डॉ. उज्ज्वला दळवींचं ‘सोन्याच्या धुराचा ठसका’ वाचलं. सौदी अरेबियामध्ये पंचवीस वर्षं डॉक्टर म्हणून काम करतानाचे त्यांचे अनुभव त्यांनी रोचक भाषेत मांडलेत. प्रवासी म्हणून एखाद्या देशात जाणं, आणि तिथे राहून, ‘आतले’ म्हनून तो देश अनुभवणं यात खूप फरक असतो. यापूर्वी सौदीविषयी ‘अतिरेक्यांना पैसा इकडून मिळतो’या आरोपापलिकडे काहीच माहिती नव्हती मला.
पुस्तकातली अकरा बाळंतपणं झाल्यानंतर दीड वर्षं दिवस राहिले नाहीत म्हणून नैराश्य आलेली त्यांची पेशंट विसरता येत नाहीये. आणि पोटाच्या मागे या रानटी वस्तीमध्ये येऊन पडेल ते काम करणार्या जगभरातल्या चाकरमान्यांचे अनुभवही. त्यांची पिळवणूक, अपेक्षाभंग, आणि तश्याही वातावरणात त्यांनी काय एन्जॉय केलं ते. जबरदस्त ठेच लागली पुस्तक वाचताना.
जिथे दुसरं मतच खपवून घेतलं जात नाही, अश्या परक्या ठिकाणी रहायचं?
रानटी कायदा आणि त्याची अंधळी अंमलबजावणी अश्या जंगलच्या राजमध्ये जगायचं?
काय कपडे घालावेत, काय खावं, कुणाशी बोलावं, काय काम करावं ... या सगळ्याचा निर्णय दुसरं कुणीतरी करणार?
डोळ्यासमोर होणारा उघडउघड भेदभाव नजरेआड करायचा?
पैसे मिळतात म्हणून कमीपणाची वागणूक आणि मनमानी खपवून घ्यायची?
अश्या समाजात वाढणारी तुमची मुलं काय संस्कार घेत असतील?
आयुष्यात इतक्या तडाजोडी कुणी करू शकतं?
आत्मसन्मान ही चैनीची गोष्ट आहे का?
ताठ मानेने काम करायला मिळणं इतकं अवघड आहे?
आयुष्यभर अश्या वातावरणात जगू शकतात माणसं?
याला पर्याय नाही? का थोड्या दिवसांनी याचीही सवय होते?
मायदेशातला नोकरीधंदा सोडून जायलाच हवं अश्या ठिकाणी?
नाही हजम झालं.
बहुतेक मला सुरक्षिततेच्या कवचाची फार सवय झालीय.
किंवा मला स्वातंत्र्याची चटक लागलीय.
का माझ्यामध्ये पुरेशी महत्त्वाकांक्षा नाही?
रिस्क घेण्याची तयारी नाही?
का सुखासुखी कुणी इथे जाणार नाही - मला त्यांची मजबूरी समजत नाहीये?
19 comments:
पुस्तक वाचायची उत्सुकता आहे. वर्णन मस्त केले आहे.
सोनाली केळकर
सोनाली, पुस्तक वाचायला घेतल्यावर खाली ठेववत नाही ... आवर्जून वाचावं असं आहे.
पुस्तक वाचायची ईच्छा निर्माण झाली.. उत्ताम पुस्तक परिचय
या वरुन आठवले ती पुस्तकविश्व ही साईट (http://www.pustakvishwa.com). या साईटवर मराठी भाषेत जास्तीत जास्त पुस्तकांची माहीती गोळा करायचा प्रयत्न आहे. आपण ही साईट आवश्य पहावी व तिथे पण माहीतीत भर घालावी अशी विनंती.
निखिल, पुस्तकविश्वच्या दुव्याबद्दल धन्यवाद. कल्पना छान आहे. बघते.
वेंधळेपणा तरी किती करावा माणसाने एका दमात? पहिल्यांदा पुस्तकाचं नाव ‘सोनेरी धुराचा ठसका’ असं टाईपलं. जरा वेळाने जाणवलं ... नाव काहीतरी वेगळं वाटतंय. यथावकाश ट्यूब लागली - ते ‘सोन्याच्या’ हवं - सोनेरी नव्हे. पोस्ट पुन्हा प्रकाशित केली, मग लक्षात आलं, नाव ‘सोन्याच्या धुराचे ठसके’ आहे. अजून कुठली चूक आत्ता तरी सापडलेली नाहीये. आणि आता दर वेळी पोस्टाची नवी आवृत्ती काढण्याऐवजी सरळ प्रतिक्रियेमध्ये चुकांची दुरुस्ती छापते.
छान परीक्षण.. काही दिवसांपूर्वी लोकसत्तामध्येही या पुस्तकाची समीक्षा आली होती. त्यातही अशा अनेक धक्कादायक अनुभवांचं वर्णन केलं होतं.
मायदेशाच्या ट्रीपमधल्या पुस्तकांच्या विश-लिस्ट मधला काउंट एक ने वाढला. :)
हेरंब, नक्की वाच. मायबोलीवर हे ऑनलाईनपण उपलब्ध आहे बहुतेक. माझं वाचन साधारणपणे हाताला येईल ते वाचायचं असं असतं - आणि काहीच वाचायला शिल्लक नाही अशी वेळ येईपर्यंत मी पेपरमधली चित्रपट - नाटक - पुस्तक परीक्षणं वाचत नाही (उगाचच) ... त्यामुळे मला या पुस्तकाचा आतापर्यंत पत्ताच नव्हता.
