Wednesday, February 9, 2011

हेमलकसा

    चंदाताई आठल्ये अमेरिकेत असतात. आनंदवन, हेमलकसा, सर्च या प्रकल्पांना अर्थसहाय्य मिळवून देण्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. शिवाय भारतात सुट्टीसाठी आलं म्हणजे त्या आवर्जून तिथे जातात, कधी हेमलकसाच्या वार्षिक सर्जरी कॅम्पमध्ये मदत, कधी आनंदवनाच्या रोजच्या कामामध्ये मदत असा प्रत्यक्ष कामात सहभागही घेतात. सर्चमधून दोन बस बदलून मी धडपडत हेमलकसाला जाणार म्हटल्यावर त्यांनी सहज म्हटलं, आम्ही उद्या हेमलकसाला जाणारच आहोत, गाडीत भरपूर जागा आहे. तू आमच्याबरोबर आलीस तर तुझा प्रवासाचा वेळ आणि त्रास वाचेल. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मीही त्यांच्याच बरोबर जायचं ठरवलं. त्यांचं बोट धरून हिंडल्यामुळे त्यांच्या पुण्याईचा फायदा आपसुकच मलाही मिळाला.

    तर चंदाताईंबरोबर त्यांची बहिण, लेखिका संध्याताई कर्णिक आणि मी गडाचिरोलीहून शनिवारी सकाळी निघालो. दुपारी आम्ही हेमलकसाला पोहोचलो. गाडीतून उतरून जरा स्थिरस्थावर होतोय, तोवर एक शंभरएक शाळकरी पोरांचा लोंढा तिथे येऊन पोहोचला - प्राणी बघायला. पोरांचा कल्ला चालला होता, आणि शिक्षक फारसं मनावर घेत नव्हते. त्यांची ही दर वर्षीची ‘प्राणीसंग्रहालयाची सहल’ असावी. यापलिकडे जाणून घेण्यासारखं हेमलकसामध्ये काही आहे हे त्यांच्या गावीही नसावं. अशा ठिकाणी आपण जातो तेव्हा तिथल्या लोकांना किमान पूर्वसूचना द्यावी, त्यांची अडचण होणार नाही असं बघावं एवढं किमान पथ्य पाळणं अवघड आहे का?

    हेमलकश्याला नागपूरचे रोटरी क्लबचे डॉक्टर दरवर्षी दोन दिवसांचा सर्जरी कॅम्प घेतात. आम्ही गेलो तेव्हा सर्जरी कॅम्प नुकताच संपलेला होता. इथले पेशंट दूरदूरहून येणारे. प्रवास जिकिरीचा. पैश्याचा प्रश्न. पुन्हा गावात गेल्यावर कुठल्याच वैद्यकीय सेवा नाहीत. त्यामुळे साधं डोळ्यांच मोतीबिंदूचं ऑपरेशन असलं, तरी पेशंट सगळ्या कुटुंबाबरोबर येतात. पेशंटचे नातेवाईक बंदिस्त खोलीत राहण्यापेक्षा रुग्णालयाबाहेरच्या मोकळ्या पटांगणावर राहतात, तिथेच तीन दगडांच्या चुलीवर त्यांचा स्वयंपाक चालतो. चांगलं बरं वाटेपर्यंत त्यांची दवाखान्यातून सुट्टी होत नाही. असे बरेच पेशंट आणि नातेवाईक अजून प्रकल्पावर होते.

