Friday, July 27, 2012

ओरिसाची भटकंती: केचला


ओरिसाची भटकंती: प्रथमग्रासे ...

     विशाखापट्टण ते कोरापुट अंतर २१३ किमी. मधे एक तासभराचा जबरदस्त घाट आहे, आणि रस्ता खराब आहे. त्यामुळे चार – साडेचार तास सहज लागतात पोहोचायला. ताडाची झाडं, ताडाच्याच झावळ्यांनी शाकारलेली घरं, झावळ्यांच्याच विणलेल्या सुंदर छत्र्या आणि चांगला रस्ता हे संपलं म्हणजे समजायचं आपण आंध्र सोडून ओडिशामध्ये प्रवेश केला. पण रस्त्याकडे आणि घाटाच्या न  संपणाऱ्या वळणांकडे दुर्लक्ष करून जरा खिडकीतून बाहेर बघितलं, तर डोळ्यांचं पारणं फिटेल. (फोटो येतांना काढलेत.)

    कोरापुटला गेल्यावर पहिलं काम म्हणजे केचलाची शाळा बघायला जायचं. मला जायचं होतं त्याच दिवशी केचलाच्या शाळेच्या मुलांचा कोरापुटला कार्यक्रम होता. त्यामुळे मुलांबरोबरच त्यांच्या शाळेला परत जाणं शक्य होतं. कार्यक्रमाच्या ठिकाणी शाळेच्या मुलांच्या कलावस्तूंचं एक छोटंसं प्रदर्शन होतं. ते बघूनच केचलाला काय बघायला मिळणार याची छोटीशी झलक मिळाली.

ताजमहाल, कुतुबमिनार, मोर ... मुलांनी बनवलेल्या वस्तू


सात – आठ वर्षाच्या मुलाने तयार केलेलं हे गोष्टीचं पुस्तक:

The brave elephant story

    गोष्ट त्याने रचलेली, चित्रं स्वतः काढलेली, आणि लेखनही त्याचंच. आपल्या बोलीभाषेखेरीज कुठल्याच भाषेचा गंध नसलेल्या निरक्षर आईबापांचा हा मुलगा या शाळेत जाऊन पुण्यातल्या पहिली – दुसरीतल्या मुलाइतकं सहज इंग्रजी बोलतोय!

     त्यानंतरचा कार्यक्रम बघतांना जाणवलं, शाळेतला फक्त एकच ‘स्कॉलर’ मुलगा इतक्या आत्मविश्वासाने वावरणारा नाहीये ... सगळीच मुलं सहजपणे, कुठलं दडपण न घेता पाहुण्यांशी गप्पा मारताहेत. कलेक्टर सर, पोलीस अंकल हे सगळे त्यांचे ‘फ्रेंड्स’ आहेत.


जवळजवळ त्याच्याच उंचीचा ढोल वाजवणारा कमलू
यात निम्म्याहून जास्त मुली आहेत!
कार्यक्रमात सादर काय करायचं, हे मुलांनीच ठरवलंय!

    कार्यक्रम संपल्यावर एकेका सिक्स सीटरमध्ये बारा मुलं, दोन मोठे आणि ड्रायव्हर, खेरीज मागे ड्रम आणि बाकीचं सामान अश्या तीन गाड्यांमधून सगळे लॉंच सुटते तिथवर पोहोचलो. तासाभराच्या प्रवासात आमच्या गाडीतली निम्मी बच्चेकंपनी बसल्या जागी झोपली. खड्डे भरलेल्या रस्त्याने जाताना झोपलेली मंडळी (आणि त्यांचं सामान) कुठेतरी पडू नये म्हणून जागे असणारे सगळे इतक्या प्रेमाने काळजी घेत होते ... कार्यक्रमाच्या सादरीकरणापेक्षाही या प्रवासातलं आणि नंतर शाळेतलं मुलांचं वागणं बघून मला शाळेच्या यशाची खात्री पटली.


    कोलाब धरणाच्या पाण्यातून तासभर लॉंचने प्रवास केल्यावर आम्ही शाळेच्या बाजूला पोहोचलो. तिथून पुढचा अर्धा – एक किलोमीटर चालत. ही जागा इतकी शांत आणि सुंदर आहे ... इथे जाणं थोडं जरी सुलभ असतं, तर इथे हॉलिडे रिझॉर्ट उभे राहिले असते!

लॉंचमधल्या सहप्रवासी

शाळेचं पहिलं दर्शन.
  
