Monday, March 14, 2011

एक से मेरा क्या होगा?

    मोठी माणसं म्हणतात, जे काही कराल, ते भव्य-दिव्य करा. आपण त्याचं अनुसरण करावं. वेंधळेपणा करतानासुद्धा. तर मी कधी लहान सहान फुटकळ गोष्टींपुरता वेंधळेपणा करत नाही. एखादा दिवस म्हणजे वेंधळेपणामागून वेंधळेपणाची मालिका असते.

    म्हणजे फक्त एक लोकल ट्रेन चुकवायची नाही. ती चुकली, नंतर स्टेशनवरून लांबच्या पल्ल्याची गाडी चुकली, मग मोबाईल हरवला अश्या दोन - चार गोष्टी तरी हातासरशी एका दमात उरकून घ्यायच्या. तर परवा असा योग होता. ऑफिसमधल्या कॉलवर बोलता बोलता कुणाशी बोलतोय त्याचं नाव विसरले. मग ज्या डॉक्युमेंटविषयी बोलणं चाललं होतं, त्याचं नाव विसरले. त्यानंतर त्याच कॉलमध्ये बोलता बोलता मध्येच शब्दच न आठवणं अशीही गंमत करून झाली. आजचा दिवस खास आहे हे तेंव्हाच लक्षात आलं.

    घरी जायला निघताना लॅपटॉपचं पेडेस्टल लॉक उघडायला गाडीची किल्ली काढली. या किल्लीने आपल्याला काय करायचं होतं यावर दोन मिनिटं विचार केला. मग शांतपणे दुसरी किल्ली काढली, लॅपटॉप घेतला, धोपटीत टाकला, आणि निघाले. घरापर्यंतचा प्रवास तसा अनइव्हेंटफुल झाला. (आता लिफ्टमध्ये भेटलेल्या माणसाने स्वतःच्या मजल्यावर उतरायचं विसरल्यावर मला ‘सॉरी’ म्हणणं हा त्याचा वेंधळेपणा. माझा नाही. आणि पंपावरच्या माणसाने पेट्रोल भरल्यावर कॅप न लावणं याचंही क्रेडिट मी नाही घेणार.) घरी पोहोचतांना आजच्या सगळ्या वेंधळेपणांवर कडी केली. स्वतःच्या घरी जातांना वळायची विसरले!!!

12 comments:

aativas said...

दुस-यांच्या ब्लोग वर पोस्ट टाकता येत नाहीत ते बरच म्हणायचं - नाहीतर आज बहुधा ही पोस्ट पण तुम्ही दुसरीकडेच कुठेतरी टाकली असती अशी शक्यता... पण असे स्पेशल दिवस एरवीच्या दिवसांची खुमारीही वाढवतात!

Gouri said...

हा हा ... सविता, बरोब्बर! आपल्याच घराचा रस्ता चुकल्यावर आपल्या ब्लॉगचाही पत्ता चुकायला हरकत नाही. बाकी अश्या दिवशी आपणच केलेल्या लीला आठवून नंतर चांगलीच करमणूक होते. :)

Anagha said...

व्वा! 'विसराळू विनू'ची बहीण वाटतं तू?! असं काय बरं आठवत होतं की सगळ्याचा विसर पडावा? :)

Gouri said...

अनघा, असं काय आठवत होते ते विसरले बघ :)

kirti said...

हा हा हा . काय गम्मत ग. पण जर मी अशी गम्मत केली न , तर नवरयाला सांगायला आठवण ठेवून विसरते , उगीच त्यांने बौध्दीक घ्यायला नको .
बाकि, तू काही एकटी नहीस हो," हम भी है साथ मे"

भानस said...

आहेस खरी ’विवि’.:D:D
जोवर ही अशी फुटकळ विसराविसरी आठवून करमणूक होतेय तोवरच ठीक नाहीतर एखादे दिवशी आपली समजून दुसर्‍याच कोणाची गाडी/घर उघडायला जाशीला आणि.... LOL

बाकी, असं जे काय विसरली होतीस ते आठवले का? :P

अपर्णा said...

मजा आली वाचताना...मग घरी कधी पोहोचलीस की आधी cyber cafet जाऊन ही पोस्ट टाकली घराचे direction घेतले आणि मग..... :P

Gouri said...

कीर्ती, तू पण वें-वर्गीय का?
बाकी या गमती नवर्‍याला सांगायच्याच नसतात ... तो ब्लॉग वाचत नाही म्हणून बिनदिक्कत लिहिलंय मी इथे;)

Gouri said...

श्रीताई, आपली समजून दुसर्‍याची गाडी
उघडण्याचा उद्योग केलाय बरं एकदा ... हुबळीला गेले होते, आणि जावेची स्कूटी घेऊन कुठेतरी गेले होते. निघताना दुसर्‍याच स्कूटीला किल्ली लावली. हाईट म्हणजे तिचं लॉक निघालं, डिकीपण उघडली. फक्त चालू होत नव्हती. चालू का होत नाहीये म्हणून शेवटी नवरा बघायला आला तेंव्हा समजलं :D

Gouri said...

अपर्णा, होईल, होईल. हळुहळू तेवढी प्रगती होईल. परवा मात्र एकदा चुकल्यावर नंतर नीट आपल्याच घरी गेले. :)

Peeves said...

Mala sarvat awadla te mhanje swatahachyach floor var utarayla visaraycha ani punha swatahach dusryala sorry mhanaycha...lai bhari! :)

Gouri said...

प्राजक्ता, अश्या गमती आपण कधी कधी करत असतो ना :)