Thursday, July 21, 2011

कुसुमाग्रज: सूत्रबंधन


‘समिधा’ मधूनच, पुन्हा एकदा.

**************************************************

सूत्रबंधन

    निवडुंगाच्या फडातून मला कण्हण्याचा आवाज ऐकू आला म्हणून मी जवळ जाऊन पाहिले.

    विदीर्ण झालेला एक मोठा थोरला पतंग काट्यांच्या शरपंजरी पडला होता.

    मी चौकशी करताच आपली कहाणी तो मला सांगू लागला,

    "आकाशात मी खूप उंच गेलो होतो." तो म्हणाला, "कागद असून सुद्धा पक्ष्यांसारखा मी आभाळावर संचार करीत होतो. जमिनीवरून स्वप्नांसारखे भासणारे मेघ आता आपल्या जवळ आले आहेत असे मला वाटाले. आनंदाने आणि अभिमानाने मी धुंद झालो. आणखी खूप वर जायचे, चांदण्यांच्या जगात प्रवेश करायचा असे मी ठरविले.

    "तेवढ्यात माझी आणि एका पक्ष्याची आभाळात भेट झाली. त्याच्या फडफडणार्‍या क्षुद्र पंखांची आणि रंगहीन सौंदर्याची मी कुचेष्टा केली आणि त्याला सांगितले: तू आकाशात संचार करणारा आहेस पण मी आकाशाला जिंकणारा आहे.

    "पक्षी उत्तरला नाही. माझ्यामागे जमिनीपर्यंत खाली गेलेल्या सुत्राकडे त्याने एक तिरस्काराचा कटाक्ष टाकला आणि तो पुढे निघून गेला.

     "ती अवहेलना मला सहन झाली नाही. या सूत्रबंधनामुळे मी आकाशावर विजय मिळवतो असे या पक्ष्यांना वाटते काय? माझे स्वतंत्र सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी मी आवेशाने ते बंधन तोडले. थोडा वेळ मी आणखी उंचावर गेलो --

     आणि नंतर वार्‍यावर हेलकावे खात या निवडुंगात येऊन पडलो!"

4 comments:

अनघा said...

वेगळीच आहे नं गोष्ट ? मला वाटले की पतंग हवेत फाटला असेल व त्याचे गर्वाचे घर खाली झाले असेल...पण हा शेवट एकदम वेगळा आणि मोठा संदेश देणारा वाटला. नाही का ? :)

Gouri said...

अनघा,शेवटी ते कुसुमाग्रजच. त्यांच्या एकेका कवितेत अर्थाच्या किती छटा दडलेल्या असतात ... प्रत्येक ओळ खोलवर घेऊन जाते मागच्या ओळीपेक्षा.

भानस said...

अप्रतिम! बरेचदा आपण किती सरधोपट विचार करतो याची ठळक जाणीव होते.

गौरी, तुझ्या या चमचाभर टॉनिकची सवय लागली बघ. :)

Gouri said...

श्रीताई, अग आत्ता बघितलं ... तुझ्या कॉमेंटला उत्तर टाकलं, ते पब्लिश झालंच नाहीये :(
टॉनिकचा पुधचा डोस टाकलाय बघ ;)