    दुपारच्या तळपत्या उन्हात अनिकेत आमटेनी आम्हाला प्रकल्प दाखवला. हेमलकसा हा गडचिरोलीचा अतिशय दुर्गम आणि मागास भाग. अजूनही पवसाळ्यात ओढ्याला पूर आला म्हणजे हेमलकश्याचा बाहेरच्या जगाशी संबंध तुटतो. इथे कामाला सुरुवात केली तेव्हा फक्त जंगल होतं - वीज नाही, रस्ते नाहीत, डोक्यावर छप्परसुद्धा नाही. डॉक्टर आमटे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अक्षरशः शून्यातून हे सगळं उभं केलेलं आहे. इथल्या आदिवासींना त्या काळात शेती माहित नव्हती. शिकार किंवा जंगलात मिळणारी फळं, कंदमुळं हे त्यांचं खाणं. वाघ, अस्वल, चिमणी, उंदीर जो मिळेल तो प्राणी शिकार करून खायचा ही पद्धत. एवढी शिकार झाली होती, की इथे कामाला सुरुवात झाली तेव्हा जंगलात चिमणीचा आवाजसुद्धा यायचा नाही - सगळे पक्षी मारून खाल्लेले. कधीकधी शिकार करताना आईबरोबर लहान लहान पिल्लं सापडायची, आदिवासी तीही खाऊन टाकायचे. अन्नाचं दुर्भिक्ष्यही होतं, आणि इतकं लहान पिल्लू एकट्याने जंगलात जगणंही शक्य नसायचं. अशी लहान पिल्लं जर तुम्ही इथे आणून दिली, तर त्यांच्या बदल्यात आम्ही तुम्हाला अन्नधान्य देऊ असं डॉक्टर आमट्यांनी आदिवासींना सांगितलं - आदिवासींनी आणून दिलेली वेगवेगळ्या प्राण्यांची पिल्लं त्यांनी जिवापाड सांभाळली - त्यातून प्रकल्पावरचं प्राण्यांचं अनाथालय उभं राहिलं आहे. त्यामुळे इथल्या प्रत्येक प्राण्याची कथा हीच - आईवेगळं लहान पिल्लू, इथे मोठं झालेलं, जंगलामध्ये आज स्वतंत्रपणे जगू शकणार नाही म्हणून आजही इथेच राहणारं. या प्राण्याचा खर्च भागवण्यासाठी सरकारी अनुदान नाही. सरकारी प्राणीसंग्रहालयं या प्राण्यांची काळजी घेऊ इच्छित नाहीत, उलट कधीकधी तेच इथे प्राणी आणून सोडतात. वन्यप्राणीविषयक कुठले कुठले कायदे लावून प्रकल्पाला धारेवर मात्र धरलं जातं. आजही या प्राण्यांचा खर्च वैयक्तिक देणगीदारांकडून मिळणार्‍या देणग्यांमधून होतो. इतक्या वर्षांच्या प्रयत्नांनंतर आता अशा शिकारीचं प्रमाण कमी झालंय. एके काळी महिन्याला १०-१२ पिल्लं इथे आणली जायची, आता वर्षाला १०-१२ येतात.

    प्रकल्पावर सुमारे ६०० मुलामुलींची निवासी शाळा आहे. शाळेत शिकून पुढे आलेली इथली आदिवासी मुलं आज उच्च शिक्षणही घेताहेत. मुलींची संध्याकाळची प्रार्थना बघायला आम्ही त्यांच्या वसतीगृहावर गेलो. नव्या वसतीगृहाची इमारत बघितली. प्रत्येक मोठ्या खोलीत १५- २० बंक बेड, आणि फळीवर मुलींच्या ओळीने लावून ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या थैल्या. प्रत्येकीचं सामान बस एवढंच. शहरात शाळेत जाणार्‍या माझ्या भाचरांना एकदा इथे शिकणार्‍या मुलींच्या आयुष्यात डोकवायला मिळालं पाहिजे असं वाटलं. एवढ्या थंडीत स्वेटर नाही, चपला नाहीत म्हणून कुडकुडत मेसला जाणार्‍या वर्गमैत्रिणी त्यांच्या उच्चाभ्रू शाळेत कश्या सापडणार?

    संध्याकाळच्या चहाला पुन्हा चंदाताईंच्या पदराला धरून इथले प्रकल्पावरचे एक जुने कार्यकर्ते बबनभाऊ पांचाळ यांच्या घरी जायला मिळालं. बबनभाऊ इथल्या दवाखान्याचे ‘नारायण’ आहेत. शेजारच्या छोट्या सिद्धीचं या आजोबांशिवाय पान हलत नाही. सूर्यास्त बघायला त्यांच्याबरोबर इंद्रावती नदीच्या संगमावर गेलो होतो, तेव्हा सिद्धीची कहाणी समजली. सिद्धीचा बाबा हा आश्रमाच्या शाळेत शिकून पुढे आलेला पहिला दंतवैद्य. दुर्दैवाने सिद्धीच्या जन्माआधीच त्याचा साप चावून अपघाती मृत्यू झाला, आणि पोटातल्या बाळासकट बायको उघड्यावर पडली. घरचा फारसा आधार नाही, पदरी येऊ घातलेलं मूल. तीही प्रकल्पावरच्या शाळेचीच विद्यार्थिनी. तिला मग इथल्याच दवाखान्यात काही काम लावून दिलं, आणि बबनभाऊ तिच्या मुलीचे - सिद्धीचे आजोबा झाले. या नात्यातली सहजता खूप भावली. चंदाताईंबरोबर अजून एका जुन्या कार्यकर्त्यांशी बोलताना असंच त्यांच्याकडून ऐकायला मिळालं ... एक मुलगी वाढवायची म्हणते आहे. बाबांनी एक आदिवासी मुलगी मोठी केली, प्रकाशभाऊ - विलासभाऊंनीही एकेक मुलगी दत्तक घेतली. मलाही एका मुलीला मोठं करायचंय! या सगळ्या कार्यकर्त्यांची आपल्याला माहिती नसते. त्यांना कुणी पुरस्कारांनी सन्मानित करत नाही. काम मोठं झालं तरी ते बिनचेहर्‍याचेच राहतात. मी तर प्रकाशभाऊ-मंदाताई भेटणार नाहीत म्हटल्यावर इथे येऊच नये असा विचार करत होते ... चंदाताईंमुळे हेमलकसाचं अंतरंग थोडंफार बघायला मिळालं.

