Monday, June 27, 2016

तोडीस तोड!




काल टेकडीवर गेलो होतो आम्ही. नुकतीच एक जरा मोठी सर येऊन गेली होती पावसाची, आणि जरा उशीरही झाला होता. त्यामुळे टेकडीवर फारसं कुणी नव्हतं. माऊ आणि तिच्या सखीचं डबक्यात खेळून झालं आणि मग खाऊ खायची वेळ झाली. तेवढ्यात माऊला तिथे एक आजोबा दिसले.
“आजोबा तुम्ही काय करताय?”
आजोबा सिमेंटचं रिकामं पोतं निरखून बघत होते.
“सिमेंटची किंमत बघतोय मी!” आजोबांचं उत्तर. अर्थात यावर “कशाला” हा प्रश्न आलाच पाहिजे नाहीतर माऊ कसली! तर या “कशाला?” ने जी गाडी सुरू झाली, ती माऊ आणि सखीचं नाव, यत्ता, शाळा, वय, घर, (फ्लॅट नंबर सकट!) अशी नेहेमीची स्टेशनं घेत आजोबा कुठे राहतात पर्यंत आली. साधारण इथवर समोरच्याचा पेशन्स संपतो, आणि काहीतरी सबब सांगून आपली सुटका कशी करून घ्यायची याची धडपड सुरू होते. पण आजचे आजोबा माऊच्याच जातीचे निघाले. “चल माझ्या घरी, माझ्या नातवाशी ओळख करून देतो तुझी!” ते म्हणाले, आणि माऊ अर्थातच एका पायावर तयार झाली. नेहेमी टेकडी उतरतांना मी माऊचा हात सोडत नाही, कारण उड्या मारत उतरतांना आमचं समोर लक्षच नसतं. आज मात्र आजोबा म्हणाले, “उतरू देत की! फार तर काय होईल? धडपडेल आणि खरचटेल. खरचटू देत!” माऊ लगेल पडत्या फळाची आज्ञा घेऊन बागडायला मोकळी.:) टेकडी उतरल्यावर अर्थातच माऊने आजोबांना आपली गाडी दाखवली, तुम्हीसुद्धा आमच्या गाडीतूनच या म्हणून फर्मान सोडलं. तेही कुठलेही आढेवेढे न घेता गाडीत बसले.
“आजोबा, गाडीत काही पाऊस लागत नाही, रेनकोट काढा!” - आजोबांनी रेनकोट काढला.
आजोबांचं घर आलं. मी माऊला त्यांना टाटा करायला सांगणार, एवढ्यात आजोबा म्हणाले, “चल घरी, माझ्या नातवाला भेटायचंय ना!”
माऊ तर काय एका पायावर तयारच! शेवटी आजोबांचं घर बघायला मावशी त्या दोघींना घेऊन गेली. गाडी पार्क करून बराच वेळ झाला, अजून या का येत नाहीत म्हणून शेवटी मी जाऊन बघते तर आजोबांच्या बेडरूममध्ये यांच्या गप्पा चाललेल्या. (ते चिखलाने माखलेले पाय वगैरे फालतू गोष्टी माऊ, सखी आणि आजोबा तिघांनाही न दिसणार्‍या. आई उगाचंच असली काहीतरी खुस्पटं काढत असते!) मग त्यांच्या हॉलच्या खिडकीतून सोफ्यावर, तिथून खाली अश्या उड्या मारून झाल्या, खाऊ खाऊन झाला, आणि अखेरीस आम्ही जायला निघालो तर आजोबांनी नातवाला विचारलं, “तुला बघायचं ना या तायांचं घर? चल आपण जाऊ यांच्याकडे! अरे चालत नाही, गाडीतून जायचंय!” अर्थातच त्याला घरी येण्यासाठी मनवणं हे माऊचं कर्तव्य. अशा रीतीने मग माऊ – सखी, सखीची आई, आजोबा, नातू आणि मी गाडीच्या दिशेने निघतो. गेटबाहेर आल्यावर आजोबांना आठवतं, आपली छत्री विसरली. ते छत्री घ्यायला मागे फिरल्यावर नातवाचा विचारही फिरतो आणि तो भूर जायला ठाम नकार देतो. आता हे घरी येणार, मग त्यांना सोडायला आपण परत इकडे येणार या विचाराने इकडे मला आणि सखीच्या आईला घाम फुटलेला असतो. अखेर आजोबांचा नातू आमची सुटका करतो :D :D :D