Tuesday, August 20, 2013

दाभोळकर गेले! :(डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा आज पुण्यात खून झाला.

एक सच्चा, काम करणारा माणूस गमावला आपण.

मी त्यांची काही पुस्तकं वाचलीत. प्रत्यक्ष त्यांना कधी बघितलेलं नाही.

त्यांच्या विचारांशी मी पूर्ण सहमत आहे असं नाही.

म्हणजे बुवाबाजी, जादूटोणा आणि धर्माच्या नावाखाली लोकांची होणारी लुबाडणूक यांच्या विरोधात अंनिसने केलेलं काम ग्रेटच आहे.

पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा अशी काळ्या – गोर्‍यांमध्ये विभागणी करता येते नेहमीच असं मला वाटत नाही. या दोन्ही टोकांच्या मध्ये करड्या रंगाचा एक मोठा प्रदेश लागतो. आणि माणसं – माझ्यासकट– फक्त विचारांनी चालत नाहीत, विचारांच्या पलिकडे कशावर तरी विश्वास ठेवण्याची त्यांची एक गरज असते असं वाटतं मला. म्हणजे श्रद्धा तशी बाय डेफिनिशन ‘अंध’च म्हणायला हवी. ज्या श्रद्धांमुळे स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचू शकते, कुणाचा गैरफायदा घेतला जातो, त्यांना नक्कीच विरोध व्हायला हवा, सरसकट श्रद्धेला विरोध कसा करायचा असं माझं मत. अर्थात हे नुसतं माझ्यापुरतं ठेवलेलं. सगळा गुंता नुसता. त्याला कृतीची जोड नाही. दाभोळकरांसारखी माणसं यापेक्षा वेगळा विचार करतात, आणि त्याप्रमाणे कृतीही करतात. म्हणून ती ग्रेट असतात. 

कुणीतरी त्यांचा जीव घेतल्याने वैयक्तिक नुकसान झाल्यासारखं वाटतंय.
  
या माणसाला संपवून टाकल्याशिवाय पर्याय नाही असं इतक्या प्रकर्षाने कुणाला वाटलं असेल?

त्यांना श्रद्धांजली वाहणार्‍या प्रत्येकाने आपल्या आयुष्यातली श्रद्धेच्या आहारी जाऊन होणारी एक अनिष्ट गोष्ट सोडायचा नेम केला, तरी केवढा मोठा बदल होईल!