Wednesday, March 8, 2017

ग्वाल्हेर

भटकंतीचा प्लॅन करतांना तसं बघायचं होतं ते खजुराहो आणि भरतपूर, मग ग्वाल्हेरला थांबायचं काय कारण? बाबांचा जन्म ग्वाल्हेरचा. त्यांचं लहानपण तिथेच गेलेलं. काका, आत्या तिथेच रहायचे. अजूनही आतेभाऊ – वहिनी तिथे आहेत. त्यामुळे त्यांना, त्यांच्या कुत्र्याला आणि बागेला भेटणं हे पण भटकंतीमधले महत्त्वाचे आयटम होते. वैनीने जुने फोटो दाखवल्यामुळे अजूनच मजा आली.
आजोबा
ग्वाल्हेरचा गावाशेजारी छोट्या टेकडीवर वसलेला किल्ला गवळ्यांच्या राजाने बांधला असं म्हणतात. किल्ला बराच जुना – म्हणजे किमान १०व्या शतकाइतका तरी जुना आहे. किल्ल्याचा विस्तार भरपूर मोठा - म्हणजे अगदी अवाढव्य म्हणण्यासारखा -  आहे. किल्ल्यावर एक बरीच जुनी आणि प्रसिद्ध शाळा (सिंदिया स्कूल) आहे, लोकवस्ती आहे. किल्ल्यावर येण्यासाठी उरवाई दरवाजा आणि हाथी पोल असे दोन मार्ग आहेत. उरवाई दरवाजाकडून चढताना वाटेत जैन लेणी कोरलेली आहेत. गाडी वरपर्यंत जाते, वरही बर्‍याच भागात फिरू शकते.

किल्ला तसा पूर्वी अनेक वेळा बघितलेला. पण दर वेळी पायी फिरताना किल्ला अर्धाच बघून झाला होता. आजवर किल्ला बघितला होता म्हणजे मानमंदिर, गुजरी महाल आणि तेली का मंदिर, सास-बहू मंदिर. जुना किल्ला बघायचा राहूनच गेला होता. या वेळी किल्ल्याचा सगळा जुना भाग बघितला. (अजूनही पूर्ण किल्ला बघून झालेला नाही!)

हा किल्ल्याचा सगळ्यात प्रसिद्ध भाग – मानसिंग तोमर राजाचा राजवाडा, (मृगनयनी वाला राजा मानसिंग) म्हणजे मानमंदिर:








इथल्या सजावटीचे रंग अजूनही ताजे आहेत. सँडस्टोनमध्ये सुंदर नक्षी कोरलेली आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात या दगडाचा रंग सुंदर सोनेरी दिसतो. सोळाव्या शतकातलं बांधकाम असूनही विशेष पडझड झालेली नाही. (हा किल्ला कधी लढलाच नाही – जो कुणी शत्रू येईल त्याच्या आधीन झाला. मग पडझड कशी होणार?)

मानमंदिराकडून खाली ग्वाल्हेर दरवाजाकडे गेलं म्हणजे गुजरी महाल येतो. हा मानसिंग राजाच्या लाडक्या गुजरी राणीचा (म्हणजे मृगनयनीचा) महाल. या महालात स्थापत्य म्हणून विशेष काही बघण्यासारखं नाही, पण इथे पुरातत्व संग्रहालय आहे – अनेक जुन्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. हे सगळं पूर्वी बघितलेलं असल्यामुळे या वेळी तिकडे गेलोच नाही. त्या ऐवजी जुना किल्ला बघायला गेलो.

जुना किल्ला म्हणजे कर्ण महाल, विक्रम महाल, भीमसिंगची छत्री, जोहार कुंड हे भाग. (खरं तर कर्ण सिंग आणि विक्रम सिंग हे दोन्ही राजे मानसिंगच्या नंतरचे. मग या भागाला जुना किल्ला का म्हणत असावेत?) या भागांविषयी अगदी कमी माहिती इथे लिहिलेली आहे. (मागे गाईड घेऊन फिरलो होतो, गाईडनेही काही सांगितलं नव्हतं.) एवढं मोठं जोहार कुंड या किल्ल्यावर आहे – कुणी, कधी जोहार केला इथे? याविषयी अवाक्षर नाही. गुगल केल्यावर समजलं, की तेराव्या शतकात अल्तमशने किल्ल्यावर हल्ला केला तेंव्हा इथे जोहार झाला होता. तेंव्हाचा राजा, जोहार करणार्‍या राण्यांची नावं सापडली नाहीत.
 
कर्ण महाल


विक्रम महाल




भीमसिंहाची छत्री आणि समोर जोहार कुंड

जहांगीर महल
हे सगळं पाहून किल्ल्याच्या दुसर्‍या टोकाला असणारं सास-बहू मंदिर (सहस्रबाहू मंदिर) बघायला गेलो. हे सुंदर मंदिर मला मानमंदिरापेक्षाही आवडतं. (गुगलल्यावर मिळालेल्या माहितीप्रमाणे हे मंदिर ११व्या शतकात कच्छवाह राजा महिपालाने बांधलं. हे सहस्रबाहू विष्णूचं मंदिर आहे. मंदिरावर आतून बाहेरून सुंदर कोरीवकाम आहे. मोठया मंदिराशेजारी एक छोटं याच शैलीमधलं मंदिर आहे. अशी दंतकथा सांगतात की राजाने पत्नीसाठी मोठं विष्णूमंदिर बांधलं तर छोटं शंकराचं मंदिर शिवभक्त सुनेसाठी बांधलं, म्हणून या मंदिरांना सास-बहू मंदिर म्हणतात.)
हे मोठं (सासूचं!) मंदिर