*************************************************************

    हेमलकश्याच्या शाळेला आज किमान २० संगणकांची गरज आहे. आपण या बाबतीत नक्कीच मदत करू शकतो. हा निधी उभा करण्यासाठी तुमचा सगळ्यांचा सहभाग हवाय. या प्रकल्पाच्या कामातला आपला खारीचा वाटा उचलू या!

प्रकल्पाचा पत्ता आणि अन्य माहिती:

http://lokbiradariprakalp.org/
aniketamte@gmail.com

लोक बिरादारी प्रकल्प, हेमलकसा
मु.पोस्ट भमरागड
जिल्हा गडचिरोली
पिन ४४२ ७१०

फोन नंबर: +९१ ७१३४ २२०००१
फॅक्स: +९१ ७१३४ २२०११२

डॉ. प्रकाश आमटे - 9423121803
श्री. अनिकेत आमटे - 9423208802
डॉ. दिगंत आमटे - 9421782993

*************************************************************
हे हेमलकसाचे काही फोटो ... मंडळी, कालच्या सर्चवरच्या पोष्टीतही खाली फोटू आहेत - मी त्याचा उल्लेख करायची विसरले आहे :(


Tuesday, February 8, 2011

शोधाच्या गावाला जाऊ या

    बिरबलाच्या गोष्टीत एक माणूस असतो. तो एकीकडे अंधारात हरवलेली चीजवस्तू दुसरीकडे उजेड आहे म्हणून तिथे शोधत असतो. खरं तर स्वतःचा शोध घेण्यासाठी भटकणं काहीसं तसंच. पण नवी माणसं भेटल्यावर, नव्या जागा बघितल्यावर कदाचित एखादा नवा पैलू सापडेल. ज्यांच्याकडे बघून काही मार्ग सापडेल अशी ग्रेट माणसं दिसतील या विचाराने सुट्टीत भटकंती करायचं ठरवलं होतं. त्यातलाच एक मुक्काम म्हणजे सर्च शोधग्राम, गडचिरोली.
    डॉक्टर अभय आणि राणी बंग यांचं इथल्या आदिवासींच्या आरोग्यासाठी चालणारं काम आणि त्याच वेळी त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लॅन्सेटसारख्या नियतकालिकातून प्रसिद्ध होणारे शोधनिबंध याविषयी वाचलं होतं, आणि खरोखर "Think globally act locally" चा हा नमुना बघण्याची बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती. अखेरीस तो योग जुळून आला. खरं तर असं काम बघायला हौशे-नवशे-गवशे भरपूर येत असणार. तिथल्या लोकांनी यांना किती एन्टरटेन करायचं? त्यामुळे सर्चशी संपर्क साधताना मनात थोडी धाकधूक होती. पण इथे इतकं मनापासून स्वागत झालं, की सगळ्या शंका दूर झाल्या. पहिल्याच दिवशी संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर राणीताई- अभयभाऊंनी चौकशी केली. आणि अभयभाऊंनी जेंव्हा ‘इथे तुझ्यासारखे अस्वस्थ आत्मे भरपूर आहेत!’ म्हणून सांगितलं, तेंव्हा आपण अगदी योग्य ठिकाणी आलोय याची खात्री झाली. ‘गौरी आपल्याला भेटायला आलीय तिची नीट काळजी घ्या ग’ म्हणून राणीताईंनी सगळ्यांना सांगितलं, आणि मग मी एकटीच इथे आले आहे हे विसरूनच गेले. रात्री माझ्यासारखीच अजून एक पाहुणी तिथे येऊन पोहोचली, आणि मग तर आमची वर्षानुवर्षांची गट्टी असावी अश्या गप्पा सुरू झाल्या.
    दिवसभर तिथल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये भटकून त्यांच्या कामाची माहिती करून घ्यायची, संध्याकाळी सगळे प्रार्थनेसाठी एकत्र जमतात तेंव्हा दिवसभरातल्या कामांचा आढावा, मनमोकळ्या गप्पा, आणि मग रात्री शेकोटीशेजारी बसून मस्त जेवण. आपण कधी इथले होऊन जातो ते कळतच नाही. स्वतःला शोधणार्‍या, आपल्या आजुबाजूच्या लोकांसाठी काही करू इच्छिणार्‍या तरुणांचा एक vibrant गट इथे भेटतो. कुणी चार आठवडे, कुणी काही महिने, कुणी दोन वर्षं असं काम करायला, वेगवेगळ्या क्षेत्रातले उच्चशिक्षित तरूण इथे त्यांचं स्वप्न घेऊन येतात. कम्युनिटी लाईफ म्हणजे रूक्षच असलं पाहिजे असं नाही - कार्यकर्त्यांमध्ये दिसणारे सहज खेळीमेळीचे संबंध, सर्चच्या परिसरामध्ये वारंवार जाणवणारी सौंदर्यदृष्टी आणि योजकता फार सुखावून जाते. संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात सर्चच्या आवारातलं छोटं तळं आणि तळ्याकाठची अभ्यासिका बघितल्यावर तर मला थोरोच्या वॉल्डनचीच आठवण झाली. सुसज्ज ग्रंथालय, statistical analysis विभाग, आदिवासी कला संग्रहालय, मॉं दन्तेश्वरी दवाखाना सर्व वास्तूंची बांधणी आदिवासींच्या घरांशी जवळीक सांगणारी.
