Thursday, December 29, 2011

मिनिट्स ऑफ द मिटिंग

    आजकाल माझी टीम व्हर्च्युअल असते. म्हणजे जगाच्या वेगवेगळ्या कोपर्‍यात बसलेले लोक स्वतःला एक टीम म्हणवून घेतात आणि एकत्र काम करतात. महिनेच्या महिने बरोबर काम करून कधी समक्ष भेटण्याचा योग येत नाही. याचा एक फार मोठा तोटा आज जाणवला - ऑफिसच्या मिटिंग रूममध्ये सगळ्यांनी एकत्र बसून मिटिंग मिटिंग खेळायची संधी क्वचितच मिळते, आणि यातून कलाक्षेत्राची मोठी हानी होते आहे.

    नॉन व्हर्च्युअल मिटिंगच्या सुखद आठवणीत आज बुडून गेले होते.

    एखादं काम आज हातावेगळं करायचंच म्हणून आपण आज सगळं बाजूला ठेवून बसावं, आणि मॅनेजरने पकडून मिटिंगला घेऊन जावं. मिटिंग रूममध्ये कुडकुडत (ऑफिसच्या मिटिंगरूममध्ये बसलेला माणूस गार पडलाच पाहिजे असा नियम असावा. एवढं कमी टेंपरेचर तिथे कशाला करून ठेवतात माहित नाही.) आपण बाहेरच्या कामाच्या उबदार आठवणीने तळमळत असावं. पाच एक मिनिटात आपल्याला अंदाज येतो, आपल्या पक्षाची चार टाळकी दिसावीत म्हणून आपल्याला इथे ओढून आणलंय - इथे आपलं काहीही काम नाहीये. यानंतर सुरू होते निव्वळ जागं राहण्याची धडपड. त्या धडपडीतून मग अश्या कलाकृती निर्माण होतात:



    आता मला सांगा, डेस्कवरून केलेल्या व्हर्च्युअल मिटिंगमध्ये असं काही निर्माण करण्याची ताकद आहे का? आपल्या कामाचं इथे काही चाललेलं नाही म्हटल्यावर मी फोन हळूच डिस्कनेक्ट करून टाकीन, किमान पक्षी ‘म्यूट’ करून आपल्या कामाला लागेन. पण मग कलेचं काय?


Tuesday, December 27, 2011

ज्वाला जशा उसळती ...

सगळ्या उत्सुकतेने माना उंचावून बघताहेत आकाशाकडे ... उद्याची वाट बघत :)
बदामी एक्झोराच्या कळ्या

* पोस्टीच्या नावातच ‘जशा’ ऐवजी ‘जश्या’ लिहिलं होतं मी ... ते नजरेला आणून दिल्याबद्दल आभार, सविता! आता दहा वेळा लिहून टायपून काढायला पाहिजे हा शब्द. :)

Monday, December 26, 2011

कं पोस्ट


१. वास आलेला चालणार नाही.

२. घरात चित्रविचित्र किडे नकोत.

३. चिलटं, माश्या अज्जिबात नकोत.

४. घरात गांडूळं चालाणार नाहीत.

५. दुसर्‍या टेरेसवर कचरा नकोय.

६. उगाच फुकटचे खर्च सॅंक्शन होणार नाहीत.

    एवढ्या अटी आणि शर्ती घेऊन सोसायटीचा ओला कचरा प्रकल्प असताना या विषयातल्या आडाणी व्यक्तीने घरात वेगळा प्रयोग सुरू करणे याला निव्वळ खाज म्हणतात.

    तर माझ्या मोठ्ठ्या सुटीत सुदैवाने एका कंपोस्टिंगवरच्या कार्यशाळेला जायला मिळालं. तिथे बघितलेल्या तयार सिस्टीम्स एक तर माझ्या बजेटमध्ये नव्हत्या, किंवा मर्यादित जागा, तिथे वेळ, ऊन, पाऊस यापासून संरक्षण नसणं, कबुतरांचा उपद्रव आणि जोडीला नवरोबाकडून आलेल्या वरच्या अटी यात बसण्याएवढ्या आखुडशिंगी बहुदुधी आहेत असा विश्वास मला वाटला नाही. त्यामुळे कंपोस्ट स्टार्टिंग मिक्श्चर, मायक्रोबॅक्टेरिअल लिक्वीड, दोन-चार माहितीपत्रकं आणि आपल्याला काय करता येईल याच्या आयडिया एवढंच कार्यशाळेतून घेतलं.

    फेब्रुवारीमध्ये आमचा घरचा कंपोस्ट प्रकल्प सुरू झाला, दिवाळीपासून मी बागेत हेच कंपोस्ट वापरते आहे - घाबरू नका. कंपोस्टिंगच्या नावाखाली कचर्‍याचे फोटो आणि बारकावे दाखवून तुम्हाला बोअर करत नाही. यात अश्या ‘खाज असलेल्या’ लोकांनाच रस असेल असा माझा अंदाज आहे. कंपोस्ट कसं करायचं (किंवा काय काय करायचं नाही) याचे तपशील कुणाला हवे असतील तरच माहिती टाकते. यातलं फार काही समजलंय असं मला वाटत नाही. फक्त हा प्रयोग ‘मॉडरेटली सक्सेसफुल’ झाल्याचा माझा निष्कर्ष आहे. पण यातून धडा घेऊन पुन्हा कंपोस्टिंग नक्की करणार.

******************************

    एवढं काय नडलं होतं घरी कंपोस्टिंग करण्याचं?

    दोन - अडीच वर्षांपूर्वी माझी छोटीशी बाग सुरू केली तेंव्हापासून काहे गोष्टी खटकत होत्या. बागेसाठी आपण माती विकत आणतो. माती काही कारखान्यात तयार होत नाही. जमीन लागवडीखाली आल्यावर तिथे सकस मातीचा थर तयार व्हायला वर्षं लागतात. पैशाची चणचण असली, म्हणजे शेतकरी शेतातली माती विकतात. ही माती आपण आयती विकत घेतो, चार सहा महिने - वर्षभर वापरतो, तिच्यात वेगळीवेगळी खतं मिसळतो, आणि तिचा कस कमी झाला म्हणून टाकून देतो ... पुन्हा नवी माती मातीमोलाने विकत घेतो. म्हाणजे बागकामाच्या हौसेच्या नावाखाली थोडीथोडी माती आपण निकस करत राहतो.

    आपल्या बागेत एक छोटीशी कमीत कमी परावलंबी इकोसिस्टीम बनवता येईल का? बागेतलाच कचरा वापरून खत बनवलं, आणि जुन्या मातीमध्ये ते मिसळून तिचा कस कायम राखला तर? बाहेरची खतं वापरलीच नाहीत तर? (कीटकनाशकं वापरायचा प्रश्नच नव्हता, कारण रोगर किंवा दुसर्‍या केमिकल कीटकनाशकाचा मलाच त्रास होतो. त्यामुळे बागेत फवारायचं म्हणजे डेटॉलचं पाणी, फार फार तर साबणाचं पाणी. याव्यतिरिक्त काही मी वापरणं शक्य नाही.) हा कंपोस्टिंगचा पायलट म्हणजे त्या मोठठ्या किड्याचा एक छोटासा भाग.

Sunday, December 18, 2011

लव्ह ऍट फर्स्ट साईट ...

    सध्या दिवसच असे आहेत, की यांच्याकडे बघाल तर प्रेमातच पडाल. त्यांचे मोहक रंग आणि ताजेपणा भुरळ पाडल्याखेरीज राहणार नाहीत तुम्हाला. काय घेणार आणि काय सोडणार ... सगळंच हवं. मग आपल्याला काय पाहिजे आहे, काय करायचंय याचा विवेक राहतो बाजूला.  

    बघा आता तुम्हीच ...



