Wednesday, November 11, 2020

अंक बघावा करून

 शाळा – कॉलेजात असताना फलकलेखन हे माझं आवडतं काम होतं. म्हणजे आपल्याला आयुष्यात दुसरं काही जमलं नाही, तर साईनबोर्ड पेंटिंगचा धंदा करून चार पैसे कमवता येतील असा माझा विचार होता. पण नोकरी सोडल्यावर चार पैसे कमवण्याची वेळ आली तोवर डिजिटल माध्यमांनी साईनबोर्ड पेंटिंगला खाऊन टाकलं होतं आणि फ्लेक्सचा जमाना आला होता. त्यामुळे माझ्या बॅकअप प्लॅनचा पैसे कमावण्यासाठी आता काही उपयोग नाही. पण लेटरिंग, सुलेखन, लेआऊट, रंगसंगती या सगळ्यात काहीतरी करण्याची खुमखुमी अजून टिकून होती. यंदा आमच्या सोसायटीचा डिजिटल दिवाळी अंक करायचं ठरलं आणि त्या निमित्ताने मी ही हौस पुरवून घेतली.😄 हा पहिलाच अंक असल्यामुळे अगदी लोगो, फॉन्टपासून सगळं नव्याने ठरवायला वाव होता. त्यामुळे अंकाची तांत्रिक बाजू सांभाळायला मजा आलीच, खेरीज संपादनामध्ये बरंच काही शिकायला मिळालं.

दहावीच्या सुट्टीमध्ये प्रबोधिनीच्या संचालक कार्यालयात काम करत होते. तेव्हा अण्णांची पत्रं लिहिताना आधी कच्चा खर्डा लिहायचा, त्यात शुद्धलेखनाच्या चुका असतील तर अण्णा तो शब्द तीन वेळा लिहायला सांगायचे. त्यात मराठी शाळेतून शिकल्याने इंग्रजी पत्रलेखनाची बोंबच असायची. म्हणजे अण्णा बाबांना भेटले तेव्हा माझं इंग्रजी किती कच्चं आहे हे त्यांनी काळजीने सांगितलेलं आठवतंय. अकरावीपासून इंग्रजी माध्यम आलं, इंग्रजी वाचन वाढलं आणि इंग्रजी कच्चं असण्याची काळजी करण्याचे दिवस मागे पडले. आपण मराठी आणि इंग्रजीतून बर्‍यापैकी आणि शुद्धलेखनाच्या चुका न करता लिहू शकतो हा अत्मविश्वास आला.

 

लिहिण्य़ाची जागा टायपिंगने घेतली आणि घात झाला. वर्डमधल्या स्पेलचेकने स्पेलिंग आणि व्याकरणाची वाट लावली. त्यात ब्लॉगवर लिहायला लागले आणि लिहिलं की प्रसिद्ध, त्याच्यावर ताबडतोब प्रतिक्रिया ही सवय लागली. लिहिलेलं स्वतः तपासणं, अजून कोणी तपासणं, दुरुस्त करणं हे मागेच पडलं. तुमचा ब्लॉग तुमच्या हक्काचा. तिथे तुम्हाला कोण हटकणार? शुद्धलेखनाच्या चुका आवर्जून दाखवून देणारे हेरंबसारखे मोजके मित्र वगळले, तर काहीही लिहा, कसंही लिहा, चालतंय अशीच परिस्थिती.

 

