Friday, January 16, 2015

ही तुझीच?आज एक गंमत झाली. एका आजींकडे मी माऊबरोबर गेले होते. त्यांनी मला विचारलं,
“ही तुझीच?”
“हो, माझीच.”
मग जरा वेळाने बोलता बोलता परत, “ही तुझीच?”
मला काही परत आलेल्या या प्रश्नाचा रोख कळला नाही. त्यांना कदाचित "जास्तीची माहिती" ऐकायची असावी असं वाटलं.
“हो. माझीच. Adopted.”

माऊसमोर असा उल्लेख करणं त्या आजींना काही आवडलं नाही. “तिला वाईट वाटेल असं नाही बोलू तिच्यासमोर.” त्यांचा सल्ला.

मला न पटलेला. तिला किंवा मला वाईट वाटावं असं काय आहे adopted असण्यामध्ये? मी तिची जन्मदात्री नसल्याने तिला किंवा मला आज काहीही फरक पडत नाही. पुढेही पडण्याचं कारण नाही. It is just a fact. यात कमीपणा वाटावा / अभिमान वाटावा असं विशेष काहीही नाही. याला विनाकारण लेबल कशाला लावायचं? यात मुद्दाम सांगून जाहिरात करण्यासारखं काहीच नाही, पण तिच्यापासून किंवा कुणापासून लपवून ठेवण्यासारखं तर नाहीच नाही.

कुठल्याही दोन वर्षांच्या उपद्व्यापी लेकीच्या आईइतकीच मी माऊवर कावते. आणि कुठल्याही दोन वर्षांच्या उपद्व्यापी लेकीसारखेच कारभार ती दिवसभर करत असते. आपल्या कुटुंबाविषयीची ही माहिती समजून वाईट वाटून घ्यायची उसंत आहे कुणाला इथे?

No comments: