Sunday, September 13, 2009

सखी

मैत्रीची काही नाती अशी असतात, की वर्षानुवर्ष तुम्ही भेटला नाहीत, तरी काल भेटलो होतो असा सहजपणा पुढच्या भेटीत राहतो. तारा कायम जुळलेल्याच राहतात. अशीच ही सखी. अम्ही गेल्या आठ दहा वर्षात भेटलेलो नाही. फोन नाही, इ-मेल नाही, पत्र नाही. पण जिवश्च कंठश्च मैत्रीण म्हटलं म्हणजे पहिलं नाव आठवतं ते तिचंच. माझी बालपणीची सखी.

तसं बघितलं तर आमचं जगणं आज एकमेकांना कुठेच छेद देत नाही. मला खात्री आहे, मी हे जे खरडते आहे, त्याची तिला आयुष्यात कधी गंधवार्ताही लागणार नाही. त्यामुळे अगदी निश्चिंत होऊन, मोकळेपणाने मी इथे हे लिहिते आहे.

पाच भावंडातली ही चौथी. घरात प्रचंड कर्मठ वातावरण. अगदी विटाळाच्या वेळी शिवलेलं चालत नाही इथपर्यंत. सगळ्या रीतीभाती, सणवार सगळं यथासांग पार पडलंच पाहिजे. आणि कडधान्य विकत आणून घरी जात्यावर डाळी काढण्यापर्यंत सगळी कामं घरी. या धबडग्यामुळेच का काय, पण सखीची आई सारखी आजारी. घरातली ही सगळी कामं करायची ती शाळकरी वयाच्या या सगळ्या भावंडांनी. म्हणजे काका तसे अतिशय सज्जन होते, पण त्यांच्या मते हीच जगायची रीत होती. मला काय भातुकलीसारखी ही पण एक गंमत होती. संध्याकाळभर सखीच्या घरात पडीक असायचे मी. पण खेळून झालं, की जेवायला आणि झोपायला माझ्यासाठी एक खूप वेगळं घर होतं. तिथे मला आजच्या स्वयंपाकाची काळजी करावी लागत नव्हती का रात्रभर जागून दिवाळीचा फराळ करावा लागत नव्हता.

शाळेतल्या पुस्तकी अभ्यासात सखी तशी मागेच असायची काहीशी. म्हणजे काकांच्या मते माझ्या संगतीमुळे ती शाळेत पास होत होती ही चांगली प्रगती होती. पण खरं तर पुस्तकांपलिकडच्या शाळेत मी तिच्या संगतीमुळे केवढं तरी शिकत होते. शाळेतल्या अभ्यासाव्यतिरिक्तच्या सगळ्या गोष्टीत आम्ही बरोबर असायचो - खेळ, चित्रकला, गर्ल गाईड, गाणी, नाच, सबकुछ. शिवाय शाळेबाहेरचे उद्योगही - नदीवर पोहायला जाणं, वॉल-हॅंगिंग, मेंदी असले क्लासही आमचे बरोबर चालायचे. त्याशिवाय आमच्या डोक्यातनं आलेले प्रकल्प सुद्धा असायचे - अगदी दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री निधीसाठी पैसे जमा करायचे, म्हणून रोज चिवडा बनवून तो शाळेत मधल्या सुट्टीत विकण्यापर्यंत। नेतृत्व, स्वतः जबाबदारी घेऊन काही करणं आणि आहे त्या परिस्थितीमधून मार्ग काढणं सखीकडून शिकावं. आम्ही गाव सोडून गेलो त्यानंतर सखीचा पुस्तकी अभ्यास मागे पडला, तर माझा पुस्तकांबाहेरचा.