छतावरचं कोरीवकाम

छोटं (बहू) मंदिर

सास बहू मंदिराच्या जवळच किल्ल्यावरचं सगळ्यात प्राचीन आणि उंच असं तेली का मंदिर (तेली की लाट) नावाचं विष्णू मंदिर आहे. मिहिरभोज राजाच्या राजवटीमध्ये (९ वं शतक?) हे मंदिर बांधलं होतं. वेळेआभावी या भेटीत हे मंदिर बघायचं राहून गेलं. शिख गुरू हरगोबिंद यांच्या नावाचं एक गुरुद्वाराही (गुरुद्वारा दाता बंदी छोड साहिब) मंदिरावर आहे. गुरू हरगोविंद यांना ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर जहांगीरने कैदेत ठेवलं होतं. जहांगिर खूप आजारी पडला, पण गुरू हरगोबिंद यांनी प्रार्थना केल्यावर तो बरा झाला. जहांगीराने गुरूंची आणि त्यांच्या सोबत असणार्‍यांची मुक्तता करायचं ठरवलं. तेंव्हा गुरूंनी ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर बंदी असणार्‍या ५२ राजांना आपल्यासोबत सोडवण्यासाठी ५२ बंद असणारा अंगरखा घातला, आणि हे राजे एक एक बंद धरून गुरूंच्या सोबत तुरुंगातून बाहेर पडले! गुरुद्वारामध्ये अर्थातच मस्त लंगर मिळतं. वेळेआभावी इथेही जाता आलं नाही, हेही पुढल्या भेटीत.

ग्वाल्हेरला झाशीच्या राणीची समाधी आहे, ती माऊला बघायची होती. (पुण्याहून निघाल्यापासून गाडीत सारखं “रे हिंदबांधवा” आणि “बुंदेले हरबोलों के मुह” चाललं होतं!) झाशीला सर ह्यू रोझचा वेढा पडल्यावर राणीने किल्ल्याच्या तटावरून तिच्या बादल घोड्यासकट उडी मारली. घोडा दगावला, राणी वाचली. तिथून राणी काल्पीला गेली. काल्पीला पुन्हा इंग्रजांकडून पराभव झाल्यावर राणी, तात्या टोपे आणि इतर सेनानी ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेरहून शिंदे आग्र्याला पळून गेले होते. ग्वाल्हेर स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या सैनिकांच्या ताब्यात होतं. ग्वाल्हेर ताब्यात आल्यावर बंडखोरांनी नानासाहेबांना पेशवे जाहीर केलं आणि शांत बसले. इंग्रजांच्या होऊ घातलेल्या हल्ल्यासाठी त्यांना तयार करण्यात राणीला अपयश आलं. अपेक्षेप्रमाणे इंग्रजांचा हल्ला झाला, ग्वाल्हेरच्या फूल बाग भागामध्ये राणीच्या नेतृत्वाखालच्या सैन्याला इंग्रज सेनेने हरवलं, या लढाईत “भारतीय सेनानींपैकी सर्वात धोकादायक” अशा राणीला वीरगती प्राप्त झाली. फूल बागमध्ये राणीचं स्मारक बघितलं. इथे राणीचा अश्वारूढ पुतळा आहे. (बालगंधर्व चौकात आहे तसाच, तेवढाच.) स्मारकावरही “रे हिंदबांधवा ... “ कोरलेली आहे. (या कवितेचे कवी भा रा तांबे हे ग्वाल्हेरचे राजकवी होते.) या स्मारकाच्या समोरच्या मोकळ्या मैदानावर दर वर्षी राणीचा स्मृतीदिन साजरा केला जातो. (स्मारक रात्री बघितलं, त्यामुळे तिथले फोटो नाहीत.)

जयविलास पॅलेसमध्ये शिंदे सरकारचं संग्रहालय आहे. पॅलेस, आवार भव्य आणि उत्तम निगा राखलेलं आहे. संस्थानिकांचे आजचे वारस या पॅलेसच्या भागातच राहतात. इथे माऊला शिंद्यांच्या जेवणाच्या टेबलावरची सुकामेव्याची रेल्वेगाडी दाखवायची होती. त्यामुळे पॅलेस म्युझियमला जायचं ठरलं होतं. पण बाहेरून जितकं भव्य आणि नेटकं वाटलं, त्या मानाने आतल्या संग्रहालयाने निराशा केली. संग्रहालयामध्ये कुठेही माहिती लिहिलेली नाही – तुम्ही हवं तर गाईड घेऊन बघावं अशी अपेक्षा आहे. तसंही माऊला घेऊन सगळं संग्रहालय बारकाईने बघणार नव्हतोच, पण तिला दाखवायच्या रेल्वेगाडीने पण निराशा केली. एकीकडे डायनिंग टेबलवर गाडीचे रूळ घातलेले, दुसरीकडे गाडी काचेच्या कपाटात बंद करून ठेवलेली. ती कशी चालायची आणि त्यावरच्या वस्तू उचलल्यावर कशी थांबायची हे नुसतं स्क्रीनवर बघायचं! हे तर तिला घरी बसूनही बघता आलं असतं.
जयविलास पॅलेस


पॅलेसच्या आवारातलं नारिंगीचं झाड

कुंती सगळीकडे फुललेली होती.
ग्वाल्हेरला आल्यावर बघण्याइतकंच महत्त्वाचं काम म्हणजे खाणं – पिणं. चाट, कुल्फी – फालुदा – रबडी, गजक ही इथली खासियत. त्यामुळे भरपूर पेटपूजा झाली. पुढच्या भेटीत काय काय बघायचं आणि काय काय खायचं हे ठरवून झालं, आणि मग उरलेल्या भटकंतीसाठी निघालो.

No comments: