Monday, October 10, 2011

लॅंडस्केप बोन्साय

    सिझनल झाडांची बाग, लॉन, गुलाब, अश्या बागकामातल्या यत्ता चढत गेलं म्हणजे काही वर्षांनी तुम्हाला बोन्साय करण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात हौशा-नवशांनी एखादा पदर्थ करावा, पण वर्षभराचं लोणचं घालणं हे कसं खास सुगरणीचंच काम - तसं. बोन्साय करणं म्हणे प्रचंड चिकाटीचं काम आहे. वर्षानुवर्ष तन्मयतेने एखादी कलाकृती घडवावी, तसं. आणि लॅंडस्केप बोन्साय म्हणजे तर तुम्हाला आधी संपूर्ण देखावा डोळ्यापुढे आणता यायला हवा, आणि मग त्याची दीर्घकालीन कार्यवाही.

    हा माझ्या बागेतला लॅंडस्केप बोन्सायचा लेटेस्ट नमुना.


******************************

    या पोस्टवर पुण्याच्या पूर्वेकडून आक्रमाणाचा धोका संभवतो. तेंव्हा खास डिस्क्लेमर - मला बोन्सायचा अजूनही अतिशय राग आहे, आणि या ‘लॅंडस्केप’(?)मुळे माझं मतपरिवर्तन वगैरे झालेलं नाही. `झाडाला खुरटवायचं आणि त्याला सुंदर म्हणायचं हे कुठलं प्रेम?' इ. इ. प्रवचन ऐकावं लागलेल्या पूर्वेकडच्या लोकांनी फोटोच्या वरचं घडाभर तेल केवळ वातावरणनिर्मितीसाठी आहे याची कृपया नोंद घ्यावी :)

    एप्रिल - मे महिन्यात कधीतरी धान्याला ऊन दिलं. कबुतरांनी त्यावर डल्ला मारू नये म्हणून वर चादर घालणं मस्टच. या चादरीवर ठेवायला वजन म्हणून एक कोरडी माती भरलेली कुंडी वापरली होती. आणि हा पांढरा दगडसुद्धा. ऊन देऊन झालं, धान्य भरून ठेवलं, आणि वापरात नसलेली गच्ची नेहेमीसारखीच बंद झाली. गच्चीचा केर काढायला आधेमधे बाईंनी काय उघडली असेल तेवढीच. केर काढताना सोयीसाठी बाईंनी तो दगड कुंडीतच टाकून ठेवला. उन्हाळा संपला, पाऊस आला. पावसाळा संपत आल्यावर त्या कुंडीत हा नॅचरल लॅंडस्केप तयार झालाय. :D :D

******************************

    एवढं पकवून झाल्यावर आता पोस्टमधला मुख्य मुद्दा. बाबा आमटेंच्या ‘ज्वाला आणि फुले’ मधल्या दोन ओळी

                ‘वटवृक्षाच्या सावलीत सिद्धार्थाचा बुद्ध होतो
                माणसाच्या सावलीत वटवृक्षाचा बोन्साय होतो’

    अश्या काहिश्या आशयाच्या आठवताहेत. कवितेचं नाव आठवत नाही, नेमक्या शब्दांविषयीही खात्री नाही. पण या कवितेची फार सय येते आहे. ही कुणाकडे असेल तर प्लीज शेअर करा ना!

37 comments:

Anagha said...

:) मला वाटलं, आपल्यात काहीतरी मतभेद आहेत वाटतं ! हुश्श ! :)
फिरक्या घेत बस हा तू ! :D

....वटवृक्षाचा बोन्साय होतो ! सुंदर आहे...
आता नेहेमीप्रमाणे तूच शोध आणि टाक इथे ! :)

aativas said...

This also shows the natural potential /urge to survive...

Well, I too don't like Bonsai.. I mean I wonder what pleasure people can have in Bonsai :-)

Gouri said...

अनघा, अग, त्या झाडाला बघून मला कविता आठवली, म्हणून :D
‘ज्वाला आणि फुले’ नाहीये माझ्याकडे ... आणि कुठे मिळेल माहित नाहीये :(

Gouri said...

सविता, खरंय. फक्त सूर्यप्रकाश मिळायला हवा ... बाकी कुठल्याही परिस्थितीत तग धरून राहतात झाडं!
आपण सगळे आता एक बोन्साय विरोधी क्लब काढू या :)

आळश्यांचा राजा said...

Carry on girls! Bonsai Hate Club! I often wonder people won't hesitate killing a poor chicken merely for the sake of what they think 'taste', but they would be still sensitive enough to understand the sorrows of a bonsai. Interesting!

अपर्णा said...

भले शाब्बास...आम्ही मारे इकडे निषेध अमक ढमक टायपायला घ्यायचं आणि गौरीनी लगेच चौकार मारायचा...:)

अवांतर, वटवृक्ष म्हटल की आम्हाला लगेच गटणे आठवतो...आणि पारंब्या आलेले पु ल...खो खो खो...

Anonymous said...

