Wednesday, May 26, 2010

स्कॉलर आणि राक्षस

    वर्षभरापूर्वी गच्चीतल्या बागेची सुरुवात केली तेंव्हा दोन फिलोडेंड्रॉनची रोपं आणली होती.

    हा माझा ‘स्कॉलर’:

     शाळेत, कॉलेजमध्ये पहिल्या बेंचवर बसणारी सिन्सियर, अभ्यासू मुलं असतात ना, पहिल्या दिवसापासून सगळ्या असाईनमेंट पूर्ण असणारी, तसा. लावल्यापासून आजपर्यंत नियमित, एका वेगाने वाढणारा. कुंडीत मॉसस्टिक लावल्यावर सिन्सियरली तिला धरून चढलेला. प्रत्येक पान नेटक्या आकाराचं, रंगाचं. अगदी भेटायला आलेल्या मैत्रिणीने ‘हे प्लॅस्टिकचं झाड ना?’ म्हणून विचारलं, इतका शिस्तीचा.
    यांना कधी कंटाळा येत नाही का? दंगा करावासा वाटत नाही का? सगळ्या नियमांमध्ये आणि शिस्तीमध्ये बोअर होत नाही का? सारखं काय शहाण्यासारखं वागायचं? हे प्रश्न मला स्कॉलर मंडळींना बघून पडायचे, आज याला बघून पडतात. हे आपल्याला झेपणारं नाही, याची तेंव्हाही खात्री होती, आजही आजे. स्कॉलर मंडळींविषयीचा जुनाच आदर याच्याविषयी वाटतो.

    आणि हा राक्षस:

    याचं सगळं त्या स्कॉलरच्या उलट. कुठलाही नियम याला मान्य नाही. कुंडीतल्या मॉसस्टिकचा आणि याचा दूरान्वयेही संबंध नाही, कारण आपण कसं वाढावं हे दुसरं कुणी ठरवणंच मुळात याला मान्य नाही. तो अपनी मर्जी का राजा आहे. सगळी पानं साधारण एका आकाराची असावीत हे याच्या गावीही नाही. याचं आजवर आलेलं प्रत्येक पान जुन्या पानापेक्षा मोठं आहे, म्हणून त्याचं प्रेमाचं नाव ‘राक्षस’. नर्सरीमधून आणल्यावर पहिल्यांदा ज्या कुंडीत हा राक्षस लावला, ती त्याला आवडली नाही. आणि आपली नाराजी त्याने अगदी स्पष्टपणे व्यक्तही केली. नुसतंच भुंडं खोड, पानांचा फारसा पत्ता नाही, असलेली पानं लगेच पिवळी पडणं असा बाग-आंधळ्यालासुद्धा नजरेआड न करता येणारा तीव्र निषेध त्याने व्यक्त केला. त्यामुळे थोड्या दिवसांतच त्याला नवी कुंडी मिळाली. हे नवं घर आवडल्याचंही आणि खूश असल्याचंही त्याने तितक्याच जोरात सांगितलं. एवढा तरारून आला, की हेच ते जुनं केविलवाणं झाड यावर विश्वास बसू नये.
    गच्चीतल्या वेड्या वार्‍यावर डोलायला याला आवडतं. भले त्यामुळे पानांच्या चिंध्या झाल्या तरीही. वार्‍यापासून थोडं संरक्षण म्हणून याला कोपर्‍यात हलवावं, तर शेजारच्या भिंतीवर घासून हा पानांची लक्तरं करून घेतो. त्यामुळे मारामारी करून आलेल्या पोरासारखा का दिसेना, याला तिथे वार्‍यातच ठेवायचं असं मी ठरवलंय. नाही तरी मला कुठे व्हर्सायसारखी ‘शिस्तबद्ध’ बाग करायचीय? तो मजेत असला म्हणजे झालं. स्कॉलरसारखा मला याच्याविषयी आदर बिदर वाटत नाही - पण आपल्यासारखंच कुणीतरी आहे हे बघून बरं नक्कीच वाटतं.
    आता तुम्हीच सांगा, या दोघांना एका जातीची दोन झाडं कुणी म्हणेल का? या बोटॅनिस्ट लोकांना काही समजत नाही असं माझं मत झालंय.

(फोटो भर दुपारच्या रम्य वातावरणात काढलेत, आणि दोघंही आता या फोटोंपेक्षा दुप्पट मोठे झाले आहेत... पण ताजे फोटो काढायचा कंटाळा केलाय फोटोमुळे पोस्ट लांबणीवर पडेल म्हणून ... तेंव्हा समजून घ्या.)

18 comments:

आनंद पत्रे said...

हेहेहे.. तातडीने पोस्टल्याबद्दल धन्यवाद. पण हे सवयीचे व्हायला हवे ;-).

