Wednesday, January 20, 2010

वाचणाऱ्या कामगाराचे प्रश्न

बेरटोल्ड ब्रेख्त हा एक जर्मन साहित्यातला दिग्गज. डाव्या विचारसरणीचा ब्रेख्त आपल्याला भेटलेला असतो तो पुलंनी मराठीत आणलेल्या ‘तीन पैश्याच्या तमाशा’मुळे, किंवा त्याने आणलेल्या रंगभूमीवरच्या नव्या प्रवाहांमुळे.

ब्रेख्तच्या एका कवितेचा हा मराठी स्वैर अनुवाद ...

*****************************************************

वाचणाऱ्या कामगाराचे प्रश्न

सात दरवाजे असणारं थेबेस कुणी बांधलं?
पुस्तकांमध्ये बांधणाऱ्या राजांचे उल्लेख आहेत.
हे राजे स्वतः त्या शिळा वाहत होते का?
आणि अनेक वेळा बेचिराख झालेलं बॅबिलॉन
इतक्या वेळा परत कुणी बांधलं? सोन्याने भरलेल्या लिमा शहराच्या
कुठल्या घरांमध्ये तिथले बांधकाम कामगार राहत होते?
चीनची भिंत बांधून पूर्ण झाल्यावर
संध्याकाळी तिथले सगळे गवंडी कुठे गेले?
भव्य रोममध्ये
कितीतरी विजयाच्या कमानी आहेत. कुणी बांधल्या या?
सिझरचे हे सगळे विजय कुणाविरुद्ध होते?
एवढा बोलबाला असणाऱ्या बायझांझमध्ये
सगळ्या रहिवाश्यांसाठी फक्त प्रासादच होते का?
महासागरामध्ये रात्री अटलांटिस बुडत होती तेंव्हासुद्धा
मालक त्यांच्या गुलामांना आज्ञा सोडत होते.
तरूण अलेक्झांडरने भारतात विजय मिळवले.
त्याने एकाट्याने?
सिझर गॉल्सशी लढला.
त्याने सोबत किमान एक आचारी तरी नेला असेल ना?
आपलं आरमार बुडाल्यावर स्पेनचा फिलिप रडला.
दुसरं कुणीच रडलं नाही?
पानापानागणिक विजय.
विजयाच्या मेजवानीसाठी कोण खपलं?
दर दहा वर्षांकाठी एक महापुरुष.
त्याची किंमत कोण चुकती करतं?
इतक्या गोष्टी,
इतके प्रश्न.

*****************************************************

मीही कामगारच आहे. जरा ‘ग्लोरिफाईड’ कामगार म्हणा फार तर. ब्रेख्तच्या कामगाराएवढं माझं जगाच्या इतिहासाचं वाचन नाही. पण आपल्या इतिहासातला ‘सोन्याचा धूर निघणारा काळ’ वाचताना मलासुद्धा हे प्रश्न पडले होते :)


मूळ जर्मन कविता इथे सापडेल.

12 comments:

Mi, Sonal said...

khup khup aabhaar itaki sunder kavita pochwalyabaddal. Kharach khup fundamental aahet he prashn. aani pratyek kalala laagu aahet. Eternal Questions. Till the game of power, the gap between rich and poor remains, these qns will remain too!

रोहन चौधरी ... said...

असे तर खुपच 'अज्ञात' आहेत ... :) जगाचा इतिहास दुरच राहिला ... आपल्याला आपल्यासाठी लढलेले मावळे आणि सैनिक तरी कुठे माहीत आहेत सर्व???

Gouri said...

@ सोनल, सहज शोधत असताना ही कविता सापडली, आणि इतकी पटली, की लगेच अनुवाद करून ब्लॉगवर टाकाली.

@ खरंय रोहन. आपल्याला ‘सेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर’ किंवा बाजी फारतर माहित असतात ... एक एक चिरा उभारण्यासाठी घाम गाळणाऱ्यांची, बाजीच्या खांद्याला खांदा लावून खिंड लढवणाऱ्यांची नावं कुणालाच माहित नसतात. इतिहास ते घडवत असतात.