>>>> मला वाटलं, आपल्यात काहीतरी मतभेद आहेत वाटतं ! हुश्श ! :)
फिरक्या घेत बस हा तू ! :D

अगं हो ना मलापण क्षणभर चुकल्यासारखंच वाटलं....
त्या दोन ओळी मस्त गं एकदम!!!
बोन्साय विरोधी क्लबाच्या मेंबरशीपसाठी मी अर्ज दिलेला आहे वो बाय!!!

बाकि तो फोटो आवडला....

Gouri said...

आळश्यांचा राजा, याला म्हणतात "आ बैल मुझे मार." इथे बोन्साय विरोधी गट प्रबळ आहे. You asked for it. Now face the music :)

Gouri said...

अपर्णा, गटणेचा ‘वटवृक्ष’विसरूनच गेले होते मी :D :D :D

Gouri said...

तन्वी, :D :D
(ही पोस्ट म्हणजे चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला झालाय.)

D D said...

वड पिंपळासारखे वृक्ष उंच वाढतात, पण बहुतेक वेळा त्यांच्या बिया कुठे तरी कडेकपारीत, किंवा एखाद्या भिंतीवर, किंवा एखाद्या झाडावरच्या फांदीच्या बेचक्यात रूजलेल्या दिसतात. तिथे त्या झाडांचे पोषण होईलच याची कोणतीही खात्री नसते, तरीही ती झाडे तिथे रुजतात, अत्यंत कठीण परिस्थितीत तग धरतात. तसंच निसर्गातल्या इतर झाडांच्या बियाही जिथे रूजतील तिथे वाढतात. निसर्गातले सर्वच वृक्ष अशा कठीण परिस्थितीला सामोरे जातात, त्यातल्या ज्या झाडांच्या वाढीला पोषक परिस्थिती असते, त्यांचे वृक्ष बनतात, इतर मात्र खुरटलेल्या स्थितीतच तगून राहतात, पण अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर त्यांचीही वाढ होते. (अशा खुरटलेल्या वृक्षांपासूनच माणसाला बोन्साय करण्याची प्रेरणा मिळाली.)
बर्‍याचदा मोठ्या झाडांखाली पुरेशा पोषणाअभावी किंवा सूर्यप्रकाश न मिळाल्याने लहान झाडे, रुजलेली रोपटी वाढू शकत नाहीत, त्यांची वाढ खुरटते. कधीकधी जंगलातील प्राण्यांमुळेही (हत्ती, माकडे, वाळवी, मुंग्या इ.) झाडांच्या फांद्या मोडल्या जातात. त्यामुळे फक्त एखादा वृक्ष मोकळ्या जागेत वाढला म्हणजे त्याची उंच वाढ होतेच असे नाही. जंगलातही झाडांची वाढ रोखणारे, खुंटवणारे अनेक घटक असतात.
वनव्यवस्थापन (Forest Management) करतांनाही झाडांच्या काही विशिष्ट प्रजाती वाढवतांना तिथली इतर काही झाडे (वृक्ष) काढून टाकावे लागतात.
चिकू सारख्या बागायती झाडांची लागवड केली जाते, तेव्हा दर काही वर्षांनी त्यांची झाडापासून काही अंतरावर असलेल्या मुळांची नियमित कापणी करावी लागते. व्यावसायिक शेतीमध्ये ज्या झाडांचे कंद लावलेले असतात, अशा झाडांना मुख्य खोडाजवळ फुटणारे फुटवे काढून टाकावे लागतात.
बोन्सायमध्ये केल्या जाणार्‍या फांद्या आणि मुळांच्या कापणीबाबत इतकेच सांगता येईल, की ते झाड छोट्या कुंडीत वाढतांना त्याला पुरेसे पोषण मिळावे म्हणून त्याच्या अनावश्यक फांद्या आणि मुळे कापली जातात आणि इतर झाडांचीही अशी कापणी केली जाते. बर्‍याच वेळी निसर्गात वाढलेली खुरटलेली झाडेच बोन्साय करायला निवडली जातात. मी स्वतः बोन्साय करून पहिलेला नाही, पण एक नक्की सांगू शकेन, की बोन्साय करणे म्हणजे झाडाचे कुपोषण करणे नाही, तर योग्य ते पोषण देऊन मोठा वृक्ष लहान आकारात वाढवणे. जर झाडाला योग्य पोषण मिळाले नाही, तर त्याची वाढ खुरटून त्याला फुले, फळे येणे बंद होते. जेव्हा एखाद्या बोन्सायला फुलं किंवा फळं येतात तेव्हा त्याला योग्य ते पोषण मिळालं आहे याचे ते निदर्शक असते. झाडांना असे पोषण जेव्हा मिळते आणि झाडांची वाढ खुरटलेली नसते तेव्हाच दोनशे / तीनशे वर्षे वयाचे फुलणारे, फळणारे बोन्साय वृक्ष वाढवणे शक्य होते. जपानमध्ये हजार वर्षांहून अधिक वय असलेले बोन्सायवृक्ष वाढवलेले आढळतात.
म्हणून असे म्हणावेसे वाटते, की बोन्साय म्हणजे फ़क्त झाडांना शोभेसाठी बुटके करून ठेवणे नाही, तर ती एक शास्त्रशुद्ध कला आहे, पण ती सगळ्यांनाच जमेल असे नाही.

