Monday, May 31, 2010

बिचारी झांटीपी

    नवर्‍याने आयुष्यात एक काम धड केलं नाही. हिनेच त्याला खाऊ - पिऊ घालायचं, संसाराचं गाडं ओढायचं. त्याने फक्त रिकामटेकड्या शिष्यांना गोळा करायचं, आणि दिवसभर तोंडपाटीलकी करायची. या सत्याच्या शोधाने कधी कुणाचं पोट भरलंय? काही कामधंदा नको का माणसाला? काही पोटापाण्याची व्यवस्था?

    शिष्यांनी तरी किती डोक्यावर चढवून ठेवावं याला? हाक मारून ओ देत नाही म्हणून वैतागून शेवटी अंगावर पाणी फेकावं, तर त्यावर याची टिप्पणी ... "ढगांच्या गडगडाटानंतर पाऊस पडाणारच!" ... आणि हे सुद्धा कौतुकाने नोंदवून ठेवणारे याचे शिष्य.

    हे अथेन्सचे नागरिक तरी एवढ्या निरुपयोगी आणि निरुपद्रवी माणसाला कसे घाबरले कोण जाणे.

    पण याला तरी समजलं पाहिजे ना? बिनाकामाचा असला तरी असल्याचा आधार होता. आता सत्याच्या नावाने घरदारावर तुळशीपत्र ठेवून मरायला निघाल्यावर पोरांकडे कोण बघणार?  झांटीपीच्या नशीबाचे भोग काही संपत नाहीत.

    तत्त्वामागे जाणारा सॉक्रेटिस इतिहासात अजरामर, आणि फरफटत खस्ता खात त्याच्यामागे येणारी बिचारी कजाग झांटीपीही.

    आता नवरा-बायकोची भांडणं काय होत नाहीत? फाटक्या तोंडाची असली म्हणून काय झालं, प्रेम होतंच ना तिचं नवर्‍यावर? जगरहाटीपेक्षा काय वेगळी अपेक्षा ठेवली होती तिने संसाराकडून? पण एकदा नवर्‍याच्या अंगावर टाकलेलं पाणी शतकानुशतकं छळत राहणार बिचारीला. आणि आपला बिनकामाचा नवरा एवढं काय करून गेलाय हा प्रश्न सुद्धा.

*************************************************************

    तुकोबाची अवली काय किंवा सॉक्रेटिसची झांटीपी ... त्यांच्या नवर्‍यांचं कौतुक वाचताना मला नेहेमी हा प्रश्न पडलाय ... यांच्या बायकांना काय वाटत असेल?

5 comments:

Gouri said...

पोस्ट वाचून शबाना ने मैथिलीशरण गुप्त यांच्या या कवितेचा दुवा पाठवलाय ... http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%96%E0%A4%BF_%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%B8%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%B9_%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87_/_%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4

शाळेच्या अभ्यासाच्या पुस्तकात होत्या त्यापलिकडे मला हिंदी कविता माहित नाहीत :(

kirti said...

It has always been tough for wives of great men. They achieved what they wanted because they were passionate, talented, gifted even possesed but it was always because their wives took it upon themselves to run the domestic show singlehandedly.
your post reminded me of "ahe manohar tari "and even "Nach ga ghuma". While the first one speaks about
challenges of having a creative husband in amusing tone , "nach ga ..." speaks it with a poignant tone.
BTW ; i hv downloaded Baraha direct but how to link to the blog?

Gouri said...

कीर्ती, अगदी खरंय. माणूस म्हणून मोठं होताना तुमच्या घरातल्या माणसांना विसरून कसं चालेल असं वाटतं. म्हणूनच दोघांनी मिळून स्वप्न बघणारी आणि ती पूर्ण करणारी जोडपी मला खूप भावतात.
बराहा डायरेक्ट वापरणं अगदी सोपं आहे ... ब्लॉगला बराहा लिंक करावं लागत नाही... कुठल्याही प्रोग्रॅमसारखं ‘बराहा डायरेक्ट’ सुरू करायचं, मराठी (युनिकोड) भाषा निवडायची, आणि लिहायला सुरुवात करायची ... कसं लिहायचं याचं मार्गदर्शन बराहाच्या हेल्प मध्ये आहे.

Anagha said...

:)

Gouri said...

अनघा, सॉक्रेटिस शिकताना त्याची झांटीपी एकदम आवडून गेली ... तिचा नवरा एवढा मोठा, जगावेगळा यात तिचा बिचारीचा काय दोष, नाही का?