अंक करतानाही सुरुवातीला माझ्या डोक्यात ब्लॉगस्वरूपात प्रसिद्ध करण्य़ाचाच विचार होता. सुदैवाने बाकी संपादकांना पिडिएफ प्रकाशित करावी असं वाटत होतं. पिडिएफ करायची म्हणजे ब्लॉगसारख्य़ा सापडल्या तर, सापडतील तेव्हा चुका दुरुस्त करून भागणार नव्हतं. शिस्तीत संपादन करणं, मुद्रितशोधन करून घेणं गरजेचं होतं. (आणि आर्टवर्क, लेआऊट वगैरेलाही जास्त वाव होता.) हे करताना लक्षात आलं, की आपल्या लिहिण्यातली शिस्त पार लयाला गेलेली आहे. लेखनातल्या चुका तर कितीही वेळा वाचलं तरी दिसतच नाहीयेत. अंकात चुका राहून जाऊ नयेत म्हणून नाईक काकांनी खूप मेहनत घेतली. वृत्तपत्रकारितेतल्या त्यांच्या अनुभवामुळे ब्लॉगालेखनातून आलेल्या “पी हळद नि हो गोरी” सवयीला जरा लगाम लागला. ब्लॉग तुम्हाला लिहितं करतो, पण तुमच्यातल्या संपादकाचा हळूहळू कुंभकर्ण होत जातो. या अंकाच्या निमित्ताने त्याला जरा जाग आली.


अंकासाठी लिहिण्याचं आवाहन सगळ्यांना करतांना थोडी काळजी वाटत होती. कोण, कसं लिहिणारं आहे काहीच अंदाज नव्हता. किती प्रतिसाद मिळेल याचीही कल्पना नव्हती. आलेल्या लेखनातून निवड करण्याची, कुठलं लेखन नाकारण्याची चैन आम्हाला करता येणार नव्हती. अंक वाचनीय व्हायचा असेल, तर तुम्ही चांगले विषय, चांगले लिहिणारे हेरून त्यांचा अंकात जास्तीत जास्त समावेश असेल असं बघा या अंजलीच्या सूचनेचा खूप उपयोग झाला. त्यामुळे लेखनात विषयांचं, अनुभवांचं वैविध्य नक्कीच आणता आलं. साहित्याच्या मोजपट्टीवर अंक कदाचित तेवढा सरस होणार नाही, कारण साहित्याच्या दृष्टीने आम्हीच फार होमवर्क केलेला नाही.


एक जाणवलेली गोष्ट म्हणजे अंकात शाळकरी वयातले लेखक आहेत (त्यांच्यासाठी इंग्रजी माध्यम चालेल असं आम्ही म्हटलं होतं) आणि मग पस्तीस ते ऐशी - पंचाऐशीपर्यंतचे. अठरा ते पस्तीसमध्ये कोणीच नाही. या लोकांपर्यंत एक तर आम्हाला अजिबातच पोहोचता आलं नाही, किंवा ते मराठी लेखन-वाचनापासून इतके दू गेले आहेत की त्यांचा सहभाग शून्य होता.  


आपल्या सोसायटीचा असा अंक होतो आहे, अंक अमुकअमुक तारखेला प्रकाशित होईल, आपण झूम मिटिंग घेऊन प्रकाशनाचा कार्यक्रम करूया अशा प्रत्येक मेसेजला भरभरून प्रतिसाद मिळाला, भरपूर कौतुक झालं. अंकात सहभागी असणार्‍या आणि नसणार्‍याही सगळ्यांकडून. त्यामुळे हा फक्त या वर्षी पुरता “करोना दिवाळी अंक” राहण्याऐवजी पुढेही अंक होत राहतील असं वाटतंय.अशी ही आमच्या दिवाळी अंकाची गोष्ट. या सगळ्या प्रक्रियेतून तयार झालेला अंक बघायचा असेल, तर संपूर्ण अंकाची पिडिएफ (१२ एम.बी.), चार भागात पिडिएफ (३ ते ५ एम.बी.चा एकेक भाग) आणि ब्लॉग असे तीन पर्याय आहेत:


संपूर्ण अंक पिडिएफ 


भाग १ पिडिएफ 

भाग २ पिडिएफ 

भाग ३ पिडिएफ 

भाग ४ पिडिएफ 


ब्लॉगची लिंक  

4 comments:

Snehal said...

Great work Gouri. Appreciate your efforts.

Gouri said...

Thanks dear ☺️

Kavs said...

All rounder, Gouri!! 😊

Gouri said...

Kavs, सगळ्यात रस आहे पण अनुभव नाही, त्यामुळे Jack of all trades 😃