Gouri said...

D D, ब्लॉगवर स्वागत, आणि सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आभार!
बोन्साय करताना झाडाची काळजी घेतात, मान्य. अश्या झाडांवर फुलं, फळंही दिसतात. पण ज्या वृक्षांकडे मान वर करून बघायचं, त्यांची सावली अनुभवायची, ती एवढ्याश्या उथळ कुंडीत बघायला मला तरी आवडत नाहीत.

D D said...

गौरी,
उंच झाडं सगळ्यांनाच बघायला आवडतात. पण एखाद्या उंच वृक्षाच्या आजूबाजूला शोधक वृत्तीने पाहिलं, तर त्याच्याखालच्या जमिनीवर, त्याच वृक्षाच्या बियांमधून रुजलेली पण वाढ खुरटलेली पाचसहा तरी झाडं बघायला मिळतात, हा निसर्गाचाच अविष्कार आहे. असो.

मी माझ्या आधीच्या कॉमेंटमध्ये जे लिहायला विसरले, ते आता लिहितेय...
झाडांनाही भावना असतात आणि त्यांनाही संवेदना असतात. पण माणसामध्ये जशी चेतासंस्था असते, तशी चेतासंस्था झाडांमध्ये नसते, तिचे स्वरूप वेगळे असते. त्यामुळे झाडांना जाणवणार्‍या संवेदनांचे स्वरूप हे माणसाला जाणवणार्‍या संवेदनेपेक्षा काहीसे वेगळे असते. एखाद्या माणसाचा हात किंवा पाय कापावा लागला, तर त्याला वेदना होईल, अवयव गमावल्याचे दुःख होईल आणि आपले रूप डिफॉर्म झाले यामुळे त्याला काहीसे असुरक्षित वाटेल (कारण माणसाला दोनच हात किंवा दोनच पाय असतात आणि त्यापैकी एखादा गमावला तर नवीन हात किंवा पाय फुटणार नसतो.) पण जर एखाद्या झाडाची फांदी कापली गेली, तर त्या झाडाला वेदना होईल, त्याचबरोबर कापलेली फांदी ही त्या झाडाचे प्रोपॅगेशन होण्याची एक शक्यता असल्याने त्याचा आनंदही जाणवेल तसेच या तुटक्या फांदीमुळे त्याजागी अजून नवीन फांद्या येण्याची शक्यताही वाढते, त्यामुळे डिफॉर्म झाल्याचा असुरक्षितपणा झाडात निर्माण होण्याची शक्यता कमीच असेल.

थोडक्यात प्रत्येक वाढ झालेली फांदी कापली गेली, की ती झाडासाठी प्रोपॅगेशनची संभाव्यता असल्याने झाडाला जाणवणारी वेदना ही माणसाला जाणवणार्‍या वेदनेपेक्षा वेगळी ठरते.

एखादं झाड खूप उंच वाढू दिलं, त्याची एकही फांदी कापली नाही, एकाही प्राण्याला त्या झाडाबरोबर कोणतीही इंटरअ‍ॅक्शन करण्याची संधी दिली नाही, तर त्या झाडाची फांदीमुळे प्रोपॅगेशन होण्याची शक्यता खूपच कमी होईल आणि त्याला फक्त बिया रुजून होणार्‍या प्रोपॅगेशनवर अवलंबून रहावे लागेल. अशा वेळी खूप वाढ झालेल्या फांद्याच्या वजनाचा भार झाडाला पेलवत नाही आणि काही जास्त वाढलेल्या फांद्या स्वतःहूनच कोसळून पडतात. हे खूपच परस्परसापेक्ष आहे.

त्यामुळे बोन्सायबाबत तटस्थपणे बोलतांना त्या झाडाच्या फांद्या आणि मुळं कापणं हे अगदी चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही किंवा ते अनैतिक आहे, असाही दावा करता येणर नाही. शिवाय बोन्साय केलेली झाडं जर कुंडीतून काढून परत जमिनीत लावली, तर ती पुन्हा जोमाने वाढतात. त्यांची बोन्सायची ही स्थिती पुन्हा बदलता येऊ शकते.

अर्थात तुमचं बोन्सायबाबतचं मत बदलावं म्हणून मी हे सांगत नसून, "बोन्साय करणं हे नैतिक की अनैतिक" ह्या संभ्रमात सापडलेल्या व्यक्तींना निसर्गाचा यासंदर्भातला रोल असा असतो ह्याची जाणिव करून देण्याचा हा एक प्रयत्न आहे. तुमची बोन्सायबद्दलचीच पोस्ट असल्याने साहजिकच ही कॉमेंट बोन्सायबद्दल सर्च करणार्‍यांच्या नजरेला पडेल, म्हणून मुद्दाम हे लिहीत आहे.

