Thursday, August 14, 2014

हैरान हू मै ...


शाळेला जायची गडबड. अजून माऊची पोळी संपयचीय, मोजे, बूट घालून व्हायचेत, औषध घ्यायचं राहिलंय.

खिडकीत आई एक एक घास भरवते आहे, एकीकडे माऊचं खिडकीतून बाहेर बघणं चाललंय. औषध काढायला आई तिथून बाजूला गेल्यावर माऊ तिच्याकडच्या गाणार्‍या भूभूला खिडकीतून दिसणारी आज्जी, काका दाखवायला लागते. खिडकीच्या आतून भूभूला नीट दिसत नाहीये सगळं, म्हणून मग भूभूला गजाबाहेर काढते. तेवढ्यात आई आल्यामुळे घाईघाईने भूभूला आत घेण्याची धडपड सुरू होते, आणि भूभू अडकून बसतो.

“अग, थांब ... भूभू पडेल खाली!” आई ओरडल्याबरोबर पटकन माऊ भूभूला सोडून देते आणि बिचारा भूभू बाहेरच्या विंडोसीलवर जाऊन बसतो. आता इथे आई, बाबा कुणाचाच हात पोहोचणार नाहीये. भूभूचा त्रिशंकू झालाय. तिथून खाली पडला तर बिचारा थेट सात मजले खालीच जाईल. भूभू माऊचा लाडका असला तरी तो तिचा नाहीचे मुळी. खालच्या दादाने उदारपणे थोडे दिवस खेळायला दिलाय तो माऊला. बर्‍यापैकी महागातला. थोडक्यात, आता काय करायचं या विचाराने आईला घाम फुटलाय. एकीकडे माऊला धपाटा घालायला हात शिवशिवतोय, दुसरीकडे तिचं “भूभू, तिकडे काका शिमिंग करतोय बघ, दिसला ना तुला?” संभाषण ऐकलेलं असल्यामुळे हसू आवरत नाहीये.

कशीतरी माऊला वेळेत तयार करून आई शाळेत घेऊन जाते. तिथे आज एक वेगळंच रहस्य आहे आईसाठी. भूभूचा विचार करायला वेळच नाहीये. काल माऊच्या डे केअरच्या बॅगेत काल दुसर्‍याच कुणाचा तरी फ्रॉक आणि चड्डी बदललेल्या ओल्या कपड्यांमध्ये आलेय, आणि माऊची चड्डी आणि शॉर्ट गायब आहे. या गमतीजमती नेहेमी शाळेत होतात, पण हे सगळं डे केअरच्या बॅगेत बघून आई चक्रावून गेली आहे. डे केअर – वर्ग – डे केअर अश्या फेर्‍या केल्यावर अखेरीस हे रहस्य उलगडतं. काल माऊ वर्गातून डे केअरला पिवळा फ्रॉक घालून आली होती ना, तो आणि चड्डी भिजली म्हणून डे केअरच्या ताईंनी बदलली, बदललेले कपडे नेहेमीप्रमाणे डे केअरच्या बॅगेत.

पण पिवळा फ्रॉक तर माऊचा नाहीचे!

वर्गात माऊने जीन्सची शॉर्ट आणि चड्डी ओली केली म्हणून वर्गातल्या ताईंनी कपडे बदलले तिचे आणि तो पिवळा फ्रॉक - चड्डी घातली. तो वर्गातल्या अजून कुणाचातरी हरवलेला असणार!

हे कोडं सुटल्यावर आईचं डोकं तेज चालायला लागतं. घरी आल्यावर खिडकीतून आरसा बाहेर काढून ती भूभूची पोझिशन नीट बघून घेते. आणि कपड्यांच्या हॅंगरने अलगद भूभूला वर उचलते. माऊ येण्यापूर्वी रोजच्या दिवसात इतक्या प्रकारचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आईने स्वप्नातही केलं नसेल.  