Thursday, December 15, 2011

हिंजवडी

    मोठ्या शहराजवळचं एक गाव. शहराजवळ असूनसुद्धा तसं दूरच, कारण गाव कुठल्या हायवेवर नाही. गावाला पक्का रस्ता नाही. पिण्यासाठी चांगलं पाणी नाही. टिपकागदावर पसरणार्‍या शाईच्या ठिपक्यासारखं शहर चहूबाजूंनी पसरत असताना हे गाव तसं बाजूला पडलेलं. अजून आपलं गावपण थोडंफार जपून असलेलं.

    गावात एक फॅक्टरी आली. फॅक्टरीच्या लोकांनी पक्का रस्ता बनवला. फॅक्टरीच्या मालाचे ट्रक, कामगारांना आणणार्‍या बसेस, मोठ्या मॅनेजर लोकांच्या गाड्या सुरू झाल्या. गावातली वर्दळ वाढली. हळुहळू अजून काही फॅक्टर्‍या आल्या, गावाला वर्दळीची थोडी सवय झाली. चहाच्या टपर्‍या आल्या, हॉटेल आलं. सिक्ससीटर सुरू झाल्या.

    त्यानंतर गावात सेझ आला, जवळून एक ‘बायपास’ निघाला, आणि गावाचं रूपच पालटलं. दहा वर्षांपूर्वी जिथे रस्ताच नव्हता, तिथे आता रस्ता ओलांडणं हे एक संकट होऊन बसलं. कंपन्यांच्या देशी-परदेशी पाहुण्यांसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स आली, मॉल आले, बंगल्यांच्या सोसायट्या आल्या, रेसिडेंशिअल टॉवर्स आले. गावाचं इंग्रजाळलेलं नाव जगभरात पोहोचलं.

    इथल्या कंपन्यांच्या चकचकित ऑफिसच्या काचेच्या आतलं जग आणि बाहेरचं जग ही दोन वेगवेगळी विश्व आहेत.

    आत वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आहे. जगभरातल्या कस्टमरसाठी काम चालतं. परदेशी कस्टमरांसाठी ही आपलं काम स्वस्तात करून घेण्याची सोय. त्यांच्या दृष्टीने स्वस्तात काम करणारे कामगार. पण आपल्यासाठी हे उद्योग देशाला निर्यातीचा पैसा मिळवून देतात. त्यामुळे त्यांचा मान मोठा. शिवाय पगारही बरा. परदेशी प्रवासाची संधी. हे परदेशात आपल्या देशाची तरूण, महत्त्वाकांक्षी, उच्चशिक्षित, मेहेनती अशी प्रतिमा वगैरे निर्माण करतात. ‘इंडिया शायनिंग’म्हणतात ते यांच्यामुळेच.

    बाहेर गेल्या वीस - पंचवीस वर्षातला कायापालट भांबावून बघणारं गाव आहे. शेती गेली, शेती विकताना आलेला पैसा उडून गेला. नव्या कंपन्यांमध्ये गावच्या तरुणांसाठी काम नाही. विस्थापित न होता आपल्याच गावात ते उपरे झालेत. गावपण संपलं, तसं बकालपण आलं. गुन्हेगारी वाढली. संध्याकाळी ओसंडून वाहणार्‍या रस्त्यावर कुणा आयटीवाल्याचा धक्का गावकर्‍याला लागला, तर त्याला धरून मारायला हात शिवशिवायला लागले. शरद जोशी म्हणतात तो ‘भारत’ हाच असावा.

    अजून दहा वर्षांनी गावातल्या मूळ रहिवाश्यांची अवस्था शहरातल्या झोपडपट्टीसारखी होणार का?

    ते जात्यातले, म्हणून सुपातल्यांनी डोळेझाक करायची?

************

    गेले काही दिवस ऑफिसमधून बाहेर पडलं, की हा किडा डोक्यात वळवळायला लागतो. विकास कशाला म्हणायचं, काय मार्गाने देशाने जायला हवं वगैरे मोठे प्रश्न आहेत. त्याची मोठी आणि पुस्तकी उत्तरं शोधाण्यात मला आत्ता रस नाहीये. मला रोज दिसणरं, माझ्या ऑफिसच्या लगतचं हे चित्र बदलण्यासाठी मला काही करण्यासारखं आहे का?

Saturday, December 10, 2011

राजबंदिनी

* १९३५च्या सुधारणांमध्ये ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला.
* लोकमान्य टिळकांना ब्रह्मदेशात मंडालेच्या तुरुंगात ठेवलं होतं, आणि रत्नागिरीला ब्रह्मदेशाच्या थिबा राजाच्या राजवाड्याचे अवशेष आहेत.
* विपश्यना ध्यानपद्धती गोयंका गुरुजींनी ब्रह्मदेशातून भारतात आणली.
* इरावती कर्वेंचं नाव ब्रह्मदेशातल्या इरावद्दी नदीवरून ठेवलेलं होतं.
* आझाद हिंद सेना ब्रह्मदेशातल्या जंगलांमधून कोहिमापर्यंत पोहोचली.
* दुसर्‍या महायुद्धात ब्रह्मदेशाच्या घनदाट जंगलात टिकून राहण्यासाठी इंग्रज सैनिकांना जिम कॉर्बेटने मार्गदर्शन केलं होतं.
* ऑंग सान स्यू की असं काहीतरी नाव असलेली बाई इथे लोकशाहीचा लढा लढते आहे.
*************************************************************
    डोक्याला ताण देऊनही जेमतेम पाच दहा वाक्यात माझं ब्रह्मदेशाविषयीचं ‘ज्ञान’ संपतं. ईशान्य भारतातली राज्य सुद्धा आम्हाला धड माहित नसतात, तिथे ईशान्य भारताच्या पलिकडच्या या शेजार्‍याविषयी काय माहिती असणार?

    प्रभा नवांगुळ यांनी लिहिलेलं ‘राजबंदिनी’ हे स्यू चीचं (हो, तिचं नाव ‘ऑंग सान स्यू ची’ आहे,‘की’ नाही हे सुद्धा पुस्तक वाचल्यावरच समजलं.) चरित्र वाचलं, आणि भारताच्या अजून एका अस्वस्थ शेजार्‍याची थोडीशी ओळख झाली.

    आज ब्रह्मदेशात जगात सर्वाधिक काळ लष्करी हुकूमशाही चालू आहे. आणि तिथे लोकशाही यावी म्हणून स्यू चीचा अहिंसक लढा चाललाय. ब्राह्मी वेशातला, केसात फुलं माळलेल्या, नाजुक अंगकाठीच्या स्यू चीचा फोटो पाहिला, म्हणजे मला तर ही एखादी संसारात बुडून गेलेली चारचौघींसारखी बाईच वाटते. तिला वर्षानुवर्षे स्थानबद्ध करून ठेवण्याइतकी भीती लष्करी हुकूमशाहीला का बरं वाटत असावी? या उत्सुकतेने हे पुस्तक वाचायला घेतलं.

    ऑंग सान स्यू ची ही ब्रह्मदेशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे जनरल ऑंग सान यांची धाकटी मुलगी. १९८८ सालापर्यंत ती इंग्लंडमध्ये आपल्या ब्रिटिश नवर्‍याबरोबर आणि दोन मुलांबरोबर साधंसरळ आयुष्य जगत होती. १९८८ साली तिच्या आईच्या आजारपणामुळे स्यू ची थोड्या दिवसांसाठी म्हणून रंगूनला आली, आणि हळुहळू ब्रह्मदेशाच्या लोकशाहीसाठीच्या लढ्याचा चेहेराच बनून गेली. तिचा लढा आजही संपलेला नाही. तिच्या मृदु चेहेर्‍यामागे एक दृढनिश्चय लपलेला आहे. वर्षानुवर्षांचा एकांतवास, पतीची, मुलांची ताटातूट, पतीचं आजारपण आणि अखेर भेट न होताच मृत्यू - यातलं काहीच तिला तिच्या लोकशाहीसाठीच्या लढ्यापासून दूर करू शकलेलं नाही.

