Monday, July 18, 2011

कुसुमाग्रज: सप्तर्षी

कुसुमाग्रज, समिधा संग्रहातून.
************************************************

सप्तर्षी

    ते सातही ऋषी वृद्ध होते.

    त्यांच्या पांढर्‍या सफेत दाढ्या छातीच्या खाली गेल्या होत्या आणि डोक्यावरील शुभ्र जटा रुप्याच्या उंच टोपांसारख्या दिसत होत्या.

    एकमेकांत ठराविक अंतर ठेवून ते ध्रुवाच्या भोवती प्रदक्षिणा घालीत होते.

    कोणीही बोलत नव्हते, थांबत नव्हते अथवा इकडेतिकडे पाहात नव्हते. खाली मान घालून सारेजण चालत होते.

    त्यांची निष्ठा अपूर्व होती. निष्ठेनेच त्यांच्या वृद्ध पायांत अदम्य सामर्थ्य निर्माण केले होते.

    त्यांचा हा अनंतकालीन प्रवास चालू असताना एकदा काहीतरी उत्पात झाला आणि एक मोठा थोरला धूमकेतू त्यांच्या समोर येऊन उभा राहिला.

    अवकाशात स्वच्छंदाने मुशाफिरी करणार्‍या धूमकेतूला त्या सात वृद्ध ऋषींचा हा उपक्रम पाहून नवल वाटले. तो कुतुहलाने त्यांच्याबरोबर चालू लागला आणि चालता चालता त्याने विचारले,

    "मुनींनो, का आपण असं भ्रमण करीत आहात?

    कोणीही त्याला उत्तर दिले नाही. सर्वांनी त्याच्याकडे एकेक कटाक्ष टाकला आणि आपला प्रवास पुढे चालू ठेवला.

    धूमकेतूने सभोवार पाहिले. सात ऋषींच्या मागे एक वृद्ध स्त्रीही झपाट्याने चालत असलेली त्याला आढळली.

    त्याने विचारले, "ऋषिजनहो, ती स्त्री आपल्या पाठीमागे लागली आहे म्हणून आपण असे फिरता आहात काय?"

    सर्वजण संतप्त आणि उद्विग्न झाले. आता बोलण्याशिवाय गत्यंतर नव्हते. "आम्ही सर्वजण अनंतकाळापासून त्या ध्रुवाभोवती प्रदक्षिणा घालीत आहोत!" एक ऋषी म्हणाला.

    "कशाकरिता?"

    "हे पूजन आहे, ही भक्ती आहे!"

    "परंतु या भक्तीने तुम्ही आपल्या दैवताच्या जवळ जाऊ शकता का? पूर्वीइतकेच तुमच्यापासून ते दूर आहे!

    ऋषिमंडळ काहीसे विचलित झाले. परंतु एकजण निग्रहाने उत्तरला, "आमचं सुख साधनेचं आहे, साध्य संपादनाचं नाही!"

    "तुम्ही खरोखरी सुखी आहात काय?" धूमकेतूने विचारले.

    सातही ऋषींचे चेहरे अस्वस्थतेने भारावून गेले.

    धूमकेतू म्हणाला, "मला वाटतं, अन्तराळात तुमच्याइतकं दुःखी कोणीही नाही! माझ्याबरोबर तुम्ही प्रवासाला येता का? या असीम आकाशातील अनेक सौंदर्यं मी तुम्हाला दाखवीन. रंगीत पिसारा फुलवणारा व्याधाचा तारा, शुभ्र संथ तेजाची धार धरणारी शुक्राची चांदणी, चंद्रांची माळ गळ्यात घालून फिरणारा शनी, श्वेतकमलं जिच्यात उमलली आहेत ती आकाशगंगा! आपण याल तर -- "

    ऋषींनी असहायपणे परस्परांकडे पाहिले. ‘हो’ म्हणण्याचे सामर्थ्य अथवा धैर्य आता कोणातही राहिले नव्हते.

    "आमची निष्ठा अचल आहे. कोठलंही सौंदर्य आम्हाला मोह पाडू शकत नाही!" एक जण कसाबसा उत्तरला.

    धूमकेतू निघून गेला आणि ऋषिमंडळ पूर्ववत् खाली मान घालून प्रदक्षिणा घालू लागले! पण ती निष्ठा --

7 comments:

अनघा said...

मला ना असं वाटतंय...की आपण दोघी तुझ्या त्या सुंदर फुललेल्या रंगीत बागेत कॉफी पीत बसलोय...आणि तुला आवडलेले काही छान छान लिखाण तू मला वाचून दाखवतेयस...किती सुंदर क्षण आपण टिपतोय म्हणून सांगू ! :)

aativas said...

इथे कुसुमाग्रजांची ( अर्थातच सगळी आवडती) पुस्तक माझ्याजवळ नाहीत .. पण त्याची उणीव तुम्ही भरून काढतंय थोडीशी :-)

Gouri said...

अनघा, कॉफी विथ कुसुमाग्रज :)

Gouri said...

सविता, ‘समिधा’ मधल्या कुठल्याच कविता जालावर नाहीत. त्यामुळे पुन्हा कधी पुस्तक जवळ नसताना त्या वाचाव्याश्या वाटल्या तर म्हणून इथे टाकते आहे.

अनघा said...

हेहे!! अगदी अगदी ! :)

भानस said...

गौराई, खूप धन्यू गं... समिधा इथे माझ्याजवळ नाही. तुझ्यामुळे उजळणी होतेय... :)

Gouri said...

श्रीताई, शाळेत, कॉलेजला असताना कुसुमाग्रजांची पारायणं केली. त्यानंतर मी कवितासंन्यासच घेतला होता ... कवितेचं पुस्तकच हातात धरत नव्हते. अश्या कित्येक वर्षांच्या उपवासानंतर आता ‘समिधा’ने पारणं फेडते आहे ;)