Friday, November 12, 2010

चवळी सूप

खादाडी पोस्ट लिहिण्याला माझा तात्त्विक विरोध आहे. असल्या पोस्ट लिहिताना लेखकाला समस्त वाचकवर्गाला टुकटुक करून आम्ही काय काय मस्त खाल्लं हे सांगण्याची संधी मिळते. वर आणखी शिक्षा म्हणून छान छान फोटो टाकता येतात. हा वाचकांवर (विशेषतः ऑफिसमध्ये बसून ब्लॉग वाचणार्‍या बापड्या वाचकांवर) अन्याय आहे. तेंव्हा खादाडीवरची पोस्ट लिहिणार नाही असा माझा निश्चय आहे. तो मी फक्त या पोस्टपुरता गुंडाळून ठेवलेला आहे  याची कृपया नोंद घ्यावी :D

साहित्य: चवळीचे चार दाणे, कॅमेरा, ऊन, पाऊस, माती, पेशन्स इ.

वेळ: सुमारे तीन महिने

कृती: बारीक पांढर्‍या चवळीच्या पाकिटातले लाल दिसणारे चार दाणे घ्यावेत.
साधारणपणे ऑगस्टमध्ये ते पेरावेत. त्यांना भरपूर ऊन आणि पाऊस मिळाला पाहिजे. आठवडाभरात त्यांना कोंब येतात. कबुतरं, मध्येच पडलेली उघडीप यात दोन कोंब वाळून जातात. उरलेले दोन वेल तासातासने वाढत असावेत असं वाटण्यासारख्या वेगाने चढत जातात. त्याला खालीलप्रमाणे फुलं आली, म्हणजे वेल नीट वाढतोय असे समजावे.

ही फुलं जोडीजोडीने येतात. फुल एका दिवसात वाळतं, आणि चवळीची शेंग दिसायला लागते. प्रत्येक शेंग पूर्ण वाढून काळपट झाली की काढावी आणि सावलीत सुकवावी. दोन दिवसांनी तिचे दाणे काढावेत. याप्रमाणे रोज १५-२० दाणे निघतील. ते सठवत रहावेत. वेलावरच्या सगळ्या शेंगा याप्रमाणे काढून झाल्या, म्हणजे लक्षात येते, की याची उसळ अर्धी वाटीपेक्षा जास्त होणार नाही.
तेंव्हा घरात कुणी नसताना चवळीचे सूप करून एकटयाने प्यावे. पुराव्यासाठी एक फोटो काढून ठेवावा.

सूचना:

१. फुलं मोजून किती शेंगा येणार, ‘पीक’ किती निघणार याची स्वप्नं बघू नयेत. अंदाज हमखास चुकतो. काही शेंगा पोचट निघतात, काही भरण्यापूर्वीच सुकून जातात. तेंव्हा भरून, वाळून हातात पडेपर्यंत शेंग आली म्हणू नये.
२. सुपात काहीही घातले / घालायचे राहिले, तरी घरच्या चवळीचे सूप गोडच लागते. तेंव्हा पुढची कृती विचारू नये.
३. वेलावर नुसती फुलं असताना आल्यागेल्या प्रत्येकाला "ओळखा बरं कसला वेल आहे ते" म्हणून भाव खाऊन घ्यावा. नंतर कुणाला देण्याइतके चवळीचे दाणे निघण्याची शक्यता कमीच असते.

24 comments:

Raj said...

अभिनंदन शेतकरीण बाई :)
>घरात कुणी नसताना चवळीचे सूप करून एकटयाने प्यावे.
हे बाकी खासच!

Pankaj - भटकंती Unlimited said...

हा हा हा.. .अशक्य भारी.

ता.क.: फुलाच्या फोटोचा कॉंट्रास्ट अजून थोडा पाहिले. एसएलआर आल्यावर जमेलच तसे.

(वरील कमेंटमध्ये मुख्य मसुदा कुठला आणि ता.क. कुठला असा गैरसमज होण्याचा संभव आहे. पण तसे नमूद केले आहेच.)

Jaswandi said...

ही पोस्ट "सुप्परलाईक" आहे माझ्याकडनं :)
लैच भारी!

Gouri said...

राज, अरे कुणाला तरी चव नीट समजण्याइतकं मिळायला हवं ना? :)
लाल चवळी बाजारात सहज मिळत नाही, तर साध्या चवळीतले लाल दाणे लावून काय येतं ते बघावं म्हणून सहज म्हणून लावली होती चवळी. येणार का, किती दिवसात, किती दाणे याचा काहीच अंदाज नव्हता.

Gouri said...

पंकज, फोटो टाकतानाच मला वाटलं होतं ... साधा कॅमेरा आहे ना सध्या :)

Gouri said...

जास्वंदी, रेसिपी मस्त आहे ना? आपण फक्त दाणे पेरायचे, आणि वाट बघत बसायचं. बाकी सगळं काम आपोआप होतं :)

हेरंब said...

>> तेंव्हा खादाडीवरची पोस्ट लिहिणार नाही असा माझा निश्चय आहे. तो मी फक्त या पोस्टपुरता गुंडाळून ठेवलेला आहे याची कृपया नोंद घ्यावी :D

नोंद घेण्यात आलेली आहे तरीही परंपरेनुसार णी षे ढ स्वीकारावा ही विनंती..

बाकी तुझ्या पोस्टवरून चहा आणायला वेळ लागल्यावर "आयला हा काय दार्जिलिंगला गेलाय का चहा आणायला" वाली जी कमेंट येते ना तिची आठवण आली. चवळी सूप करायचं मान्य आहे पण तयारी थेट 'ऑगस्ट' मध्ये (हे महत्वाचं) पेरण्यापासून ?? हा हा लय भारी.. खर्रखुर्र दार्जिलिंग ;)

अनघा said...

चवळी किती टपोरी आहे! फूल, पोस्ट, चवळी आणि सुपाचा फोटो...सगळं मस्त! :)

Gouri said...

हेरंब, णीषेढ झाल्यावर मला खरंच खादाडी पोस्ट लिहिल्यासारखं वाटतंय :)
चार दाणे घेऊन सूप बनवायचं म्हणजे तीन महिने लागणारच ना? ;)

Gouri said...

अनघा, किती सुंदर रंगाचं आहे ना फूल? नुसत्या फुलांसाठीसुद्धा पुन्हा लावायला हरकत नाही असं वाटतंय. :)

रोहन चौधरी ... said...

धन्य गं बाई तू... कसली भारी पोस्ट... अश्शी वरीजनल खादाडी पोस्ट टाकल्याबद्दल तुझा नो निषेध.. :D

आनंद पत्रे said...

कमीतकमी सामग्री वापरून सुप वाजवलंस ह्याचं ;)

Anonymous said...

sahi sahi aani sahich :)

ag photo kasale mast aahet phulanche ... reshipi jam bhannat.... hi post aavadali asalyache aamachya matoshrinni pansangitale aahe tula :)

Gouri said...

रोहन, चला म्हणजे मिनिमम निषेध खादाडी पोस्ट टाकण्यात मला यश आलं की! :)

Gouri said...

आनंद, अगदी बरोबर ... चार दाणे वापरून केलेलं सूप :D

Gouri said...

तन्वी, आईला रेसिपी आवडली म्हणजे सहीच ग... तू वाचायला सांगितली होतीस का तिला?

अपर्णा said...

चार दाण्याची रेसिपी.....झकास....सुट्टीमध्ये (जर सुरु झाली असली तर) चांगल सुरु आहे अस म्हणेन मी तरी...मग आता पुढची रेसिपी पण येऊ द्यात....मी काही निषेध बिषेध करत नाही कारण अशीच नोंद मनात ठेवून मी पण खादाडीबद्दल काहीबाही लिहित असतेच न...:)
रच्याक पुढच्या वर्षी आमच्या फार्मविलमध्ये चवळी लावावी म्हणते...मागच्या वेळी आमच्या शेजार्याने इथली कुठली तरी बिन लावली होती त्याच्या थोड्या शेंगा चाखायला मिळाल्यात पण ह्या रेसिपीने जरा टेम्प्टिंग होतंय....

Gouri said...

अपर्णा, अगं सुट्टी सुरू व्हायचीय अजून. या ‘रेसिपी’मध्ये माझा सहभाग दाणे पेरणे (फार फार तर २ मिनिटं) अधून मधून फोटो काढणे (येता जाता) आणि शेंगा गोळा करणे (फार तर २ मिनिटं रोज) एवढाच आहे ... बाकी काम बिया, ऊन, पाऊस, माती यांचं. त्यामुळे सुट्टी नसतानाही जमलंय. तू नक्की लाव बीन्स ... विशेष कष्ट न घेता छान येतात (म्हणे). तुझीपण बीन्सची रेसिपी येऊ देत! :)

THE PROPHET said...

भारीच...
खादाडी पोस्टचं हे व्हेरियेशन आवडलं!! :)

Gouri said...

विद्याधर, सोप्पी रेसिपी आहे ना? ;)

प्रसाद साळुंखे said...

सॉलिड सोप्पी खादाडी पोस्ट,
म्हणजे नेहमी छळणार्‍या प्रश्नांना थारा नाही
उदा. साहित्यामधलं अमुकतमुक नक्की मिळतं कुठे? लालसर म्हणजे साधारण केवढं लालसर? चवीनुसार मीठ? घरातल्या स्पून्सपैकी टेबलस्पून कुठला? हे फोटोत दाखवलंय तसचं बनल्यावर दिसतं का?

Gouri said...

प्रसाद, याहून अवघड रेसिपी आपल्याला लिहिता येत नाही बाबा :D

भानस said...

अगं, कसला मस्त उपद्व्याप केला आहेस तू हा... आवड्याच अपनेको. आता दोन महिन्यात कुठल्या कुठल्या बिया कुठच्या कुठच्या कुंड्यांमध्ये पेरायचे ठरवते आहेस? मनातल्या कुठे उगवल्या व किती सुंदर फुले फुलली ते सांग गो बये... मी वाट पाहिन... :)

Gouri said...

भाग्यश्री, अग आधी चांगलं खत पाणी घालून तयारी करायचीय ... चांगली भरघोस फुलं यावीत म्हणून :)