Tuesday, October 3, 2017

कजा कजा मरू... २ :)

गेल्या आठवड्यात माऊचा वाढदिवस झाला. मागच्या वाढदिवसाला सगळी विकतची सजावट होती, या वेळी आज्जी आणि मी काहीतरी छान करावं असं ठरवत होतो.

माऊकडे दादाने दिलेली खूप छान छान गोष्टींची पुस्तकं आहेत. आमचा दादा पुस्तकं इतकी जपून वापरतो, की हे वापरलेलं पुस्तक आहे यावर सांगूनही विश्वास बसणार नाही. अगदी पुस्तक खराब व्हायला नको म्हणून त्याला पुस्तकावर नाव सुद्धा घालायचं नसतं! (मी लहान असताना मला पण दादा मंडळींनी वापरलेली गोष्टीची पुस्तकं मिळायची. ही पुस्तकं वाचणं म्हणजे creativity, problem solving आणि वाचन असं सगळं एकत्र होतं. बहुतेक पुस्तकातली पानं गायब असायची. कव्हर आणि पुस्तकाची फारकत तर नेहेमीचीच. त्यामुळे आधी एका पुस्तकाचे भाग जमवायचे, मग ते वाचायचं, त्यात एखादं पान नसेल तर आपल्या कल्पनाशक्तीने भर घालायची असं सगळं चालायचं. सगळे दादा लोक माऊच्या दादासारखे असते तर!)  तर या पुस्तकांमध्ये एक पांडा, फुलपाखरं आणि माकडाच्या गोष्टीचं गोडुलं पुस्तक आहे. त्यातलं एक चित्र माऊला, आज्जीला आणि मला इतकं आवडलं, की या वेळी माऊच्या वाढदिवसाला या मंडळींनाच बोलवावं असं ठरलं:




मग आज्जीने मस्तपैकी पांडा आणि माकडाचं चित्र रंगवून दिलं. त्यावर पानांनीच लिहायचं ठरलं. वरून रंगीबेरंगी कागदांची फुलपाखरं ठेवली. (चित्र माऊंट बोर्डवर पोस्टर, ऍक्रिलिक आणि वॉटर कलरने काढलं, फुलपाखरं घरात सापडलेल्या कागदांची. पेपर टेपने हे सगळं भिंतीला चिकटवलं, फुलपाखरं पण पेपर टेपनेच लावली.) “रिटर्न गिफ्ट्स” साठी ताईने अजून काही फुलपाखरं बनवून ठेवली. आणि माऊच्या वाढदिवसाची तय्यारी झाली!



हे सगळं करायला इतकी मज्जा आली, की सखीच्या वाढदिवसाला पण आपण असं काहीतरी करू या असं आज्जी आणि मी ठरवून टाकलंय! :)

2 comments:

Neelam Karle said...

Ka cha ma... Ma cha ka ka?

Gouri said...

अग, "जागेमध्ये बाऊ आणि कजा कजा मरू" (बागेमध्ये जाऊ आणि मजा मजा करू) असं एक मस्त गाणं आहे मुलांचं. :)