Friday, June 19, 2020

लॉकडाऊनच्या गोष्टी

शंभर शब्दातल्या गोष्टी लिहायचा प्रयत्न 😊

लॉकडाऊन झाला. नवर्‍याचं हॉटेल बंद झालं. मालक चांगला आहे, पुढच्या महिनाभराचा पगार दिला त्यानं. आपण तर कामाला जाऊ शकत नाही. बाई पैसे देतीलही, पण फुकटचे कसे घ्यायचे? आधी उसने घेतलेले फेडले नाहीत अजून. आहे त्यात भागवलेलं बरं.

पहिल्या लॉकडाऊन पाठोपाठ दुसरा, तिसरा, चौथा संपला. अजून कामं सुरू नाही झाली. धान्य रेशनवर मिळालं, थोडंफार वाटप पण झालं वस्तीत. मोठा आधार मिळाला त्याचा. पोटापाण्याची सोय झाली. रोज डेअरीवाला विचारतो दूध नेतेस का म्हणून. इतक्या वर्षांचं गिर्‍हाईक आहे. कधी उधारी थकवली नाही आपण. आज तो द्यायला तयार आहे. पण आपली ऐपत नसताना कशाला! नकोच ते. त्यापेक्षा बिनादुधाचा चहा बरा. 
  
***

लॉकडाऊन झालाय. गेल्या महिन्यापर्यंत पैसे गावी पाठवत होतो... बिवीबच्चे तो उधर है, घर उधर है. इथे रहायचं ते पोटासाठी. काम बंद झालंय सगळ्यांचंच. शंकर पण म्हणाला. त्याचे तर मागच्या कामाचे पैसे पण थकलेत. मुकादम फोन उचलत नाही. इथे प्रत्येक गोष्टीलाच पैसे मोजावे लागतात. खोलीचं भाडं भरलं नाही तर बाहेर काढीन म्हणतोय मालक. किती दिवस रांगेत उभं राहून पोळीभाजी घ्यायची? शंकरची स्कूटर पडलेली आहे. सुतारकामाची अवजारं विकली तर पेट्रोलचे पैसे तर सुटतील. तीन दिवस गाडी चालवली तर पोहोचू घरी. एकाला दोघं आहोत, गाडी बंद पडली तर चालू. पण आता आपल्या माणासात जायचंय.

*** 

माझी इंग्लीशची ओरल झाली, चिऊची बाकी आहे अजून. काऊची पण. आणि गाण्याची परीक्षा तर सगळ्यांचीच. ओरल्स झाल्या की मग लेखी परीक्षा, आईस्क्रीम पार्टी, आणि मग सुट्टी! सुट्टीमध्ये कॅम्पला जायचंय. अक्काकडे जायचंय. स्लीपओव्हरला पण पाठवेल का आई? मोठ्या झालोय आता आम्ही. इतकं काय काय करायचं ठरलंय सुट्टीमध्ये ... पण शाळा काही सुरू होत नाही, परीक्षा काही संपत नाही. नुसतं घरात बसून राहतं का कोणी असं? वर्षा टीचरना मिठी कधी मारायची आता? आणि बाबूचे सारखे कॉल असतात, जर्रा आवाज केला की ओरडतो तो. हा करोना भेटूच दे, त्याला मी काठीने मारणार आहे. आणि मोदी आजोबाना पण. नीट सांगत पण नाहीत लॉकडाऊन कधी संपणार ते.

***

5 comments:

Unknown said...

Khupach mast lihilayes Gauri...!!! Vachat rahayala avadel...lihit raha👍😊

Gouri said...

थॅन्क्यू! :)
गोष्टी लिहिण्याचा मला फार कंटाळा आहे ... पण एवढ्या छोट्या फॉर्मॅटमध्ये लिहायला मज्जा आली.

Tejmi.blogspot.com said...

थोडक्यात पूर्ण सार छान मांडला आहेस 👍😊

Gouri said...

तेजल, ब्लॉगवर स्वागत! असं छोटं छोटं लिहायला आवडतं मला.😊

Unknown said...

लिहा भरपूर लिहा ,आम्ही नक्कीच वाचू.

छोट्या गोष्टी त मोठा आशय मांडला तुम्ही.
शुभेच्छा

बाळासाहेब पाटील , पुणे