Friday, August 4, 2017

माऊचा मित्र :)

काल अचानक माऊचा एक मित्र तिच्याशी खेळायला घरी आला होता. हा माऊचा अगदी लाडका मित्र आहे. तो छोटा असताना माऊने त्याला अगदी कौतुकाने मांडीवर वगैरे घेतलंय. आता तो मांडीवर घ्यायच्या आकाराचा राहिलेला नाही, माऊपेक्षा मोठ्ठा झालाय, पण म्हणून काय झालं, माऊ ताई आहे ना त्याची! कधीही सोसायटीत खाली खेळताना, टेकडीवर, पार्किंगमध्ये – कुठेही तो दिसला की माऊ त्याला भेटायला धावत सुटते. त्याच्या बरोबर त्याचा दादा असतोच. दादाशी गप्पा मारत मित्राशी खेळणं चालतं. हल्ली कधीकधी माऊला जाणवायला लागलंय आपला दोस्त मोठा झाल्याचं. त्यामुळे मग मधेच तिला भीती वाटते त्याच्याशी खेळायची. पण त्याला भेटायचं तर असतंच.

तर हा मित्र काल रात्री एकटाच घरी येऊन थडकला. सोबत दादा नव्हता. रात्री उशीरा माऊ अगदी झोपायला आली होती, तेंव्हा दार वाजलं. बाबाने बघितलं, तर दारात हा उभा! माऊने लग्गेच ओळखलं त्याला. याचं घर सोसायटीच्या अगदी दुसर्‍या टोकाला, नेमका फ्लॅट नंबर मलाही माहित नाही. याला माऊचं घर कसं सापडलं असेल? लिफ्टमधून एकटा आला, का एवढे जिने चढून आला? काही हा असेना, आता एवढा भेटायला आलाय म्हटल्यावर त्याला दारात कसा ताटकळत ठेवणार? दार उघडल्याबरोबर तो आपलंच घर असल्यासारखा आत शिरला. जरा भांबावला होता, पण त्याच्याशी बोलल्यावर एकदम निवांत झाला. घरभर फिरला. माऊ रंगीत खडू घेऊन काहीतरी चित्र काढत बसली होती, त्यातला एक लगेच मटकावला त्याने. मग बाकी घराचं इन्स्पेक्शन सुरू झालं. एकीकडे माझं चाललं होतं, “एका ठिकाणी बस. दादा कुठंय तुझा? तू एकटाच कसा आलास? तुमची चुकामूक झालीये का? पाणी वगैरे हवंय का तुला? बाहेर गॅलरीमधून आपण दादाला हाक मारू या का?” पण त्याला ऐकायला वेळ कुठंय! माऊचा बाबा त्याच्या दादाला शोधायला निघाला. वॉचमन काकांना पण त्याने फोन केला हा एकटाच इकडे आलाय म्हणून. इकडे याने मग माऊच्या खेळण्यांकडे मोर्चा वळवला. माऊच्या खेळण्यांमधला मोठ्ठा गुलाबी बॉल त्याला भलताच आवडला. पण तो खेळायला घेतल्याबरोबर त्याला दात लागून फुस्स करून एकदम हवाच गेली त्याची. मग दुसरा कडक बॉल घेऊन त्याच्याशी मस्त खेळत बसला तो. त्याच्या पाठोपाठ माऊ घरभर लाह्यांसारखी तडतड उडत होती. त्याचा दादा आला, त्याला हाक मारली,” बघीरा!” पण हे महाराज आपले बॉलशी खेळण्यातच मग्न. आपला दादा हरवला होता, आपण नवीन ठिकाणी आलोय, आपल्याला घराचा रस्ता माहित नाहीये, कशाची पर्वा नाही त्याला. मित्र मैत्रिणी भेटले, की आम्ही खूश! अल्सेशियन असला, तरी माऊच्याच जातीचा आहे म्हटलं तो!

******
नंतर त्याच्या दादाने सांगितलं - हे दोघं नेहेमीसारखे रात्री फिरायला बाहेर पडले. बघीरा नेहेमीसारखा धावत, पण आज दादाच्या पायाला लागलं होतं, त्यामुळे तो मागे पडला. तोवर हा एकटाच पुढे आला. बघिराला एवढे जिने चढायला आवडत नाहीत. म्हणजे बहुतेक समोर लिफ्ट उघडी असावी तिच्यामध्ये शिरला, आणि लिफ्ट बंद होऊन वर आली. एकटा लिफ्टमधून येतांना घाबरला असणार नक्कीच. पण नीट बाहेर पडला. आणि मग त्याने पायाने बरोबर माऊच्याच घराचा दरवाजा कसा वाजवला त्यालाच माहित!

2 comments:

हेरंब said...

हाहाहा मस्तच

Gouri said...

हेरंब, अजून पुढची गंमत ऐक. हा किस्सा ऐकल्यावर माऊच्या सखीने बघिराशी (आणि माऊशी पण) कट्टी घेतली - तो तिच्याकडे का गेला नाही म्हणून!