Saturday, March 26, 2011

चकवाचांदण

    मारुती चितमपल्लींचं ‘चकवाचांदण’ वाचलं.

    शाळेत असताना मारुती चितमपल्लींचा धडा होता. बहुतेक रानकुत्र्यांविषयी. त्यात नवेगाव किंवा नागझिर्‍याच्या जंगलातली वर्णनं होती. जंगलच्या बोलीभाषेतले शब्द, अनोळखी वर्णनं यामुळे तेंव्हा काही विशेष गोडी वाटली नव्हती वाचताना.

    अरण्याविषयी मी पहिलं वाचलं होतं ते जिम कॉर्बेटचं. शाळेत आणि कॉलेजात ‘कुमाऊंचे नरभक्षक’, ‘मॅन इटिंग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग’, ‘टेंपल टायगर’ या पुस्तकांची किती पारायणं केली याची गणती नसेल. ही पुस्तकं वाचून वाचून माझ्यात नकळत एक आरामखुर्चीतला वन्यजीवअभ्यासक तयार झाला होता. ‘माझ्या’ जिम कॉर्बेटच्या तोडीची अरण्यविद्या दुसर्‍या कुणाजवळ असू शकत नाही आणि त्याच्याएवढं सुंदर लेखन या विषयावर कुणी करू शकत नाही असा एक गंड हा ‘वन्यजीव अभ्यासक’ उगाचच बाळगून होता. हिमालयाच्या पायथ्याची जंगलं ती खरी जंगलं. जिम कॉर्बेटचं लिखाण ते खरं लिखाण हे डोक्यात बसलं होतं. या फुकटच्या माजामुळे मी आजवर चितमपल्ली वाचले नव्हते.

    ‘नापास मुलांचं प्रगतीपुस्तक’ वाचत होते, त्यात चितमपल्लींची कहाणी होती. त्यांच्या चाचपडण्याच्या,धडपडीच्या दिवसांविषयीचं ते लिखाण वाचून मी वेडी झाले. पाच वर्षांपूर्वी आईने वाढदिवसाला ‘चकवाचांदण’ दिलं होतं, ते अजूनही न वाचण्याचा करंटेपणा आपण केलाय हे आठवलं. पुस्तक वाचायला घेतलं, आणि स्वतःच्याच बनचुकेपणाची लाज वाटली. ही सलग लिहिलेली आत्मकथा नाही. वेळोवेळी प्रकाशित झालेल्या लेखांवर संस्करण करून, काही भर घालून हे पुस्तक बनलं आहे. त्यामुळे सुरुवातीला एक - दोन प्रकराणात जरा कुठे लिंक न लागणं किंवा द्विरुक्ती जाणवली. पण चितमपल्लीं सांगताहेत ती गोष्ट एवढ्या ताकदीची आहे की, काही पानांतच तुम्ही त्यात गुंगून जाता.

    वाचून झाल्यावर एवढंच म्हणेन की हा वनात राहून ज्ञानसाधना करणार्‍या प्राचीन ऋषीमुनींच्या जातकुळीचा माणूस आहे. त्यांचं ज्ञान आणि लिहिण्याची शैली ग्रेट आहेच, पण त्यांची आयुष्यभर नवं शिकण्याची आच आणि जंगलांचं प्रेम त्याहूनही ग्रेट आहे.

6 comments:

अनघा said...

मी कुठे आणि कधी त्यांच्याबद्दल वाचलं होतं ते काही आठवत नाही...आता हे पुस्तक वाचेन. :)
'माझ्यात नकळत एक आरामखुर्चीतला वन्यजीवअभ्यासक तयार झाला होता.!'
:) :)

Gouri said...

अनघा, एवढी वर्षं आपण चितमपल्लींचं लेखन का वाचलं नाही याचा विचार करत होते तेंव्हा हा शोध लागला. :)
काही वेळा आपले उगाचच केवढे मोठे पूर्वग्रह असतात ते जाणवतही नाही. नंतर आपल्याच आंधळेपणाचं आश्चर्य वाटतं, नाही का?

अपर्णा said...

गौरी खर तर शाळेत त्यांच्याबद्दल वाचूनच नंतर मी बरीच पुस्तक आणून वाचलीत..आता विसरलेही आहे..कदाचित चांदणभूल वाचलही असेल पुन्हा वाचल पाहिजे...

मजा म्हणजे जिम कोर्बेटही आवडत पण कदाचित ती पुस्तक मी मराठी अनुवादित वाचलीत त्यामुळे मला चितमपल्ली जास्त आवडले..त्यांची ओघवती भाषा जास्त भिडली....कधी कधी वाटत मी त्यांच्या पुस्तकामुळे किती वेळा त्याच्या त्या पाटलाबरोबर जंगल फिरले आहे....

Gouri said...

अपर्णा, चकवाचांदण वाचताना मीही माधवराव पाटलांच्या बरोबर नवेगाव बांधच्या जंगलात भटकून आले. त्यांची भाषा सुंदर आहे. पण शाळेत असताना somehow तिची गोडी लागली नव्हती.
जिम कॉर्बेट मुळातून वाचून बघ. ‘रुद्रप्रयाग’ वगैरे वाचताना हटकून एकदा तरी आपल्या छाताडावर नरभक्षक वाघ पाय ठेवून उभा आहे असं स्वप्न पडून जाग येते. :)

Parag said...

Chakwa chandana surekh ahe faar ! me 3 divsanpurvi vachla hota.. faar avadla hota :)

Gouri said...

पराग, प्रतिक्रियेसाठी आभार!