Gouri said...

देवयानी, खूपच उपयुक्त माहिती .. इथे शेअर केल्याबद्दल आभार!
कुठल्याही प्रकारची शेती / बाग हा माणसाचा प्रयत्न निसर्गाला आपल्या अंकित करण्याचाच प्रयत्न असतो. (आणि विज्ञानाच्या प्रगतीबरोबर हा इंटरफेअरन्स वाढतच जाणार.) त्यामुळे माणसाचा कुठला, काय मर्यादेपर्यंतचा इंटरफेअरन्स नैतिक आणि कुठला अनैतिक असं ठरवणं अवघड आहे.
पण बोन्साय मला आवडत नाही. त्यातलं सौंदर्य मला तरी दिसत नाही. 'respect for small things' वगैरे कल्पना पटत नाहीत.

हेरंब said...

अपर्णाची संपूर्ण कमेंट कॉफीत पेस्ट !!!

(कमेंट द्यायला उशीर केल्यावर अजून काय होणार म्हणा ! )

Gouri said...

हेरंब, :D
मला सखाराम गटणे पुन्हा वाचायला पाहिजे एकदा ... वटावृक्ष पार विसरून गेले होते मी!
बा द वे - कं पोस्ट प्रकल्प पूर्ण झालाय माझा. (अखेरीस!)

0 said...

गौरी
माणूस हा शेती करणारा निसर्गातला एकमेव प्राणी नाही. मुंग्या सुद्धा अफिड्स नावाच्या किड्यांची आणि एक प्रकारच्या बुरशीची शेती करतात, इतकंच नाही तर त्यांना उदार आश्रय देणार्‍या एका झाडाच्या कळ्याही त्या कुरतडून टाकण्याशारखा निर्घृणपणा त्या दाखवतात कारण त्यामुळे त्यांना रहायला जास्त मोकळि जागा मिळते.
१) http://www.sciencedaily.com/releases/2007/10/071009212548.htm
२)http://www.sciencedaily.com/releases/2008/03/080324173459.htm
३) http://www.sciencedaily.com/releases/2009/04/090428111535.htm

तुम्ही संवेदनाक्षम असल्याने तुम्हांला बोन्साय आवडत नाही, तसेच सिल्कचे कपडे पण आवडत नसतील कारण सिल्कचं कापड तयार करण्यासाठी हजारो-लाखो रेशमाच्या किड्य़ांना त्यांच्या कोशावस्थेतच मारावं लागतं. बोन्साय तरी जिवंत असतो पण हे किडे तर मरतातच. तसंच तुम्ही मध पण वापरत नसाल कारण मध काढण्यासाठी लाखो मधमाशांचं घर उध्वस्त करावं लागतं. कोंबड्यांच्या फार्ममध्ये त्यांना आयुष्यभर एका छोट्या पिंजर्‍यात कोंडून ठेवलं जातं म्हणजे त्यांचाही तो एकप्रकारचा बोन्सायच म्हणावा लागेल हे तुम्हांलाही पटेल. :)

जे संपूर्ण शाकाहारी असतात ते प्राण्यांचं दूध पीत नाहीत, मध खात नाहीत, सिल्कचं कापडही वापरत नाहीत आणि नॉनव्हेज, अंडी वगैरे तर अजिबात खात नाहीत असं आमच्या झूऑलॉजीच्या मॅडम म्हणायच्या. :)

एकंदरीत मी याबाबत फारच कन्फ्युज्ड आहे.
- हाफ झुऑलॉजिस्ट.

Gouri said...

हाफ झुऑलॉजिस्ट, ब्लॉगवर स्वागत, आणि प्रतिक्रियेबद्दल आभार! तुम्ही दिलेल्या मुंग्याविषयीच्या लिंक्स सही आहेत!
मला बोन्साय का आवडत नाही ते वर देवयानीच्या प्रतिक्रियेच्या उत्तरात लिहिलंय. सुपर संवेदनाक्षम असल्याचा किंवा नैतिकतेच्या विचारातून संपूर्ण शाकाहारी असल्याचा दावा मी करत नाहीये.

kirti said...

गौरी , मस्त पोष्ट टाकली बघ . त्या शिवाय खालील चर्चा पण अत्यन्त माहिती देणरी आहे , मात्र मी खरी शाकाहारी कि नाही ह्या बाबत सम्भ्रम वाढ्ले बुवा.
सिल्क साडी शिवाय जगता येते ग पण दूध ?
आणी बोन्साई बद्दल म्हणायचे झाले तर , वाढ खुर्टावुन जगवायचे अणी त्याला सुन्दर म्हणायचे मला पटत नाहि.
हे माझे मत ह्याच झूलोजीशी कही ही सम्बन्ध नही.

Gouri said...

कीर्ती, खूप दिवसांनी प्रतिक्रिया दिलीस ब्लॉगवर? मला वाटलं कुठे हरवलीस म्हणून. :)
शाकाहाराविषयीच्या आपल्या कल्पनांमध्ये संस्काराचा केवढा मोठा भाग असतो ना ... दूध आणि त्यापासून बनणारे पदार्थ शाकाहारात येत नाहीत हे पचायला जड जातं. :)

D D said...

संपूर्ण शाकाहारी लोकांना vegan म्हणतात, तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहारात वापरणार्‍या शाकाहारींना lacto vegetarian म्हणतात. आपण आपल्या मनाशी काही पूर्वग्रह बनवलेले असतात आणि त्याचप्रमाणे आपण विचार करतो, ह्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मी परत कॉमेंट देणार नव्हते, पण ह्या झूऑलॉजीमुळे पुन्हा एकदा कॉमेंट देत आहे.

झूऑलॉजीच्या ह्याच वेबसाईट वर अजून एक लिंक आहे http://www.sciencedaily.com/releases/2008/07/080728221236.htm
सॅलॅमॅंडर सारखा प्राणी जेव्हा एखादे बोट गमावतो तेव्हा त्या प्राण्याला पुन्हा बोट फुटते. तसेच सेंटीपेड सारखे प्राणी सुद्धा अर्भकावस्थेत असतांना एखादा पाय गमावतात, तेव्हा त्यांना तो पाय परत फुटतो. शेपटी तुटलेली पाल तुम्ही सगळ्यांनी पाहिलीच असेल, शत्रूला चकवण्यासाठी पाल स्वतःच स्वतःची शेपटी तोडून टाकते आणि पळत सुटते, अर्थात पालीला परत शेपटी फुटते. या सगळ्या प्राण्यांमध्ये जशी पुनर्निर्माणाची शक्ती असते, काहीशी तशाच प्रकारची पुनर्निर्माणाची शक्ती झाडांमध्येही असते. पाल ज्या सहजतेने स्वतःची शेपटी तोडून टाकण्याची क्रिया स्वीकारते, त्याच सहजतेने झाडेही स्वतःची मुळे आणि फांद्या तोडून टाकणे स्वीकारतात. त्याशिवाय झाडाची वेगळ्या प्रकारची चेतासंस्था असते, म्हणून झाडाला त्याच्या फांद्या आणि मुळे कापून लहान आकारात वाढविणे क्रूरपणाचे ठरत नाही. निसर्गाने एखादा परिपक्व वृक्ष किती उंचीपर्यंत वाढावा याच्यावर मर्यादा घातली आहे, पण परिपक्व वृक्षाला फुले आणि फळे लागण्यासाठी त्याची उंची कमीत कमी किती असावी याच्यावर निसर्गाने काहीही निर्बंध घातलेला नाही, म्हणून जंगलात सुद्धा खुरटलेल्या वृक्षालाही फुले, फळे लागलेली दिसतात.

असे जरी असले, तरी जी झाडे (वृक्ष) कठीण परिस्थितीत तग धरून राहू शकतात - ज्यांची अशा प्रकारे राहण्याची क्षमता असते, त्यांचाच बोन्साय होऊ शकतो. मनात आणले म्हणून वाटेल त्या झाडाचा बोन्साय करता येत नाही. नारळासारख्या उंच झाडांचा बोन्साय करता येत नाही. वाळवंटात काही मीटर उंच वाढणार्‍या निवडुंगाचाही बोन्साय करता येत नाही. किंवा गणेशवेलीसारख्या नाजूक पण पसरट वाढणार्‍या वेलींचाही बोन्साय करता येत नाही. नारळ, निवडुंग, गणेशवेल इत्यादींचा बोन्साय करायचा ठरवला तर ते क्रूरपणाचे ठरेल, कारण त्यांची तशा प्रकारे वाढण्याची क्षमताच नसते.

बोन्सायच्या झाडांकडे जर दुर्लक्ष झाले आणि त्यांना पाणी घातले गेले नाही, तर त्यांची पाने सुकतील, कदाचित गळतीलही, पण त्यांची मुळे मात्र वेगाने वाढून आजूबाजूला पसरतील आणि पाण्याचा शोध घेतील आणि बहुतेक वेळा ते झाड पाणी मिळेपर्यंत तग धरून जिवंत राहिलेले दिसेल... कारण ते त्यांच्या जीन्समध्येच आहे. पण काचेच्या बंदिस्त टेरॅरियममध्ये वाढणार्‍या झाडांकडे दुर्लक्ष झाले आणि त्यांना पाणी घातले गेले नाही किंवा जास्त घातले गेले, तर ती नाजूक झाडे तग धरू शकणार नाहीत कारण तसं त्यांच्या जीन्समध्येच नाही. अर्थात बोन्सायपेक्षाही काचेच्या टेरॅरियममध्ये झाडे वाढवणे जास्त चिंतेचे आहे. पुढच्या काही दिवसांत शक्य झालं तर, मी एक पोस्ट लिहून टेरॅरियम काय असतं त्याची माहिती ब्लॉगवर टाकेन.

Gouri said...