नंतर असंच काही वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सखीची निवांत भेट झाली. माझ्या घरातल्या मुक्त वातावरणात आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे हे शोधण्यासाठी मी धडपडत होते. पैशाचं पाठबळ नसणाऱ्या, तीन मुलींची लग्नं कशी जुळवायची याच्या विवंचनेतल्या मारवाडी घरात सखी आपण आईवडिलांना अजून संकटात घालायचं नसेल, तर पदरी पडेल ते दान स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे हे समजून त्यात आपण काय काय करू शकतो याच्या शक्यता पडताळून पाहत होती. काकांची मतं अजूनही बदललेली नव्हती. मुलींनी नोकरी करणं, पैसा कमावणं त्यांना मान्य नव्हतं. क्षमता (आणि खरं तर गरजही) असूनही काम करायचं नाही? एक वेळ नोकरी आणि पैशाचा विचार बाजूला ठेवू - पण पूर्ण स्वातंत्र्याची चटक लागलेल्या माझ्या मनाला, आवडत असलं तरी काहीतरी करायचंच नाही ही कल्पनाच सहन होण्यापलिकडची होती. सखीच्या आयुष्यात चार दिवस डोकावतानाच मला घुसमटायला लागलं. सिद्धेश्वराच्या तलावात दोघींनीच जाऊन रोईंग केल्यावर सखी म्हणाली, तिच्या नव्या मैत्रिणींमध्ये असली यडच्याप गंमत करणारी कोणीच नाहीये. तिच्या जागी असते तर काय केलं असतं मी? जगाशी भांडायला निघाले असते? फ्रस्ट्रेट होऊन माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांचं जगणं हराम करून टाकलं असतं? निघून गेले असते हे सगळं सोडून? हाय खाऊन, मरेपर्यंतचे दिवस ढकलत राहिले असते?

लहानपणी आमचा एकत्र ‘अभ्यास’ चालायचा, खेळ चालायचे, बाकीचे अनंत उद्योग चालायचे. असंच एकदा आम्ही मिळून रोजचं दिवसभराचं ‘वेळापत्रक’ बनवलं होतं. म्हणजे दुपारी दोन ते तीन अभ्यास (?), त्यानंतर अर्धा तास विश्रान्ती वगैरे वगैरे. तर हे वेळापत्रक बनवताना मी सखीला विचारलं ... अगं तुझी सगळी कामं तू यात कुठे बसवणार? त्यासाठी किती वेळ ठेवायचा? सखीचं उत्तर, "ते मी बघून घेईन ... तू सांग आपला दिनक्रम". मी ते वेळापत्रक’ दोन दिवसाच्या वर काही पाळलं नसेल ... ती किमान आठवडाभर तरी पाळत होती ... मला लाज वाटून मी तिला ते बंद करायला सांगेपर्यंत. आज सखीचं लग्न झालंय, तिला दोन मुलं आहेत. मारवाडी घरामध्ये एकत्र कुटुंबामध्ये राहाताना, घरातले सगळे रीतीरिवाज, कामं, मुलांचं सगळं करताना तिने स्वतःचं ब्युटी पर्लर सुरू केलंय. सासू सासऱ्यांची आजारपणं काढता काढता, मुलांचं करता करता, नवरोबाचा इगो जपता जपता तिने लहानपणीच्याच सहजतेने "ते मी बघून घेईन" म्हटलं असणार. नवऱ्याने नवरेशाही गाजवलीच पाहिजे असं बाळकडू घेऊन मोठं झालेला तिचा नवरा आज तिला तिच्या घरकामात मदत करतोय, तिला पार्लर चालवायला पाठिंबा देतोय. सखी, तू जिंकलंस.

3 comments:

Anonymous said...

सहज सोपं लिहिलयेस.....सखीने जिंकल्याचा आनंद मलाही व्हावा ईतकी सहज पोहोचवलीस तिला....

क्रान्ति said...

खूप सुरेख लिहिलंस गौरी! खरंच अगदी मनात उतरली सखी! छोट्या छोट्या हेलकाव्यांनी डगमगून
जाणा-या माझ्यासारखीला वेळोवेळी मदत करील ही तुझी सखी!

Gouri said...

गेले काही दिवस उगाचच उदास, निराश, अन्यायग्रस्त वगैरे वाटत होतं. अशा वेळी सखीची सय आली, आणि जाणवलं, की आपण उगाचच राईचा पर्वत करतोय. सुख बोचतंय आपल्याला. इतक्या वर्षांच्या सखीच्या मैत्रीमधून काहीच शिकलो नाही का आपण? मग जशी सुचली तशी सखी ब्लॉगवर उतरवली.