Monday, September 13, 2010

थोरोचं वॉल्डन

    सद्ध्या थोरोचं ‘वॉल्डन ऍन्ड अदर रायटिंग्ज’ वाचते आहे. नेहेमी पुस्तक वाचायला घेतलं, म्हणजे ते हातावेगळं होईपर्यंत त्याच्याविषयी बोलायला मला वेळ नसतो. हे मात्र चवीचवीने, रोज थोडं वाचावंसं वाटतंय. पुस्तकाचा अजून जेमतेम पाचवा हिस्सा संपलाय, पण मी थोरोच्या प्रेमात पडले आहे. सध्या मला चावत असणारे गैरसोयीचे प्रश्नच हा बाबा विचारतोय.
    कुठल्या तरी आर्किटेक्टने त्याच्या विचाराने बांधलेलं घर माझं घर कसं असू शकेल? माझं घर माझ्या गरजांप्रमाणे, माझ्या प्रकृतीप्रमाणे, माझ्या कुवतीप्रमाणे बनलं पाहिजे. मी ते बांधलं, तरंच ते खरं माझं घर होईल असं थोरो म्हणतो. एकदम पट्या. घर घ्यायचं ठरवल्यापासून हा प्रश्न मला छळतोय.

    थोरोने काही इंटरेस्टिंग दगड गोळा केले होते. हे दगड घरात ठेवल्यावर त्याच्या लक्षात आलं - त्यावर धूळ बसते, आणि ही धूळ नियमित झटकण्याचा नवा व्याप आपण निष्कारण मागे लावून घेतलाय. त्याने शांतपणे ते दगड पुन्हा बाहेर टाकून दिले. मी गोळा केलेले, दुसर्‍या कुणी प्रेमाने दिलेले किती धोंडे मी उगाचच वाहत असते. ही सगळी अडगळ मी कधी घरातून काढून टाकणार?

    कुठल्याही जागी जाण्याचा सर्वोत्तम मार्ग पायी जाणं हा आहे. नाही पटत? विचार करा. मी विमानाने गेले, तर प्रत्यक्ष प्रवासाचा वेळ चालण्यापेक्षा खूपच कमी असेल. पण त्या विमानाच्या तिकिटाचे पैसे कमावण्यासाठी मी घालवलेला वेळ हा प्रवासावर खर्च केलेला वेळंच आहे. म्हणजे मी एवढा वेळ केवळ प्रवासाच्या पूर्वतयारीत खर्च केला, आणि पायी जाताना ज्या गोष्टी बघायला मिळाल्या असत्या, त्या बघण्याची संधीही घालवली. डोक्याला फार त्रास देतोय हा थोरो.

    माझे दिवसाचे नऊ किंवा त्याहून जास्त तास कमवण्यावर खर्च होतात. खेरीज ऑफिसला जाण्यायेण्यातला वेळ, ऑफिसचा विचार करण्यात घालवलेला ऑफिसबाहेरचा वेळ वेगळा. वर्षाकाठच्या दहा सुट्ट्या आणि मला घेता येणारी बावीस दिवसांची रजा हा माझा ‘फावला वेळ’. वॉल्डनच्या प्रयोगानंतर थोरो म्हणतो, की वर्षाचे सहा आठवडे काम त्याच्या अन्न-वस्त्र-निवारा या प्रथमिक गरजा भागवायला पुरेसं होतं. उरलेला वेळ त्याला वाटेल तसा वापरायला मोकळा होता. म्हणजे थोरोच्या हिशोबाच्या नेमकं उलटं माझं गणित आहे. वर्षाचे शेहेचाळीस आठवडे काम आणि सहा आठवडे मोकळीक. याचा अर्थ एक तर मला माझ्या नोकरीमधून अन्न-वस्त्र-निवार्‍यापलिकडचं बरंच काही मिळतंय, किंवा मी वेळेचा अतिशय इनएफिशिअंट वापर करते आहे. सोचनेकी बात है.

