Sunday, August 1, 2021

चिव चिव चिमणी

माऊला एक मांजराचं पिल्लू पाळायचंच होतं. आधी तू स्वतःचं आवरायला शीक, पिल्लाला सांभाळण्याइतकी मोठी (आणि शहाणी) हो, मग बघू असं म्हणून मी आजचं संकट उद्यावर ढकललं होतं. पण नको तेव्हा माऊच्या बाबालाही नेमकं मार्जारप्रेमाचं भरतं आलं. वाटेत दिसलेलं एक पिल्लू स्वतःच उचलून आणून “बाबाला नकोय” म्हणून सांगायची त्याने सोय ठेवली नाही. सोसायटीच मांजराची पोरकी पिल्लं सापडतातच. असंच एकदा गच्चीत अगदी छोटं पिल्लू अडकलंय असा निरोप मिळाला, आणि माऊ आणि बाबा त्याला काढायला गेले. तोवर एका मार्जारप्रेमी ताईने ते पिल्लू ताब्यात घेतलं होतं. फारच छोटं आहे, त्याला माणसांची सवय नाही, एक – दोन दिवस माझ्याकडे रुळवून मग तुला देते असं ती म्हणाली आणि पिल्लू घरी घेऊन गेली. आणि दुसर्‍या दिवशी ते पिल्लू बागेत हरवलं. मग प्रचंड रडारड. आता यानंतर जे कुठलं मांजराचं पोरकं पिल्लू माऊसमोर येईल, त्याला घरात घेणं भागच होतं. तर अशा रीतीने ही चिऊ घरी आली. घरी म्हणजे घराच्या गॅलरीत. कारण ती आली मी  घरी नसताना. माऊने तिला प्रेमाने अंडं उकडून दिलं, दूध भाकरी दिली. सखीमंडळ जमा होऊन ऑलरेडी बारशाची तयारी सुरू झाली होती. अडचण एकच होती, की पिल्लू बोका आहे का भाटी हे अजून त्यांना ठरवता आलं नव्हतं. त्यामुळे सर्व प्रकारची नावं गोळा करणं चाललं होतं. (यातल्या एका कन्यकेने मला वायरलेस पासवर्ड पण मागितला. कशाला, तर पिल्लू बॉय आहे का गर्ल हे गूगलवर चेक करायला!)

दुष्काळातून उठून आल्यासारख्या दिसणार्‍या या उंदराएवढ्या पिल्लाने सगळं खाणं गट्टम करून वर अजून दुसर्‍या माऊसाठीची पोळी आणि अंडही संपवलं! मी घरी पोहोचेपर्यंत हे सगळं बाहेर यायला सुरुवात झाली होती, आणि गॅलरीचं माईनफिल्ड झालेलं होतं. दिवसभरात हे आवरेल असं वाटलं, पण दुसर्‍या – तिसर्‍या दिवशीही हीच अवस्था. दिवसभर झोपेल तिथे, बसेल तिथे, जाईल तिथे बारीक बारीक चिरकत होतं पिल्लू. “तुझी सू सारखी शी करतेय बघ!” मी माऊला चिडवून घेतलं. ती बिचारी दिवसभर पिल्लाची शी पुसत होती. एवढं करून पिल्लू पहिल्या दिवशीपेक्षा बरंच अक्टीव्ह वाटत होतं, आवाज फुटायला लागला होता. डॉक्टरांकडे जाऊन जंतांचं औषध आणि पिसवांसाठी पावडर आणली, पण तरीही शी चालूच. त्यातल्यात्यात सवड काढून पिल्लाचे उपद्व्याप चालूच होते. गॅलरीतून चढून गच्चीत जाणं, शेजारच्यांच्या गॅलरीमध्ये उडी मारून मग तिथे अडकून बसणं, गॅलरीच्या खिडकीतून उडी मारून घरात येणं, लोटून ठेवलेली गॅलरीची दारं उघडून घरात येणं. परत डॉक्टरांकडे नेलं, तर त्यांनी सांगितलेलं ऐकून मी हादरलेच. हिचं पित्ताशय सुजलंय, बरं होण्याची आणि जगण्याची शक्यता कमी आहे म्हणून सांगितलं डॉक्टरांनी. त्यासाठी माऊच्या मनाची तयारी करायलाही. चार चार औषधं आणि एक्सरेसाठीचं प्रिस्क्रिप्शन घेऊन तिथून जड पावलांनीच माऊ आणि मी आलो. त्या रात्री सव्वातीन वाजता घराच्या दुसर्‍या गॅलरीतून पिल्लाचा आवाज आला. धडपडत उठून बघितलं तर ही कन्या गॅलरीच्या वरून कोणी टपकू नये म्हणून एक इंच जाडीचे बार लावले आहेत त्या बारवर फिरतेय. बर्‍याच विनवण्या करून बया उतरायला काही तयार नाही. बास्केटमध्ये भाकरीचा तुकडा ठेवून बास्केट वर केली तर पुढचे दोन पाय बास्केटमध्ये घातले, तुकडा काढून घेतला आणि ही महाराणी वर ती वरच. “बस आता इथेच!” म्हणून वैतागून मी झोपायला गेले शेवटी. पंधरा मिनिटात पावसाची भुरभुर सुरू झाली, आणि हिचं म्याव म्याव. आता मात्र बाईसाहेब गुमान बास्केटमध्ये उतरल्या. डॉक्टरांनी तिचं पित्ताशय कमकुवत आहेत म्हणून अंड्याचं पिवळं बलक पचायला जड जाईल, ते देऊ नका म्हणून सांगितलेलं, इकडे सकाळी तिने गच्चीत जाऊन तिच्याच आकाराचं कबूतर मारून खाल्लं. इतकं उपद्व्यापी आणि resourceful पिल्लू (माऊनंतर) मी पहिल्यांदाच बघतेय.