देवयानी, तुमच्या (तुझ्या?) प्रतिक्रियेआंमधून खूपच छान माहिती मिळते आहे. त्यामुळे अजूनही सविस्तर प्रतिक्रिया येऊ देत!
टेरॅरियम मी कधी प्रत्यक्षात बघितलेलं नाही. एवढ्याश्या बंदिस्त जागेत झाडांची रचना ही कल्पना काही मला आवडली नाही. बोन्सायसारखीच. :)

D D said...

गौरी,
तुम्हांला माझी मतं पटत नसतांनाही, तुम्ही ती मांडायची संधी दिली याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
मात्र हे वाचून कोणी आपली मतं बदलावीत अशी माझी अपेक्षा नाही. माझा स्कॅनर सध्या बंद असल्याने, टेरॅरियमचे फोटो मला दुसरीकडून स्कॅन करून घ्यावे लागतील, ते मिळाले, की मी लगेच टेरॅरियमची पोस्ट टाकेन.

Gouri said...

देवयानी, मला ब्लॉगवर तू म्हटलेलं पळेल ... :) इथे फक्त सहमतीच्याच प्रतिक्रिया हव्यात असं नाही. वेगळं मत मांडलं गेलं म्हणजे नवी माहिती, नवा दृष्टीकोनही मिळतो त्याबरोबर, नाही का?

kirti said...

गौरी , सध्या भारतात परत आले आहे . मुले शाळा , कोचिंग शोधत होते. अता जरा नविन ठिकाणी (इंदुरला) जम बसला आहे.
म्हणून ब्लॉग वर हालचाल कमी होती.

Gouri said...

कीर्ती, नव्या जागेत सगळं सेटल झालं का मग? तशी इंदोर फार छान जागा आहे राहण्यासाठी. (आणि खाण्यासाठी :D)

D D said...

गौरी,
मी माझ्या ब्लॉगवर टेरॅरियमबद्दल पोस्ट लिहिली आहे.

मराठीतली पोस्ट टेरॅरियम - काचपात्रातला बगिचा इथे वाचा - http://swingsofmind.blogspot.com/2011/11/blog-post.html

English post – Terarium – Bottle Garden – read here -http://swingsofmind.blogspot.com/2011/11/terrarium-bottle-garden.html

Gouri said...

देवयानी, खूप माहितीपूर्ण पोस्ट ... टेरॅरियमविषयी मराठीतून सविस्तर माहिती मी पहिल्यांदाच बघितली. मराठीमध्ये बागकामाविषयी एकही अभ्यासपूर्ण ब्लॉग मला अजून तरी दिसला नाहीये. अजून वेगवेगळ्या विषयांवर लिहिणार का?

D D said...

गौरी,
धन्यवाद!
झाडांविषयी लिहितांना त्यांच्याबद्दलच्या ज्या गोष्टींचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे, किंवा जी झाडे प्रत्यक्ष वाढवून पाहिलेली आहेत त्यांच्याबद्दलच लिहिते. बोन्साय मी प्रत्यक्ष केला नाही, पण वड आणि पिंपळाची झाडं कुंडीत वाढवून पाहिली आहेत, बोन्सायचे दोनवेळा प्रॅक्टीकल्स पाहिले आहेत आणि माझ्या नातेवाईकांनी तयार केलेले बोन्सायही मी स्वतः पाहिले असल्याने मी त्याच्याविषयी इतके सविस्तर लिहू शकले.

सध्या आमच्या परिसरात उंच इमारती उभ्या झाल्याने सूर्यप्रकाश अडला जातो, त्यामुळे झाडं लावण्यावरही मर्यादा आली आहे. म्हणूनच मी या विषयावर फारसं काही लिहिलेलं नाही. एखादं विशिष्ट झाड नजरेसमोर ठेवून लिहितांना ते कोणत्या प्रकारच्या मातीत वाढतं, त्याची पाण्याची आणि सूर्यप्रकाशाची गरज, त्याला खत कशा प्रकारे घालायचं, त्याला होणारे रोग आणि त्यावरच्या उपाययोजना ह्याबद्दल लिहिलं जातं. मराठीत ह्या विषयावर अनेक माहितीपूर्ण पुस्तकं उपलब्ध आहेत.पुण्याला दरवर्षी कृषी प्रदर्शन भरतं तिथल्या स्टॉलवर ही पुस्तकं उपलब्ध असतात. तसंच मुंबईतही दरवर्षी झाडांची प्रदर्शनं भरतात, तिथेही ही पुस्तकं उपलब्ध असतात.

जे पुस्तकात आहे, तेच ब्लॉगवर टाकण्यात विशेष अर्थ नाही. माझ्याजवळची माहिती आणि माझा प्रत्यक्ष अनुभव ह्यावर आधारलेला लेख लिहायला मला आवडेल. मात्र तुम्हांला एखाद्या विशिष्ट झाडाविषयी माहिती हवी असेल किंवा झाडांविषयी काही शंका असतील, तर जरूर मला इमेल पाठवा, मी मला जितकी माहिती आहे, तितकी तुम्हांला निश्चित देईन. कदाचित तुमच्या शंकेतून मला एखादा विषय सुचला, तर त्याबद्दल मी ब्लॉगवर लिहिन.

