अचानक ध्यानीमनी नसताना आय सी यू बाहेरच्या प्रतिक्षाकक्षामध्ये तळ ठोकायची वेळ आली, आणि एक वेगळंच जग बघायला मिळालं.
जनरल वॉर्ड, सेमी स्पेशल, स्पेशल, डिलक्स वगैरे वर्गभेद इथे नसतात.
"तुमचं कोण?" एवढा एकच प्रश्न या परिवाराचा एक भाग होण्यासाठी पुरेसा असतो.
"आमच्या पेशंटने आज म्हणे एक डोळा उघडला!" एवढी बातमी इथल्या लोकांना आनंदित करायला पुरेशी असते.
तुमचा पेशंट एकदा त्या काचेच्या दाराआड गेला, की तुम्ही फक्त बाहेर वाट बघायची.
आत ठेवलेल्या आपल्या माणसाला भेटता येत नाहीये, म्हणून तळमळणार्या काकूंना कुणी गावाकडची ताई "तुमच्या पेशंटला पाजायला घेऊन जा" म्हणून शहाळ्याचं पाणी देते, तेंव्हा काकूंबरोबरच अजून कुणाकुणाच्या नातेवाईकांचेही डोळे भरून येतात.
"आपल्याच नशीबात अमूक तमूक का" असा प्रश्न पडत असेल तर जरा वेळ इथे बसा. आपण किती नशीबवान आहोत याचा साक्षात्कार होतो.
कारण इथे तुम्हाला जबरी अपघातानंतर गेले दहा दिवस मृत्यूशी झगडणार्या पंचवीस वर्षांच्या मुलाची आई भेटते.
पंधरा दिवसांपूर्वी ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झालेल्या बाईचा नवरा भेटतो.
चार दिवसांपासून मुलांना आजोळी धाडून, कपड्यांची बॅग भरून सासूबरोबर पुण्याला आलेली, इथल्याच बाकड्यावर रात्री झोपणारी सून दिसते.
पोराच्या इलाजासाठी आज लगेच पंचवीस हजार कुठून आणू म्हणून काळजीत पडलेले गावाकडचे आजोबा दिसतात.
ज्यांचे नातेवाईक आयसीयू पर्यंत पोहोचूच शकले नाहीत, त्यांच्यापेक्षा हे सगळे नशीबवान असतात.
आणि तुम्ही?
18 comments:
मला हॉस्पिटलची भितीच वाटते.. तरीही आपण खुप भाग्यवान हेच खरे...
गौरी,
पोस्टाचे नाव फ़ार समर्पक आहे.आपले सुख आपल्याला फ़ारशे दिसत नाही.ठ्णठ्णीत तब्बेती हे कीत्ती मोठे भाग्य आहे, ह्यचि जाणीव अधीच असलेली बरी.
पोस्टात नमूद केलेले अनुभव मी पण पाहीले आहेत, माज़्या सासुबाइ टाटा मधे असताना.
हॊस्पिटल हा अनुभव मी कधीच विसरू नाही शकत.
आणी , हो बाई बाराहा मिशन यशस्वी.तुला आणि मझ्या थोरल्या चिरंजीवांना ह्याचे यश आहे.
गौरी, माझे बाबा पहिल्या वेळी सहा दिवस, बायपासच्या नंतर तेविस दिवस व तिस~यांदा ऍंजोच्यावेळी तीन दिवस आयसीयू मध्ये होते.इतके भयाण दिवस काढलेत नं.प्रकृती सलामत तो सबकुछ चंगा...हे सत्य इथे गेल्यावरच कळते.
थोडक्यात पण एक वेगळं सत्य मांडलंस...मला आय.सी.यु.ची एकंदरित भितीच वाटते...माझी काही माणसं आय.सी.यु.त फ़क्त गेलीत परत नाही येऊ शकली.....
फारच थोडक्यात आटोपलस. पण तुला काय म्हणायचय ते लक्षात येतंय. गंभीर केलंस.
