Thursday, September 17, 2009

मन वढाय वढाय

ती आज नेहेमीपेक्षा जरा उशीराच निघाली ऑफिसला. तसं आज एकदम अर्जंट काही काम नाहीये काही - निवांतच दिवस आहे. सगळी साठलेली कामं उरकून टाकता येतील. गाडीमध्ये मस्त भीमसेनचा मल्हार चालू होता. पहिल्याच वळणावर एका हिरोने बाईक मध्ये घुसवली आणि वर गुरकावून बघितलं. दिसत नाही का ... गाडी अंगावर घालता का काय वगैरे वगैरे प्रेमळ संभाषणांची एक छोटीशी फैर झडली. बाईकवाल्याचीच चूक होती असं तिला ठामपणे वाटलं. पण त्या एका मिनिटानी मल्हाराची मजा घालवली ती घालवलीच. पुढे मुख्य रस्त्याला लागल्यावर पुन्हा एक गॅस सिलेंडर भरलेला टेंपो प्रेमाने भेटायला येत होता. तसं तिचं रोजचं गाडी चालवणं बऱ्यापैकी ऑटोपायलटवरच असतं. पण एकाद्या दिवशी तिच्या तंद्रीवर असा ओरखाडा उठतो.

असा एक प्रसंग झाला, तर समोरच्याची चूक आहे. परत दुसरा प्रसंग झाला, तर जरा लक्ष द्यायला हवंय. गाडी चालवतांना सलग तीन वेळा असं झालं, तर अर्थ सरळ आहे - आजचा दिवस आपला नाहीये. आज आपण लोकांना ‘या, या, मला येऊन धडका, तुमचं स्वागत आहे!’ असा मेसेज देतो आहोत आणि आपलं जजमेंट सुट्टीवर आहे. तिचा हिशोब सरळ आहे. आज पूर्ण लक्ष देऊन गाडी चालवायला पाहिजे नाही तर काही खरं नाही.

ती पुढची पाच मिनिटं मनापासून प्रयत्न करते ... फक्त गाडी चालवण्यावरच लक्ष केंद्रित करण्याचा. अगदी भीमसेन सुद्धा बंद. बाहेर मस्त सोनेरी ऊन चमकतं आहे. पलिकडची टेकडी हिरवीगार झालीय. इतके सुंदर तजेलदार रंग कधी मला फोटोत किंवा चित्रात बंदिस्त करता येतील का? हा पिवळा कॅनरी यलो आहे का? व्हॅन गॉने कुठला रंग वापरला असता बरं तो रंगवायला? इतकी मस्त हवा आहे आणि आपलं नुसतं ऑफिस एके ऑफिस चाललं आहे. कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे आता भटकायला. शू ... लक्ष फक्त ड्रायव्हिंगकडे ... फक्त ड्रायव्हिंगकडे ... ड्रायव्हिंगकडे ... फक्त रस्त्याकडेच बघायचं. रस्त्यावरून जाणाऱ्या विजेच्या तारेवर पर्ससारखं काहीतरी अडकलेलं दिसतंय ते काय आहे म्हणून कल्पनेच्या वारूला मोकाट सोडायचं नाही. ती रिकामी रिक्षा चढावर धापा टाकत बरोबर गाडीच्या पुढे येणार आहे ... तिला आधीच बगल मारायला पाहिजे ...समोरच्या रिक्षाला बगल ... ‘मुकद्दर का सिकंदर’ लिहिलेल्या म्हातऱ्या रिक्षाला बगल ...

‘मुकद्दर का सिकंदर’? नाही तिच्यावर ’मुकदर का सिंकदर’ लिहिलंय.

खिक ... रोज तंद्री लागली म्हणजे गॅसवर ठेवलेलं दूध उतू जातं तसं तिला फसफसून हसू येतंय. ’मुकदर का सिंकदर’ म्हणजे?

बॅंकेतल्या ठेवीवरच्या व्याजदरासारखे मूक-दर, सिंक-दर असे वेगवेगळे दर असतात का?

या पैकी मूक-दर किफायतशीर का सिंक-दर (म्हणजे घराचं कर्ज fix rate ने घ्यायचं का floating ने याचा आपण हिशोब करतो तसं ) असा प्रश्न रिक्षा मालकाला पडला आहे का?

सिंकदर म्हणजे बुडण्याचा वेग?

का दिवसभरात तासाला किती वेळा शिंका आल्या याची सरासरी?

पूर्ण लक्ष गाडी चालवण्याच्या प्रयत्नाला पूर्णविराम. ‘मुकदर का सिंकदर’ला डोक्याबाहेर काढेपर्यंत ऑफिस आलंय.

10 comments:

Deepak said...

मस्तच!
मलाही "मुकदर का सिंकदर" समजायला जरा वेळच लागला, कारण मी ही "मुकद्दर का सिकंदर" असंच वाचत होतो.. थोड्या वेळाने - ट्युब पेटली :)

Raj said...

खि खि..मुकदर का सिंकदर लई आवडल. :)

अवधूत डोंगरे said...

सोनेरी ऊन डोळ्यात चमकल्यासारखं. छान पोस्ट.

क्रांति said...

वा! सहज, सुरेख लिहिलंस अगदी!

Nupur said...

Hey you write so well.. I'm not into too much marathi but being a maharashtrian I always want to read some good marathi stuff. :) I'm hooked to your writing :)

Gouri said...

भुंगा, raj, अब्द, क्रान्ति, Nu - pratikriyebaddal abhar. ghari net aajaree hote aani office madhye kaamaatoon doke baaher kaadhaayachee sandheec milat navhati ... tyaamule don aathavade ikade phirakataach aale naahee.

Meenakshi Hardikar said...

Gauri jogalekar ka ? kahi kalala nahi profile madhun. tuzi blogvara comment aja pahili. aga ho sadhya nivant asa vel milat nahi tyamule likhan almost band padalay. tuza blog ata vel milala ki vachen nivant. :)

भानस said...

’मुक-दर का सिंक-दर’ एकदम भारी. छान लिहीलस ग.:)

Gouri said...

मीनाक्षी, हो. गौरी जोगळेकर. तुला मेल पाठवते आहे.

भानस, प्रतिक्रियेबद्दल, आणि ब्लॉग फॉलो केल्याबद्दल धन्यवाद!

Jaswandi said...

kasala bharee lihites rao.. mastch :)