Monday, February 1, 2016

पुन्हा एकदा सर्च ...

    सर्च / डॉक्टर अभय आणि राणी बंग यांच्या कामाविषयी एक थोडक्यात आढावा घ्यायची संधी मिळालीय सद्ध्या. त्या निमित्ताने माझीच जुनी ब्लॉगपोस्ट वाचली, आणि जाणवलं, की मी त्या पोस्टमध्ये फार थोडं, वरवरचं मांडलंय.

    पहिली गोष्ट – डॉक्टर अभय बंगांनी तेंव्हाच्या माझ्या शोधाविषयी जे सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं, ते तेंव्हा अजून पचवणं चाललं होतं. (अजूनही ते पूर्ण झालं म्हणवत नाही.) त्यामुळे त्याविषयी पोस्टमध्ये काहीच उल्लेख नाही. जेंव्हा आपल्याला काय हवंय ते इतकं असतं, शब्दात पकडता येत नसतं, तेंव्हा काय करायचं? कसं शोधायचं? हा माझा प्रश्न होता. डॉक्टर अभय बंग म्हणाले, विनोबांनी मला सांगितलं होतं ... “आपला स्वधर्म आपल्या जागीच सापडतो.” हे ऐकतांना मला पार गीतेतलं, आपण आयुष्यभर आपलं विहित कर्मच करत राहिलं पाहिजे असं deterministic वाटलं होतं. त्यामुळे फारसं पटलंही नव्हतं. पण जितका त्यावर विचार करत गेले तितके याचे अधिकाधिक पदर स्पष्ट होत गेले. आपल्या आजूबाजूला अनेक मोठी माणसं असतात. त्यांच्याकडे बघितलं की आपल्याला वाटतं, “ग्रेट! आयुष्यात असंच काहीतरी करायला हवं माणसाने! नाहीतर काय अर्थ आहे या जगण्याला?” वगैरे वगैरे. त्याच वेळी त्यांचं जगणं खूप अवघड पण वाटतं. हे आपल्याच्याने होणार नाही हेही आतून आपल्याला माहित असतं.
   
    मग या “आतून माहित असण्या”वर आपण अजून जरा जास्त का विसंबत नाही? आपल्याला पेलेल, झेपेल, ज्यात आपल्या क्षमता पुरेपूर वापरल्या जातील आणि आपल्याला आनंदही देईल असं काम कुठलं, ते हे “आतून माहित असणं”च सांगणार आहे ना! आपल्या जागी सापडणार्याम स्वधर्माचा अर्थ आता असा समजतोय मला.

    अजून एक फार मोठी गोष्ट लिहितांना चक्क सुटून गेली होती. डॉक्टर अभय बंग एका आदिवासी बालमृत्यूचा किस्सा सांगतात. न्युमोनिया झालेल्या एका कुपोषित नवजात बाळाने तपासणी करत असतांनाच त्यांच्यापुढ्यात शेवटचा श्वास घेतला. हा बालमृत्यू का झाला याचा विचार करतांना त्यांना तब्बल १८ कारणं सापडली:

    बाळाचं कुपोषण गर्भातच सुरू झालं. त्याची आई स्वतःच कुपोषित होती. तिला पोटभर खायला नव्हतंच, खेरीज गरोदरपणी आई पोटभर जेवली तर बाळ जास्त लठ्ठ होतं आणि बाळंतपण अवघड होतं असा समज. जन्मानंतर बाळाला लगेच दूध मिळालं नाही कारण पहिले तीन दिवस बाळाला पाजायचं नाही ही तिथली समजूत. त्यानंतर आईला दूधच आलं नाही. मग गाईचं दूध खूप पातळ करून अस्वच्छ बाटलीतून पाजलं गेलं. पोट भरायचं नाही म्हणून बाळ सतत रडायचं, रडून रडून त्याचा घसा बसला. त्यात हगवण सुरू झाली. त्यानंतर आरोग्यसेवेऐवजी जादूटोण्याचे उपाय झाले. हे दूधही बंद करून साबुदाण्याचं वरचं पाणी पाजायचा सल्ला मिळाला, तो अंमलातही आणला. बाळाचा बाप सतत दारू पिऊन पडलेला, आईला मलेरिया. तशात बाळाला न्युमोनिया झाला, परत मांत्रिकाकडे नेलं. अखेर एके दिवशी सकाळी बाळ खूपच सिरियस झाल्यावर बाळाला घेऊन आई आणि आजी दवाखान्यात यायला निघाल्या. दवाखाना केवळ चार किमी अंतरावर, पण वाटेत नदी, तिला पूर आलेला. नदीवरचा पूल निकृष्ट बांधकामामुळे खचलेला, त्याचं बांधकाम पूर्णही केलेलं नाही. त्यामुळे पूर ओसरेपर्यंत वाट बघण्याशिवाय पर्याय नाही. संध्याकाळी पूर ओसरल्यावर त्या दवाखान्यात पोहोचल्या तोवर खूप उशीर होऊन गेला होता.

    अशा घटना, ही कारणं आपणही कधीतरी ऐकलेली असतात. हे बदलायचा प्रयत्न करणं म्हणजे आभाळाला ठिगळ लावण्यासारखं वाटायला लागतं मग.  डॉक्टर बंग याविषयी काय म्हणतात हे महत्वाचं. ही सगळी कारणं सुटणं महत्वाचं आहेच. पण आपलं पहिलं उद्दिष्ट बालमृत्यू थांबवणं हे आहे. त्यासाठी ही सगळी कारणं सुटायची गरज नाही. यातलं एक कारण जरी कमी झालं तरी हा बालमृत्यू टळू शकतो! त्यांचं सगळं संशोधन आणि काम हे या दृष्टीकोनातून आहे. काय केल्याने लवकरात लवकर, कमीत कमी खर्चात आपण बालमृत्यू टाळू शकू?

    यासाठी संशोधन करायला हवं. हे संशोधन सुसज्ज प्रयोगशाळांमध्ये व्हावं म्हणून बालमृत्यूपासून पार दूर कुठेतरी व्हायची गरज नाही. जिथल्या लोकांना याची गरज आहे तिथे संशोधन झालं तरच आपल्याला मृत्यूची नेमकी कारणं समजणार आहेत, आणि कमीत कमी खर्चात, लवकरात लवकर बालमृत्यू थांबवता येणार आहेत. आणि हे संशोधन शास्त्रीय कसोट्यांवर स्वीकारलं गेलं तर यातूनच राज्याच्या, देशाच्या आणि जागतिक स्तरावरही धोरणनिश्चितीवर प्रभाव टाकता येणार आहे. हा विचार घेऊन डॉक्टरांनी सर्चचं काम उभं केलेलं आहे. त्यामुळे त्याचं काम एकाच वेळी गडचिरोलीसारख्या महाराष्ट्रातल्या दुर्लक्षित जिल्ह्यासाठीही महत्वाचं आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेसाठीही.

    पुढच्या वेळी सर्चचा शोध घेताना निसटून गेलेलं अजून काय काय सापडेल काय माहित! :)

No comments: