Thursday, December 15, 2011

हिंजवडी

    मोठ्या शहराजवळचं एक गाव. शहराजवळ असूनसुद्धा तसं दूरच, कारण गाव कुठल्या हायवेवर नाही. गावाला पक्का रस्ता नाही. पिण्यासाठी चांगलं पाणी नाही. टिपकागदावर पसरणार्‍या शाईच्या ठिपक्यासारखं शहर चहूबाजूंनी पसरत असताना हे गाव तसं बाजूला पडलेलं. अजून आपलं गावपण थोडंफार जपून असलेलं.

    गावात एक फॅक्टरी आली. फॅक्टरीच्या लोकांनी पक्का रस्ता बनवला. फॅक्टरीच्या मालाचे ट्रक, कामगारांना आणणार्‍या बसेस, मोठ्या मॅनेजर लोकांच्या गाड्या सुरू झाल्या. गावातली वर्दळ वाढली. हळुहळू अजून काही फॅक्टर्‍या आल्या, गावाला वर्दळीची थोडी सवय झाली. चहाच्या टपर्‍या आल्या, हॉटेल आलं. सिक्ससीटर सुरू झाल्या.

    त्यानंतर गावात सेझ आला, जवळून एक ‘बायपास’ निघाला, आणि गावाचं रूपच पालटलं. दहा वर्षांपूर्वी जिथे रस्ताच नव्हता, तिथे आता रस्ता ओलांडणं हे एक संकट होऊन बसलं. कंपन्यांच्या देशी-परदेशी पाहुण्यांसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स आली, मॉल आले, बंगल्यांच्या सोसायट्या आल्या, रेसिडेंशिअल टॉवर्स आले. गावाचं इंग्रजाळलेलं नाव जगभरात पोहोचलं.

    इथल्या कंपन्यांच्या चकचकित ऑफिसच्या काचेच्या आतलं जग आणि बाहेरचं जग ही दोन वेगवेगळी विश्व आहेत.

    आत वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आहे. जगभरातल्या कस्टमरसाठी काम चालतं. परदेशी कस्टमरांसाठी ही आपलं काम स्वस्तात करून घेण्याची सोय. त्यांच्या दृष्टीने स्वस्तात काम करणारे कामगार. पण आपल्यासाठी हे उद्योग देशाला निर्यातीचा पैसा मिळवून देतात. त्यामुळे त्यांचा मान मोठा. शिवाय पगारही बरा. परदेशी प्रवासाची संधी. हे परदेशात आपल्या देशाची तरूण, महत्त्वाकांक्षी, उच्चशिक्षित, मेहेनती अशी प्रतिमा वगैरे निर्माण करतात. ‘इंडिया शायनिंग’म्हणतात ते यांच्यामुळेच.

    बाहेर गेल्या वीस - पंचवीस वर्षातला कायापालट भांबावून बघणारं गाव आहे. शेती गेली, शेती विकताना आलेला पैसा उडून गेला. नव्या कंपन्यांमध्ये गावच्या तरुणांसाठी काम नाही. विस्थापित न होता आपल्याच गावात ते उपरे झालेत. गावपण संपलं, तसं बकालपण आलं. गुन्हेगारी वाढली. संध्याकाळी ओसंडून वाहणार्‍या रस्त्यावर कुणा आयटीवाल्याचा धक्का गावकर्‍याला लागला, तर त्याला धरून मारायला हात शिवशिवायला लागले. शरद जोशी म्हणतात तो ‘भारत’ हाच असावा.

    अजून दहा वर्षांनी गावातल्या मूळ रहिवाश्यांची अवस्था शहरातल्या झोपडपट्टीसारखी होणार का?

    ते जात्यातले, म्हणून सुपातल्यांनी डोळेझाक करायची?

************

    गेले काही दिवस ऑफिसमधून बाहेर पडलं, की हा किडा डोक्यात वळवळायला लागतो. विकास कशाला म्हणायचं, काय मार्गाने देशाने जायला हवं वगैरे मोठे प्रश्न आहेत. त्याची मोठी आणि पुस्तकी उत्तरं शोधाण्यात मला आत्ता रस नाहीये. मला रोज दिसणरं, माझ्या ऑफिसच्या लगतचं हे चित्र बदलण्यासाठी मला काही करण्यासारखं आहे का?

10 comments:

अनघा said...

विचारात पडले...शेवटचं वाक्य...तुझा प्रश्र्न.

मला हल्ली असंही वाटायला लागलंय....संवेदनशीलता हा एक शाप आहे.

Gouri said...

जेवढं मन संवेदनशील तेवढा जास्त मनस्ताप होणारच ग ... पण दगड बनून कसं चालेल?

aativas said...

दूरदृष्टीचा अभाव आहे सगळा .. किंवा दलाल स्वप्न विकण्यात वाकबगार आहेत अस म्हणायचं .. स्वप्न विकत घेतल्यावरच कळत किती महागात पडल ते!!

Gouri said...

सविता, खरंय. त्याची काय किंमत पडली हे नंतरच समजतं. पुढच्यास ठेच, मागच्यालाही तीच ठेच.

हेरंब said...

अप्रतिम अप्रतिम पोस्ट..

नेहमीच्या गोष्टींना एका वेगळ्या कोनातून बघायला लावून विचारत पाडलंस !!

अपर्णा said...

गौरी योग्य शब्दात मांडलस...काय बोलू?? तुझा शेवटचा प्रश्न अनेक जणांच्या मनातला आहे...आणि ही परिस्थिती आणखी अनेक ठिकाणी निर्माण होतेय...त्यासाठी आय टीचेच उद्योग आहेत असं नाही पण भूमिपुत्राची परवड हा आपल्या देशाचा नारा असल्यासारखं होतंय का?? कसली इंडिया शायनिग

Raj said...

पुण्याच्या उपनगरांमध्ये जायचं झालं तर मला नवीन शहरात गेल्यासारखं पत्ता शोधत फिरावं लागतं. एकही भाग ओळखीचा वाटत नाही. हे सगळं कुठल्या दिशेनं चाललय कुणास ठाउक!

Gouri said...

हेरंब, जरा ऑफिसच्या काचेच्या पलिकडून इकडे बघितल्यावर फारच वेगळं चित्र दिसतंय!

Gouri said...

अपर्णा, आयटीवालेच जबाबदार असं नाही म्हणणार मी. लोक कुठून कुठून आपलं गाव सोडून नोकरीसाठी येतात इथे. त्यांच्या गावात काम मिळालं तर ते तरी कशाला येतील?

Gouri said...

राज, पुण्याचे कितीतरी नवे भाग असे आहेत, जिथे फिरताना नव्या शहरात हिंडल्यासारखंच वाटतं. काहीच ओळखीचं नाही.