    साधारणपणे पुस्तक हातात आलं, म्हणजे मला थेट विषयाला भिडायची घाई असते. प्रस्तावना, लेखक परिचय, अर्पणपत्रिका असल्या गोष्टीच काय- कित्येक वेळा पुस्तकाचं नावसुद्धा मी धड वाचत नाही. (आत्ता सुद्धा पुस्तकाचं नाव हे लिहिताना प्रथम नीट वाचलं ;) ) पण या घिसडघाईला वॉल्डन अपवाद ठरलं. राफ वॉल्डो इमरसनची प्रस्तावना मी चक्क मुख्य पुस्तक वाचण्यापूर्वी, मनापासून वाचली. एका समकालीनाला थोरो किती समजला होता हे या प्रस्तावनेत प्रतिबिंबित होतं.

    मराठीतून थोरोला भेटायचं असेल, तर दुर्गाबाईंनी 'वॉल्डनकाठी विचारविहार' नावाने थोरोच्या लिखाणाचा गाभा असणारं ‘वॉल्डन’ मराठीत आणलंय.  इंग्रजी पुस्तक ई-बुक स्वरूपातही उपलब्ध आहे.

Walden & other writings
Henry David Thoreau
2002 Modern Library Paperback Edition

वॉल्डनकाठी विचार विहार
अनुवाद: दुर्गा भागवत
१९६५

इ-प्रत: http://books.google.com/books?id=yiQ3AAAAIAAJ&printsec=frontcover&dq=walden

27 comments:

Ashwin said...

सुरेख!! मी पण हे पुस्तक असंच वेड लागल्यासारखं वाचलं, आणि फारच अस्वस्थ झालो होतो..आत्ताच तुमचा ब्लॉग वाचला आणि पुन्हा एकदा थोरोचं पुस्तक हाती घेतलं आहे...मला हे पुस्तक परत वाचायला लावल्याबद्दल धन्यवाद!!
वॉल्डनकाठी विचार विहार मात्र प्रचंड शोधाशोध करूनदेखिल मिळत नाहीये. सध्या कुठे उपलब्ध आहे का ते??

Gouri said...

अश्विन, मराठी पुस्तक मलाही मिळालेलं नाही. http://granthalaya.org/cgi-bin/koha/opac-detail.pl?biblionumber=53363 इथे काही माहिती मात्र मिळाली.

Anonymous said...

मलापण अशी वेड लावणारी पुस्तक आवडतात...लवकरच घेतो वाचायला...धन्स

Gouri said...

देवेंद्र, नक्की वाच. खरंच वेड लावणारं आहे पुस्तक.

Raj said...

मस्त. ओळख करून दिल्याबद्दल आभार. मी आत्ताच नवीन घरात शिफ्ट केले त्यामुळे काही गोष्टी ओळखीच्या वाटल्या.

Gouri said...

राज, नवीन घर, नवीन जॉब अश्या ज्या घटनांशी आपल्यला ‘जुळवून’ घ्यावं लागतं, त्यांच्या संदर्भात तर थोरो एकदमच पटतो.

kirti said...

गौरी ,
पुस्तकाची महिती दिल्या बद्दल अनेक धन्यवाद.
मला थोरो मनापासून पटला .आपण साधे सोपे जीवन उगीच कठीण करुन घेतो.
वाचायला घेतेच लौकर.

Dhananjay said...

Thoreau is simply great! Walden is his masterpiece.
@Ashwin,Gauri - I've got photocopy of marathi translation by Durgabai. The book is out of print. But I liked the original version than translation.

Anagha said...

'वर्षाचे शेहेचाळीस आठवडे काम आणि सहा आठवडे मोकळीक. याचा अर्थ एक तर मला माझ्या नोकरीमधून अन्न-वस्त्र-निवार्‍यापलिकडचं बरंच काही मिळतंय...'
छान... चला, मला परत एकदा कळून गेलं कि माझं काम हे मला नुसतं अन्न, वस्त्र, निवारा देत नाही!! धन्यवाद गं गौरी. :)

Gouri said...

कीर्ती, आपण किती अडगळ गोळा केलीय ते थोरो वाचल्यावर जाणवतं.

