Sunday, June 28, 2009

कु.स.म.प्र.झा.ला.क.पे.

कपडे घ्यायला गेल्यावर जसे एखाद्या दिवशी फक्त ठराविक हिरव्या रंगाचेच कपडे मनात भरतात, तसाच पुस्तकांच्या दुकानात शिरताना सुद्धा आपला एक मूड असतो. त्या दिवशी तीच पुस्तकं ‘दिसतात’. आणि त्या पुस्तकाविषयी, लेखकाविषयी काहीही माहिती नसली, कुणाकडून काही ऐकलेलं नसलं, तरी जनरली ही पुस्तकं छान निघतात.

तर असं एका दिवशी मला दुकानात ते पुस्तक ‘दिसलं’, पण जवळ ऑलरेडी भरपूर सामान होतं / पाऊस होता / घाई होती अशा कुठल्यातरी नतद्रष्ट कारणामुळे ते घ्यायचं राहिलं. नंतर साधारण सहा एक महिन्यांनी अचानक दुसऱ्या एका पुस्तकांच्या दुकानात जायचा योग आला. दुकान नवीनच सुरू झालेलं होतं, आत माफक गर्दी होती. मस्त निवांत पुस्तकं बघत अर्धा एक तास मजेत घालवता येईल अशी सगळी सेटिंग होती. अशा वेळी दुकानातल्या असिस्टंटला दुर्बुद्धी सुचली.

"Mam which book are you looking for?" त्यानं वातानुकूलित इंग्रजीमध्ये प्रश्न केला.

हा प्राणी कुणाला इतक्या तत्परतेने असिस्ट करतो आहे म्हणून मी अजुबाजूला बघितलं. तो आदबीने विचारलेला प्रश्न अजून कुठल्या मॅमना नसून अस्मादिकांनाच विचारण्यात आलेला होता. मी? याला कोणी संगितलं मी कुठलं पुस्तक शोधते आहे म्हणून?

"I am looking for a paperback ... about this big, with red color cover and published more than six months back!" माझं .उत्तर (A stupid question gets an equally stupid answer.).

त्या असिस्टंटाने एकदा माझ्याकडे खुळ्यासारखं बघितलं आणि मग तिथून काढता पाय घेतला.

पुस्तकाच्या दुकानात शिरतांना साधारणपणे नवरा आणि मी एकमेकांना ओळखत नाही असं भासवत दुकानाच्या दोन विरुद्ध टोकांकडून पुस्तकं बघायला सुरुवात करतो. पण माझा आणि त्या असिस्टंटचा एवढा इंटरेस्टिंग संवाद ऐकण्याचं भाग्य नवऱ्यालाही मिळालं होतं. धन्य होऊन त्याने एकदा माझ्याकडे बघितलं.

मी: "मग ... त्या दिवशी मी बघितलं होतं ना ते पुस्तक ... कुत्र्याविषयीचं ... तेच शोधते आहे मी."

नवरा: "अगं पण पुस्तकाला काही नाव गाव असतं. लेखक असतो."

मी: (स्वगत)"पुस्तकाचं नाव माहित असतं तर मी डायरेक्ट काऊंटरवर नसतं घेतलं का ते?"

तर अखेरीस त्या दिवशी कुत्र्याविषयीचं सहा महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेलं लाल कव्हरचं पेपरबॅक काही तिथे सापडलं नाही.

नंतरच्या वर्षभरात काही ठिकाणी त्याचं परीक्षण वाचलं, कुणी कुणी ‘आवडतं पुस्तक’ म्हणून त्याचा उल्लेख केलेला वाचला. मला पुस्तकांच्या दुकानात जायची संधी मिळाली नव्हती, आणि पुस्तकांच्या आणि लेखकांच्या नावांशी माझं वाकडं असल्यामुळे अजूनही माझ्यासाठी ते कु.स.म.प्र.झा.ला.क.पे. च होतं.

परवा अचानक कंपनीच्या कृपेने बंगलोरला विमनतळावर दीड तास मोकळा मिळाला. मी तडक पुस्तकांच्या दुकानात शिरून ते कु.स.म.प्र.झा.ला.क.पे. विकत घेतलं. (विमानतळावर ते मला दुप्पट किंमत देऊन घ्यावं लागलं असणार हे मान्य ... पण कंपनीच्या खर्चाने प्रवास करत असतांना per diem मधून विकत घेताना दुप्पट किंमतीकडे काणाडोळा करता येतो ;)). विकत घेतल्यानंतर साधारण १० तासात ते वाचून झालेलं होतं. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार सामान्यजन त्या कु.स.म.प्र.झा.ला.क.पे. ला ‘Marley & me' या नावाने ओळखतात.

'Marley & me' ही मार्लेची त्याच्या मलकाने सांगितलेली अतिशय हृद्य कथा आहे. मार्ले हा ताडमाड उंचीचा आणि ताकदीचा अमेरिकन लॅबरोडॉर. पण इतका मोठा झाला तरी छोट्या पिल्लाएवढाच अवखळ. मुलांचं खाणं चोरणारा, सोन्याच्या साखळीपासून पगाराच्या चेकपर्यंत काहीही नियमितपणे गिळून टाकणारा, कुत्र्यांना शिस्त लावण्याच्या शाळेतून बेशिस्त म्हणून काढून टाकलेला, वादळाला घाबरणारा, घरातल्या वस्तूंची नियमित नासधूस करणारा, घरातल्या माणसांइतकंच प्रेमाने परक्या अनोळखी माणसाचं स्वागत करणारा असा हा ‘जगातला सगळ्यात वाईट कुत्रा’. एवढा वाईट कुत्रा त्याच्या घराला काय देत असतो, हे समजण्यासाठी पुस्तक मुळातूनच वाचायला हवं.

8 comments:

यशोधरा said...

हो गं, अगदी.

रोहिणी said...

few days back I saw the movie 'marley and me ' wonderful movie.... i can just imagine how wonderful the book must be !!!

Vishakha said...

बरोब्बर! तू कुत्र्यावरचं पुस्तक म्हटल्यावर मला लगेच "मार्ली" च डोळ्यासमोर आलं. मी वाचलं नाहिये अजून, पण ऐकलंय खूप त्याबद्दल.

माझं पण अगदी अस्स्च झालं एका मायकलॅंजेलो च्या पुस्तकाबद्द्ल. ते आता कधी सापडेल की नाही कोणजाणे!

Gouri said...

यशोधरा, रोहिणी, विशाखा, आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद :) मला आता हा सिनेमा बघायचाच आहे.
विशाखा, कधीतरी नक्की सापडेल बघत ते पुस्तक!

G said...

wow! serendipity!
:)

मस्त वाट्तं असं काही घडलं की!
बरं, पिक्चर बघण्या आधी पुस्तक वाचावस असं माझं मत आहे.

by the way, title चा अर्थ नाही कळला.
:(

Gouri said...

G,

कु(त्र्याविषयीचं) स(हा)म(हिन्यांपूर्वी) प्र(सिद्ध) झा(लेलं) ला(ल) क(व्हरचं) पे(परबॅक) :D

आळश्यांचा राजा said...

झकास!

अब्द said...

व्वा, सुंदर.