Thursday, January 12, 2017

अडाणी

आजोबा नातवाबरोबर बससाठी थांबलेले होते. नातवाची मैत्रीण अजून आली नव्हती. नातवाने विचारलं, “आजोबा, ती केंव्हा येणार?” बसची वेळ होत आलेली. मैत्रीण यायलाच हवी खरं तर. येईलच आता. मला वाटलं आजोबा हेच सांगणार नातवाला. आजोबांनी काय सांगावं? “बघ, बघ, लिफ्टचा आवाज येतोय. लिफ्टमध्येच आहे ती, येईलच आता!”

नातू लहान आहे आजोबांपेक्षा. त्याचे कान आजोबांपेक्षा नक्कीच तिखट असणार. लिफ्टचा आवाज येत नाहीये हे त्याला नक्की समजणार. आजोबा आपल्याशी विनाकारण खोटं बोलले हे समजल्यावर सहज, विनाकारण थापा कशा मारायच्या हे सहज शिकून जाईल नातू. आजोबांनाही गुरुदक्षिणा म्हणून एखादी लोणकढी ऐकायला मिळेल लवकरच.

अजून एक छोटी मैत्रीण. तिला सांभाळणार्‍या ताईकडे सोपवून आई नोकरीला जाते. ताई तिला थोड्या वेळाने शाळेत सोडते. गेले काही दिवस छोटीला शाळेत जायला नको वाटतंय. ती घरातून निघायलाच तयार होत नाही शाळेत जायचं म्हटल्यावर. ताईने काय करावं? ताई तिला म्हणते, “चल आपण बागेत खेळायला जाऊ!” मग छोटी आनंदाने निघते घरून. पण घराबाहेर पडल्यावर तिला बागेत नाही, शाळेत जायला लागतंय रोज. शाळेत जायच्या आधीच ताईने लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा नसतो हे चांगलं शिकवलंय तिला.

शाळेत लेकाला सोडायला आलेली आई. नेहेमीचाच सीन – लेकाला शाळेत जायचं नाहीये. आई त्याला सांगतेय – शाळेत गेलं नाही तर वॉचमन दादा अंधार्‍या खोलीत कोंडून ठेवतात! घाबरून मुलगा शाळेत जातो. शाळेत जाणं हा अंधार्‍या खोलीला पर्याय बनतोय त्याच्यासाठी. पण आई खूश आहे – मुलाला कुरकुर न करता शाळेत पाठवण्याचा सोप्पा मार्ग सापडलाय तिला.

दुर्दैवाने मला लहानपणी कधी आईने शाळेत जायला पर्याय नसेल तर “तुला शाळेत जावंच लागेल” म्हणूनच ठणकावून सांगितलंय, बागुलबुवा किंवा अंधार्‍या खोलीत कोंडून ठेवणार्‍या वॉचमनच्या गोष्टी सांगितल्या नाहीत. साखरेत घोळवून सांगणं, वाईट वाटेल, रडू येईल, आपण वाईट दिसू म्हणून खरं न सांगणं असल्या गोष्टी तिला यायच्याच नाहीत अजिबात. लहान मुलांचं नाजुक मन सांभाळणं शिकलीच नव्हती ती बहुतेक.  त्यामुळे अमुक गोष्ट केली नाही तर शिक्षा मिळणार असली, तर तो अगदी खरा खुरा, जाणवणारा धपाटा मिळण्याची खात्री असायची, बुवा येईल आणि तुला घेऊन जाईल अशी न दिसणारी, कल्पनेतली भीती घालताच आली नाही तिला.

आईचं चुकलंच. अजूनही मला खोटं बोलता येत नाही – पांढरं / करडं/ काळं – कुठल्याच रंगाचं - अगदी माऊशी सुद्धा! कधी शिकणार मी आता? आणि माऊला कधी शिकवणार?

2 comments:

Poornima said...

me agadich relate karu shakale..mazi aai pan ashich..tyamule mala pan lekishi khota bolata yet nahi ani avadat pan nahi..pan gharatalyanche mhanane asate ki atta kashala radavayche tila..
pan tyamule ticha vishvas ahe me bolate tyachyavar..ajun vay varsha 4 ch ahe arthat 😊

Gouri said...

पौर्णिमा, माऊ पण सव्वा चार वर्षांचीच आहे! पण कुणीतरी आपल्याशी खोटं बोलतंय असं वाटलं तर ती सरळ येऊन मला विचारते.

एक दोन वेळा असं झालंय की मी लोकांना सांगितलंय तिला खरं काय ते सांगा, तरीही तिला रडवायला नको म्हणून ते खोटं बोलतात. म्हणजे माऊ बाहेर जायचा हट्ट धरून बसली, तर "मी जरा खाली जाऊन येतो, मग तुला घेऊन जाईन" प्रकारातलं. पण आत्ता रडवायचं नाही म्हणून असं बोलायचं, नंतर तिला आपल्याला फसवलं हे कळणं जास्त वाईट. मी त्यांच्या समोर सुद्धा माऊला सांगते ते खोटं सांगताहेत म्हणून!
:)