Sunday, October 23, 2016

माऊसोबत कंदिल!

या वर्षी कंदिल माऊला सोबत घेऊन करायचा प्लॅन होता. म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा तशी तिला सोबत घेऊनच सुरुवात केलेली होती, पण तिचे कारभार आणि माझा पेशन्स हे दोन्ही बघता लवकरच तिची रवानगी बाबाकडे झाली होती. या वेळी शक्यतो पूर्णवेळ तिला सोबत ठेवून, रागवारागवी होण्याची वेळ न येता (!) हे व्हावं असं वाटत होतं. गेल्या वर्षभरात माझ्या पेशन्समध्ये न झालेली वाढ, आणि तिचे कमी न झालेले उपद्व्याप बघता हा अतीव महत्त्वाकांक्षी बेत होता. पण तरीही. (काशीस जावे, नित्य वदावे :)

तर त्यामुळे कंदिल सोप्यात सोपा हवा. करायला लागणारा वेळ कमीत कमी हवा. तो रंगीबेरंगी असावा म्हणजे माऊला त्यात जास्त रस वाटेल. आणि तिला करण्यासारखं काहीतरी काम त्यात असावं अशी रिक्वायरमेंट लिस्ट घेऊन सुरुवात केली. साधा सोप्पा करंज्यांचा कंदिल करायचा ठरवला. पुन्हा एकदा, पतंगाचे चार रंगांचे कागद घरातच सापडले. (इतक्या वेळा मला कागद घरातच कसे सापडतात? ते बहुतेक घरातच जन्माला येत असावेत. विकत आणल्याचं अजिबात आठवत नाहीये. आणि मागे असे कागद वापरून कंदिल केला त्याला किमान पाच वर्षं झालीत.)

पूर्वतयारी म्हणून या कागदांचे ६”x६” असे प्रत्येक रंगाचे ६ असे एकून २४ चौरस कापून घेतले. तितक्या करंज्या बहुतेक पुरतील असं वाटलं. या चौरसाच्या कडांना काही कोरीव काम करणं / त्यावर रंगवणं टेक्निकली शक्य आहे, पण आजच्या प्रायॉरिटीमध्ये नाही असं ठरवून त्या सगळ्या कल्पना निकराने बाजूला टाकण्यात आल्या!

मग आतला सिलेंडर बनवायला २१”x९” असा कार्डशीट घेतला (हा ही घरातच होता ... पण मला आठवतोय विकत आणलेला!) त्याला रुंदीच्या ९ इंचातले दोन्ही बाजूचे साधारण दीड दीड इंच सोडून मधल्या भागात प्रकाश बाहेर येण्यासाठी मोठे अंडाकृती काप दिले. (यातलं काहीही बाहेरून दिसणारं नाही, त्यामुळे या आकाराने / कागदाच्या रंगाने काही फरक पडणार नव्हता – फक्त भरपूर प्रकाश त्यातून बाहेर आला पाहिजे एवढीच काळजी घेतली. मग त्याची टोकं स्टेपल करून सिलेंडर बनवला. कार्डशीट वापरला तरी या सिलेंडरला फार जीव वाटत नव्हता. कसाबसा वेडावाकडा उभा होता तो. एव्हाना एका जागी बसण्याचा माऊचा पेशन्स संपायला आला होता. त्यामुळे या सिलेंडरला अजून बळकटी आणावी / नवीन बनवावा याचा विचार करायला फुरसत नव्हती.

आता माऊचं काम. तिच्या बरोबर पतंगाच्या कागदाच्या चौरसाच्या करंज्या बनवल्या.

मग त्या सगळ्या करंज्या सिलेंडरला चिकटावल्या.   

वरच्या बाजूने चिकटवायला सोनेरी कागद घरात नव्हता. (कसा काय? हा घरात तयार होत नाही बहुतेक!). मग तिथे केशरी रंगाचा हॅंडमेड पेपर (मागच्या वर्षीच्या कंदिलातला उरलेला :) ) स्टेपल केला. आता सिलेंडरला जरा जीव आला.

खालच्या बाजूने शेपट्यासाठी पतंगाच्या कागदाच्या पट्ट्या कापून तो चिकटवला. त्याच्या वरून केशरी हॅंडमेड कागदाची पट्टी चिकटवली.

कंदिल टांगण्यासाठी वरच्या बाजूला दोन भोकं केली, दोरा ओवला. कंदिल तय्यार! :)

कंदिल करतांना स्टेप बाय स्टेप फोटो वगैरे काढणं सुचलंही नाही.  तो वर करंज्यांचा फोटो आहे त्या उरलेल्या. आम्ही पुरेश्या दाट लावल्या नाहीत बहुतेक. २० पुरल्या, ४ उरल्या. त्यांना माऊ सद्गती  देईल.

साधारण पावणेदोन वाजता मी चौकोन कापायला घेतले, आणि चार वाजता कंदिल तयार झाला. म्हणजे सव्वा माणसांनी कंदिल करायला सव्वा दोन तास लागले.

शेपट्या कापतांना माऊची पाठवणी बाबाकडे झालीच, पण बाकी कंदिल विशेष रागवारागवी (आणि  उपद्व्याप न होता) दोघींनी एकत्र बसून केलाय! कंदिल कसा का दिसेना, या ऍचिव्हमेंटवर मी जाम खूश आहे!!!

6 comments:

विशाखा said...

Chhan ch!
Me pan gelya varshi amcha 'bokya' sobat kandil kela hota :) pan majha atee ambitious plan mule designch chukale hote!
At least it involved 'poking holes' into construction paper by the little one :)

Gouri said...

विशाखा, ब्लॉगवर स्वागत! गेले काही दिवस नेट नव्हतं माझ्याकडे त्यामुळे प्रतिक्रियेला उत्तर देता आलं नाही.
पोरांबरोबर असं काही करतांना तयार होणारा कंदिल हे बायप्रॉडक्ट असतं. कंदिल करतांना किती मजा आली ते जास्त महत्त्वाचं, नाही का? ;)

Poornima said...

Aga sundarach ahe..me pan karen pudhalya varshi..kitti majja ali he mahatvache..agadi agadi..
Sorry apali olakh nahiye..pan ha blog vachate me..Poornima

Kavs said...

haha! phaar majja ali vachtana :) Amchya upadvyapi ratnala tila dilele kaam sodun aai che kaamach karayche aste. Mag project purnatvala jaatach nahi! but it's still fun.

Gouri said...

पौर्णिमा, Kavs, दिवाळीची सगळी सुट्टी मी भटकते आहे. त्यामुळे इकडे फिरकलेच नाहीये, तुमच्या प्रतिक्रियांना उत्तरं लिहायला उशीर झालाय मग.
पौर्णिमा, अग प्रत्यक्ष भेटलं नाही, तरी ब्लॉग वाचला की ओळख होतेच, नाही का? :)
Kavs, दिलेलं काम सोडून आईचं काम हे माऊचंही असतंच. हल्ली मग मी तिने करायचं काम तिला देतच नाही, मीच करणार आहे म्हणते ;)

Sakhi said...

झकास ...
कंदील सुंदरच पण मिळून बनवण्याचा कल्पकपणा आणि करताना आलेली मज्जा हे मस्त प्रकरण ... !!
दिवाळीच्या शुभेच्छा !!