Monday, August 27, 2012

ड्रीमरनर - ऑस्कर पिस्टोरियस

‘ड्रीमरनर’ ही ऑस्कर पिस्टोरियसने सांगितलेली त्याची स्वतःची कहाणी. साऊथ आफ्रिकेच्या ऑस्करच्या दोन्ही पायांमध्ये जन्मत:च दोष होता, आणि आपल्या पायांवर तो शरीराचा भार तोलू शकणार नाही असं डॉक्टरांचं निदान होतं. आपल्या बाळासाठी सर्वात योग्य उपचार काय असू शकेल हे समजून घेण्यासाठी ऑस्करच्या आईवडिलांनी जगभरातल्या तज्ञांची मत घेतली, सर्व शक्यता पडताळून बघितल्या. आयुष्यभर व्हीलचेअर वापरणं किंवा पाय कापून टाकून कृत्रीम पाय लावणे असे पर्याय समोर होते. ऑस्कर चालायला शिकण्याच्या वयाचा होण्यापूर्वीच पायाच्या शस्त्रक्रिया झाल्या, तर तो कृत्रीम पायांनी चालायला लवकर शिकेल आणि त्याच्या मनात आपल्या ‘वेगळ्या’ पायांविषयी कुठलाही गंड निर्माण होणार नाही असं डॉक्टरांचं मत पडलं. त्याप्रमाणे शस्त्रक्रिया झाल्या, ऑस्करचे दोन्ही पाय गुडघ्याखाली कापण्यात आले, आणि आपल्या वयाच्या बाकी मुलांसारखाच ऑस्करही चालायला लागला - कृत्रीम पाय वापरून.

चालण्यापाठोपाठ सुरू झाली मोठया भावाच्या सोबतीने केलेली दंगामस्ती. ऑस्करच्या आईवडिलांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. बाळ जन्मल्याबरोबर त्याचे पाय पाहून ऑस्करच्या वडिलांनी म्हटलं, "याचे पाय वेगळे दिसताहेत." सदोष नाही, तर फक्त वेगळे. ऑस्करच्या ‘वेगळ्या’ पायांचा त्यांनी कधी बाऊ केला नाही. आवश्यक ते वैद्यकीय निर्णय योग्य वेळी घेतले, पण आपल्या मुलाला कधीही कुठली वेगळी वागणूक दिली नाही. मोठ्या कार्लने बूट घालायचे, तसेच ऑस्करने पाय आणि बूट घालायचे इतक्या सहज या कुटुंबाने ऑस्करचं पाय नसणं स्वीकारलं. इतर मुलांमध्ये त्याला नैसर्गिकपणे मिसळू दिलं, झाडावर चढणं, सायकल चालवणं, पोहणं, धडपडणं सगळं सगळं करू दिलं. वाढीचं वय आणि ऑस्करचा धडपडा स्वभाव, त्यामुळे दर दोन एक महिन्यांनी ऑस्करचे नवे पाय बनवण्याची वेळ यायची. पण त्याचा कुणी बाऊ केला नाही.

ऑस्करला सगळ्याच मैदानी खेळांमध्ये रस होता. शाळेच्या होस्टेलला रहायला गेल्यावर तो रग्बीमध्ये जास्त रमू लागला, या खेळात पुढे येण्यासाठी त्याची कसून तयारी सुरू झाली. पण त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली, रग्बीसाठी पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी त्याला दोन महिने फक्त ऍथलेटिक्सचा सराव करायला सांगितला गेला. ऍथलेटिक्सची ऑस्करला कधीच फारशी आवड नव्हती. रग्बीसाठी म्हणून नाईलाजाने त्याने पळण्याचा सराव सुरू केला, आणि त्याची पळण्यातली गती बघून कोच त्याला अपंगांच्या स्पर्धांसाठी १००, २००, ४०० मीटर पळण्यात तयार करायला लागले. २००४च्या अथेन्सच्या पॅरालिंपिक्समध्ये ऑस्करने १०० आणि २०० मीटर स्पर्धेत पदक मिळवलं. पुढच्याच वर्षी त्याने साऊथ आफ्रिकन चॅम्पियनशीप स्पर्धेत ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत (अपंगाच्या नव्हे, धडधाकट खेळाडूंच्या) उत्तम वेळ नोंदवली. आपण पाय असणार्‍या स्पर्धकांच्या तोडीची कामगिरी करू शकत असू, तर त्यांच्याही स्पर्धांमध्ये भाग का घेऊ नये या विचाराने ऑस्करने अपंगांच्या आणि धडधाकट खेळाडूंच्या दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर धावपटू म्हणून पुढे येण्यासाठी एकीकडे ऑस्करचा कसून सराव चालू होता, तर दुसरीकडे त्याच्या कृत्रीम पायांमुळे त्याला पळतांना धडधाकट खेळाडूंपेक्षा गैरवाजवी फायदा मिळतो म्हणून वादंग सुरू झाला. जानेवारी २००८ मध्ये आयएएएफनी (इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ऍथलेटिल्स फेडरेशन्स) ऑस्करवर धडधाकट खेळाडूंच्या स्पर्धेत खेळण्यास बंदी घातली. ऑस्करने या बंदीविरुद्ध सीएएसकडे (कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) अपील केलं. त्याला कृत्रीम पायांमुळे जसे फायदे होतात, तसे तोटेही होतात. अन्य अपंग खेळाडू ऑस्करच्या कामगिरीच्या जवळपास पोहोचू शकलेले नाहीत. त्याची कामगिरी सातत्याने सुधारत असतांना त्याने कृत्रीम पायांमध्ये कुठलाच बदल केलेला नाही. हे मुद्दे विचारात घेऊन मे २००८ मध्ये ऑस्करवरची बंदी उठवण्यात आली. २००८च्या बीजिंग ऑलिंपिक्ससाठी ४०० मीटर स्पर्धेसाठीची पात्रता वेळ ऑस्करला नोंदवता आली नाही, आणि त्याने वाईल्ड कार्डवर प्रवेश मिळवण्यास नकार दिला. त्यावर्षीच्या पॅरालिंपिक्समध्ये त्याने १००, २०० आणि ४०० मीटर धावण्यामध्ये सुवर्णपदक आणि ४०० मीटरमध्ये (अपंगांसाठी) विश्वविक्रम आशी चमकदार कामगिरी केली. यंदाच्या लंडन ऑलिंपिक्समध्ये ४०० मीटर्स धावणे आणि ४०० x ४ रिलेमधल्या सहभागानंतर ऑस्कर अपंगांच्या पॅरालिंपिक्समध्ये आपली बीजिंगची तीन सुवर्णपदकं राखण्याचा प्रयत्न तर करेलच, शिवाय ४०० x ४ रिलेमध्येही तो सहभागी होतो आहे. आपली ओळख एक ऍथलिट म्हणून असावी, 'अपंग असूनसुद्धा पळणारा' अशी नको अशी ऑस्करची इच्छा आहे. त्याच्या मनोनिग्रहाने आणि मेहनतीने त्याच्या अपंगत्वावर कधीच मात केलीय. त्याची स्पर्धा आहे ती स्वतःशीच.

धावण्याच्या ट्रॅकवर इतिहास घडवत असतानाच ऑस्कर भूसुरुंगांच्या स्फोटामुळे हात पाय गमवून बसलेल्या लोकांना कृत्रीम हातपाय मिळवून देण्यासाठी काम करतो आहे. या कामात आर्थिक मदतीबरोबरच तो स्वतःचा वेळही देतोय.

ऑस्करची आत्मकथा विशेष भावते, ती त्यातल्या संयत चित्रणामुळे. तसं बघितलं तर दोन्ही पाय नसणं, लहानपणीच आई वडिलांचा डायव्होर्स, आईचा मृत्यू, प्रेमभंग, मोठ्या भावापासून दुरावणं, ऍथलेटिक्स संघटनेने बंदी घालणं आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूला झेलावे लागणारे ताणतणाव असा मेलोड्रामा तयार करायला लागणारा सगळा मालमसाला ऑस्करच्या गोष्टीत आहे. पण ऑस्कर कुठेही स्वतःची कीव करत नाही. कृत्रीम पायांच्या घर्षणामुळे पायावर होणार्‍या जखमा असोत, किंवा पावसात पळतांना येणार्‍या अडचणी असोत, या गोष्टी फक्त जाताजाता सांगण्याच्या ओघात नमूद केल्या जातात. त्यांचं तो भांडवल करत नाही.  माझ्याच वाट्याला हे का हा प्रश्न या गोष्टीत कुठेच येत नाही. तो खरा योद्धा आहे. आहे ती परिस्थिती स्वीकारून आव्हानांना सामोरे जाण्याची त्याची धमक आचंबित करते.

मराठी पुस्तक वाचतांना अनुवाद म्हणून भाषा कुठे बोजड वाटत नाही हे अनुवादकर्तीचं यश. या अनुवादाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सोनाली नवांगुळ यांनी तो केलाय. लहानपणी बैलगाडीचं चाक पाठीवर पडल्यामुळे त्यांचे दोन्ही पाय निकामी झालेत. इस्लामपूरसारख्या लहान गावात अपंगांसाठीच्या सुविधा नसल्यामुळे त्यांना शाळेत जाणंसुद्धा शक्य नव्हतं. पण घरी अभ्यास करून, शिकून त्या आज कोल्हापूरमध्ये पत्रकार म्हणून काम करतात. अपंगांना दया दाखवणाऱ्या पण समानतेची संधी नाकारणाऱ्या आपल्या समाजात त्या आज एकटीने स्वतःच्या फ्लॅटमध्ये स्वावलंबी आयुष्य जगतात. त्यांचं आयुष्यही ऑस्करसारखंच प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्वतःचं जगणं ऑस्करशी खूप जवळ जाणारं आहे.

(फोटो जालावरून साभार)

****************************
DreamRunner Oscar Pistorias Giyanni Meralo
ड्रीमरनर - ऑस्कर पिस्टोरिअस, सहलेखक - गियन्नी मेरलो,
अनुवाद - सोनाली नवांगुळ
मनोविकास प्रकाशन

20 comments:

सचिन उथळे-पाटील said...

मस्त.... घेतो वाचायला.

Gouri said...

सचिन, चार -पाच तासात वाचून होणारं पुस्तक आहे ... नक्की वाच!

Abhishek said...

त्याचा एखादा फोटो पण देशील काय!

Gouri said...

अभिषेक, एक फोटो टाकलाय.

Raj said...

अप्रतिम. पुस्तक यादीत होतंच, आता वर सरकवलं आहे. :)

Anonymous said...

नक्की वाचणार गं...
पुस्तक ओळख तू करून दिलीये म्हटल्यावर प्रश्नच येत नाही!!

Gouri said...

राज, नक्की वाच ... सुंदर आहे.

Gouri said...

तन्वी, मला खूप आवडलं हे पुस्तक.

सिद्धार्थ said...

अपर्णाच्या तोत्तोचानच्या पोस्ट नंतर लगेच ही पोस्ट वाचली. आता दोन पुस्तकांची खरेदी नक्की.

Gouri said...

सिद्धार्थ, दोन्ही पुस्तकं वाच ... मस्त आहेत!

Unknown said...

Hi Gouri,
This is Nina Sheriff, heading VAS division. We are looking for an experienced Marathi writer for Mobile VAS content. If you are interested, mail me your details at nina.sheriff@raftaar.in

Thanks.

Gouri said...

Nina, thanks for the opportunity. Will send you an email shortly.

Suhas Diwakar Zele said...

हल्लीच ऐकून होतो ह्याबद्दल... वाचतो लवकरचं :) :)

Gouri said...

सुहास, सिनेमा, नाटकासारखंच पुस्तकही ताजंताजं वाचण्यात जास्त मजा असते, नाही का? :)

Anagha said...

नक्की वाचेन. पुस्तकांची यादी वाढती आहे ! :)

Gouri said...

अनघा, माझं हल्ली असं मत झालंय, की लेखक मंडळी वाचकांचा विचार करत नाहीत. एकाच वेळी इतकी इंटरेस्टिंग पुस्तकं उपलब्ध असतात ... बिचार्‍या वाचकानी कधी संपवायची ही सगळी पुस्तकं? ;)

हेरंब said...

अप्रतिमच लिहिलं आहेस !! पोस्टच इतकी ग्रेट आहे पुस्तक तर महान असेल.. !!

Gouri said...

हेरंब, ऑस्करची गोष्टच इतकी भारून टाकणारी आहे, की त्याविषयी किती लिहू आणि किती नको असं व्हावं! :)

kavita mahajan said...

सोनालीला कळवलेस का? ती फेसबुकवर आहे. कळव. तिला खूप बरे वाटेल.
आता मी तिला दुसरे एक मोठे पुस्तक दिलेय अनुवादाला. आव्हानास्पद आहे.
चांगले आणि वेगात काम करतेय ती. :-).

Gouri said...

हो ... फेसबुकवर कळवलंय. :)