Gouri said...

धनंजय, भाषांतरापेक्षा मूळ पुस्तक कधीही सरसच असणार. पण दुर्गाबाईंनी केलेलं भाषांतर बघण्याची उत्सुकता आहे.

Gouri said...

अनघा, अग त्या वाक्यातला कळीचा शब्द ‘किंवा’ आहे ;)
आपल्या कामातून त्यापलिकडचं मिळत असतं, ते आपण गृहित धरतो, आणि आयुष्यभर हेच, असंच जगायचं असतं असंही गृहित धरतो.

Anagha said...

अगं! पण मला म्हणायचंय कि माझ्या नशिबाने मला आवडणाराच उद्योग मी पैसे मिळवण्यासाठी करते!! चुकतेय वाटतं कमेंट काहीतरी!! :(

Gouri said...

अनघा, चुकत नाहीये ग काही - नशीबवान आहेस. :)

Satya said...

विचार आवडले... म्हणजे एकदम innovative वाटले... असा विचार मी आधी केला नव्हता... आणि हो त्या पुस्तकाच्या इ-प्रतीचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद... :)

Gouri said...

Satya, ब्लॉगवर स्वागत, आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

Anonymous said...

पुस्तक नक्कीच वाचावयास घेईन. छान पोस्ट. कधीतरी लागेल म्हणून खचाकच भरलेल्या माळ्याची आठवण आली.

Gouri said...

अनुजा, सध्या सगळी अडगळ काढायचा प्रयत्न चाललाय माझा. :)

Anonymous said...

गौरे अगं थोरो वाचायचा विचार कधीचा बाजूला पडतोय माझा... आता मात्र मराठी वा ईंग्लिश जे मिळेल ते शोधून वाचायला हवेय....

Gouri said...

तन्वी, कुठल्याही भाषेत चालेल, पण थोरो वाचच!

Dhananjay said...

@Gouri
Obviously any original work is better. But I didn't find the efforts I took to get the marathi translation copy worth of it!

Gouri said...

धनंजय, मग मी मराठी अनुवाद शोधण्यासाठी विशेष धडपड करणार नाही. मूळ इंग्रजी पुस्तक सहज उपलब्ध आहे.

Priyaranjan Anand Marathe said...

Want to read this book. The language is bit difficult to understand.

Gouri said...

प्रियदर्शन, ब्लॉगवर स्वागत! भाषा सुरुवातीला थोडी जड वाटते, पण मग पुस्तक इतकं इंटरेस्टिंग होत जातं, की भीषेची अडचण होत नाही.

सर्चविषयी आज मेल पाठवते.

विकास पोवार said...

समिक्षण वाचून पुस्तकाविषयीचं कुतूहल आणि ते वाचण्याची इच्छा जागृत झाली. आता आधी इंग्रजीला भिडावं का हा प्रश्न आहे. कारण रहस्य कथांतलं इंग्रजी हे वैचारीक, जिवन विषक दृष्टीकोनावरच्या इंग्रजीपेक्षा जास्त रहस्यमय असतं असा काहीसा अनुभव. त्यात लेखकाचा कालावधी खुप आधिचा.पण वाचायला हवच असं वाटू लागलंय. धन्यवाद गौरी.

Unknown said...

अतिशय सुरेख आणि सोप्या भाषेत पुस्तकाची ओळख करून दिली आहे. "Conveyer Belt" lifestyle मधे थांबून विचार करायला भाग पाडणारे पुस्तक आहे

Gouri said...

विकास, मूळ पुस्तक वाचता येत असेल तर कधीही त्याला पाहिली पसंती द्यायला हवी. इथे भाषांतर दुर्गाबाईंनी केलंय, तरीही. आमचे सर सांगायचे – भाषांतरकाराचं काम हे एका कुपीतलं अत्तर दुसर्‍या कुपीत ओतण्यासारखं असतं. कितीही प्रयत्न केले, तरी थोडं तरी उडून जातं, थोडं तरी मागे राहतच.