   ही शाळा आहे अरविंद आश्रमाची. इथल्या दुर्गमातल्या दुर्गम भागात उत्तम शाळा चालवून दाखवण्याच्या जिद्दीने प्रांजल जौहार या माणसाने उभी केलेली. शाळेसाठी पैसा उभा करणं, जमीन मिळवणं, बांधकाम, मुलं आणि शिक्षक गोळा करणं ही सगळी या माणसाची धडपड. शाळा सुरू होऊन चार वर्षं झालीत. इथल्या शाळेची मुलं बारा महिने शाळेच्या वसतीगृहात राहतात, आठवड्यातून एक दिवस रात्री आपापल्या घरी जातात. शाळेत सद्ध्या सहा ते नऊ वयोगटातली सुमारे ७० मुलं आहेत. ही ‘फ्री प्रोग्रेस स्कूल’ आहे. कुठलीच शैक्षणिक पार्श्वभूमी नसणाऱ्या या मुलांचा आत्मविश्वास जागा करणं, त्यांना शिक्षणाची गोडी लावणं, त्यांना इंग्रजी, हिंदी, ओडिया भाषेत सहज संवाद साधता येणं हे या शाळेचं यश. ही मुलं मोठी झाल्यावर बहुधा आसपासच्या दुसऱ्या साध्या शाळेत जातील. केचलाच्या शाळेतलं शिक्षण त्यांना तिथे टिकून रहायला बळ देईल.

    गावात अजूनही वीज नाही. मोबाईल कव्हरेज बहुतेक भागात नाही. शाळेने सोलार, बोअर आणि पवनचक्कीच्या सहाय्याने वीज आणि पाण्याची व्यवस्था केलीय. आम्ही पोहोचलो त्या दिवशी संध्याकाळी वीज नव्हती. सगळे अंधारात चाचपडतांना “सोनू को देखा क्या?” म्हणून विचारत होते. प्रत्येकाने चौकशी करावी असा / अशी सोनू कोण बरं? म्हणून विचार करत होते. लवकरच उलगडा झाला – सोनू हे शाळेत पाळलेल्या साळिंदराचं नाव. गावातल्या आदिवासींनी खाण्यासाठी धरलेलं हे साळिंदराचं पिल्लू त्यांना पैसे देऊन शाळेने सोडवून घेतलंय. सध्या त्याचा शाळेच्या आवारात मुक्तसंचार आहे. सूर्य मावळला, म्हणजे सोनूचा दिवस सुरू होतो. शाळेची मुलं त्याला घाबरत नाहीत, बाहेरून येणारे मात्र घाबरतात. आणि सोनूला लोकांना घाबरवायला आवडतं. जेवतांना कधी सहज मागे बघितलं, तर अचानक सोनू मागे उभा दिसतो! चपला खाणं, रात्रभर कुठल्या तरी खोलीच्या दारावर धडका देत राहणं, खोलीचं दार उघडं दिसलं, की लगेच आत शिरून गादी ‘पावन’ करून ठेवणं अश्या सोनूच्या लीला ऐकायला मिळतात. पण हा खोडकरपणा सोडला, तर सोनूचा कुणाला त्रास नाही. केचलाच्या शाळेचा तो एक अविभाज्य भाग आहे.

सोनू
    सोनूसारखंच एक हरणाचं पिल्लूसुद्धा सोडवून आणलंय शाळेने.

    दुसऱ्या दिवशी हरी, जगन, मुदली आणि त्यांचा अजून एक मित्र असे चौघं मला आश्रमाची बाग दाखवायला घेऊन गेले. भाजीपाला, फुलझाडं, फळझाडं रानफुलं असं जे त्यांना आवडेल त्याचा फोटो घ्यायचा असे आम्ही दीड – दोन तास बागेत भटकत होतो. सहा सात वर्षांची मुलं सोबत आहेत आणि तुमचा कॅमेरा हाताळायला मागत नाहीत असा माझा पहिलाच अनुभव. आपल्या सोडून कुणाच्याही खोलीत शिरायचं नाही, कुठल्या वस्तूला हात लावायचा नाही, पाहुण्याचा कॅमेरा मागायचा नाही अश्या सगळ्या गोष्टी इतकी सहज शिकली आहेत ही मुलं ... दोन दिवस त्यांच्यासोबत राहतांना कुठे भांडण, मारामाऱ्या बघायला मिळाल्या नाहीत!

Kechla - Orchard
    दुपारच्या वेळी एक गावातली बाई औषध घ्यायला शाळेत आली होती. गावातल्यांना लागतील अशी थोडीफार औषधं शाळा पुरवते. वैद्यकीय मदत हवी असेल, तर शाळेच्या लॉंचमध्ये घालून दवाखान्यात पोहोचवतात काही वेळा. नकळत मनात हेमलकसा प्रकल्पाचा विचार आला. तोही दुर्गम आदिवासी भागातच आहे. दोन्ही ठिकाणची गरज बऱ्याच प्रमाणात सारख्याच असणार. पण दृष्टीकोनात फरक आहे. केचला प्रकल्प मुख्यतः पुढची पिढी डोळ्यासमोर ठेवून उभा केलेला आहे.

    परतीचा प्रवास सरकारी लॉंचमधून आणि सरकारी गाडीमधून झाला. ज्या प्रवासाला जातांना तीन तास लागले होते, तेच अंतर परततांना आम्ही एक – दीड तासात कापलं. हा आहे शाळेकडच्या आणि सरकारी रिसोर्सेसमधला फरक. तसं बघितलं, तर केचलाच्या मुलांना शाळा उपलब्ध करून देणं हे शासनाचं काम. ते काम कुणी स्वयंस्फूर्तीने करत असेल, आणि सरकारने त्यांना मदत केली, तर किती चांगला परिणाम साधता येतो, हे पुढच्या भटकंतीमध्ये बघायला मिळालं.