Gouri said...

देवयानी, पडत्या फळाची आज्ञा घेऊन लगोलग माझ्या पहिल्या दोन शंका:
१. रानजाई आणि बदामी एक्झोरावर काळ्या मुंग्या mealybugs घेऊन येताहेत. पहिल्यांदा मुंग्या येतात, नंतर बग्ज दिसायला लागतात. मुंग्याच त्यांना घेऊन येतात अशी मला शंका आहे.मुंग्यांचा आणि या किडीचा काय संबंध असतो?
२. माझी गच्ची उत्तरेला येते. म्हणजे उन्हाळ्यात भरपूर ऊन, हिवाळ्यात सावली. अश्या बागेसाठी काही सजेशन्स?

D D said...

१. मिलीबग्जच्या शरीरातून बाहेर पडणार्‍या हनीड्यू च्य़ा स्त्रावाकडे मुंग्या आकर्षित होतात, म्हणून त्या मिलीबग्जना पाळून त्यांचा उपयोग करून घेतात.
मिलीबग्ज कमी प्रमाणात असतील, तर एखादी काडी घेऊन तिने ते मिलीबग्ज काढून टाकावेत.
मिलीबग्ज थोडे जास्त असतील, तर लागण झालेला भाग कापून टाकावा. कापलेला भाग झाडांच्या जवळ राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
मिलीबग्ज खूप प्रमाणात असतील तर, त्यांच्यावर तंबाखूचे किंवा साबणाचे मिश्रण फवारावे. हे मिश्रण त्या मिलीबग्जना पूर्ण ओले करेल, याची दक्षता घ्यावी. मात्र मिश्रण फवारण्याआधी झाडाला दोन दिवस भरपूर पाणी घातलेले असू द्यावे, म्हणजे झाडांवर त्याचा परिणाम होणार नाही.
तंबाखूचे मिश्रण तयार करण्यासाठी थोडा तंबाखू घेऊन तीनचार दिवस पाण्यात भिजवून ठेवावा आणि त्या मिश्रणाचा रंग चहाच्या रंगाइतका दिसेल अशा तीव्रतेचे मिश्रण तयार झाले, की ते लागण झालेल्या भागावर फवारावे.
साबणाचे मिश्रण तयार करतांना सौम्य तीव्रतेचा असणारा डिश वॉशिंग लिक्विड सोप घ्यावा. ५मिली (१ टीस्पून) लिक्विड सोप १ लिटर पाण्यात मिसळून त्याचे मिश्रण झाडाच्या लागण झालेल्या भागावर फवारावे व मिलीबग्जना पूर्ण ओले करावे. किंवा या मिश्रणात एखादे कापड भिजवून त्यानेही झाडांच्या फांद्या पुसून घेता येतील.जर सतत मिलीबग्जची लागण होत असेल, तर महिन्यातून एकदा अशा प्रकारे साबणपाण्याने फांद्या पुसून घ्याव्या.
मुंग्या जर मिलीबग्जना मुळांलगतच्या मातीतून घेऊन येत असतील, तर ते झाड कुंडीतून काढून पाण्याने नीट धुवून घ्यावे, त्याच्यावर कुठेही मिलीबग्ज नाहीत याची खात्री करून मग ते निर्जंतुक केलेल्या मातीत लावावे.
२. गच्चीत हिवाळ्यात किती तास ऊन असते त्याचा अंदाज घ्यावा. माझ्या अंदाजाप्रमाणे ज्यांना गुलाबापेक्षा कमी ऊन लागते अशी दोन ते तीन तास सूर्यप्रकाश पुरणारी फुलझाडे तुम्हांला लावता येतील.
शेवंती, झेंडू, निशिगंध, जास्वंद, गोकर्ण इत्यादी झाडे चालतील.... मात्र कदाचित अशा फुलझाडांना हिवाळ्यात कमी फुलं येतील. हिवाळ्यातही दोनतीन तास ऊन येत असेल, तर बटण गुलाबही लावता येतील. हया फुलझाडांना हिवाळ्यात ऊन येणार्‍या जागी ठेवण्याची दक्षता मात्र घ्या.
फॉलिएज प्लांट्स लावायची असतील, तर त्यातल्या ज्या झाडांना जास्त प्रकाश चालतो अशी झाडे लावता येतील, मात्र उन्हाळ्यात या फॉलिएज प्लांट्स्ना हलवून थोड्या सावलीच्या जागी ठेवावे लागेल म्हणजे ती जळणार नाहीत. पामची झाडेही लावता येतील. तसेच कमी प्रकाशात वाढणारी फॉलिएज प्लांट्स लावायची असतील, तर उन्हाळ्यात त्यांच्याभोवती शेडनेट टाकावे, ह्यातून सूर्यप्रकाश गाळून येतो. नर्सरीत ७५%, ५०%, २५% अश तीव्रतेची शेडनेट्स मिळतात, त्यातून आपल्याला हवे ते निवडून घ्यावे.

Anagha said...

