Sunday, October 26, 2008

Seltsam im Nebel ...

गेल्या वर्षभरात जर्मनीमधली थंडी कशी असते ते बघायला मिळालं, नंतर इथला सुंदर उन्हाळा अनुभवला. आता शेवटचे तीन आठवडे उरलेत - इथला हेमंत अनुभवण्यासाठी. 'Fall season' च्या सौंदर्याविषयी बरंच ऐकलं होतं. मेपलच्या पानांचे सुंदर रंग आता संपले आहेत. सगळा पर्णसंभार उतरवून एक एक झाड अनोळखी होतं आहे. या रंगीत पानांकडे बघून जाणवलं एखादा शेवट सुद्धा किती नयनरम्य असू शकतो ते.

पण या सगळ्यापेक्षा अगदी अनपेक्षित असं एक निसर्गाचं रूप बघायला मिळतं आहे सद्ध्या -प्रचंड धुकं. माथेरानला सकाळी गुलाबी थंडीमध्ये एक लडिवाळ धुकं दिसतं. सूर्य उगवतो आणि मग ते हळुहळू विरून जातं. सकाळच्या दवबिंदूंसारखं थोडा वेळ आपल्याला ते जादुई दुनियेमध्ये घेऊन जातं, आणि म्हणूनच हवंहवंसं वाटतं. हे धुकं तसं नाही. या दिवसभर, सगळीकडे व्यापून राहणा़ऱ्या धुक्यामध्ये एक एकाकीपणा, उदास भाव आहे.

‌कॉलेजमध्ये राजगुरू सरांनी हेरमान हेसंची एक कविता शिकवली होती 'seltsam im Nebel zu wandern...' अशी. पुण्याला शिकतांना ती एवढी भावली नव्हती - धुक्यामध्ये एवढी मजा येते ... इतकं काय निगेटीव्ह लिहिलं आहे याने धुक्याविषयी - असं वाटलं होतं तेंव्हा. आज उठल्यावर बाहेरचं धुकं बघितलं, आणि 'im Nebel ...' ची आठवण झाली. या धुक्यात हेसंची कविता एकदम फिट्ट बसते.



Im Nebel

Seltsam, im Nebel zu wandern!
Einsam ist jeder Busch und Stein,
Kein Baum sieht den andern,
Jeder ist allein.

Voll Freunden war mir die Welt,
Als noch mein Leben licht war;
Nun, da der Nebel fällt,
Ist keiner mehr sichtbar.

Wahrlich, keiner ist weise,
Der nicht das Dunkel kennt,
Das unentrinnbar und leise
Von allen ihn trennt.

Seltsam, im Nebel zu wandern!
Leben ist Einsamsein.
Kein Mensch kennt den andern,
Jeder ist allein.

-Hermann Hesse

हा माझा स्वैर अनुवादाचा प्रयत्न:
(काहीही अभ्यास न करता, चांगली डिक्शनरी न बघता केलेला ’स्वैर अनुवादा’चा प्रयत्न - (म्हणजे खरं तर ’स्वैराचार’, नाही का? ;) ) - त्यामुळे हेरमान हेसं आणि राजगुरू सरांची माफी मागून)

धुक्यामध्ये

धुक्यामध्ये फिरतांना वेगळंच वाटतं!
प्रत्येक झाड आणि दगड एकाकी असतो
एका झाडाला दुसरं दिसत नाही
प्रत्येक जण एकटं असतं.

माझं विश्व सुहृदांनी भरलेलं होतं
अजून माझ्या आयुष्यामध्ये प्रकाश होता
आता धुकं पडल्यावर
कुणीच नजरेला येत नाहीये.

चोरपावलांनी गाठणारा, चुकवता न येणारा
आणि सगळ्यांपासून तुम्हाला दूर नेणारा
अंधार समजून घेतल्याशिवाय
खरोखर कुणालाच शहाणपण येत नाही

धुक्यामध्ये फिरतांना वेगळंच वाटतं!
आयुष्य म्हणजे एकाकीपणाच असतो
एक माणूस दुस़ऱ्याला ओळखत नाही
प्रत्येक जण एकटं असतं.

2 comments:

आळश्यांचा राजा said...

हे धुके म्हणजे नेमके काय असावे? आपल्या जगाविषयीच्या कल्पना, ज्या आपल्या जगाकडे पाहण्याच्या मार्गात अडथळा आणतात?

Gouri said...

असू शकेल. मी कधी असा विचारच केला नव्हता. त्या कवितेतून मला प्रकर्षाने जाणवलं होतं ते हे, की एकाकीपणा अनुभवल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही - आणि हा एकाकीपणा धुक्यामध्ये अनुभवायला मिळतो (लक्षणेने नाही - शब्दशः) असं हेसं ला म्हणायचं आहे.