Monday, August 7, 2017

सदिच्छा!

माऊला टेकडीवर जायला खूप आवडतं, पण सकाळी कधी मी तिला टेकडीवर नेत नाही. सुट्टीच्या दिवशी सकाळी टेकडी म्हणजे माझा एकटीचा वेळ असतो. आपल्या गतीने, इकडची तिकडची झाडं बघत टेकडी चढायची, वर फिरायचं आणि घरी परत यायचं म्हणजे माझ्यासाठी एकदम ध्यान केल्यासारखं असतं. सकाळी मोकळ्या हवेत पाय जितके चालतील तितका डोक्यातल्या कचर्‍याचा निचरा होतो! असं मस्त फिरून परत आल्यावर जे काही वाटतं, त्याला तोड नाही असं माझं मत आहे! अर्थात ही चैन रोज करायला मिळत नाही, फक्त सुट्टीच्या दिवशीच ही संधी मिळते. त्यामुळे हा वेळ कुणाबरोबरही शेयर करायला मी अर्थातच नाखूश असते. अगदी माऊसोबत सुद्धा. माऊला घेऊन मी संध्याकाळी परत एकदा टेकडीवर जाईन, पण सकाळी तिला बरोबर घेणार नाही!

तरीही कुणीतरी वाटेत भेटतं, चार शब्द बोलतं. तितपत तंद्री मोडणं मी चालवून घेते. मागच्या वेळी मात्र गंमत झाली. टेकडीवर नियमित येणारे अगदी रोज, सकाळ – संध्याकाळ येणारेसुद्धा लोक आहेत. त्यातले थोडेफार लोक (माझं आजूबाजूच्या लोकांकडे कधी लक्ष नसतं, तरीही) मला ओळखतात. त्यातले एक आजोबा. खरं तर तरूण आजोबा म्हणायला हवे असे. कारण निवृत्त झालेत, पण उत्साह तरुणासरखा आहे त्यांचा. भलतेच गप्पिष्ट. बरेच वेळा दिसतात, दिसले की दोन शब्द नक्कीच बोलतात. दोन चार वेळा अगदी मला थांबवून सुद्धा गप्पा मारल्यात त्यांनी. खूप कळकळीने बोलतात, त्यांच्या विषयात त्यांना बरंच काही माहित असतं, काही चांगलं व्हावं अशी मनापासून इच्छा असते. तर आज हे आजोबा अगदी चढायला सुरुवात करतानाच भेटले. चालतांना मी फारसं बोलत नाहीच, पण चढताना तर नाहीच नाही. तोंड किंवा पाय एकच काहीतरी चालू शकतं माझं एका वेळी. आजोबांचं स्वगत चालू होतं, मी आपली अगदीच शिष्टपणा वाटू नये इतक्या वेळा एकाक्षरी प्रतिसाद देत होते. टेकडी चढून झाली, पहिल्या बाप्पाचं देऊळ आलं. (टेकडी चढल्याचढल्या हा दिसतो, म्हणून पहिला बाप्पा. माऊने केलेलं बारसं.) अजून पुढे जाऊन खडीसाखरेचा बाप्पा आला (इथे संध्याकाळी प्रसादाला नेहेमी खडीसाखर असते!), पुढे बांबूच्या बेटापाशी पोहोचलो, तिथून तीन वेगवेगळ्या दिशांना रस्ते फुटतात. यांनी पण नेमका माझाच रस्ता निवडला! वाटेतलं मोहाचं झाड आलं आणि गेलं, शेवटी नंदीबैलाच्या बाप्पाला जाऊन पोहोचलो आम्ही. (या बाप्पाच्या समोरच्या जमिनीवर कोळ्यासारख्या दिसणार्‍या नंदीबैल किड्यांची भरपूर घरं असतात. मातीमध्ये छोटा खड्डा करून तिथे हा मातीखाली लपून बसतो. एखादी मुंगी आली, की तिच्या पायानी खड्याच्या कडेची माती आत पडते, आणि झटकन उडी मारून नंदीबैल सावज धरतो. इथे गेलं, की नंदीबैलाच्या खड्ड्यांमध्ये बारीक काडी घालून त्याला बाहेर काढायचं हा माऊचा आणि सखीचा लाडका खेळ आहे. ) तरी आजोबांचं स्वगत काही संपलं नाही!!! वाटेत नभाळी फुलली होती, फालसा(?)ला फळं धरायला लागली होती, रंगीत सुरवंट दिसले, हिरवं पोपटी गवत उन्हात चमकत होतं, अगदी जवळून मोराचे आवाज आले – मी एक दोन वेळा या सगळ्याकडे त्यांचं लक्ष वेधण्याचा क्षीण प्रयत्न केला. (पण ते निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यामुळे इतक्या क्षुद्र distractions मुळे चित्त विचलित होऊ न देता ते तासभर बोलत राहू शकतात.) त्यांचं म्हणणं असं, की टेकडीवर आल्यावर दहा – पंधरा मिनिटं लोकांनी एका ठिकाणी गप्पा मारल्या तर किती मज्जा येईल! वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी एकत्र गप्पा मारून डोक्याला किती खुराक मिळेल! उदाहरणार्थ, “भोसडीच्या!” ही तुम्हा आम्हाला शिवी म्हणून माहित आहे. पण हा म्हणे संस्कृतमधल्या “भोs सदिच्छा!” या अभिवादनाचा अपभ्रंश आहे. हे त्यांना टेकडीवर येणार्‍या एका भाषातज्ञांकडून समजलंय. आजोबा आता टेकडीवर त्यांच्या मित्रांना भेटतांना नेहेमी “भोS सदिच्छा!” म्हणतात!

नंदीबैलाच्या बाप्पाच्या इथे आजोबांना अजून काही स्नेही भेटतात. ते गप्पा मारत थांबतात, मी आल्या वाटेने परत निघते. जातांना ज्या सगळ्यांना धड भेटता न आल्याची चुटपूट लागून राहिली होती, त्या सगळ्या सग्या सोयर्‍यांना मी परतीच्या वाटेवर निवांत भेटते. तरीही, आजचा चालण्यातला निम्मा वेळ आजोबांनी खाऊन टाकल्याचा सूड मग ब्लॉगवर त्यांचा किस्सा लिहून तरी निघणारच ना! ;)





2 comments:

Anagha said...

आहा ! 😊

Gouri said...

फोटो बघूनच ताजंतवानं वाटतंय की नाही अनघा! :)