गौरे,
'इथे फक्त सहमतीच्याच प्रतिक्रिया हव्यात असं नाही. वेगळं मत मांडलं गेलं म्हणजे नवी माहिती, नवा दृष्टीकोनही मिळतो त्याबरोबर, नाही का?'
आवडलं ! :)

...अगं आईई ग !!! एकदम चर्चा ( वाद नाही म्हटलंय हा मी ! :) )

Gouri said...

देवयानी, माझ्याकडे थंडीमध्ये साधारण दोन महिने एक - दोन तासही ऊन येत नाही. नंतर हळुहळू ऊन्हाचं प्रमाण वाढत जातं. सद्ध्या सोनचाफा, जांभळी अबोली, मदनबाण, लाल एक्झोरा, बदामी एक्झोरा, रानजाई, जाई, झेंडू, कण्हेर, कढीपत्ता, शेवंती, दवणा, पॉईन्सेटिया, बाल्सम, फिलोडेंड्रॉन, ब्लीडिंग हार्ट व्हाईन आणि अजून काही फॉलिएज प्लांट्स आहेत. थंडीत ऊन नाही म्हणून निम्म्या झाडांवर कीड पडते, आणि उन्हाळ्यात उरलेली करपायला लागतात. सध्या तरी शेड नेट लावणं शक्य नाही, आणि दिवसभर घरात कोणी नसल्यामुळे कबुतरांचा उपद्रव फार आहे. पूर्वी मी सौम्य साबणाचं द्रावण कीडीसाठी फवारत होते, पण त्यापेक्षा डेटॉलचं पाणी जास्त चांगलं असं मला सांगितलं. त्यामुळे सद्ध्या फक्त डेटॉलचं पाणी आणि कीड दिसली की हाताने काढून टाकणं असं चाललंय.

Gouri said...

अनघा, :D:D
चर्चेतून केवढी नवी माहिती पुढे आली आहे बघ!

D D said...

गौरी,
काहीजण मिलीबग्जसाठी डेटॉल वापरतात, पण डेटॉलच्या अतिवापरामुळे झाडांच्या सालीच्या पेशी अतिशुष्क होऊन जळू शकतात. म्हणून डेटॉल वापरतांना त्याचा स्प्रे न फवारता, ब्रशने डेटॉलचे द्रावण लागण झालेल्या भागावर लावावे.

तुम्हांला ज्या व्यक्तीने डेटॉल वापरण्याचा सल्ला दिला, ती निश्चितच या क्षेत्रातली अनुभवी व्यक्ती असेल. मी फक्त हौस म्हणून हॉर्टीकल्चरचा डिप्लोमा केला आहे, त्यामुळे मला असलेली पुस्तकी माहिती मी दिली. अर्थात, साबणच्या द्रावणाचा उपयोग मी करून पाहिला आहे, पण त्या झाडांवर तेव्हा लागण जास्त नसल्याने, ती कीड लगेच आटोक्यात आली होती.

असो. सध्या पुरेसा प्रकाश मिळत नसल्याने तुमच्या झाडांवर कीड पडत आहे. त्यासाठी तुम्ही आर्टीफिशीअल प्रकाशात झाडे वाढवू शकता. यासाठी ६० वॅटचा वॉर्म फ्लुरोसन्ट लाईट (ज्याच्या स्पेक्ट्रममधून रेड लाईट बाहेर पडतो, असा ) घेऊन तो झाडांपासून चार फूट अंतरापेक्षा थोडा वर लावावा. साधारण प्रत्येक स्क्वेअर फूटाला २० ते ४० वॅट लाईट मिळेल अशी दिव्यांची रचना करावी व या दिव्यांखाली फुलझाडांच्या कुंड्या ठेवाव्या. कमी प्रकाश लागणारी झाडे प्रकाशाच्या वर्तुळाच्या कडेला ठेवावी. रोज संध्याकाळी तीन ते चार तास हे दिवे लावून ठेवावे. इतका वेळ प्रकाश मिळाला, तरी झाडांची वाढ होऊन त्यांच्यावरची कीड कमी होईल.

फ्लुरोसन्ट लाईटच्या ऐवजी साधा इनकॅन्डेन्सण्ट बल्बही वापरता येईल, पण तो जरा अधिक उंचीवर लावावा लागेल.

टेरेस पूर्ण ओपन असेल, तर कबुतरांचा उपद्रव थांबवता येणार नाही, मात्र थोडी बंदिस्त टेरेस असेल, तर कबुतरे येऊ नयेत यासाठी लावण्याचे खास नेट मिळते, ते वापरता येईल.

Unknown said...

मला झाडाच्या बी पासुन बोन्साय करायचे आहे त्तर मला plz माहीती द्या

Gouri said...

प्रतिक, बोन्साय कसं करतात याची माझी माहिती प्राथमिक आणि केवळ ऐकीव आहे. वर प्रतिक्रिया दिल्यात त्या देवयानी (D D) किंवा अजून कुणी तज्ञांकडून तुम्हाला ही माहिती मिळू शकेल.