गौरी, तू अन मी एकाच वेळी वाचलं बहुतेक...मी माझ्या जेटलॅगचा वेळ या पुस्तकात सत्कारणी लावला....ते लोकसत्तामधलं वाचुनच लिस्टवर ठेवलं होतं...असो..
तुला पडलेले प्रश्न मलाही पडलेत कारण इतका त्रास/त्यांची अरेरावी सहन करुनही पाव शतक तिथं काढण्याचं कारण काय हे खरंच सारखं सारखं वाटतं आणि तेवढं एक सोडून बाकी सगळं लेखिकेने लिहिलंय...
मी हे पुस्तक वाचले नाही पण सॊदीत ६-७ वर्षे राहिले आहे. चांगला ग्रुप होता.छान गेला. माझे अनुभव चांगले आहेत. थोडे दिवसासाठी जाउन रहायला काहीच हरकत नाही. तिकडून अमेरिकेत आल्यावर इथेही काही बंधने जाणवतातच. आत्मसन्मान ही गोष्ट वेगळी आहे. हे लोक तिथे प्रवेश करताना सगळे नियम सांगतात. अरेरावी, मुलींकडे बघण्याची दृष्टी आणि वागणुकीतला भेदभाव अगदी सगळीकडे असतो. आपल्या देशातही हा अनुभव प्रत्येकाला येतो. मुस्लीम हा धर्म अजून बराच नवीन आहे. आपल्या कडेही पूर्वी बंधने होतीच.
मी हे पुस्तक वाचले नाही पण सॊदीत ६-७ वर्षे राहिले आहे. चांगला ग्रुप होता.छान गेला. माझे अनुभव चांगले आहेत. थोडे दिवसासाठी जाउन रहायला काहीच हरकत नाही. तिकडून अमेरिकेत आल्यावर इथेही काही बंधने जाणवतातच. आत्मसन्मान ही गोष्ट वेगळी आहे. हे लोक तिथे प्रवेश करताना सगळे नियम सांगतात. अरेरावी, मुलींकडे बघण्याची दृष्टी आणि वागणुकीतला भेदभाव अगदी सगळीकडे असतो. आपल्या देशातही हा अनुभव प्रत्येकाला येतो. मुस्लीम हा धर्म अजून बराच नवीन आहे. आपल्या कडेही पूर्वी बंधने होतीच.
I have written about my exp on my blog mpmate.blogspot.com about saudi
अपर्णा, ग्रेट माईंड्स रीड अलाईक ;)
लेखिकेच्या सौदीमध्ये पहिलं पाऊल टाकण्याच्या काळापेक्षा आता बरीच सुधारणा असावी, मोठ्या शहरातली परिस्थिती वेगळी असावी असं माधुरीनी ब्लॉगवर दिलेल्या माहितीवरून (http://mpmate.blogspot.com/2009/05/arabian-sites.html) वाटलं.
माधुरीताई, तुम्ही दिलेल्या दुव्यावर छानच सविस्तर माहिती दिलीय रियाधमधल्या जगण्याविषयी. या पुस्तकाची सुरुवात पंचवीस तीस वर्षांपूर्वीच्या ग्रामीण सौदीमधून होते - एवढ्या वर्षात यात बदल झाले असावेत.
अरेरावी, वागणुकीतला भेदभाव इ. तुम्ही म्हटलंय तसं सगळीकडेच अनुभवायला मिळतं हे खरंय - पण वाचल्यावर तिथे फारच टोकाची परिस्थिती वाटाली.
लिस्ट मध्ये टाकलं!
लिस्टमध्ये लगेच टाकलेयं. लवकरच योग येईल बहुदा. :)
आनंद, भाग्यश्री, नक्की वाचा हे पुस्तक.
खूप सुंदर लिहिलयस ! पुस्तक तातडीने वाचण्याची इच्छा झालीय ! असेच एक `दिनार' या नावाचे एक पुस्तक निरंजन उझगरे या कवीने लिहिलिले आठवतेय. सुमारे २५ वर्षांपूर्वी ! असेच काही अनुभव .......
राजीव, आवर्जून वाचावं असं आहे पुस्तक. माहितीपूर्ण आणि रोचक भाषेत लिहिलेलं. पण डॉक्टरकीसारखा जगाच्या पाठीवर कुठेही पोटापुरते नक्कीच मिळेल असा पेशा असताना लेखिकेला एवढी वर्षं सौदी मध्ये का घालवावीशी वाटली हे मात्र समजत नाही.
वाचायला हवं! नाहीतरी उद्या जाऊन वाचनालयाची पुस्तकं परत करायचीच आहेत! मग मी हे घेऊन येईन. :)
अनघा, नक्की वाच. आणि तुझ्या दुबईच्या अनुभवांविषयीही लिही ना!
पुस्तकाविषयी लिहिताना मला फार अवघड जातं ... पुस्तकात काय सांगितलंय हे सांगायचं, पण ते वाचायची उत्सुकता तर राहिली पाहिजे. मग कधी कधी माझं मतच पुस्तकाच्या आशयापेक्षा जास्त जागा खाऊन जातं :) तसं झालंय या पोस्टमध्ये.
Post a Comment