Saturday, November 9, 2013

एक वर्ष झालं!मागच्या वर्षी याच सुमाराला प्रवासाला निघालो होतो आम्ही ... उत्सुकता, काळजी, युफोरिया असं सगळं ओझं सोबत घेऊन. रात्रभराच्या प्रवासात झोप लागणं शक्यच नव्हतं ... डोळ्यात न बघितलेल्या बाळाविषयी इतकी स्वप्नं होती, की झोपायला वेळच नव्हता.

कशी असेल ती? मनात नाही भरली तर? आपल्याला जमेल ना सगळं नीट? घरातले सगळे स्वीकारतील ना? जन्मदात्री गेली म्हणून बाळाला देऊन टाकायला तयार झालेले नातेवाईक कसे असतील? सौदा करताहेत का ते बाळाचा? काय अपेक्षा आहेत त्यांच्या?

“इतक्या लहान बाळात काही मेडिकल प्रॉब्लेम असले तरी समजणार नाहीत. फार मोठी रिस्क आहे ही.” एका अनुभवी हितचिंतकांचा प्रामाणिक सल्ला. "बाळ न बघता हो म्हणू नका, आणि इतकं लहान शक्यतो नकोच." सगळंच इतकं अचानक झालंय, की धड विचार करायला वेळच झाला नाही. अजून काहीच नक्की नाही, त्यामुळे कुणाला सांगणं, त्यांचं मत घेणंही शक्य नाही. फक्त कायदेविषयक आणि वैद्यकीय सल्ला मात्र घेतलाय.

सगळं नीट झालं, तर आयुष्य बदलूनच जाईल एकदम. आणि फिसकटलं काही कारणाने तर? न बघितलेल्या बाळासाठी घेतलेल्या अंगड्या-टोपड्यांकडे बघायची हिंमत होईल परत? प्रवास संपता संपत नाही. तिथे पोहोचल्यावरसुद्धा पहिला दिवस फक्त पूर्वतयारीचा. उरलीसुरली खरेदी करायची आणि वाट बघत बसायची.

कसा तरी दिवस संपतो. दुसर्‍या दिवशी सकाळीच एक एवढुस्सं गाठोडं हातात येतं. नव्या स्पर्शामुळे बावरलेला चेहरा तासाभरात शांत होतो. हे इतकं गोडुलं आहे, की बघताक्षणी त्याच्या प्रेमात न पडणं अशक्य. पण अजून सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता व्हायचीय. आपल्या हातात आहे, पण अजून हे आपलं नाही. हा दिवस कालच्या दिवसापेक्षा जास्त छळणारा. समोर आहे, त्याला आपलं म्हणायचं नाही हे कसं शक्य आहे?

दुसर्‍या दिवशी दुपारी अखेर सगळे सोपस्कार पूर्ण होतात. ही लाडूबाई आता आपली! एवढी निराशा आणि अनिश्चितता अनुभवल्यावर विश्वास बसत नाही यावर. पुढचा महिनाभर तरी जमीन दिसूच नये एवढी हवेत आहे मी! या परीने अशी काही जादूची कांडी फिरवली आहे, की सगळ्या गोष्टी आपोआप जुळून येतात, शंका हवेत विरूनच जातात. आपल्यांना मनवण्यात खर्च केलेला वेळ आणि एनर्जी, सरकारी दिरंगाई, झारीतले शुक्राचार्य आणि न संपणारं वाट बघणं ... तरीही, It was worth the wait.

18 comments:

Anagha Nigwekar said...

कशी भर्रकन संपतात बघ वर्ष ! पत्ता पण लागणार नाही ! :) :)

Gouri said...

हो ग ... पहिलं वर्ष कधी उडून गेलं कळलंच नाही!

भानस said...

पुन्हा एकदा तुम्हां सगळ्यांचे अभिनंदन! परीला खूप खूप आशीर्वाद! :)

खरेच गं, वर्ष कुठे सरुन गेलं हे कळलंच नाही. आत्ता आत्ता तू सांगितलेलं आठवतंय की परीला घेऊन आलो. :)

Gouri said...

श्रीताई, दिवस पळताहेत सद्ध्या! एक क्षण धरून ठेवू म्हटलं तर पुढचा निसटतो! :)

aativas said...

Yes, when you have too much to do, time flies :-)

Happy 'Home coming B'day' to Pari!

Gouri said...

सविता, अगदी! आणि घरी येण्याचा वाढदिवस झाला बरं का जोरात! :)

Raj said...

Time is an illusion. :)

Happy Homecoming B'day To Pari and Wishing her the best in life.

अपर्णा said...

अगं नशीबवान आहेस मुलगी आहे तुला. खूप खूप मज्जा कर तिच्याबरोबर. घरात एक लहान मूल असलं की दुनिया की कोई भी ताकत तेरे हौसले को कुच भी नहीं कर सकती..
Take care of the lady bug ;) happy birthday pari :)
Enjoy

Aparna

Gouri said...

Raj, indeed! :)

Gouri said...

अपर्णा, हो ग ... मुलगी हवी होती! :)

Manjiri said...

All the best wishes for her and for your family!
-Manjiri

Sagar said...

Abhinandan .. Aata jara Pariche photos pan upload kar

Gouri said...

आभार , मंजिरी! :)

Gouri said...

सागर, अरे फोटोग्राफर वर्षभरापूर्वी निघालाय तो पोहोचलाच नाही अजून! ;)

सौरभ said...

:) :) :) I remember the small visit... geee... making me feel nostalgic :D :D :D

गौरी said...

gouri, me tujya blog chi navin reader ahe. me ithle almost sagle posts wachun kadhale ekach diwsaat. tu khup chhan lihites. please keep writing :)

Gouri said...

सौरभ, आता परत यायला हवं ... एक वर्ष होऊन गेलं, नाही का? ;)

Gouri said...

गौरी, पहिल्यांदा मला वाटलं अरे मीच लिहिलेली प्रतिक्रिया आहे का :)
ब्लॉगवर स्वागत, आणि चिकाटीने सगळ्या पोस्ट वाचल्याबद्दल आभार! नवीन लिहायला अजून उत्साह येतो मग!