Monday, October 4, 2010

ऑल इन / आफ्टर अ डेज वर्क

(मागच्या जर्मनी भेटीमध्ये काही पूर्व जर्मनीतले सहकारी, काही पश्चिमेचे, एक ब्राझिलची अशी टीम होती, त्यामुळे बर्‍याच गंमतीजमती झाल्या.त्याविषयी लिहायला सुरुवात केली होती, पण दोन महिन्यांपासून हे अर्धमुर्ध लिहून पडून आहे ... आज तसंच प्रकाशित करते आहे.)

********************


माणसं तशी एकेकेट्याने असताना बर्‍यापैकी नॉर्मल वागतात - पण त्यांची काही कॉम्बिनेशन्स एकदम डेंजर असतात.  असंच एक कॉम्बिनेशन गेले दोन आठवडे झाले होतं. त्याचा हा कॅलिडोस्कोप.

********************

रात्री साडेनऊला ऑफिसमधून निघून वाट शोधत परदेशातलं अनोळखी गाव बघायला साधारणपणे शहाणी म्हणण्यासारखी माणसं जात नाहीत. पण सगळेच "जाऊन तर बघू या" म्हणणारे निघाल्यावर अश्या प्रवासात धमाल मजा येते. नकाशा, जीपीएस अश्या क्षुद्र साधनांवाचून तुमचं काही अडत नाही. एक एक्झिट चुकली तर पुढची ... त्यात काय एवढं? नाही तरी आपल्याला काय घाई आहे पोहोचायची? रोज हॉटेलपासून ऑफिसपर्यंतचा प्रवासही रोमांचक असतो - कारण रोज नवाच रस्ता सापडतो.

********************

मला जर्मन बीयर चढलीय का? का खरंच माझ्या आजुबाजूचे लोक या भागातल्या डुकरांच्या संख्येविषयी, डुकरांच्या रोगांमधल्या स्पेशलायझेशनविषयी गंभीर चर्चा करताहेत? इथली डुकरं स्वच्छ असतात, त्यांची पिल्लं गोजिरवाणी दिसतात हे मान्य. पण डुक्कर हा प्राणी माणसाला स्पेशलायझेशन म्हणून का बरं निवडावासा वाटावा? आणि या उच्च शिक्षणासाठी ब्राझीलहून युरोपला शिकायला यावं? या परिसरात साडेचार लाख डुकरं आहेत? नाही ऍक्च्युअली त्यांनी साडेचार मिलियन म्हटलं ... म्हणजे पंचेचाळीस लाख! (पुण्यात किती असावीत?) हानोवरचं व्हेटर्नरी कॉलेज आणि क्लिनिक डुकरांसाठी जगप्रसिद्ध आहे ही ज्ञानप्राप्ती हा सगळा संवाद ऐकण्यातून झाली. यांची चर्चा चाललीय तोवर अजून एक बियर घ्यावी हे बरं. इट हेल्प्स मेंटेन युअर सॅनिटी.

********************

एखाद्या माणसाची सूचना तुम्हाला मान्य होत नाही, परिस्थितीशी अगदीच विसंगत वाटते कधीकधी. मान्य. पण म्हणून तुम्ही कामाच्या ठिकाणी, मिटिंगमध्ये ‘हाल्फ’ (अर्धा) म्हणून त्याची संभवना करू शकता? हे जरा जास्तच होतंय. चारपाच वेळा ‘हाल्फ’ ऐकल्यावर मला शोध लागला ... ही बाई हिच्या ब्राझिलियन पोर्तुगीज उच्चारांप्रमाणे जर्मन ‘राल्फ’ चा ‘हाल्फ’ बनवते आहे :D. आधी जर्मन ‘र’एवढा गटरल - बहुसंख्य अन्यभाषिकांना न झेपणारा ... त्याचं पोर्तुगीज रूप एवढं भीषण असेल याची मला कल्पना नव्हती.

