Friday, September 8, 2017

टेकडी कुणाची?

 परवा आमची टेकडी अगदी फोटोसकट पेपरात झळकली. चुकीच्या कारणासाठी – तिथे फिरायला गेलेल्या एका बाईंचा मोबाईल आणि साखळी चोरट्यांनी हिसकावून घेतली म्हणून. त्या तिथे नियमित फिरायला जाणार्‍यातल्या होत्या. वेळही सोमवारी संध्याकाळी सहा ते सातच्या मधली, म्हणजे शनिवार – रविवार पेक्षा कमी, पण थोडीफार वर्दळीचीच. चोरांचा माग लागला, चोरलेला मालही पोलिसांना परत मिळाला.

चोरांपैकी एक मोठा, बाकी सगळे कायद्याच्या मते अज्ञान. हा मोठा चोर टेकडीजवळच्या झोपडपट्टीत राहणाराच.  योगायोगाने माझ्या कामाच्या बाईच्या ओळखीतला. (त्याच दिवशी संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला माझ्या बाईला भेटलाही होता वस्तीत.) साधारण २३ वर्षं वय. आई धुणीभांडी करते, बाप रोजंदारीवर मिळेल ते काम करतो. हा घरातला मोठा मुलगा. अजून लहान बहीण आणि भाऊ आहेत, ते शिकताहेत. हा काहीही कामधाम करत नाही. यापूर्वीही त्याने असले उद्योग केलेत, हे माहित वस्तीत सगळ्यांना माहित आहे. चोर्‍यामार्‍या करायच्या, पोलीस आलेच तर वस्तीमागच्या टेकडीवरच्या रानातून पसार व्हायचं. टेकडीवर बसून दारू ढोसायची असले याचे उद्योग. याच्याकडे एखादा सुरासुद्धा असायचा कधीमधी. त्यामुळे कुणी त्याच्या वाटेला जायचं नाही. आपल्या पोरांना असली संगत नको म्हणून त्याला लोक फारसे आपल्या भागात येऊ द्यायचे नाहीत. माझ्या बाईंचा नवरा तर संध्याकाळी सहानंतर त्यांच्या मुलग्यांना सुद्धा घराबाहेर पडू देत नाही!
चोरीची तक्रार नोंदवल्याबरोबर लगेच पोलीस वस्तीत आले. पोलिसांना चुकवायला हा दुसरीकडे पळून गेला. तिथेही पोलीस मागावर आलेत म्हटल्यावर उंच इमारतीवरून ड्रेनेजच्या पाईपला धरून उतरण्याच्या प्रयत्नात हा खाली पडला. ससूनला ऍडमिट केलंय, पाठीला जबरदस्त मार लागलाय, बहुतेक दोन्ही पाय लुळे राहणार आता आयुष्यभर. पोलीस – न्यायालय काय शिक्षा देतील तेंव्हा देतील, पण पोराला वाटेल तसा बहकू दिल्याची शिक्षा आईबापांना भोगावी लागणार त्याला आयुष्यभर पोसून. 

बाकी सगळं जैसे थे होईल हळुहळू. म्हणजे याचे साथीदार - मित्र कदाचित थोडे दिवस जरा दबून राहतील पोलिसांना. वस्तीतल्या मुलींना जपणारे, त्यांची लवकरात लवकर लग्नं लावून "जबाबदारीतून मोकळे होणारे" आईबाप पुन्हा या पोरांच्या गुंडगिरीकडे काणाडोळा करणार. अर्धवट शिकलेल्या पोरांना बापासारखी मजूरी करायला लाज वाटणार, दुसरं मनासारखं काम क्वचितच सापडणार. नाहीतर ते पुन्हा इकडेच वळणार.
या झोपडपट्टीच्या जवळ मोठ्या हाऊसिंग सोसायट्या आहेत. तिथे गाड्या धुणं, सिक्युरिटी अशी थोडीफार कामं या वस्तीतली मुलं करतात. बरीच मुलं रिक्षाही चालवतात. इव्हेंट मॅनेजमेंट, भंगारचा धंदा अशी कामंही करतात. पण आईबापाच्या पैशावर गुंडगिरी करणारी मुलंही इथे भरपूर आहेत. वस्तीवर लक्ष ठेवायला पोलिसांनी एक चौकीच केलीय आता जवळ. पण या मुलांशी बोलू शकेल, त्यांना कामाला लावू शकेल असं कुणी मला तरी माहित नाही.

उगाच सुखाचा जीव धोक्यात कशाला घालायचा म्हणून टेकडीवर जाणार्‍या सोसायटीवाल्यांची संख्या रोडावणार, सोसायटीतल्या सोसायटीमध्ये फिरणार्‍यांची वाढणार. यात सगळ्यांचाच तोटा आहे. कायदा पाळणारे जितके कमी लोक टेकडीवर येतील, तेवढी टेकडी जास्त धोक्याची होते. जास्तीत जास्त लोकांनी तिथे येत राहिलं पाहिजे. तिथे जाग रहायला हवी किमान सकाळ – संध्याकाळी तरी. फक्त फिरायला येणार्‍यांनी अवेळी, एकट्यानी गच्च झाडीमध्ये शिरणं, महागडे मोबाईल – दागिने मिरवणं यातून चोराला निमंत्रण दिल्यासारखं होतं याचं भान राखायला हवं. (सोमवारी चोरी झाली त्यांनी यापैकी काही करून मुद्दाम चोरी ओढवून घेतली असं म्हणायचं नाही मला, पण खबरदारी घेणं महत्त्वाचं.) वेगवेगळ्या वर्गातली माणसं जिथे एकत्र येतात अशा सुरक्षित सार्वजनिक जागा आपल्या शहरांमध्ये आधीच कमी आहेत. त्या जास्तीत जास्त राखायला हव्यात.  सोसायट्यांमध्ये क्लोज सर्किट टिव्ही बसवून आणि महागातल्या सिक्युरिटी एजन्सी नेमून शहर सुरक्षित बनत नाही, फक्त मोजके सुरक्षित घेटो तयार होतात. आणि शहाणे लोक या घेटोच्या आत जितके जास्त राहतील, तेवढं बाहेरचं शहर जास्त असुरक्षित होतं असं मला वाटतं.

2 comments:

aativas said...

हं, सोशल मीडियाच्या अवास्तव वापराने 'एकत्र येऊन प्रत्यक्ष कृती करण्याच्या' आपल्या सामाजिक क्षमतेबद्दल दिवसेंदिवस काळजी वाढायला लागली आहे खरं.

Gouri said...

आधी घाईत अर्धवट प्रतिक्रिया पोस्ट झाली ... ती उडवून परत पूर्ण लिहिते.

Fear mongering प्रकार सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणावर होतोय. तशी जागरूकताही वाढतेय थोडीफार, पण तिथे लाईक दिलं की आपलं कर्तव्य संपतं, प्रत्यक्ष कृती दिसत नाही या माध्यमातून पोहोचलेल्यांमध्ये फारशी.

अर्थात हे पण सोशल मीडियावरच लिहितेय मी :)

पण या घटनेमध्ये सोशल मिडियाचा संदर्भ कळला नाही मला.