 

पूर्वी पोरं जगत नसली की दगड्या, धोंड्या वगैरे नावं ठेवायचे. हे पिल्लू किती जगणार आणि किती दिवस घरी राहणार याविषयी शंकाच होती. त्यात सारखं चिरकून ते इतकं घाण झालेलं होतं, की मुलगा आहे का मुलगी तेसुद्धा बघायला उचलून घेववत नव्हतं. पहिल्या दिवशी माऊची सोबतीण म्हणून तिला चिऊ म्हटलं तेच मग कायमचं नाव झालं तिचं. पण चिऊपेक्षा कासव किंवा  गोगलगाय वगैरे नाव ठेवलं असतं तर बरं झालं असतं बहुतेक. ही खर्‍या चिमणीसारखी कुठूनही बघता बघता भुर्रकन गायब होतेय.

बरीच औषधं झाली, पण चिमणी बरं व्हायचं नाव घेईना. एकेका दिवशी सकाळपासून आपण फक्त हिची जगोजागी केलेली ठिपका ठिपका शी साफ करतोय असं जाणवलं की अगदी फ्रस्ट्रेशन यायचं. पण या दिवसात माऊसुद्धा माझ्याबरोबरीने हे काम करत होती. चिऊ घरी आल्याने तिची नेहेमीची दुसरी मांजर घरी येत नाही, चिऊशी तर नाहीच, जुन्या मांजरीशीही खेळायला मिळत नाही म्हणून एकदाही तक्रार केली नाही माऊने! त्यात एक दिवस चिमणी बेपत्ता झाली. कुठेच मिळेना. खरं सांगायचं तर माझा जीव भांड्यात पडला यापुढे हिची घाण साफ करायला नको, आणि माऊच्या नजरेसमोर पिल्लू मेलं तर ते दुःख पाहणं नको. चिऊ हरवणं, प्रयत्न करूनही न सापडणं किती सोयीचं त्यापेक्षा!

पण माऊने बरीच शोधाशोध केली, आणि सकाळी बेपत्ता झालेलं पिल्लू संध्याकाळी परत सापडलं! ती सापडल्यावरचा माऊचा आनंद बघून स्वतःच्या विचारांची लाज वाटली.

दोन आठवडे झाले, तीन आठवडे झाले, डॉक्टरांनी दिलेली सगळी औषधं खाऊनही चिऊच्या परिस्थितीत म्हणावी तशी सुधारणा दिसेना, आणि इतका भयंकर काही आजार असेल तर तब्येत त्यामुळॆ खालावतेय असंही दिसेना. आली तेव्हा नुसतेच मोठ्ठे डोळे आणि हाडांचा सापळा असं रूप होतं, त्यात मात्र हळुहळू बदल होऊन जरा अंग धरल्यासारखं वाटायला लागलं, खाणं, हगणं आणि झोपणं याव्यतिरिक्त काही करायला तिला थोडी सवड मिळायला लागली. एक दिवस चिऊ दोरीशी खेळायला लागली, तेव्हा माऊला झालेला आनंद शब्दात न सांगता येणारा.        

चिऊला येऊन महिना होईल उद्या. महिनाभरात तिने मला बरंच काही शिकवलं. कुठल्या गोष्टीत पाच मिनिटाच्या वर न रमणारी, झाडांना पाणी घालताना टाळाटाळ करणारी माऊ कंटाळा न करता, किळस न वाटून घेता एका आजारी पिल्लासाठी इतकं करेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.  इतकं आजारी पिल्लू हरवल्यावर बरं झालं, ब्याद टळली असं न म्हणता माऊ भर पावसात ‘आपल्या’ पिल्लाचा शोध घेत फिरेल, त्याला घेऊनच येईल असंही वाटलं नव्हतं. माऊला काही गोष्टी शिकायला अवघड जातात, मी थकून जावं इतके कष्ट पडतात. पण आयुष्यात सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ती शिकतेय, शहाणी होतेय, ज्याला आपलं म्हटलं त्याला वार्‍यावर न सोडता त्याच्यासाठी काही करतेय  हा फार मोठा दिलासा आहे माझ्यासाठी. थॅंन्क्यू चिमणे.
 




No comments: