Monday, August 3, 2009

का लिहायचं?

एखादा विषय ‘माझ्याविषयी लिहिलं तरी चालेल’ म्हणून उदार मनाने परवानगी देतो. ब्लॉगवरचं नवं पोस्ट आकार घेऊ लागतं. डोक्यात एक डेमन थ्रेड सुरू झालेला असतो. अजून थोssडासा आकार आला, कि लिहिता येईल. बोटं टायपायला उतावीळ असतात. अशा वेळी नेमकं कुठलं तरी नको तेवढं काम येतं. ऑफिसमध्ये, घरी, गाडी चालवताना, जागेपणी, झोपेत ... पूर्ण वेळ त्या कामाचंच प्रोसेसिंग डोक्यात चालू असतं. शेवटी तो ब्लॉगचा दानव दोरा वेळ संपून मरून जातो. नंतर वेळ मिळतो, पण लिहायची इच्छा नसते / काही सुचत नाही / लॅपटॉप बडवण्यापेक्षा कागदावर रेघोट्या ओढण्यात / मातीत खेळण्यात जास्त रस वाटतो ... थोडक्यात म्हणजे चांगले तीन - चार आठवडे आपण ब्लॉगकडे ढुंकूनही बघत नाही. अचानक ब्लॉगवर नवी कॉमेंट येते / मेलीस का म्हणून कुणीतरी प्रेमाने विचारतं. लिंक उघडून आपण आपलाच ब्लॉग तिऱ्हाईतासारखा वाचत असतो...

हे आपण लिहिलंय? कधी? इतकं वाईट लिहितो आपण? लिहिताना शंभर वेळा वाचलं तरी दिसले नसते असे दोष दिसायला लागतात - फारच त्रोटक ... रटाळ ... आशय काहीच नाही ... सुमार दर्जा ... एका एका पोस्टवर शेरे मिळत जातात, आणि ते पोस्ट डिलिट करायला बोटं शिवशिवायला लागतात.

हे आपण लिहिलेलं नाही. आपण असं काही लिहिणं शक्यच नाही. तसंही महिनाभरापूर्वीची मी आणि आजची मी एक कुठे आहे? नदी तीच आहे असं आपण म्हणतो ... प्रत्यक्षात दर वेळी आपण वेगळं पाणी बघत असतो ना? तीच नदी परत बघितल्यासारखं वाटणं हा तर केवळ आभास! जे मी लिहिलेलं नाही, ते मी का डिलिट करावं?

मला माहित आहे, आणखी एका महिन्याने मला हेही लिहिलेलं उडवून टाकायची अनिवार इच्छा होणार आहे. पण आज लिहिणं भाग आहे. नाईलाज आहे. आज जे काही टाईपते आहे, ते सुद्धा खरं तर मी लिहिलेलं नाहीच.

‘आपण लिहिलेलं’ वाचताना, त्यातला ‘आपण’ दूर झाला, तर केवढा फरक पडतो!

7 comments:

सर्किट said...

:-)

been there.. felt that.. done that.. undone that..

kititari vela swat:cha blog ani posts mi freeze kele, mag defrost kele.. ekda vaitagun sare posts ani blog delete karun takala, pan dusaryach diwashi to restore karava mhanun google la help magitali.

blogging pasun sanyaas ghetala, ani punha yeun lihilahi. khara naav, TopaN naav .. khara patta, khota patta..

conclusion kay tar bha.po.!!

Gouri said...

चला म्हणजे फक्त मलाच असं वाटत नाही तर :)

भानस said...

अनेकदा मलाही असेच वाटते गं....आपणच लिहीलेले पुन्हा एकदा लिहावे. नक्कीच वेगळे अन चांगले असेल ते. याचा अर्थ आधी खरडले या पट्टीत ते नसते परंतु काहीतरी राहून गेलेले मुद्दे असतातच.
अजून तरी सन्यास घ्यावासा वाटलेला नाही. पण ती फेज येईलही लवकरच.

sahdeV said...

faar chhaan ahe ha blog, sagale posts vaachun zaale! overall comment deto ithe, aavadla mala ha blog! :)

Gouri said...

sahdeV, ब्लॉगवर स्वागत.आणि ब्लॉग आवडल्याची आवर्जून प्रतिक्रया दिल्याबद्दल धन्यवाद.

भानस, महेंद्रनी लिहिलेल्या 'ब्लॉगेटिकेट्स'नुसार, उशीरा का होईना, पण प्रत्येक प्रतिक्रियेला आवर्जून उत्तर लिहायचं ठरवलंय. त्यामुळे एवढ्या उशीरा प्रतिक्रया लिहिते आहे ... आता वाटतंय, की का लिहायचं असा प्रश्न वेळोवेळी पडणं चांगलं आहे ... त्यामुळे पुन्हा तपासून बघितलं जातं काय उद्देशाने, काय दर्जाचं लिहिलंय आपण ते.

आनंद पत्रे said...

खरंय! मला तर बर्याच गोष्टी सुचतात पण कागदावर(पक्षी: वेब) उतरवता येत नाहीत.
काही न लिहिलेल्या पण 'अमेली' चा फक्त फोटो टाकलेल्या पोस्ट वर तुमची प्रतिक्रिया पाहून खूप आनंद झाला होता.
तुमची लेखन शैली उत्तम आहे.

Gouri said...

आनंद, खूप वेळा असं होतं... काहीतरी सुचतं, आणि ते उतरवायलाच जमत नाही. नंतर केंव्हातरी आठवतं अरे हे लिहायचं होतं म्हणून.

ब्लॉग पोस्टला प्रतिक्रिया मिळाली म्हणजे हुरूप येतो हे खरंच ... स्वगताची जागा संवादाने घेतली जाते ना मग.