पोस्ट टाकली, आणि नंतर आठवडाभर मला इकडे फिरकायची संधीच मिळाली नाहीये - त्यामुळे सर्व प्रतिक्रियांना उत्तर उशीरा लिहिते आहे. सॉरी.
@ आनंद, ते एकूण वातावरण भीतीदायकच असतं ... नकळत मनावर एक ताण येतो त्याचा. तिथे रहावं न लागणारे आपण भाग्यवान.
कीर्ती, या गोष्टी असणं आपण इतकं गृहित धरतो, की नसण्याचा विचारही मनाला शिवत नाही.
भाग्यश्री, तुझ्या ब्लॉगवर वाचलं होतं ग या अनुभवांबद्दल तू लिहिलेलं - पण वाचणं आणि प्रत्यक्ष अनुभवणं यातला फरक तिथे गेल्यावर जाणवला :)
अपर्णा, खरंय ग ... आत गेलेली माणसं परत न भेटणं हे फार अवघड असतं.
आळश्यांच्या राजा, अरे या अनुभवातून सगळेच कधी ना कधी तरी थोड्याफार फरकाने जात असतात ... अजून काय म्हणणार?
Indli, thanks for the comment. Do you also include Marathi blogs?
हे वाचताना माझ्या डोळ्यासमोर एक जुनं चित्र उभं राहिलं. गौरी, तुझा हा लेख मन हेलावणारा आहे.
श्रीराज, ब्लॉगवर स्वागत. तुझ्या प्रतिक्रियेने लिहायला नवा हुरूप आला.
ह्या आय .सी.यु. ची एक दुसरी बाजू पण आहे. आपला पेशंट आत असल्यामुळे आपण लक्ष देत नाही. पण हि इस्पितळे आय .सी.यु.मधील पेशंट ला वार्ड पेक्षा जास्ती पैसे बेड चार्जेस म्हणून लावतातच. शिवाय आय .सी.यु. देखभाल चार्जेस म्हणून वेगळे लावतात. खरे तर 'आय .सी.यु. बेड चार्जेस' मध्ये ते अंतर्भूत असतातच. थोडक्यात सरकारी कर्मचारी कार्यालयात हजर होण्यासाठी सरकारी पगार घेतात व जनतेची कामे करण्यासाठी जनतेकडून वेगळा.
असा हा प्रकार आहे. ह्या अतिरिक्त चार्जेस लावण्यावर मी हरकत घेतली असता इस्पितळाने आय .सी.यु. देखभाल चार्जेस माझे बिलातून त्वरित कमी केले. (अदमासे बिलाच्या १० %). विशेष म्हणजे सदर इस्पितळ हे I S O ९००१ प्रमाणित होते . तेंव्हा आपण पण ............
राजीव, सुदैवाने आर्थिक बाजूकडे फार लक्ष घालावं लागलं नाही - मेडिकल इन्श्युरन्स होता. तरीही वॉर्डमध्ये जागा नाही म्हणून आय सी यू मध्ये ठेवलंच हॉस्पिटलने. डिस्चार्ज मिळायला सहा तास लागले - तेवढ्या वेळात बिलातली ओळनओळ नीट वाचून पाठ व्हायला आली होती, त्यामुळे ही गोष्ट लक्षात आली आणि जादा पैसे कमी करायला लावले.
गौरी, एक काळ असा आला होता कि मी मुंबईतील वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या वाऱ्या करत होते त्याची आठवण झाली. कधी धाकटी बहिण, कधी बाबा, कधी नवरा...तर कधी मधली बहिण...मन निर्ढावलंय....
अनघा, सुदैवाने मला इतक्या वार्या करायला लागल्या नाहीत हॉस्पिटलच्या कधी ... पण कितीही वेळा जायला लागलं तरी मनाची थोडी तयारी होईल, पण आपलं जवळचं माणूस असेल तिथे तर त्रास होणारच ना ग!
Post a Comment