********************

जर्मन सॉसेजेस कुणी कसं खाऊ शकतं? त्याला एक विचित्र वास असतो, आणि प्लॅस्टिकचा तुकडा खाल्ल्यासारखा स्वाद असतो. एकदम साउअरक्राउटशी स्पर्धा करेल इतका अनइंटरेस्टिंग प्रकार आहे हा.

********************

दररोज स्टीक आणि वाईनवाचून जेवण न होणार्‍या ब्राझीलच्या बाईला जर्मनीमध्ये रात्री साडेबारा वाजता मेथी खाकरा आणि दही - पोहे मेतकूट खायला घालायची आयडिया कशी वाटते? याला आन्तरराष्ट्रीय स्तरावरची देवाणघेवाण म्हणायचं का? ;) आणि जेंव्हा ही आंतरराष्टीय परिषद सिंगापूरमधल्या कुणाला तरी चर्चेत सामील करून घेते, तेंव्हा तर मी स्वतःच आचंबित होते. खरंच जग एवढं जवळ आलंय? जगाच्या कुठल्याही कोपर्‍यातून लोक एकमेकांच्या सहकार्याने एवढ्या मोठ्या आर्थिक उलथापालथी घडवून आणतात? यातल्या कुणालाच या आर्थिक घडामोडींमधून प्रत्यक्ष फायदा नाही. फायदा होणार तो कंपनीला. त्या अजस्त्र यंत्रातल्या खिळ्यांना कदाचित एखादी शाबासकीची मेल मिळेल या धडपडीकरता. बस. what motivates them to go that extra mile? याच्या एक शतांश डेडिकेशन दाखवलं तरी आपल्या देशाचे किती प्रश्न सुटतील!(मग पन्नास वर्षं झाली तरी बेळगावचा प्रश्न का बरं सुटत नाही? काश्मीर धुमसायचं का थांबत नाही? आपल्याला एकाही शेजार्‍याबरोबर बरे संबंध का निर्माण करता येत नाहीत? )

********************

राजाच्या जुन्या बागेतल्या मेळ्यामध्ये खेळ करणारे हे ऍक्रोबॅट्स रबराचे बनवलेले आहेत का? यांना मिळतात तश्या टाळ्या पुण्यातल्या दोरीवरच्या डोंबार्‍याच्या मुलीला कधी मिळणार? दर उन्हाळ्यात इथे आकर्षक दारूकामाची स्पर्धा असते. दर रविवारी एक या प्रमाणे आठ - दहा जगप्रसिद्ध फटाक्यांचे निर्माते आपलं दारूकाम सादर करतात, आणि त्यातून त्या वर्षाचा विजेता निवडला जातो. आजचं दारूकाम छानच होतं, पण तोक्योमध्ये त्यांच्या उन्हाळी उत्सवामध्ये (हानाबी मध्ये) याहून सरस काम बघायला मिळतं. दारूकामाच्या आधी एक गरम हवेचा बलून सोडतात, आणि त्या बलूनच्या खाली एक जिमनॅस्ट हवेत तरंगत कसरती करत असते. बलूनला लटकत कसरती करायला वेताचा मलखांब हा किती परफेक्ट प्रकार होईल!

********************

ब्राझिल हा दक्षिण अमेरिकेतला एकमेव पोर्तुगीजभाषिक देश आहे. (बाकी संपूर्ण दक्षिण अमेरिका स्पॅनिश बोलणारी.) काही काळ पोर्तुगीज साम्राज्याची राजधानी रिओला होती. ब्राझिलची सहकारी म्हणजे गोरी, काळी, पिवळी, इंडियन - काय रंगाची असणार याविषयी मला काहीही कल्पना नव्हती. प्रत्यक्ष भेटल्यावर समजलं - ब्राझिलची सहकारी म्हणजे कुठल्याही रंगाची असू शकते. ब्राझिल हा अतिशय सुंदर देश आहे, भरपूर नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, लोकशाही विशेष रुजलेली नाही. इथली संस्कृती काही बाबतीत अमिरिकेला अगदी जवळची, तर कौटुंबिक संबंध एकदम भारतातल्यासारखे. आपली सासू ऐशीव्या वर्षी केवढी ऍक्टिव्ह आहे याचं वर्णन वर्णन ओल्गा सांगत होती ... आयुष्यभर तिने पब चालवला - अजूनही ती रोज थोडा वेळ गल्ल्यावर बसते. काठापदराची साडी, ठसठशीत कुंकू आणि हातभर बांगड्या घालणारी माझी सासू पबच्या गल्ल्यावर बसली तर कसं दिसेल असं चित्र क्षणभर माझ्या डोळ्यापुढे तरळून गेलं :)

********************

12 comments:

आ का said...

सहीच आहे..
चांगले अनुभव आहेत.... पुढचे अनुभव पुर्ण येउ दे...

आनंद पत्रे said...

मजेशीर अनुभव आहेत...

Gouri said...

आका, अरे पूर्ण लिहून मग प्रकाशित करायचं म्हणून दोन महिने पडून राहिलं ते. म्हणून मग तसंच पोस्ट केलं :)

Gouri said...

आनंद, :)
पूर्व आणि पश्चिम जर्मनीविषयीपण बर्‍याच खाचाखोचा बघायला मिळाल्या या वेळेला. होपफुली लवकरच लिहीन त्याविषयीही.

tanvi said...

लिहीत जा गं बये जरा ....

वेगळेच अनुभव आहेत बघ सगळे... शेवटचा सासुबाईंचा मस्त...

पुढचे लिही पटकन!!

Gouri said...

तन्वी, लिहिते (हळुहळू :D).
रच्याकने, ते स्कॉलर आणि राक्षसाचे फोटू टाकले बरं का मी अखेरीस.

हेरंब said...

जर्मनी, ब्राझील, युरोप... नक्की कुठे आहेस टू आत्ता? (मी नक्की कुठे आहे आत्ता? ;).. की मलाही अमेरिकन नीर चढलंय?) ...

जोक्स अपार्ट.. मस्त वाचलं वाचायला. अजून येउदे.. आणि त्या कम्पोस्टिंगचं काय झालं?

Gouri said...

हेरंब, अरे हे दोन महिन्यांपूर्वी जर्मनी फेरीनंतर लगेच लिहिलंय. तेंव्हा ब्राझिलमधून एक, सिंगापूरमधून एक आणि भारतातून मी असं आम्ही जर्मनीमध्ये एकत्र काम करत होतो ... तेंव्हाच्या या सगळ्या गमती आहेत.
कम्पोस्टिंगचं कल्चर मिळालं नाही मागच्या शनिवारी .. त्यामुळे अजून पेंडिंग आहे शिकणं.

अपर्णा said...

गौराबाई थोड सांडल्यासारख झालंय का की मला च्यामारीकेतला भारतीय चहा चढलाय?? पण मजा आली; विशेष करून " ‘राल्फ’ चा ‘हाल्फ’ " एकदम लोळालोळी.............आणि तिला रात्रीच थालीपीठ खाऊ घालण्याची कल्पना पण लई भारी....

Gouri said...

अपर्णा, अगं थोडं काय - भलतंच विस्कळित आहे हे - पण आता पूर्ण होण्याची आशा मावळली आहे त्यामुळे तसंच टाकलंय. रात्री साडेअकरा वाजता ऑफिसमधून आल्यावर सगळी हॉटेलं बंद असतात तिथे, त्यामुळे माझ्याकडे असलेलं खाणं किंवा उपाशी झोपणं असे पर्याय होते :)

THE PROPHET said...

प्रचंड लोळालोळी!
डुक्करपुराण भारीच!

Gouri said...

विभि, डुक्करपुराण ऐकताना खरंच विश्वास बसत नव्हता हे लोक अशी काही चर्चा करताहेत म्हणून !