Saturday, December 10, 2011

राजबंदिनी

* १९३५च्या सुधारणांमध्ये ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला.
* लोकमान्य टिळकांना ब्रह्मदेशात मंडालेच्या तुरुंगात ठेवलं होतं, आणि रत्नागिरीला ब्रह्मदेशाच्या थिबा राजाच्या राजवाड्याचे अवशेष आहेत.
* विपश्यना ध्यानपद्धती गोयंका गुरुजींनी ब्रह्मदेशातून भारतात आणली.
* इरावती कर्वेंचं नाव ब्रह्मदेशातल्या इरावद्दी नदीवरून ठेवलेलं होतं.
* आझाद हिंद सेना ब्रह्मदेशातल्या जंगलांमधून कोहिमापर्यंत पोहोचली.
* दुसर्‍या महायुद्धात ब्रह्मदेशाच्या घनदाट जंगलात टिकून राहण्यासाठी इंग्रज सैनिकांना जिम कॉर्बेटने मार्गदर्शन केलं होतं.
* ऑंग सान स्यू की असं काहीतरी नाव असलेली बाई इथे लोकशाहीचा लढा लढते आहे.
*************************************************************
    डोक्याला ताण देऊनही जेमतेम पाच दहा वाक्यात माझं ब्रह्मदेशाविषयीचं ‘ज्ञान’ संपतं. ईशान्य भारतातली राज्य सुद्धा आम्हाला धड माहित नसतात, तिथे ईशान्य भारताच्या पलिकडच्या या शेजार्‍याविषयी काय माहिती असणार?

    प्रभा नवांगुळ यांनी लिहिलेलं ‘राजबंदिनी’ हे स्यू चीचं (हो, तिचं नाव ‘ऑंग सान स्यू ची’ आहे,‘की’ नाही हे सुद्धा पुस्तक वाचल्यावरच समजलं.) चरित्र वाचलं, आणि भारताच्या अजून एका अस्वस्थ शेजार्‍याची थोडीशी ओळख झाली.

    आज ब्रह्मदेशात जगात सर्वाधिक काळ लष्करी हुकूमशाही चालू आहे. आणि तिथे लोकशाही यावी म्हणून स्यू चीचा अहिंसक लढा चाललाय. ब्राह्मी वेशातला, केसात फुलं माळलेल्या, नाजुक अंगकाठीच्या स्यू चीचा फोटो पाहिला, म्हणजे मला तर ही एखादी संसारात बुडून गेलेली चारचौघींसारखी बाईच वाटते. तिला वर्षानुवर्षे स्थानबद्ध करून ठेवण्याइतकी भीती लष्करी हुकूमशाहीला का बरं वाटत असावी? या उत्सुकतेने हे पुस्तक वाचायला घेतलं.

    ऑंग सान स्यू ची ही ब्रह्मदेशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे जनरल ऑंग सान यांची धाकटी मुलगी. १९८८ सालापर्यंत ती इंग्लंडमध्ये आपल्या ब्रिटिश नवर्‍याबरोबर आणि दोन मुलांबरोबर साधंसरळ आयुष्य जगत होती. १९८८ साली तिच्या आईच्या आजारपणामुळे स्यू ची थोड्या दिवसांसाठी म्हणून रंगूनला आली, आणि हळुहळू ब्रह्मदेशाच्या लोकशाहीसाठीच्या लढ्याचा चेहेराच बनून गेली. तिचा लढा आजही संपलेला नाही. तिच्या मृदु चेहेर्‍यामागे एक दृढनिश्चय लपलेला आहे. वर्षानुवर्षांचा एकांतवास, पतीची, मुलांची ताटातूट, पतीचं आजारपण आणि अखेर भेट न होताच मृत्यू - यातलं काहीच तिला तिच्या लोकशाहीसाठीच्या लढ्यापासून दूर करू शकलेलं नाही.

    स्यूची विषयी मला तरी आजवर काहीच माहिती नव्हती. तिच्याविषयी कुठलं पुस्तकही बघायला मिळालं नव्हतं. इतकी मर्यादित माहिती उपलब्ध असताना या पुस्तकासाठी लेखिकेने घेतलेले परिश्रम वाखाणण्यासारखे. जरूर वाचा.

राजबंदिनी - ऑंग सान स्यू ची हिचं चरित्र
लेखिका: प्रभा नवांगुळ
प्रकाशन: राजहंस, २०११
किंमत: रु. २५०

    आता ‘फ्रीडम फ्रॉम फियर’ हे स्यू चीचं पुस्तक मिळवून वाचायचंय. 

12 comments:

Anonymous said...

>>>>हो, तिचं नाव ‘ऑंग सान स्यू ची’ आहे,‘की’ नाही हे सुद्धा पुस्तक वाचल्यावरच समजलं.

बघ माझाही हाच घोळ होता....

पुस्तक नक्की हवय वाचायला.... अर्थात कधी मिळेल कल्पना नाही, पण मिळवून वाचणार हे नक्की!!!

Gouri said...

तन्वी, नक्की वाच ग. मला आईच्या मैत्रिणीकडून मिळालं, ते खाली ठेवेपर्यंत मी दुसर्‍या पुस्तकाला हात लावला नाही.

अनघा said...

गेल्या वेळच्या 'टाइम' च्या अंकात तिच्यावर लेख आला आहे...'टाइम' मध्ये आहे म्हणजे नक्की माहितीपूर्ण व सुंदर असावा...तो पण वाचायला नाही मिळालेला अजून ! :(

Gouri said...

अनघा, पटकन वाच बघू तो लेख ... आणि लिंक पाठव :)

Kanchan said...

पुस्त्क मिळवून वाचते आणि मग अभिप्राय कळवते. नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, गौरी.

Gaurav said...

hey thanks for sharing

Gouri said...

कांचन, आभार!

Gouri said...

गौरव, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार!

Abhishek said...

काही लोकांबद्दल/विषयांबद्दल किती कमी माहीत आहे हे लेख वाचून अधिक जाणवलं.

Gouri said...

अभिषेक, खरंय. मिडियाने उचलून धरल्याशिवाय या बातम्या त्यांच्या महत्त्वासह आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत! ब्रह्मदेश आणि स्यू ची ही आपल्याकडे कुठेतरी कोपर्‍यातली जागा भरणारी फुटकळ बातमी असते.

हेरंब said...

अप्रतिम पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल सगळ्यात आधी आभार.

या बाईविषयी वर्तमानपत्रात बरंच वाचलं आहे. पण कुठलंही पुस्तक वगैरे वाचलं नाहीये. नक्की वाचेन. पुन्हा एकदा धन्यवाद. !

Gouri said...

हेरंब, नक्की वाच. अनघाने सांगितलंय म्हणून मी टाईम मॅगेझिनच्या साईटवर जरा शोध घेतला. तिथे हे कव्हर सापडलं:http://www.time.com/time/magazine/article/0,9171,2040197-1,00.html
इथेही थोडी माहिती आहे तिच्या विषयी.