Tuesday, February 21, 2012

The Cairo Trilogy

    एक वर्ष पूर्ण झालं जस्मिन रिव्होल्युशनला. अजून तिचं यश अपयश ठरायचंय.
   
    असेच आशा घेऊन आलेले दिवस इजिप्तने मागच्या शतकातही बघितले होते. लोकशाहीची स्वप्न तेंव्हाच्या तरुणांनीही बघितली होती. ‘कैरो ट्रायलॉजी’ वाचलं तेंव्हापासून या पुस्तकाविषयी लिहायचं मनात होतं. आता वाचून खूप दिवस झालेत, फारसे तपशील आठवत नाहीयेत, पण एका वेगळ्याच विश्वाची ओळख करून देणार्‍या या पुस्तकाविषयी आठवेल तसं लिहायचंच असं ठरवलंय.

    इजिप्तचे नजीब महफूझ हे नोबेल पुरस्कार विजेते लेखक. कैरोमधलं १९१९ ते १९४४ या काळातलं लोकजीवन वर्णन करणार्‍या तीन कादंबर्‍यांची ही महफूझ यांची मूळ अरबी भाषेतली मालिका. मी वाचलं ते या कादंबर्‍यांचं इंग्रजी भाषांतर.

    अल सयीद अहमद आणि अमीनाबी हे कैरोमधलं एक जोडपं. त्यांच्या कुटुंबाची गोष्ट या तीन कादंबर्‍यांमधून महफूझ यांनी सांगितली आहे. पहिली कादंबरी वाचतांना मला आपल्या ह ना आपट्यांच्या "पण लक्ष्यांत कोण घेतो?" ची आठवण झाली. गोष्टीची तीच लय, आणि सामाजिक परिस्थितीही काहीशी तशीच. आणि पुस्तकाचं आकारमान बघता तब्येतीत वाचण्याची गोष्ट.

    या कादंबरीत आपल्याला दिसतो तो अल सयीद अहमद हा इजिप्तच्या पुरुषप्रधान संस्कृतीचं प्रतिक म्हणता येईल असा कुटुंबप्रमुख. त्याच्या एकाधिकारशाहीखाली जगणारं त्याचं कुटुंब. अमीनाबी ही पतीचा प्रत्येक शब्द झेलण्यात धन्यता मानणारी आज्ञाधारक पत्नी. तिला बाहेरचं जग दिसतं ते केवळ खिडकीच्या नक्षीदार झरोक्यातून. नवर्‍याची परवानगी न घेता दर्ग्याला गेली म्हणून अल सयीद बायकोला थेट घराबाहेरसुद्धा काढतो! कादंबरी वाचतानाच आपल्याला गुदमरायला होतं. मुंगीच्या गतीने काळ सरकत असतो, आणि त्याच गतीने या घराचं जगणंही बदलत जातं.

    अल सयीदची शारीरिक ताकद हलूहळू वयाप्रमाणे कमी होत जाते. मुलींची लग्न होतात आणि त्या आपापल्या सुखदुःखात बुडून जातात. यासीन बापाचं कर्तृत्त्व न घेता फक्त बाहेरख्यालीपणाच घेतो. कवी मनाचा फहमी मोर्चामध्ये चुकून गोळी लागून मरतो. धाकटा कमाल धर्म, प्रेम, परंपरा यापासून दूर जाताजाता जगाकडे पाठ फिरवणारा तत्त्वज्ञ बनतो. शेवटापर्यंत धीराने जगत राहते ती अमीनाबी. संपूर्ण कादंबरीतली सगळ्यात मृदु वागणारी खंबीर स्त्री.

    गेल्या वर्षी तहरीर चौकाच्या बातम्या बघताना लोकशाहीची स्वप्न बघणारा, झगलूलपाशाला पाठिंबा देणारा फाहमी आठवला कैरो ट्रायलॉजीमधला. डोळ्यात स्वप्न असणारे असे किती फाहमी क्रांतीमध्ये हकनाक मरत असतील !