स्कॉलर आवडला.. पण राक्षस जास्त जवळचा वाटतोय...

आळश्यांचा राजा said...

लय भारी लिवता तुमी म्याडम!

हेरंब said...

सुंदर !! झक्कास !! (पहिलं स्कॉलर साठी आणि दुसरं राक्षसासाठी..) ..

ताजे फोटो पण टाक ना म्हणजे महास्कॉलर आणि ब्रह्मराक्षस कसे दिसतात ते कळेल.. ;)

बाकी आनंदशी सहमत. समानधर्मामुळे राक्षस जवळचा वाटला..

भानस said...

सहीच.... अगं आमचा ब्रम्हराक्षसही असाच अगदी वेडा आहे पण फुलतो तेव्हां मात्र अगदी वेड लावतो गं.स्कॉलर अगदी मेटिक्युलसली वागणारा. छानच.

Gouri said...

@ आनंद, खास वाढदिवसानिमित्त २ पोस्ट ;)

Gouri said...

@ आळश्यांचा राजा: कसचं कसचं

Gouri said...

@ हेरंब, ताजे फोटो लवकरच (?) टाकते.

Gouri said...

@ भाग्यश्री, अगं तुझी ब्रह्मराक्षसाची पोस्ट वाचली ... सहीच आहे तुझाही ब्रह्मराक्षस.

Raj said...

मस्त. दोन्ही झाडे एकाच जातीची आहेत यावर
विश्वास बसत नाही. हे वाचून मला ज्युरासिक पार्कमधली
पॅलिओबॉटनिस्ट एली काय म्हणते ते आठवले..

You have plants right here in this building, for example, that are poisonous. You picked them because they look pretty, but these are aggressive
living things that have no idea what century they're
living in and will defend themselves. Violently, if
necessary.

Gouri said...

@ राज, दोन्ही फिलोडेड्रॉनमधल्याच पोटजाती आहेत. फिलोडेड्रॉनमध्ये खूप वैविध्य असतं. (हे मला ती झाडं घेताना माहित नव्हतं, आणि घेताना दोन्ही साधारण एकाच आकाराची दिसत होती.). ज्युरासिक पार्कमधला quote सहीच आहे ... मला आठवत नव्हता.

Vinay said...

अहो, एकाच आईच्या पोटी जन्म घेणारी दोन मुलं सुद्धा एकसारखी होत नाहीत. तिथे ह्या झाडांचं काय घेऊन बसलात. ते सोडा, आपण सगळे मानव जातिचेच आहोत. तरी एक माणूस दुसर्‍या सारखा नसतो. तेच ह्या झाडांच्या बाबतीत का घडू नये??

tanvi said...

क्या बात है!!! स्कॉलर आणि राक्षस दोघेही क्य़ूट आहेत... :D

>>>>>>ताजे फोटो पण टाक ना म्हणजे महास्कॉलर आणि ब्रह्मराक्षस कसे दिसतात ते कळेल.. ;)

लवकर टाक फोटो .....आळशी कोणीकडची!!! :)

kirti said...

Gauri,
this was too good. your plants are like my two sons. elder one is conformist , respects rules and all that........ younger one is just like you wrote about Raxas - self styled, reactionary, challenging the authority. hehehe . i loved the analogy. you are very good at drawing analogies.

Gouri said...

@ विनय, खरंय.पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना हे झाडांच्याही बाबतीत असणार.

Gouri said...

@ तन्वी, तू सुद्धा? (कं पंथातलीच असूनसुद्धा? ) अगं सद्ध्या उन्हाळ्यामुळे झाडांचे फार हाल होताहेत. जरा एखादा पाऊस झाला म्हणजे मस्त दिसतील. एक - दोन आठवडेच उरलेत आता उन्हाळ्याचे. तेंव्हा, लवकरच ... :)

Gouri said...

@ कीर्ती, पोस्ट आवडली म्हणून छान वाटालं. तुझ्या प्रतिक्रियेवरून मला एकदम तारे जमीन पर मधली भावंडं - विशेषतः त्यातला सिन्सियर, स्कॉलर दादा आठवला.

Anagha said...

'मारामारी करून आलेल्या पोरासारखा का दिसेना, याला तिथे वार्‍यातच ठेवायचं असं मी ठरवलंय. नाही तरी मला कुठे व्हर्सायसारखी ‘शिस्तबद्ध’ बाग करायचीय? तो मजेत असला म्हणजे झालं.':) छान! खूप आवडलं! नेहेमी बागेत रमलेली असतेस ना गं तू?

Gouri said...

अनघा, अग माझा रोजचा मोकळा वेळ बागेतच जातो. रोज सगळ्यांना भेटल्याशिवाय चैन नाही पडत :)