Wednesday, November 18, 2015

चित्रदुर्गद कल्लिन कोटे...

टिपू सुलतानाचा त्रिवार निषेध!!!

“आयुष्यात पाहिलेच पाहिजेत”च्या लंब्याचौड्या यादीमध्ये तीन किल्ले बर्‍याच वर्षांपासून वरच्या टोकाला आहेत – सुरजमल जाटाचा अभेद्य असा भरतपूरचा किल्ला, दुसरा असाच केवळ फितुरीनेच जिंकता आलेला चित्रदुर्ग आणि आपल्या महाराष्ट्रातला हरिश्चंद्रगड. या तिघांपैकी एकाचंही दर्शन काही केल्या होत नव्हतं. मग यावेळी दिवाळीला कर्नाटकात जातांना मी नवर्‍याला एकदम अल्टीमेटमच देऊन टाकला ... या ट्रीपमध्ये मला (माझा) चित्रदुर्ग दाखवला नाहीस तर मी परत (तुझ्या) कर्नाटकात येणारच नाही! महाराष्ट्र - कर्नाटकाची सीमा ओलांडली, म्हणजे पुढच्या सगळ्या गोष्टी दाखवणं ही नवर्‍याची जबाबदारी असते. अजूनही मला कर्नाटकाचा भूगोल समजत नाही. त्यामुळे कुठून कुठे जायचं, कुठे रहायचं हे सगळं त्याचं डिपार्टमेंट असतं. आपण फक्त बघायचं काम करायचं! ;) चित्रदुर्गला चालायला खूप आहे, माऊला अजून झेपणार नाही म्हणून नको, तिथे ऊन फार असतं म्हणून नको, लांब आहे म्हणून नको असं करत इतकी वर्षं चित्रदुर्ग राहून गेला होता. 

तर अखेरीस या वेळी चित्रदुर्ग बघायचा मुहुर्त लागला आणि माझी दिवाळी झाली. चित्रदुर्ग पुणे – बंगलोर हायवेवर हुबळीहून २११ किमी आहे. बंगलोरहूनही साधारण तेवढंच अंतर. रस्ता सुंदर आहे, आणि पुणे – मुंबई, पुणे कोल्हापूर किंवा तुमकूर – बंगलोरच्या  मानाने गर्दी नाहीच. घाट प्रकारही नाहीच. सरळ गुळगुळीत मोकळा रस्ता. त्यामुळे बंगलोर किंवा हुबळीहून इथे तीन – साडेतीन तासात आरामात पोहोचता येतं. वाटेत बाजूला सूर्यफुलं फुललेली शेतं होती, मस्त पाण्याची तुंगभद्राही लागली, पण असं कुठेही वाटेत थांबणं नवर्‍याला मान्य नसल्याने या सगळ्यांकडे गाडीतूनच बघावं लागलं. कष्ट न करता चित्रदुर्ग पदरात पाडून घेण्यासाठी एवढी किंमत द्यावी लागणारच ना! 
रस्ता ... मख्खन!

गेस्ट हाऊस मधून दिसणारा किल्ला

किल्ल्याच्या समोरच केटीडीसीचं गेस्ट हाऊस आहे. त्याचं ऑनलाईन बुकिंग आदल्या दिवशी मिळालं होतं. गेस्ट हाऊस स्वच्छ, सर्व्हीस चांगली, खायला मेन्यू मर्यादित पण चव चांगली, किंमत वाजवी.
दोन – अडीचला तिथे जेवून किल्ला बघायला बाहेर पडलो. माऊने आतापर्यंत फक्त दिवाळीला विकत मिळणारे किल्ले पुण्यात बघितले होते, त्यामुळे “आई किल्ल्यावर माणसं पण आहेत का? (म्हणजे मावळे, शिवाजी महाराज वगैरे ठेवतात तशी) असा तिचा प्रश्न आला. आत शिरल्यावर मी तटबंदी वगैरे बघण्यात मग्न, नवरा गाईडच्या शोधात, तर माऊचा प्रश्न, “अग आई, पण किल्ला कुठे आहे इथे?” यालाच किल्ला म्हणतात हे काही फारसं पटलं नाही तिला. :)



हवा ढगाळ होती, पावसाची एक सरही येऊन गेली. त्यामुळे इतकी वर्षं ऐकून असलेल्या तिथल्या प्रसिद्ध उन्हाचा अजिबात त्रास झाला नाही. किल्ल्यावर हिंदी, इंग्रजी गाईड मिळतात. एक दीड तासात गाईडने किल्ला (पळवतच) फिरून दाखवला. त्याची माहिती सांगून झाली होती, पण एक एक जागा नीट बघायला मिळालेली नव्हती. ती परत येताना बघू, किंवा उद्या परत येऊन बघू अशी मनाची समजूत करून घेतली होती. या किल्ल्यावरचा प्रसिद्ध “मंकी मॅन” (कन्नडमध्ये “कोती राजा” म्हणतात त्याला.) आम्ही किल्ल्यात प्रवेश करत होतो तेंव्हाच नेमका बाहेर पडत होता. उद्या परत यायचंच आहे तेंव्हा तो भेटेल अशी आशा ठेवून पुढे निघालो. किल्ला अतिशय स्वच्छ ठेवलेला आहे. आणि तटबंदी, पायर्‍याची फारशी पडझड झालेली नाही. भुईकोट असल्याने बघायला बर्‍यापैकी गर्दी होती, पण कुठे “Vicky loves Pinky” गिरगिटून ठेवलेलं नव्हतं, कचराही नव्हता. किल्ल्यावर भरपूर माकडं आहेत. पक्ष्यांचे कॉलही भरपूर ऐकू येत होते. हंपीसारख्याच प्रचंड शिळा सगळीकडे पसरलेल्या. त्यातूनच चिरे घडवून तटबंदी, जोती वगैरे केलेली. या दगडाला एक सुंदर सोनेरी आभा आहे. वरचं बांधकाम विटांच आणि मातीचा गिलावा. हे फारसं शिल्लक नाही, फक्त कुठेकुठे अवशेष दिसतात.

मातीच्या भिंतीचे अवशेष
 आम्हाला किल्ल्यातली सगळ्यात प्रसिद्ध जागा – ओबव्वाची खिडकी – इथे सोडून, “आलात तसेच, त्या रस्त्यानेच परत जा” म्हणून गाईड गायब झाला. ही ओबव्वाची खिडकी म्हणजे पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी तटात सोडलेली भोकं आहेत. ओबव्वा ही मदकरी नायकाच्या एका सैनिकाची बायको. तिच्या नवर्‍यावर या भोकांच्या बाजूच्या बुरुजावर टेहळणीचं काम सोपवलेलं होतं. नवरा दुपारी जेवायला घरी आला, आणि ओबव्वा पाणी आणायला बाहेर पडली. तिला हैदरच्या सैनिकांची हालचाल जाणवली. पुढे होऊन बघते, तर त्या पाण्याच्या भोकांमधून सरपटत एक सैनिक किल्ल्यात प्रवेश करत होता. ओबव्वाने त्याच्या डोक्यात मुसळ घातलं आणि त्याला मारून टाकला. दुसरा सैनिक आला, त्याचीही तीच गत. नवरा जेवून आला, तेंव्हा ती मेलेल्या सैनिकांच्या मढ्यांच्या गराड्यात, हातात रक्ताने भरलेलं मुसळ घेऊन उभी होती! नवर्‍याने हल्ल्याची वर्दी दिली, आतलं सैन्य सावध झालं, आणि किल्ला वाचला. ही ओबव्वा आपल्या हिरकणीसारखी इतिहासात अमर झाली! तर ती पाण्याची भोकं पाहिल्यावर एवढ्याश्या भोकातून मोठा माणूस आत शिरेल यावर विश्वास बसेना. मग तिथे माऊसकट पूर्ण आत उतरून भोकांपर्यंत जाऊन पाहणं आलंच.  

ओबव्वाची खिडकी- पावसाचं पाणी जाण्यासाठीची जागा

ओबव्वाने शत्रूला बघितलंय! :)

इथे पोहोचेपर्यंत उद्या परत आल्यावर काय काय, कसं कसं बघायचं याची यादी तयार झाली होती मनात. गाईडने नुसत्या लांबून दाखवलेल्या कितीतरी जागा होत्या. भीम – हिडिंबेचा विवाह इथेच झाला अशी समजून आहे, आणि किल्ल्यावर हिडिंबेश्वराचं मंदिर आहे. ते नीट बघायचं होतं. किल्ल्यात एक सुंदर कातळ आहे, तो चढून गेल्यावर वर मंदिर, त्याच्या मागच्या बाजूला तलाव हे फक्त दुरून बघितलं होतं, तिथे माऊला जमत असेल तर चढायचं होतं. आणि मुख्य म्हणजे तटाच्या भिंटींवर माकडं चढतांना बघितली होती, तसाच चढणार्‍या त्या कोतीराजाचं आश्चर्य माऊला दाखवायचं होतं. 

पण इथे नेमका टिपू आडवा आला! टिपू प्रकरणामुळे चित्रदुर्ग गावातलं वातावरण तापलेलं होतं. दुसर्‍या दिवशी हिंदू संघटानांनी कर्नाटक बंद पुकारला होता अशी माहिती परततांना गेटवर आमचा गाईड परत भेटला त्याने सांगितली. मग नंतर बंद मागे घेऊन फक्त रास्ता रोको करण्याची घोषणा झाली. पण सकाळी लवकरात लवकर इथून बाहेर पडा, नाहीतर अडकून पडाल असा सल्ला गेस्ट हाऊसवरही मिळाला. उद्या बघण्याच्या सगळ्या प्लॅनवर पाणी पडलं. दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसातला परत निघालो. पावणेआठला गावात बाजार भागात पोहोचलो, तर जमावाने दुकानं बंद करायला ऑलरेडी सुरुवात केलेली होती. (पुण्यात कसं, पावणेआठला दुकानं मुळी उघडणारच नाहीत कुणी बंद करायला!!!) मुख्य चौक बंद होता. आजवर कन्नड भाषा विशेष चांगली न येण्याने माझं फारसं काही अडलेलं नव्हतं, पण समोरून संपूर्ण रस्ता आडवून घोषणा देत येणारे लोक काय म्हणताहेत ते न समजल्याने कसं बेचैन वाटतं हे लक्षात आल्यावर आपल्याला शिकली पाहिजे ही भाषा नीट, हे परत जाणवलं. कुठल्या कुठल्या गल्ली बोळातून अखेरीस आम्ही हायवेला लागलो, आणि मग पुढचा प्रवास अगदी निर्विघ्न झाला. तर आता उरलेला चित्रदुर्ग पुढच्या ट्रीपमध्ये ... सगळं या टिपू सुलतानामुळे!!!

***
"चित्रदुर्गद कल्लिन कोटे" म्हणजे चित्रदुर्गचा दगडी किल्ला. एका प्रसिद्ध कन्नड गाण्यातले हे शब्द. बहुधा राजकुमारचं गाणं. पुढचं मागचं काहीही मला आठवत नाहीये, पण गाणं मस्त आहे ते! गाण्याचं चित्रीकरण चित्रदुर्गच्या किल्ल्यात आहे, आणि त्यात ओबव्वाची गोष्ट सांगितलेली आहे. गाणं इथे बघता येईल.

4 comments:

aruna said...

खूप छान माहिती

Gouri said...

अरुणाताई, नक्की भेट देण्यासारखी आहे ही जागा!

Pankaj - भटकंती Unlimited said...

रोपवेने जाण्यासारखा असूनही रायगड तुझ्या लिस्टमध्ये नसल्याने तुमची असहिष्णू यादीत रवानगी गेली आहे ;-)

माहिती सुंदर आहे. चित्रदुर्गावरची मंदिरे फारच सुंदर आहेत. मस्तच वर्णन. चित्रदुर्ग गावात त्या लहानशा वेशीतून आत गेल्याबरोबर डाव्या हाताला लक्ष्मी टिफिन सेंटरमध्ये गरमागरम लुसलुशीत इडल्या आणि डोसा मिळतो. फारच उत्तम.

ओंडू सिंगल डोसा!

Gouri said...

पंकज, पुढच्या वेळी खाल्ला पाहिजे तो डोसा आणि इडल्या!
रायगड या यादीत नाही. तो "पुन्हा बघितलाच पाहिजे"च्या यादीत आहे. :) अडचण हीच आहे - पहिल्या यादीतल्या गोष्टी दुसर्‍या यादीत जाऊन गर्दी करत राहतात. :D