**************************************
The Cairo Trilogy (Palace Wअlk, Palace of Desire & Sugar Street)
Author: Naguib Mahfouz

पुस्तक फ्लिपकार्टवर इथे आहे.
(ही तिन्ही पुस्तकं स्वतंत्र उपलब्ध आहेत. माझ्याकडे ट्रायलॉजी म्हणून एकच हार्डबाऊंड ठोकळा आहे.)

8 comments:

Raj said...

सुरेख ओळख. वाचायच्या यादीत टाकले आहे. हल्ली छान पुस्तक परिचय वाचला की चांगलेही वाटते आणि टेंशनही येते. चांगले अशासाठी की अजून एक वाचनीय पुस्तक सापडले, टेंशन अशासाठी की आधीच यादी इतकी लांब आहे की एक आयुष्य कसं पुरणार? :)

Gouri said...

राज, खरंय. जितकं वाचू तेवढी यादी वाढतंच जाणार ... :)

अनघा said...

थोडक्यात बारकावे दिलेयस. :)
पण काय काय आणि कधी वाचू मी ??? :(

Gouri said...

तुझी सिक लीव्ह वापरून टाक बघू सगळी :)

Anonymous said...

गुदमरून जायला होतं हे अगदी खरं. बारीक वर्णनाने मी सुरुवातीला मंत्रमुग्ध झाले होते, पुस्तक खाली ठेववत नव्हते, आणि कुठेतरी या पुरुषप्रधान संस्कृतीची टीका जाणवेल अशी आशा होती. पण ते झालं नाही, आणि मग वर्णनाचाही कंटाळा आला. मी फक्त पहिलं पुस्तक वाचलं. यासीन हे पात्र तर अजिबात आवडले नाही!

माझ्या ब्लॉगवरच्या प्रतिसादाबद्दल आभार!
"डेली डंप" तसे महागच आहे ना? तरी त्यांनीच मला स्वस्तातला पर्याय सांगितल्याचे मला आवडले. मातीच्या वजनानी नाही तर माझ्या लहान मुलाच्या कुतुहलामुळे कुंड्यांचा खांब टिकतोय की नाही अशी शंका वाटू लागलीय. बघू काय होतं ते!

Prachi said...
This comment has been removed by a blog administrator.
Gouri said...

प्राची, ब्लॉगवर स्वागत!
पुरुषप्रधान संस्कृतीवर टीका सापडेल असं मलाही वाटलं होतं, पण इथे परिस्थितीचं फक्त वर्णन आहे. ते मात्र अतिशय परिणामकारक आणि बोलकं.
अमीनाबीचं शेवटी काय होतं या उत्सुकतेतून मी तिन्ही पुस्तकं वाचली. पहिले दोन भाग वाचून कमालकडून खूप अपेक्षा होत्या, पण त्याने मात्र काहीच केलं नाही :(

Gouri said...

प्राची, ‘डेली डंप’चं डिझाईन मस्त आहे. बाकी ज्या काही कंपोस्टिंग सिस्टिम बघितल्या त्यापेक्षा हे मला खूपच आवडलं. पण मला पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर कंपोस्टिंग करायचं होतं - किती जमेल याविषयी खात्री नव्हती. त्यासाठी मला ‘डेली डंप’चा खांब महाग वाटला. (पुण्यामध्ये त्या डिझाईनच्या कंपोस्ट बीन तयार मिळतात.) पण ते डिझाईन वापरून कुठल्याही बायोडिग्रेडेबल मटेरियलमध्ये तुम्ही स्वतः कंपोस्ट बीन बनवायला त्यांची हरकत नाही हे मला विशेष वाटलं.
http://mokale-aakash.blogspot.com/2011/12/blog-post_26.html
इथे मी या कंपोस्टिंगच्या उठाठेवीविषयी लिहिलंय ... तुमच्या प्रयोगाची प्रगती वाचायला आवडेल.