माऊच्या खिडकीमध्ये दिवसभर काय काय घडामोडी चाललेल्या असतात याचा कुणी व्हिडिओ केला तर इतका मनोरंजक होईल ना!

 

12 comments:

Pankaj - भटकंती Unlimited said...

प्रॉब्लेम सॉल्विंग आम्हांलाही जमायला लागलंय. आमच्याकडे एक मेजर प्रॉब्लेम म्हणजे जमिनीवर असेल ते उचलून तोंडात घालणे. अगदी दोरा, एखादा केस, चुकार झुरळ आणि डास सुद्धा. परवा तर आई जागेवर उडाली पण पिलूडी पालीच्या पिल्लासोबत खेळत होती.


"माऊच्या खिडकीमध्ये दिवसभर काय काय घडामोडी चाललेल्या असतात याचा कुणी व्हिडिओ केला तर इतका मनोरंजक होईल ना!"
>> म्हणूनच मी तो Drift HD Ghost-S असं लांबलचक नाव असलेला कॅमेरा घेतलाय. आणि या अशा व्हिडिओचं डोक्यात आहे.
https://www.facebook.com/photo.php?v=1448768088727210

बघू जमेल कधीतरी.

Anagha said...

मस्त ! तुझ्याबरोबर मला माझ्या लेकीचे उद्योग आठवतायत ! :) :)

Gouri said...

पंकज, तोंडात घालणं अजूनही चालतं बरं आमच्याकडे. पालीचं पिल्लू अजूनतरी तिला भेटलं नाहीये हे नशीब आईचं.
तो व्हिडिओ लवकर बनव बरं! आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा क्रॅश कोर्स करायचा असेल तर लवकर माऊला भेटायला ये पिल्लूला घेऊन.

Gouri said...

अनघा, तुझी लेक पण अशीच उद्योगी होती का ग? माऊचे बाकी मित्र-मैत्रिणी एवढे शांत वगैरे वाटतात ना मला तिचे उद्योग बघितल्यावर!

aativas said...

एक व्हिडीओ कराच लवकरात लवकर आणि तो इथं अपलोड करा .. तशी वाचून कल्पना येतेय पण पाहणं जास्त रोचक असेल :-)

Pankaj - भटकंती Unlimited said...

प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स cannot be harnessed by any crash course, but experience!

Gouri said...

सविता, तुमची कॉमेंट वाचून लक्षात आलं ... खूप दिवसात तिच्या उद्योगांचा व्हिडिओ नाही केलेला. करायला हवा आता.

Gouri said...

पंकज, you will get sufficient problem solving experience in a day with Mau. :D It is like a crash course in living in the moment.

Anonymous said...

गौरे अजून तर सुरूवात आहे.... प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स हळूहळू जोमाने वाढतील :) .... आमच्या गौराक्कांच्या कालच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे या विचारात आहे मी अजूनही, .... ’ Sense Organs जसे शरीराला असतात तसे मनालाही असतात का ? कारण मी मनात कात बोलते ते माझं मला ऐकू येतं .... आणि असतात तर किती ? आणि नसतात तर मला मी बोललेलं ऐकू कसं येतं ? "

सांग आता :)

पोस्ट भारी :)

Gouri said...

तन्वे, अजून वर्षभराने गौराक्का आणि माऊ एकमेकीं शी काय बोलतील ते ऐकण्यासारखं असेल. ;)
आणि असे वरच्या वर्गातले प्रश्न नाही घालायचे बरं नुकत्याच शाळेत जायला लागलेल्यांना!

Mrudula said...

Gauri khup diwasani wachale tu lihilele. Chhan jamaley. Dolyapudhe ubhe rahile sagale :)

Gouri said...

मृदुला, सद्ध्या मी "खूप दिवसांनी" विषयी काही बोलू शकत नाहीये ... पुढची पोस्ट कधी टाकीन याचा भरवसा नसतो कारण! :)