भानस said...

गौरी, अनुवाद भावला-भिडला.अनेक अनुत्तरीत प्रश्न आणि त्यांची अनुत्तरीत उत्तरे. या सगळ्या अनाम वीरांना सलाम.म्हणतात ना, " लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा मरता नये." पण ते लाखच नसतील तर पोशिंदा काय करू शकेल.नेमके हेच दुर्लक्षिले-भरडले जातात.

Gouri said...

@ त्यातही महाराजांसारखा ‘लाखांचा पोशिंदा’ विरळाच, ज्याच्या गारुडामुळे लोक आपखुषीने त्याच्यासाठी मरायलाही तयार होते ... नाहीतर गुलामांच्या पिळवणुकीमधून उभी रहायची मोठेमोठी कामं ... मोठेपणा मात्र राजाला.

रोहन चौधरी ... said...

" लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा मरता नये."

माझा ह्या वाक्याला पूर्ण विरोध आहे ... म्हणजे बघा ना ... पोशिंदा असताना 'लाख मेले' तर त्या पोशिंद्याचा काय फायदा???

आणि ते लाख मेल्यावर पोशिंदा काय करणार?? अजून पुढचे लाख तयार करणार का मारायला?

किमान शिवरायांना हे वाक्य लागू होत नाही असे मला वाटते...

(काही वेगळा अर्थ असल्यास सांगावा...)

Gouri said...

रोहन, मला या वाक्याचा अर्थ थोडा वेगळा वाटतो. मी हे कायम महाराजांच्याच संदर्भात ऐकलेलं आहे, आणि त्यात मला अनुयायांचा त्यांच्यावरचा विश्वास दिसतो. आपल्या जिवापेक्षा महाराजांचा जीव त्यांना मोलाचा वाटतो कारण आपल्या माघारी आपल्या घरादाराची व्यवस्था महाराज बघतीलच, खेरीज स्वराज्य उभं राहील, इतक्या लोकांना आधार मिळेल अशी त्यांची खात्री दिसते.

आपल्या इतिहासात राजा पडला म्हणून पत्त्यांच्या डोलाऱ्यासरख्या कोसळलेल्या सत्तांची उदाहरणं कमी नाहीत. त्यात पुन्हा तो विष्णूचा अंश, भूलोकीचा देव इ. इ. त्यामुळे नादान असला तरी राजा जगणं महत्त्वाचं अशी धारणा होती. अश्या वेळी तू म्हणतोस तसं लाख मेल्यावर त्या पोशिंद्याचा काय फायदा हे कदाचित सयुक्तिक होईल.

हेरंब said...

खुपच छान ग. हे असे बेसिक पण टोचणारे प्रश्न विचारले ना कोणी की जाम बेचैन होतं

अवधूत / Avadhoot said...

तुम्हाला जर्मन येते, हे किती चांगलं आहे. कविता आवडली. काफ्काचं काही अनुवाद केलंत तर वाचायला आवडेल.

Gouri said...

अवधूत, काफ्काला हात घालायचा म्हणजे भरपूर अभ्यास हवा ... त्याच्या साहित्याचा, त्यात येणाऱ्या संदर्भांचा, त्याला समांतर म्हणता येईल अश्या मराठीतल्या साहित्याचा. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला सुरुवात करणं आज मला शक्य नाहीये. त्यामुळे सद्ध्या तरी अशी एखादी कविता, छोटी कथा या पलिकडे माझ्या भाषांतराची मजल नाही.

Gouri said...

हेरंब, एकदम रोखठोक सवाल करतो ब्रेख्त. आपल्याला सुखाने जगू देत नाही :)

Gouri said...

हेरंब, एकदम रोखठोक सवाल करतो ब्रेख्त. आपल्याला सुखाने जगू देत नाही :)