयमज्झगा

    आनंद, दुःख, आशा निराशा याचं घर बांधून मला जखडून ठेवणाऱ्या तुला मी जन्मामागून जन्म शोधतो आहे. तुझ्या या घरापायी मला कितीएक जन्मांची दुःख सहन करावी लागली. आता मात्र मी तुला बघितलंय - परत काही तू मला बांधून ठेवू शकणार नाहीस. तुझे पाश, तुझं घर सगळंच आता भंग पावलं आहे. मनातले सगळे विकार गळून गेले आहेत, मला पुन्हा पुन्हा या चक्रात अडकवणारी तहान शमली आहे.

*************************************************************
    बौद्ध होणं सोपं आहे ... बुद्ध होण्यासाठी आपण कधी प्रयत्न करणार?

11 comments:

आनंद पत्रे said...

मी स्वतःला चिमटा घेतला.. अजुन एक पोस्ट पाहुन... ;-)

कळतंय पण वळत नाही...

Gouri said...

हे हे हे आनंद, मला स्वतःलाच गरगरतंय. पण या तिन्ही पोस्ट जवळजवळ पूर्ण अवस्थेत ड्रफ्ट म्हणून पडून होत्या ... तारखेचा शिक्का फक्त आजचा आहे. लिखाण जुनंच. आणि ही शेवटची. अजून धक्का नाही देणार मी ब्लॉगला आणि वाचकांना :D

भानस said...

ये हुई नं बात! गौरी, सहीच गं. लागोपाठ लिहिलेस. येऊ देत अजून. :)

Raj said...

buddha is one of my fav personalities ever. Good post :)

Deepak Parulekar said...

Very Nice gauri !!!

In fact last sentence was so impressive !!

Keep It up !!

Regards
Deepak Parulekar
Mumbai

Gouri said...

@ Raj, I find Buddha to be a very fascinating personality. Thx :)

@ दीपक, शेवटाचं वाक्य सत्यनारायण गोयंका यांच्या प्रवचनातलं आहे, आवडलं त्यामुळे मनात राहिलेलं ... धन्यवाद!

rajiv said...

केवढा सुंदर विचार लिहून गेलीस . प्रणाम त्या प्रतिभेला !

Gouri said...

राजीव, मूठभर मांस चढलं पहा तुमची प्रतिक्रिया वाचून ... अश्याने वजन वाढणार माझं ;)

मी लिहिलंय त्यातलं काही बुद्धाने स्वतःच म्हटलंय, काही इतरांनी त्याच्याविषयी म्हटलंय. बुद्ध पौर्णिमेला ते सगळं आठवलं, आणि उतरवून काढलं इतकंच. सुचवणारा दुसरा कुणीतरी. आपलं श्रेय टाईपण्यापुरतं. (नाहीतर गेला महिनाभर काही सुचत नाहीये म्हणून शांत बसावं लागलं नसतं, नाही का?)

Anagha said...

प्रवास आणि प्रयत्न त्याच दिशेने चाललेत..माझे...छान आहे पोस्ट...

Anagha said...

प्रवास आणि प्रयत्न त्याच दिशेने चाललेत..माझे...छान आहे पोस्ट...

Gouri said...

अनघा, शेवटी हेच महत्त्वाचं ना? बाकी कितीतरी गोष्टी आपण नुसत्याच करतो - का करायच्या कळत नसताना. तुझ्या प्रवासाला शुभेच्छा!