क्रमशः

केचलाचे अजून काही फोटो इथे आहेत.

17 comments:

Anagha said...

हे सगळं वाचून मला पुन्हां पुन्हां एकच वाटतं... खूप चांगली चांगली कामं आपल्या देशात होत असतात. मात्र वेगवेगळ्या माध्यमांतून फक्त वाईट आणि निराशाजनक चित्रच आपल्या नजरेसमोर उभं केलं जातं.

खूप छान...मला अभिमान वाटतो तुझा. :)
आणि एक तक्रार ! मला का कळवत नाहीस तू असं काही करायला निघातेस तेव्हां ? मी पण येईन ना मग तुझ्याबरोबर ! म्हणजे नोकरदार आहे मी...पण प्रयत्न तर करेन यायचा तुझ्याबरोबर ! :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

कसली भारी पोरं आहेत.

परत एकदा... म्हणजे नोकरदार आहे मी...पण प्रयत्न तर करेन यायचा तुझ्याबरोबर ! :)

Gouri said...

अनघा, अशी कितीतरी कामं चालली आहेत आपल्या आजुबाजूला, पण यात सनसनाटी बातमीचं मूल्य नाही, त्यामुळे प्रसारमाध्यमातून ते पुरेसं पुढे येत नाही असं वाटतं मला.
अगं अभिमान वाटावा असं काम तिथले लोक करताहेत ... मी फक्त तिथे भेट देऊन आले. आणि तू मागच्या भटाकंतीच्या वेळी सांगितलेलं लक्षात होतं माझ्या, पण या वेळी मी निघाले तेंव्हा तू टूर-कीमध्ये होतीस. :)

Gouri said...

पंकज, पुन्हा भटकायला जायच्या आधी सांगते मी तुलाही ... म्हणजे मला कॅमेरा सोबत घ्यायला नको! :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

जल्ला मेला... येऊन जाऊन कॅमेरा. त्याच्याशिवाय जग पहायला शिकायचंय मला अशा भटकंतीतून.

Gouri said...

हे तू म्हणावंस? :)
या जागा नुसत्या बघण्यासारख्या तर आहेतच. पण तुझ्याजवळ त्या फोटोत पकडण्याची कला आहे. तू फोटो काढलेस, तर हे अजून खूप लोकांपर्यंत पोहोचवू शकशील.

Anonymous said...

सकारात्मक, आशादायक निरीक्षणे आणि शब्दात मांडणे सुद्धा ! फोटो आवडले. विशेषतः तिथल्या मातीचा dark विटकरी ओलसर रंग. कोकणातील मातीची आठवण करून देणारा...

Gouri said...

तृप्ती, हो ग, इथल्या मातीचा लाल रंग एकदम कोकणाची आठवण करून देतो. आणि पावसाळ्यात गेल्यामुळे जोराचा पाऊस नसला तरी वातावरण सुंदर होतं.

Raj said...

वा! अशी शाळा, अशी लोकं आहेत हे इथपर्यंत कधी पोचतच नाही. इतक्या लांबून ही वार्ता आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल अनेक आभार.

Gouri said...

राज, हा भाग बाकीच्या देशासाठी अस्तित्वातच नाही. आपल्याकडेच काय, पण भुवनेश्वरलाही याविषयी फारशी माहिती नसते कुणाला. अर्थात, आपल्याला तरी गडचिरोलीविषयी काय माहित असतं?

aativas said...

अशा खूप 'चांगल्या' गोष्टी घडत असतात भवताली हा माझाही अनुभव. तू ते पाहिलसं आणि आमच्यापर्यंत पोचवते आहेस याचा आनंद आहे. मीही कोरापुटला गेले होते पूर्वी - त्याची आठवण या निमित्ताने जागी झाली :-) पुढे वाचायची उत्सुकता आहे.

Gouri said...

सविता, तुमच्या पोस्टमधून अशी देशाच्या कानाकोपऱ्यातली माणसं भेटतच असतात! :) कोरापुट सुंदर आहे ना?

मी बिपिन. said...

Fantastic!

Suhas Diwakar Zele said...

सही गं... मला पण असं फिरायला आवडेल, हे जग बघायला आवडेल, त्यातून काही शिकायला आवडेल..

:)

:)

Gouri said...

Bipin, Suhas, saddhya mi punyat nahi. tumachi comment ushira baghitali. Sorry.
Pudhacha bhag ajoon 10 divasani punyala paratalyavar. :)

Unknown said...

Gauri vachun khoop bar watla. Manat nakalat Anandwan athawale. Ani lagech tu kelela hemalkasacha ullekh.
Durdaivane aslya changlya gosti lokanparyant pochat nahit.Anagha mahante tase.
sam vichari bhetlyane anand zala.
wel milel tase lihit ja.

Gouri said...

सीमा, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! असं चांगलं काही बघायला मिळालं, म्हणजे त्याविषयी लिहिलंच पाहिजे असं वाटतं मला! :)