Tuesday, September 19, 2017

माऊचा आणि आजीचा बाप्पा

यंदा माऊला सोबत घेऊन बाप्पा बनवायचा विचार होता. माऊची चिकाटी आणि माझा पेशन्स दोन्ही वाढवण्याची फार गरज असल्यामुळे हा (अती) महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार अशी भीती मला वाटत होती. पण एका दिवशी दुपारी बाप्पाचं नाव घेतलं आणि सुरुवात केली. माऊ, सखी, तिची आई आणि मी चौघीजणी बाप्पा बनवायला बसलो.

अर्धा पाऊण तास, माफक आरडाओरडा करून असे दोन बाप्पा तयार झाले:मग लक्षात आलं, आपल्या बाप्पाचे कान मिकी माऊससारखे दिसताहेत. मग बाप्पाला मुकुट घालण्याऐवजी आम्ही चक्क सांता क्लॉजची टोपी घातली :)


सखीचा बाप्पा मात्र शहाण्यासारखा, बाप्पाचे कान आणि नागाचा मुकुट घालून तयार झाला.

बाप्पा तयार होईपर्यंत माऊचा उत्साह संपला. त्यामुळे उंदीरमामा आईने बनवला.

शाडूची माती परत वापरायची म्हणजे त्यात शक्यतो काही भेसळ होऊ द्यायला नको. त्यामुळे बाप्पा रंगवायचा नव्हता. पण सखी आणि तिच्या आईच्या बाप्पासोबत माऊने तिचाही बाप्पा गेरूने रंगवून टाकला.

माऊचा बाप्पा बनेपर्यंत तिकडे आजीनेही एक मस्त बाप्पा बनवून ठेवला होता. या वर्षी पुन्हा एकदा मी बाप्पा बनवलाच नाही त्यामुळे.


असे दोन दोन बाप्पा मग मोदक खायला घरी आले. :)

बाप्पाची सजावट फुला – पानांनी केल्यामुळे पानं – फुलं सुकतील तसा त्यात बदल करता येतो. त्यामुळे आमचा बाप्पा रोज वेगळा दिसतो!
***
माऊसोबत बाप्पा केल्यावर लक्षात आलेल्या गोष्टी म्हणजे - छोट्यांसाठी बाप्पा बनवतांना माती थोडी सैल भिजवलेली असली तर बरी. घट्ट मातीचा लाडू वळायला त्यांना अवघड जातो. हात – सोंड – डोकं जोडायला टुथपिकचे तुकडे वापरले. नाही तर ते घट्ट जोडणं मुलांना अवघड जातं. (माऊच्या बाप्पाचं डोकं तर वाळल्यावर चक्क गोल गोल फिरत होतं. त्यामुळे आमचा बाप्पा आपोआपच मान हलवणारा झाला!) साधारण अर्धा अर्धा किलो मातीचा बाप्पा दोघींनी बनवला. या आकाराचे लाडू वळायला त्यांना बरे पडले. छोटासा लाडू बनवून टुथपिकने त्याला मोदकाचा आकार द्यायला छोट्यांना मज्जा येते.

***
माऊला बाप्पाला दोन पूर्ण दात लावायचे होते. “अग, पण बाप्पाला एकच दात असतो!” मी म्हटलं. मग माऊचा विचार बदलला.
“माझ्या बाप्पाला दातच नको!”
“का ग?”
“तो गर्ल आहे. गर्ल ला असे बाहेर आलेले दात नसतात!”
“अग, बाप्पा आहे ना तो! गर्ल कसा असेल?”
“का? माझा बाप्पा आहे ना!”
या वर्षी तरी बाप्पाला त्याचा एक दात मिळालाय. पण आई विचार करते आहे. माऊचा बाप्पा आहे, मग तिला पाहिजे, तर त्याने गर्ल असायला काय हरकत आहे?
 

3 comments:

गौरी said...

Ganpati bappa morya :) Tinahi murti surekh. Ashi organic sajavat ajunach jivant watate.

I think bappa chya murtila 2 dat astat paiki ek ardhavat asto. Aso, baki mauchi bappa girl asnyachi kalpna avdali :)

Gouri said...

गौरी, एक दात तुटलेला असतो ना बाप्पाचा (का? म्हणून मला अर्थातच विचारलं माऊ ने, आणि मला काही ती गोष्ट आठवेना!) तो अर्धा दाखवतात किंवा दाखवत नाहीत मला वाटतं.
पुढच्या वेळी तिचा बाप्पा गर्ल असणार का, आणि किती हात – पाय – सोंड – दात कान वाला असणार याविषयी मला उत्सुकता आणि काळजी वाटतेय. :)

गौरी said...

Ho ek akkha daat ani ek tutlela. Tyamagchya 2 3 dantkatha ahet I think.

Parashuramanna shankarala bhetnyapsun advale mhanun tyanni raagane tyanna shankarakdun varadaan milalelya kurhadine ganapatichya daatavar vaar kela ashi ek gosht mala mahit ahe :)
baki ajunahi astilach. Lahan mulanna hey kitpat patel kay mahit... So bappa tyanchya pareene customize honarach!

Shivay apan motthe lok tari kuthe customization kami karto bappache... agdi jai malhar pasun bahubali paryant kuthlyahi roopat chalto bappa ani bappadekhil awdine chalvun gheto, nahi ka...