    सर्चच्या पुढाकाराने जवळपासच्या आदिवासी गावांमध्ये खेळाच्या स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धा बघायला राणीताईंबरोबर ‘वाघभूमी’ गावाला जायची संधी मिळाली. एक गाव स्पर्धा भरवतं, त्यासाठी जवळपासच्या गावांमधून स्पर्धक संघ येतात. स्पर्धा भरवणारं गाव सगळ्या पाहुण्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था, मैदान तयार करणं अशी सगळी कामं वाटून घेतं. गावातल्या प्रत्येकाच्याच हे घरचं कार्य - सगळेच झटून कामाला लागतात. स्पर्धेच्या वेळी येणार्‍या पाहुण्यांच्या जेवणासाठी दोन दोन महिने आधी खास भाज्यांचे वाफे तयार केले जातात. स्पर्धेला लागणार्‍या खर्चासाठी गावातले तरूण ठेक्याने काम घेऊन पैसे साठवतात. प्रत्येक घरी एका गावाचे खेळाडू अशी सगळ्या पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था. मोहाची दारू हा इथल्या आदिवासी जीवनाचा अविभाज्य भाग, पण स्पर्धेच्या काळात गावात कोणी दारू गाळत नाही, बाहेरगावाहूनही आणत नाही. आपल्या गावाला पाहुण्यांनी नावं ठेवायला नकोत, स्पर्धा यशस्वी झाल्या पाहिजेत म्हणून सगळे धडपडतात. व्हॉलीबॉल कबड्डी आणि नेमबाजी अश्या स्पर्धा - त्यात मुलांचे आणि मुलींचे सामने. स्पर्धा चुरशीच्या झाल्या तरी कुठे निकालावरून भांडणं नाहीत, जिंकलेल्या संघाचं खिलाडू वृत्तीने कौतुक. राणीताई म्हणाल्या, अश्या स्पर्धा फक्त आदिवासी भागातच होऊ शकतात. पंचांशी भांडणं नाहीत, प्रतिस्पर्ध्यांविषयी वाईट बोलणं नाही, आयोजनाच्या कामामध्ये भांडणं नाहीत. वीस - तीस उंबरठा असणारी छोटीशी वस्ती बाहेरून कुठलंच अर्थसहाय्य न घेता इतके नेटके सामने घेऊन दाखवते! अख्खं गाव सोडा - पण गल्लीमध्ये, सोसायटीमध्ये अश्या प्रत्येकाचा सहभाग असणार्‍या स्पर्धा आयोजित करून कुठल्याही भांडणाशिवाय तडीस नेता येतील?
    राणीताईंना बघताना जाणवते, ती त्यांची सहज मिसळून जाण्याची वृत्ती. त्यांनी प्रेमाने ‘बेटा’ म्हणून हाक मारली म्हणजे जाणवतं, ही खरंच सगळ्यांची आई आहे ... इथले तरूण कर्यकर्ते त्यांना ‘अम्मा’ म्हणून हाक मारतात, आणि अभयभाऊंना ‘नायना’(तेलुगुमध्ये वडिलांना नायना म्हणतात) म्हणून.
    अभय भांऊशी गप्पा मारायची इच्छा होती. त्यांच्या व्यस्त दिनक्रमामध्ये आपल्यासाठी वेळ काढायला सांगायचा संकोच वाटत होता, पण त्यांना विचारलं - आणि त्यांनी सहज ‘परवा आपण फिरायला बरोबर जाऊ या’म्हटलं. डोक्यातला सगळा गोंधळ त्यांच्यापुढे ओतला, आणि त्यांनी इतक्या प्रेमाने मला समजणार्‍या भाषेत तो गुंता कसा सोडवायचा ते दाखवलं!
    अमेरिकेत राहूनही इथल्या कामांशी नाळ जोडून असणार्‍या चंदाताई आठलेंची सर्चमध्ये भेट झाली, पुढचा मुक्काम - हेमलकसा त्यांच्याबरोबरच गाठला. हेमलकसाविषयी पुढच्या पोस्टमध्ये.
**********************************************************************
सर्चच्या statistical analysis विभागाच्या महेशभाऊंना सध्या VB .Net मध्ये काही मदत हवी आहे. त्यासाठी सर्चला जाण्याची आवश्यकता नाही - स्काईपवरून मर्गदर्शन केलेलंही पुरेसं आहे. तुम्ही काही मदत करू शकत असाल तर नक्की सांगा.
Search - Gadchiroli

Wednesday, January 19, 2011

एकटी

एकटीनेच सुट्टी घेतली आहेस?


एकटीच फिरणार?

अरेरे ... नवर्‍याला सुट्टी नाही मिळाली का? बिच्चारी ... बोअर होशील ना आता एकटी फिरताना!

सुट्टीवर जाताना असं काय काय एवढं ऐकलं, की मलाच शंका यायला लागली आपण काय करतोय या विषयी. शेवटी आईला म्हटलं: "तुला सुद्धा वाटतंय का ग मी एकटी बोअर होईन म्हणून? "

"अगं स्वतःशीच गप्पा मारायच्यात म्हणून जाते आहेस ना? मग बोअर कशी होशील?" या तिच्या दिलाश्याने जागी झाले मी. दुसर्‍या कुणाची सोबत असली नसली तरी आपल्याला शेवटी एकटीनेच शोधायचंय ना स्वतःला? मग  आपलीच कंपनी काही काळ एन्जॉय करावी. स्वतःशीच निवांत गप्पा माराव्यात यासारखं सुख नाही. जरा चौकटीबाहेर जाऊन आपल्या आयुष्याची चौकट निरखावी असं वाटतंय ना? मग आपल्या जवळच्या सगळ्यांकडेच थोडे दिवस लांबून बघायला हवंय. त्यांच्या सोबतच राहिले तर  नीट दिसणार नाही हे सगळं.

आता हा फोटो एकाकी वाटातोय का तुम्हाला? समोर सुंदर समुद्र पसरलाय. मागे स्वच्छ वाळूचा किनारा. वर आकाशात सुरेख चित्रकारी केली आहे. नजर जाईल तिथवर समुद्र, वाळू आणि आकाशातलं सोनं. नकोशी गर्दी करणारं फ्रेममध्ये काहीच नाही. कळेल न कळेल अशी आपली ओल्या वाळूतली प्रतिमाही आहेच सोबतीला. शिवाय फ्रेमबाहेर राहून फोटो घेणाराही जवळ कुठेतरी आहेच की ... बस्स - अजून काय हवं असतं माणसाला आयुष्यात?



फोटो आळश्यांच्या राजाने काढलाय. इतका सुंदर समुद्र आणि किनारा समोर असताना पाण्यात शिरायचं सोडून फोटो काढायचं पाप मी करणार नाही ;)