    स्यूची विषयी मला तरी आजवर काहीच माहिती नव्हती. तिच्याविषयी कुठलं पुस्तकही बघायला मिळालं नव्हतं. इतकी मर्यादित माहिती उपलब्ध असताना या पुस्तकासाठी लेखिकेने घेतलेले परिश्रम वाखाणण्यासारखे. जरूर वाचा.

राजबंदिनी - ऑंग सान स्यू ची हिचं चरित्र
लेखिका: प्रभा नवांगुळ
प्रकाशन: राजहंस, २०११
किंमत: रु. २५०

    आता ‘फ्रीडम फ्रॉम फियर’ हे स्यू चीचं पुस्तक मिळवून वाचायचंय. 

Wednesday, November 23, 2011

बागुलबुवा?


गेल्या आठवड्यात ऑफिसमध्ये एक ट्रेनिंग होतं. सकाळी घाईतच घरून निघायला लागत होतं, त्यामुळे झाडांशी निवांत गप्पा होत नव्हत्या. शनिवारी ३-४ दिवसांच्या खंडानंतर जरा बारकाईने बघितलं, तर सोनचाफ्याच्या झाडावर हे सापडलं ...






घाईत, अगेन्स्ट लाईट, वार्‍यावर हलणार्‍या पानाचे फोटो काढलेत. त्यामुळे फार स्पष्ट नाहीत. :(

सध्या मी याला ‘बागुलबुवाची कात’ असं नाव दिलंय.  :)

चार दिवसांपूर्वी या पानावर हे दिसलं नव्हतं. नक्की.

गोगलगाईने शंख उतरवून ठेवल्यावर अजून एक आवरण उतरवून ठेवावं, तसं काहीसं दिसतंय हे. पण मग शंख आणि गोगलगाय कुठे गायब झाली?

चार दिवसात एवढी जाडजूड होणारी खादाड आळी असावी असं म्हटलं, तर तश्या खादाडीच्या खुणा जवळपासच्या पानांवर नाहीत.

कुठल्या पक्ष्याने आणून टाकलं म्हणावं, तर पानाला खालच्या बाजूने, कोळ्याच्या जाळ्यासारख्या नाजूक धाग्याने हे चिकटलं होतं.

गुगलूनही फारसा उपयोग झाला नाही. म्हणजे बरेच कीटक, आळ्या कात टाकतात हे समजलं, पण अशी एकसंध नाही.

फोटो काढल्यानंतर पानावरून हे कवच काडीने काढून टाकलं. ते इतकं नाजुक होतं, की काडीच्या स्पर्शानेही तुटत होतं - पण नाजुक धाग्याची पानावरची पकड एवढी घट्ट, की आवरण तुटलं, तरी धागे कायम!

माझं लक्ष नसताना कोण कारभार करत असावं बरं बागेत? :) :)

Tuesday, November 22, 2011

आजी आणि नात

कधी कधी एखादा फोटो मनासारखा जमून जातो, आणि आपल्यालाच मस्त वाटतं. असाच मला आवडलेला एक आजी आणि नातीचा फोटो. इथे टाकलेला.  या फोटोला मिळालेली बेश्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे पंकजने त्यावर पीपी करून दिलंय - या त्या फोटोच्या पंकजने एडिट केलेल्या व्हर्जन:



मला यातली दुसरी व्हर्जन सगळ्यात आवडलीय. मूळ कलर फोटोपेक्षाही.

Saturday, November 19, 2011

रॉकस्टार

    आज कपिलाषष्ठीचा योग असावा. आज नवर्‍याने आणि मी थेटरात जाऊन ताजा ताजा शिणुमा बघितला! सिनेमा सलग, ताजा असताना आणि थेटरात जाऊन बघणं हा अनुभव माझ्यासाठी सद्ध्या इतका दुर्मीळ झालाय, की अगदी रा१ बघायला सुद्धा मी तयार झाले असते म्हणा ... त्यामुळे मी इथे त्याचं कीबोर्ड झिजेपर्यंत कवतिक लिहिलं, तरी ते जरा मीठ शिंपडूनच वाचा.


    या शिणुमाला टाईम्सने चार तारे दिलेत. त्यात राजने रॉकस्टारच्या गाण्यांबद्दल इथे लिहून ठेवलंय. त्यामुळे बहुधा आपण डोंगराएवढ्या अपेक्षा घेऊन बघायला जाणार, आणि अपेक्षाभंग होऊन परत येणार अश्या तयारीनेच गेले होते. पण अपेक्षाभंगाच्या अपेक्षेचा भंग झाला. सिनेमा मनापासून आवडला.

    याहून जास्त तारे तोडत नाही. मला सिनेमाची चिकित्सा करता येत नाही. त्यातल्या एकेका पैलूविषयी काही मत देण्याएवढं तर अजिबात समजत नाही. म्हणजे अगदी सिनेमा बघताना त्यातली गाणी आवडली, तरी गाण्याचे शब्दसुद्धा नंतर आठवत नाहीत. फक्त ओव्हरऑल परिणाम जाणवतो. या अडाणीपणाला मी होलिस्टिक व्ह्यू असं गोंडस नाव दिलंय.  तर माझ्या होलिस्टिक व्ह्यूनुसार रॉकस्टार चार तारेवाला आहे.  जरूर बघा, आणि गाणी तर ऐकाच ऐका. आवडला नाही, तर मला जरूर सांगा, कदाचित माझा सिनेमाविषयीचा अडाणीपणा त्यातून थोडा कमी होईल.

Tuesday, November 15, 2011

चुकलेला ऍंगल?

ही पोस्ट वाचण्यापूर्वी हे वाचा.

    आता तुम्हीच ठरवा, मला ही कॉफीत पेस्ट वाली पोस्ट लिहायची गरज आहे का? त्यामुळे हे टायपायचं मी टाळणार होते. अनघाचं म्हणणं असं, की हे एकाच विषयावरचे दोन वेगवेगळे निबंध आहेत. भोगा आता अनघाच्या कर्माची फळं ;)

*************************************


त्या दिवशी वीज गेली आणि एकटीच मेणबत्ती लावून घरात बसले होते. एक पतंग मेणबत्तीकडे झेपावत होता. त्याला बरंच समजावायचा प्रयत्न केला, बाबा रे, हा सूर्य नाही - साधी मेणबत्ती आहे. मेणबत्तीला आयुष्याच्या केंद्रस्थानी धरशील, तर तुझा ऍंगल चुकेल. उगाचच जळून जाशील, आणि मेणबत्तीही विझेल. त्याला काही पटलं नाही. शेवटी जे व्हायचं ते झालंच.

ऑफिसच्या वाटेवर त्या पतंगाच्याच वेडेपणाने जिवाचा आटापिटा करून एकमेकांना ओलांडत चाललेली वाहनं दिसतात. त्यांना पाहून वरून तो पण असाच म्हणत असेल ... बाबांनो, इतक्या जोरात चाललाय, पण तुमचा ऍंगल चुकतोय. उगाच जीव गमवाल आणि माझा प्लॅनही खराब कराल. याही  पतंगांना वरून सांगणार्‍याचं म्हणणं पटत नाही. आपली ओढच खरी म्हणून ते आपल्याच वेगात धावत राहतात. ‘त्या’च्या दृष्टीने यांचा खेळही काही मिनिटात अटपत असणार. तोही शांतपणे म्हणत असेल ... अजून एकाचा ऍंगल चुकला!

*************************************


तळटीप: नंतर सुचलेला सुविचार: अनघाचं लिहिणं देखणं, म्हणून आम्ही काय पोस्टूच नये काय? :D :D




Wednesday, November 9, 2011

भटकंतीचे फोटू ...

गेल्या रविवारी जरा भटाकायची संधी मिळाली, तेंव्हाची ही मला इंटरेस्टिंग वाटलेली काही छायाचित्रं ...

राकट देशा, कणखर देशा ...

आजी आणि नात

पॅटर्न्स!

Tuesday, October 25, 2011

दिव्यांचा उत्सव


दिवाळीच्या शुभेच्छा!

मी पणत्यांच्या प्रकाशाच्या प्रेमात आहे. विजेच्या माळांची भगभग कुठे, आणि पणत्यांचा मंद प्रकाश कुठे. हा प्रकाश आसमंताला एकदम रोमॅंटिक करून टाकतो. आज संध्याकाळी बाहेर पणत्या लावल्यावर कॅमेर्‍याच्या नाईट मोडवर केलेले हे उद्योग :)

Thursday, October 20, 2011

बालभारती: आठवणीतील कविता

     गेल्या आठवड्यात मला एक सुंदर दिवाळी भेट मिळालीय. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या बालभारतीमधल्या कवितांचं संकलन श्री. सुरेश शिरोडकर त्यांच्या या ब्लॉगवर करत असतात.  तिथे ‘या बालांनो’ आहे, ‘श्रावणमासी’ आहे, ‘आनंदी आनंद गडे’ आहे, ‘गवतफुला’ आहे, ‘लाडकी बाहुली’ आहे ... जी कविता ऐकून आपण थेट शाळेच्या वर्गात जाऊन पोहोचतो, त्या सगळ्या बालभारतीमधल्या सुंदर सुंदर कविता तिथे आहेत.

    श्री. शिरोडकरांनी यातल्या तब्बल १८१ कवितांचं संकलन इ-पुस्तक रूपात प्रसिद्ध केलंय. या इ-पुस्तकाची सुंदर भेट त्यांनी पाठवलीय! गेला आठवडाभर मी संधी मिळाली की बालभारतीमध्ये डोकावते आहे ... त्यातली एक कविता वाचायची, आणि कवितेच्या आठवणींमध्ये हरवून जायचं असा खेळ चाललाय.  या भेटीसाठी श्री शिरोडकरांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत.

    हे इ-पुस्तक जालावर इथे उपलब्ध आहे ... तेंव्हा वाट कसली बघताय? डाऊनलोड करा आणि तुमच्या लाडक्या कवितांचं पुस्तक मिळवा!

Monday, October 10, 2011

लॅंडस्केप बोन्साय

    सिझनल झाडांची बाग, लॉन, गुलाब, अश्या बागकामातल्या यत्ता चढत गेलं म्हणजे काही वर्षांनी तुम्हाला बोन्साय करण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात हौशा-नवशांनी एखादा पदर्थ करावा, पण वर्षभराचं लोणचं घालणं हे कसं खास सुगरणीचंच काम - तसं. बोन्साय करणं म्हणे प्रचंड चिकाटीचं काम आहे. वर्षानुवर्ष तन्मयतेने एखादी कलाकृती घडवावी, तसं. आणि लॅंडस्केप बोन्साय म्हणजे तर तुम्हाला आधी संपूर्ण देखावा डोळ्यापुढे आणता यायला हवा, आणि मग त्याची दीर्घकालीन कार्यवाही.

    हा माझ्या बागेतला लॅंडस्केप बोन्सायचा लेटेस्ट नमुना.


******************************

    या पोस्टवर पुण्याच्या पूर्वेकडून आक्रमाणाचा धोका संभवतो. तेंव्हा खास डिस्क्लेमर - मला बोन्सायचा अजूनही अतिशय राग आहे, आणि या ‘लॅंडस्केप’(?)मुळे माझं मतपरिवर्तन वगैरे झालेलं नाही. `झाडाला खुरटवायचं आणि त्याला सुंदर म्हणायचं हे कुठलं प्रेम?' इ. इ. प्रवचन ऐकावं लागलेल्या पूर्वेकडच्या लोकांनी फोटोच्या वरचं घडाभर तेल केवळ वातावरणनिर्मितीसाठी आहे याची कृपया नोंद घ्यावी :)

    एप्रिल - मे महिन्यात कधीतरी धान्याला ऊन दिलं. कबुतरांनी त्यावर डल्ला मारू नये म्हणून वर चादर घालणं मस्टच. या चादरीवर ठेवायला वजन म्हणून एक कोरडी माती भरलेली कुंडी वापरली होती. आणि हा पांढरा दगडसुद्धा. ऊन देऊन झालं, धान्य भरून ठेवलं, आणि वापरात नसलेली गच्ची नेहेमीसारखीच बंद झाली. गच्चीचा केर काढायला आधेमधे बाईंनी काय उघडली असेल तेवढीच. केर काढताना सोयीसाठी बाईंनी तो दगड कुंडीतच टाकून ठेवला. उन्हाळा संपला, पाऊस आला. पावसाळा संपत आल्यावर त्या कुंडीत हा नॅचरल लॅंडस्केप तयार झालाय. :D :D

******************************

    एवढं पकवून झाल्यावर आता पोस्टमधला मुख्य मुद्दा. बाबा आमटेंच्या ‘ज्वाला आणि फुले’ मधल्या दोन ओळी

                ‘वटवृक्षाच्या सावलीत सिद्धार्थाचा बुद्ध होतो
                माणसाच्या सावलीत वटवृक्षाचा बोन्साय होतो’

    अश्या काहिश्या आशयाच्या आठवताहेत. कवितेचं नाव आठवत नाही, नेमक्या शब्दांविषयीही खात्री नाही. पण या कवितेची फार सय येते आहे. ही कुणाकडे असेल तर प्लीज शेअर करा ना!

Tuesday, October 4, 2011

कास पुराणं ... संपूर्णम्

गेला आठवडाभर वेळ मिळाला की कासचं पुस्तक, फोटो आणि गुगल असं चाललंय. आपण तिथे २० - २५ प्रकारची रानफुलं बघितलीत, आणि त्यातल्या बहुतेकांची नावंही सापडलीत. एव्हाना कासचे एकसो एक सुंदर फोटो सगळ्यांनी टाकलेत ... पण तरीही मला मोह आवरत नाहीये थोडे फोटो शेअर करण्याचा ...


Neanotis Lancifolia - तारागुच्छ



smithia hirsota - कवला / मिकी माऊस

vigna vexillata - हळुंदा / रानपावटा / हत्तीची सोंड. (अनघाने क्लिप टाकली आहे ते हेच फूल.)


पंद

Utriculari​a Purpurasce​ns - सितेची आसवं

clerodendron serratum - भारंगी

(बहुतेक) Utriculari​a lateriflor​a

गावेल

pleocaulus richie - टोपली कारवी

Murdannia crocea subsp. ochracea - अबोलिमा

Impatience / balsom - तेरडा

Murdannia graminea

cyanotis tuberosa - नभाळी

याचं नाव नाही सापडलं.


झाडाच्या फांदीवरचं शेवाळं :)

Monday, October 3, 2011

Pin Up Girl

बागेत एका नवीन कॉलनीचा मला शोध लागलाय.
स्कॉलरच्या पानावर काय कचरा पाडलाय, म्हणून मी तो हाताने काढणार होते ...

तर हे चक्क माशीचं घर आहे. एखादी टाचणी टोचावी, तसं तिने आपलं घर पानाला पिन अप केलंय.

ही माशी फुलांवर नेहेमी असते. तिच्या जेवणात किंवा विश्रांतीत मी फुलं तोडून व्यत्यय आणण्यावर अजूनतरी कधी तिने आक्षेप घेतलेला नाही. अगदी आज तिच्यापासून चार इंचावर कॅमेरा धरून मी तिच्या घरात डोकावून बघत असतानाही नाही. बागेतल्या झाडांना तिचा काही त्रास नाहीये. बागेतून घरात ती कधी शिरलेली नाही. कधी चावेल की काय या भीतीने तिला तिच्या घरातून उगाचच हुसकून लावू नये असं वाटतंय.

मी बघितलेल्या गांधिलमाश्या याहून मोठ्या, जास्त लाल, आणि जास्त आक्रमक होत्या. ही गांधीलमाशीच आहे का?

Wednesday, September 28, 2011

घटस्थापना (?)

    महाशिवरात्रीची व्याधाची गोष्ट आपल्याला माहित असते.
    शिकारीसाठी झाडावर बसलेला असताना समोरचं नीट दिसावं म्हणून तो समोरची पान तोडत होता. योगायोगाने ते झाड बेलाचं होतं. योगायोगाने झाडाखाली महादेवाची पिंड होती. आणि योगायोगानेच तोडलेली पानं पिंडीवर पडत होती. त्यामुळे शंकर व्याधाला प्रसन्न झाला इ.इ.
    योगायोगाने परवा गहू निवडले, आणि त्यातला कचरा केराच्या टोपलीत टाकण्याऐवजी चिमण्या खातील म्हणून बाहेर कुंडीत टाकला. योगायोगाने चिमण्यांनी तो खल्ला नाही,आणि योगायोगानेच नेमके घट बसण्याच्या दिवशी त्या गव्हाला मस्त कोंब आलेत.


    पण देवी म्हणजे काही भोळा सांब नव्हे. माझं पाखंडीपण तिला चांगलंच माहित आहे. ती मला प्रसन्न होईल अशी उगाचच आशा लावून बसू नये. :)

*****************************************
रच्याकने, आमच्या कासवाने आज चक्क शंभरी गाठलीय. ही माझी शंभरावी पोस्ट. त्यातल्या १० -१२ पोस्टा आवडत्या कवितांच्या आहेत ते सोडा ... ‘मी लिहिलेली शंभरावी पोस्ट’ कुठे म्हटलंय ;)

Tuesday, September 27, 2011

सोनकी

    कासविषयी सुहासने इथे लिहिलंय.

    अनघाने इथे लिहिलंय. आणि देवेंद्रने इथे.

    बाकीच्यांचं लिहून व्हायची मी वाट बघते आहे ... म्हणजे त्यांचेही दुवे इथे देता येतील. :)

    हे सगळं वाचून अजून काही कासच्या फुलांविषयी वाचायचा धीर असेल तर तुमच्यासाठी ही पुढची गोष्ट.

**************************
   
       घाटाच्या माथ्यावरचं एक छोटंसं गाव. घाटात लावलेलं रेल्वेचं इंजिन इथे काढतात म्हणून रेल्वेच्या नकाशात महत्त्वाचं. बाकी जगासाठी अनेक खेड्यातलंच एक खेडं. गावात बाहेरचे लोक म्हणजे रेल्वेवाले. त्यांची मोठी कॉलनी, त्यांचाच दवाखाना. एवढ्या संथ गावात राहून कंटाळणारी ही माणसं. आपल्यातच गट करून राहणारी, त्या गटातल्या पार्ट्या, हेवेदावे, राजकारण हेच त्यांचं मन रिझवण्याचं साधन.

    या सगाळ्या वातावरणात अजिबातच फिट न होणारं एक तरूण जोडपं. वाचन, संगीत, गावाच्या जवळपासची भटकंती ही त्यांची करमणूक. गावाजवळची गोल टेकडी तर विशेषच प्रेमाची. अगदी रोज फिरायला जाण्याची जागा. फिरायला जाताना शेजारच्या आंबेमोहोराच्या शेतांमधून घमघमाट यायचा. आणि टेकडीवरची रानफुलं तर वेड लावायची.

    नोकरीमध्ये बदली झाली, गाव सुटलं. पुढचं दाणापाणी मोठ्या शहरात लिहिलेलं होतं. पण ती टेकडी, तिथे फिरायला जाणं, आणि ती रानफुलं कायमची मनात घर करून राहिली.

    ते गाव कधी न बघितलेल्या त्यांच्या लेकीने या रानफुलांची एवढी वर्णनं ऐकली, की न भेटताच ती ओळखीचीच वाटायला लागली तिला. 

    कासच्या पठारावरच्या रानफुलांमधली ही सगाळ्यात कॉमन रानफुलं असावीत. सोनकीची. (senecio grahami)
 पण त्यांच्याविषयी इतकं ऐकलंय, की ती फार स्पेशल आहेत माझ्यासाठी. 

Tuesday, September 20, 2011

गुंता




पॉवर शिवाय काय चालणार? ती पाहिजेच.
जग कुठे चाललंय याचं भान हवं असेल तर कनेक्टिव्हिटी मस्टच. त्याखेरीज काम कसं चालणार?
आणि सिक्युरिटी म्हणजे नॉन निगोशिएबलच की.

या सगळ्या सोसापायी मग असा गुंता तयार होतो. 

Saturday, September 10, 2011

अंताजीची बखर आणि बखर अंतकाळाची

    शाणपट्टीवरच्या आळश्यांच्या राजाच्या मागणीवरून नंदा खरे यांनी लिहिलेली ही पुस्तकं विकत घेतली, तेंव्हा अंधुक कल्पना होती हा पेशवाईच्या काळाचा ‘वर्म्स आय व्ह्यू’ आहे म्हणून. मागच्या आठवड्यात ‘अक्षरधारा’मध्ये दोन्ही पुस्तकं मिळाली, आणि वाचत सुटले. लेखकाने नागपूरकर भोसल्यांच्या बंगालवरच्या स्वार्‍यांपासून ते प्लासीच्या लढाईपर्यंत (१७४० ते १७५७) आणि नंतर पेशवाई बुडेपर्यंत (१८१८) चा काळ या दोन पुस्तकांमध्ये मिळून मांडलाय.

    थोरल्या बाजीरावानंतरची पेशवाई हा काही आपल्या इतिहासातला गौरवकाळ नव्हे. परीक्षेच्या अभ्यासापलिकडे आवर्जून या काळाविषयी काही वाचावं असं कधी वाटलं नव्हतं. पण तरीही, एवढा मोठा डोलारा पत्त्यांच्या बंगल्यासारखा बघता बघता कोसळतो कसा? एवढे शहाणे होते का इंग्रज आपल्यापेक्षा? अख्ख्या हिंदुस्थानात त्यांच्या तोडीचं शहाणपण सापडू नये? ही उत्सुकता होतीच. आणि परीक्षेच्या अभ्यासात फारश्या न डोकावणार्‍या सामाजिक इतिहासाचीही.

    एखादं पुस्तक वाचताना फार त्रास होतो, आणि तरीही पुस्तक खाली ठेववत नाही. ‘अंताजीची बखर’ वाचताना हे झालं, आणि ती संपल्याबरोबर ‘बखर अंतकाळाची’सुद्धा लगे हाथ वाचणं भाग पडलं. एखादं दुःस्वप्न बघावं आणि ते संपून जाग येण्याची शक्यताच न उरावी - हे स्वप्न नसून सत्यच आहे हे जाणवावं, असं काहीसं.

    पुस्तकं केवळ मनोरंजनापुरती नाहीत. त्यात लेखकाचा अभ्यास दिसतो. पण पब्लिकला निरस किंवा जड वाटणार्‍या शोधनिबंधाऐवजी एका सामान्य बारगीराच्या भूमिकेतून बखरीच्या बाजात तो मांडल्यामुळे पानं कशी उलटली जातात हे समजतही नाही.

    इतिहासाची, त्यातही मराठी इतिहासाची आवड असेल, तर ही पुस्तकं आवश्य वाचा. प्रत्येक ऐतिहासिक पुरुषाला महामानव बनवणार्‍या गोडगट्ट ‘ऐतिहासिक’ कादंबर्‍यांची आवड असेल, तर या पुस्तकांच्या वाटेला न गेलेलंच बरं. कारण यात हाडामांसाची माणसं आहेत. त्यांच्यात गुण आहेत तसेच दोषही आहेत. अंताजी कुणालाच देव्हार्‍यात बसवत नाही. सार्‍यांचीच कुलंगडी माहित असणारा तो एक खबर्‍या. तो कुणाचाच भाट नाही. सामान्य माणसाचं शहाणपण त्याच्या बोलण्यातून दिसतं. म्हणून अंताजी वेगळा वाटतो.

या दोन्ही पुस्तकांची सुंदर विस्तृत परीक्षणं ‘मिसळपाव’वर  इथे आणि इथे उपलब्ध आहेत. मला पुस्तक वाचण्यापूर्वी त्याच्याविषयी काही वाचायचं नव्हतं, त्यामुळे आता वाचलीत.

**********************************************************
अंताजीची बखर
लेखक: नंदा खरे
मनोविकास प्रकाशन
मूल्य: २५० रुपये

बखर अंतकाळाची
लेखक: नंदा खरे
मनोविकास प्रकाशन
मूल्य: २५० रुपये

Friday, August 19, 2011

अण्णा

रोज
चढत्या भाजणीने बाहेर पडणार्‍या
भ्रष्टाचाराच्या आणि घोटाळ्यांच्या बातम्या वाचताना
मला हे जाणवत असतं.

मागच्याच वर्षी बनवलेल्या रस्त्यावरचे
खड्डे चुकवत
रोज ऑफिसला जाताना
मला हे जाणवत असतं.

मी भरलेल्या कराचे पैसे
खिरापतीसारखे वाटले जातात तेंव्हा
मला हे जाणवत असतं.

मोठमोठ्या नावांची वृत्तपत्र
एकेका नेत्याचे गुलाम असल्यासारखी
वागतांना दिसतात तेंव्हा
मला हे जाणवत असतं.

मी मत देऊनही
देश विकून खाणारे
गेंड्यालाही लाजवील अश्या कातडीचे
‘नेते’ निवडून येतात तेंव्हा
मला हे जाणवत असतं.

परदेशी सहकार्‍यांच्या
"तुमच्या देशात इतकी कर्तबगार माणसं असूनही
देशाची प्रगती मुंगीच्या पवलांनी का होते?"
या प्रश्नानी निरुत्तर होताना
मला हे जाणवत असतं.

हा देश चालवण्याची आमच्या तथाकथित नेत्यांची लायकी नाही.
We deserve a better government.

आणि हे ही जाणवत असतं
की एक सामान्य नागरिक म्हणून
माझ्या स्वतंत्र देशात
माझ्या एकटीच्या मताला
जवळजवळ शून्य किंमत आहे.
नेमकं सांगायचं तर
एकशे वीस कोटींपैकी एक.

अश्या हजारोंच्या, लाखोंच्या मतांना
अण्णा तुम्ही आवाज मिळवून दिलात!

Tuesday, August 9, 2011

कैवल्याचं झाड



ज्ञानियांचा राजा, भोगतो राणिव
नाचती वैष्णव, मागेपुढे ॥


मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड, कैवल्याचे ॥


उजेडी राहिले, उजेड होऊन

    ‘अंगणात झाड कैवल्याचे’ म्हणजे?

    म्हणजे magnolia champaca

    म्हणजे michelia champaca


    म्हणजे supramental psychological perfection 

    म्हणजे जगातलं सगळ्यात महागडं परफ्यूम ज्याच्यापासून बनवतात ते joy perfume tree,

    म्हणजे


    रोज मी या झाडाच्या नव्याने प्रेमात पडते आहे. त्यामुळे ‘अंगणात झाड कैवल्याचे’ म्हणजे अजून काही वेगळं असतं असं सांगायचा तुम्ही प्रयत्नच करू नका. त्याला फक्त माझ्या छोट्याश्या गच्चीचा राजा मानायला मी तयार नाही.

    गेले कित्येक महिने मला बागेकडे बघायला वेळ नाही. रोज सूर्य उगवतो, त्यांना प्रकाश देतो. रोज पाऊस पडतो, त्यांची तहान भागवतो. (आणि रोज मी जाऊन करंटेपणाने फक्त फुलं काढते ... वेळ नसल्याच्या सबबीवर :( ). आणि तरीही माझं हे छोटंसं सोन्याचं झाड भरभरून फुलतंय.   बाहेरच्या पाकळ्या सोनेरी, आतल्या भगव्याकडे झुकणार्‍या. आणि फुलात न मावणारा गंध. बस्स, जन्नत!

Monday, August 8, 2011

कुसुमाग्रज: शिलाखंड

कुसुमाग्रज, समिधा संग्रहातून.

************************************************************
शिलाखंड

    एका उंच डोंगरमाथ्यावर पडलेला एक शिलाखंड होता तो.

    तेव्हा मेघ त्याच्यावर निर्मळ उदकाचा अभिषेक करीत.

    उषःकालाच्या देवता त्यावर दवबिंदूंचे सिंचन करीत.

    सूर्याच्या तेजात आणि चंद्राच्या चांदण्यात तो न्हाऊन निघे.

    भोवतालचे हिरवे दुर्वांकुर आपल्या चिमुकल्या पात्यांनी त्याला हळूच स्पर्श करीत.

    हरीण आणि त्याची पाडसे त्याच्या अंगावर मान टाकून केव्हा विसावा घेत.

    सर्प आपल्या शीतल शरीराचा केव्हा त्याला विळखा घालीत.

    आकाशाच्या सावलीत --

    आणि या सर्वांच्या संगतीत --

    एका उंच डोंगरमाथ्यावर तो तेव्हा राहत होता.

    *    *    *

    आता तो एका मंदिरात आहे.
   
    मंदिर वैभवशाली आहे.
   
    नामांकित कारागिरांनी ते बांधले आहे आणि थोर कलावंतांनी ते शोभिवंत केले आहे.

    शिल्पकाराने त्याचे स्वतःचे स्वरूपही पालटून टाकले आहे.

    काळ्या आणि ओबडधोबड अशा त्या शिलाखंडाचे --

    आता एका मनोहर देवमूर्तीत रूपांतर झाले आहे.

    त्याच्या अंगावर जरीची वस्त्रे आहेत. गळ्यात, मनगटांत आणि पायांत सोन्याचे आणि रत्नाचे अलंकार आहेत.

    दिवसातून तीन वेळा श्रीमंती थाटाने त्याची पूजा होते.

    मंजूळ वाद्यांचा गजर होतो.

    आणि शेकडो भक्त त्याला वंदन करून त्याचा जयजयकार करतात.

    आणि हे सर्व होत असताना

    कोणाला न ऐकू येणार्‍या, न समजणार्‍या शब्दांत तो स्वतःशी पुटपुटत असतो,

    ‘केवढा अधःपात झाला माझा! माझ्या सुखपूर्ण जीवनाचा किती दुःखपूर्ण शेवट हा! ’

************************************************************    पुन्हा एकदा समिधामधूनच? समिधा सुंदर आहे. पण स्वतःचं काही लिहायचं सोडूनच दिलं आहेस का तू? आईने विचारलंय. तर आता थोडे दिवस कवितांचे वही मिटून ठेवायचीय. आता थोडं काही स्वतःला लिहायला सुचू देत, ते इथे उतरवलं जाऊ देत. पुन्हा केंव्हा तरी दुष्काळ पडला म्हणजे पुन्हा कवितांची वही काढून कुसुमाग्रजांची मेजवानी आपण फिरून एन्जॉय करू या.

Wednesday, August 3, 2011

कुसुमाग्रज: सारंगिया

‘समिधा’ जवळ नव्हतं त्यामुळे अजून काही कविता इथे टाकायच्या राहिल्या होत्या. ही त्यातली एक.
**********************************************************

सारंगिया

    नाही, आपण समजता ते खरे नाही.

    किनखापी गवसणीतून माझी सारंगी बाहेर पडते ती धनासाठी नव्हे.

    तारांच्या या समुदायावरून माझी धनुकली फिरू लागते ती आपले मनोरंजन कराण्यासाठी नव्हे.

    त्या उभयतांच्या मीलनातून मी मधुर रागरागिण्यांची बरसात करतो ती कीर्तीसाठी नव्हे.

    मला धन मिळत असेल, कीर्ती मिळत असेल आणि आपले मनोरंजनही होत असेल.

    पण यातील कोणत्याही गोष्टीसाठी मी सारंगीला स्पर्श करीत नाही.

    मी सांगणार आहे ते आपल्याला खरे वाटणार नाही कदाचित्, पण ते खरे आहे.

    सारंगीतून निघणारे स्वर मला दिसतात म्हणून मी सारंगी वाजवतो. ते पुनःपुन्हा दिसावेत म्हणून मी सारंगिया झालो.

    मोहळाला स्पर्श करताच त्यातून असंख्य मधमाशा चारी दिशांना उडू लागल्या,

   त्याप्रमाणे माझ्या धनुकलीचा तारांना स्पर्श होताच त्यांमधून ध्वनि-लहरींचा एक जथा बाहेर पडून उडू लागतो.

    तारांवर बसलेली लहान लहान पाखरेच जणू माझी धनुकली उठवून देते!

    काही स्वरलहरी पाण्याच्या धारेसारख्या रुपेरी असतात, काही रमणींच्या गालांवरील लज्जेप्रमाणे आरक्त असतात, काही फुललेल्या अंगाराप्रमाणे ताम्रवर्ण असतात, काही सोनेरी असतात, काही चांदण्यासारख्या चंदेरीही असतात.

    मी तार छेडली की या विविधरंगी ध्वनिपुष्पांचा दाट मांडव माझ्याभोवती घातला जातो.
    आणि एका विलक्षण आनंदाने माझे अंतःकारण बेहोष होते.

    माझ्या हातातली धनुकली तारांवर फिरत असते आणि माझे मिटलेले डोळे त्या सुंदर लहरींचा मागोवा घेत असतात.

    नृत्यांगना आपल्या झिरझिरीत वस्त्राचा पिसारा फुलवते त्याप्रमाणे त्या स्वरलहरी आपल्या रंगाचा सुरम्य विस्तार करतात.

    आणि नाचत नाचत, हासत खेळत, गात आणि गुणगुणत, मागे वळून पाहात, खाली वाकून बघत,

    मेघमंडलापर्यंत जातात आणि अंतर्धान पावतात.

    हे अलौकिक दृष्य पुनःपुन्हा दिसावे म्हणून मी सारंगिया झालो.

Thursday, July 21, 2011

कुसुमाग्रज: सूत्रबंधन


‘समिधा’ मधूनच, पुन्हा एकदा.

**************************************************

सूत्रबंधन

    निवडुंगाच्या फडातून मला कण्हण्याचा आवाज ऐकू आला म्हणून मी जवळ जाऊन पाहिले.

    विदीर्ण झालेला एक मोठा थोरला पतंग काट्यांच्या शरपंजरी पडला होता.

    मी चौकशी करताच आपली कहाणी तो मला सांगू लागला,

    "आकाशात मी खूप उंच गेलो होतो." तो म्हणाला, "कागद असून सुद्धा पक्ष्यांसारखा मी आभाळावर संचार करीत होतो. जमिनीवरून स्वप्नांसारखे भासणारे मेघ आता आपल्या जवळ आले आहेत असे मला वाटाले. आनंदाने आणि अभिमानाने मी धुंद झालो. आणखी खूप वर जायचे, चांदण्यांच्या जगात प्रवेश करायचा असे मी ठरविले.

    "तेवढ्यात माझी आणि एका पक्ष्याची आभाळात भेट झाली. त्याच्या फडफडणार्‍या क्षुद्र पंखांची आणि रंगहीन सौंदर्याची मी कुचेष्टा केली आणि त्याला सांगितले: तू आकाशात संचार करणारा आहेस पण मी आकाशाला जिंकणारा आहे.

    "पक्षी उत्तरला नाही. माझ्यामागे जमिनीपर्यंत खाली गेलेल्या सुत्राकडे त्याने एक तिरस्काराचा कटाक्ष टाकला आणि तो पुढे निघून गेला.

     "ती अवहेलना मला सहन झाली नाही. या सूत्रबंधनामुळे मी आकाशावर विजय मिळवतो असे या पक्ष्यांना वाटते काय? माझे स्वतंत्र सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी मी आवेशाने ते बंधन तोडले. थोडा वेळ मी आणखी उंचावर गेलो --

     आणि नंतर वार्‍यावर हेलकावे खात या निवडुंगात येऊन पडलो!"

Tuesday, July 19, 2011

कुसुमाग्रज: आकाशाचे ओझे

कुसुमाग्रज, समिधा संग्रह.

*****************************************

आकाशाचे ओझे

    एका उंच पिंपळाच्या शिखरावर ती लहानशी चिमणी बसली होती. आपले दोन्ही पंख तिने पसरले होते.

    सारे बळ एकवटून पिंपळाचा शेंडा तिने कवळून ठेवला होता.    ती हालत नव्हती, चिवचिवत नव्हती.तिच्या चेहर्‍यावर काही विलक्षण गांभीर्य दिसत होते. तिच्या इवल्याशा डोळ्यांतून विलक्षण तेज ओसंडत होते. 

    क्षण गेले, घटका गेल्या, दिवस जाऊ लागला; पण ती होती तशीच राहिली.
    तिच्या आप्तमित्रांना नवल वाटले. अनेक चिमण्या तिच्याजवळ चिवचिवत आल्या आणि विचारू लागल्या, ‘चिऊताई, हे असं काय करता हो? काय होतंय् तुम्हाला?’

    ती बोलता बोलेना. एकाग्र दृष्टीने नुसती त्यांच्याकडे पाहात राहिली.
     सर्व चिमण्या चिवचिव करीत तिच्याजवळ सरकू लागल्या. तिला काय होतंय हे पाहण्याचा प्रयत्न करू लागल्या.
     त्याबरोबर ती एकदम आवेशाने ओरडली, ‘मागे सरा. मला धक्का लावू नका! नाहक सार्‍या पृथ्वीचा नाश होईल!’

    चिमण्यांना काहीच कळेना. सार्‍याच गोंधळात पडल्या. शेवटी एक चतुर चिमणी पुढे येऊन म्हणाली, ‘चिऊताई, पंख उघडून तुम्ही गंभीरपणाने पिंपळावर का बसल्या आहात हे आम्हाला कळलंच पाहिजे. नाही तर आम्ही सर्वजणी मिळून तुम्हाला इथून उठायला लावू! या पिंपळावर तुमची एखादी आळई किंवा काडी हरवली आहे काय?’

    ‘आळई किंवा काडी?’ चिऊताई उद्वेगाने हसून म्हणाली, ‘क्षुद्रांच्या मनात क्षुद्र विचारच येणार! बायांनो, मी आकाशाचं ओझं माझ्या पंखांवर उचलून धरलेलं आहे!’

    ‘म्हणजे?’ सर्वजणी चिवचिवल्या!
    ‘त्याचं असं झालं’ चिऊताई सांगू लागल्या, ‘आज सकाळी या पिंपळावर बसून मी उडण्याच्या विचारात असता एक भयंकर आवाज आला आणि सारं आकाश खाली कोसळून पडलं! सर्वांत उंच अशा या झाडावर मी असल्यानं ते अर्थातच माझ्या पंखावर आलं. तेंव्हापासून ते प्रचंड ओझं मी उचलून धरलं आहे. मी उठले तर आकाश खाली पडेल आणि पृथ्वीचा चक्काचूर होईल, सार्‍या प्राणिमात्रांचा नाश होईल!’

    चिमाण्यांनी तिची समजूत घालायचा खूप प्रयत्न केला. आकाश पडत नाही आणि पडलं तरी आपल्या पंखांमुळे अडत नाही असं सर्वांनी तिला सांगितले.

    --पण तिची समजूत पटली नाही. चिमण्या निघून गेल्या आणि आकाशाचे ओझे पंखावर घेऊन ती चिमणी बसून राहिली! 

Monday, July 18, 2011

कुसुमाग्रज: सप्तर्षी

कुसुमाग्रज, समिधा संग्रहातून.
************************************************

सप्तर्षी

    ते सातही ऋषी वृद्ध होते.

    त्यांच्या पांढर्‍या सफेत दाढ्या छातीच्या खाली गेल्या होत्या आणि डोक्यावरील शुभ्र जटा रुप्याच्या उंच टोपांसारख्या दिसत होत्या.

    एकमेकांत ठराविक अंतर ठेवून ते ध्रुवाच्या भोवती प्रदक्षिणा घालीत होते.

    कोणीही बोलत नव्हते, थांबत नव्हते अथवा इकडेतिकडे पाहात नव्हते. खाली मान घालून सारेजण चालत होते.

    त्यांची निष्ठा अपूर्व होती. निष्ठेनेच त्यांच्या वृद्ध पायांत अदम्य सामर्थ्य निर्माण केले होते.

    त्यांचा हा अनंतकालीन प्रवास चालू असताना एकदा काहीतरी उत्पात झाला आणि एक मोठा थोरला धूमकेतू त्यांच्या समोर येऊन उभा राहिला.

    अवकाशात स्वच्छंदाने मुशाफिरी करणार्‍या धूमकेतूला त्या सात वृद्ध ऋषींचा हा उपक्रम पाहून नवल वाटले. तो कुतुहलाने त्यांच्याबरोबर चालू लागला आणि चालता चालता त्याने विचारले,

    "मुनींनो, का आपण असं भ्रमण करीत आहात?

    कोणीही त्याला उत्तर दिले नाही. सर्वांनी त्याच्याकडे एकेक कटाक्ष टाकला आणि आपला प्रवास पुढे चालू ठेवला.

    धूमकेतूने सभोवार पाहिले. सात ऋषींच्या मागे एक वृद्ध स्त्रीही झपाट्याने चालत असलेली त्याला आढळली.

    त्याने विचारले, "ऋषिजनहो, ती स्त्री आपल्या पाठीमागे लागली आहे म्हणून आपण असे फिरता आहात काय?"

    सर्वजण संतप्त आणि उद्विग्न झाले. आता बोलण्याशिवाय गत्यंतर नव्हते. "आम्ही सर्वजण अनंतकाळापासून त्या ध्रुवाभोवती प्रदक्षिणा घालीत आहोत!" एक ऋषी म्हणाला.

    "कशाकरिता?"

    "हे पूजन आहे, ही भक्ती आहे!"

    "परंतु या भक्तीने तुम्ही आपल्या दैवताच्या जवळ जाऊ शकता का? पूर्वीइतकेच तुमच्यापासून ते दूर आहे!

    ऋषिमंडळ काहीसे विचलित झाले. परंतु एकजण निग्रहाने उत्तरला, "आमचं सुख साधनेचं आहे, साध्य संपादनाचं नाही!"

    "तुम्ही खरोखरी सुखी आहात काय?" धूमकेतूने विचारले.

    सातही ऋषींचे चेहरे अस्वस्थतेने भारावून गेले.

    धूमकेतू म्हणाला, "मला वाटतं, अन्तराळात तुमच्याइतकं दुःखी कोणीही नाही! माझ्याबरोबर तुम्ही प्रवासाला येता का? या असीम आकाशातील अनेक सौंदर्यं मी तुम्हाला दाखवीन. रंगीत पिसारा फुलवणारा व्याधाचा तारा, शुभ्र संथ तेजाची धार धरणारी शुक्राची चांदणी, चंद्रांची माळ गळ्यात घालून फिरणारा शनी, श्वेतकमलं जिच्यात उमलली आहेत ती आकाशगंगा! आपण याल तर -- "

    ऋषींनी असहायपणे परस्परांकडे पाहिले. ‘हो’ म्हणण्याचे सामर्थ्य अथवा धैर्य आता कोणातही राहिले नव्हते.

    "आमची निष्ठा अचल आहे. कोठलंही सौंदर्य आम्हाला मोह पाडू शकत नाही!" एक जण कसाबसा उत्तरला.

    धूमकेतू निघून गेला आणि ऋषिमंडळ पूर्ववत् खाली मान घालून प्रदक्षिणा घालू लागले! पण ती निष्ठा --

Sunday, July 17, 2011

कुसुमाग्रज: चांदणी

पुन्हा एकदा ‘समिधा’. खूप वर्षांनी हा संग्रह वाचायला घेतलाय, आणि किती तरी कविता नव्यानेच भेटताहेत. त्यातल्या काही इथे तुमच्याबरोबर शेअर करायचा मानस आहे.

चांदणी

    शुक्राची तेजःपुंज चांदणी पाहून तो वेडा झाला.

    त्याने शुक्रावर जावयाचे ठरवले.

    आपले अर्धे आयुष्य खर्च करून त्याने एक प्रचंड शिडी तयार केली.

    आणि एके दिवशी तो शुक्रावर चढून गेला.

    संतुष्ट दृष्टीने त्याने तेथून आकाशाकडे पाहिले.

    शुक्राइतकीच तेजःपुंज अशी एक नवी चांदणी आकाशात तळपत होती.

    उर्वरित अर्धे आयुष्य खर्च करून त्याने पुन्हा एकदा एक प्रचंड शिडी सिद्ध केली. आणि तो पृथ्वीवर आला!

Saturday, July 16, 2011

कुसुमाग्रज: तपश्चर्या

अजून एक ‘समिधा’ मधली लाडकी कविता ...


तपश्चर्या

    पारिजातकाच्या झाडास त्या वेळी अशी सुंदर सुगंधी फुले येत नव्हती. कसला तरी गंधहीन आणि सौंदर्यहीन मोहर येई आणि मातीला मिळून जाई.

    इतर वृक्षांचे आणि फुलझाडांचे वैभव पाहून पारिजातकाच्या अंतःकरणात आसूया उत्पन्न झाली. तो दुःखी होऊ लागला.

    सभोवारची सुंदर झाडे त्याच्या दुःखाची कुचेष्टा करू लागली. त्याच्या विषादाचे विडंबन करू लागली!

    पारिजातकाने ठरवले, जगातील कोणत्याही वृक्षाजवळ नसलेले वैभव आपण मिळवले पाहिजे, वाटेल ते करून सर्व वनस्पति-सृष्टीत श्रेष्ठत्व संपादन केले पाहिजे.

    त्याने तपश्चर्या करण्यास सुरुवात केली.

    त्याच्या नम्र मस्तकावरून कालप्रवाहाच्या असंख्य लाटा गेल्या, अगणित वादळे गेली, अनेक वणवे गेले.

    पण त्याचा निर्धार ढळला नाही. तो खाली मान घालून तपश्चर्या करीत राहिला.

    अखेर त्याचे तप सफल झाले, परमेश्वर त्याच्यापुढे येऊन उभा राहिला. ‘वर माग’ म्हणून पारिजातकास त्याने आज्ञा केली.

    तपाला बसतेवेळी मनात असलेली इच्छा पारिजातकाने, दीर्घ श्रमांच्या ग्लानीमध्ये बोलून दाखवली.

    तो म्हणाला - चांदण्यासारखी सुंदर, निशिगंधासारखी शुभ्र, कमलासारखी आरक्त, त्यांचा गंध मधुर आहे, पण उद्दाम नाही अशा फुलांचा विपुल फुलोरा मला लाभावा.

    ईश्वराने त्याची इच्छा सफल केली. स्वर्गात शोभण्यासारख्या सुंदर फुलांनी पारिजातक बहरून गेला. जणू असंख्य स्वप्नांचा थवाच त्याच्या फांद्यांवर येऊन बसला होता!

    परिमलाच्या द्वारा त्याच्या वैभवाचे वृत्त सार्‍या रानात पसरले. सर्व वृक्ष त्याच्यापुढे नम्र झाले. त्यांनी पारिजातकाचा जयजयकार केला.

    पारिजातकाने डोळे उघडले. आपले अतुल वैभव त्याच्या दृष्टीस पडले. त्याची ग्लानी उतरली. तो आवेशाने उद्गारला, "मी तापसी आहे! मला हे वैभव काय करायचे?"

    आपल्या देहावर बहरलेली ती सारी संपदा त्याने खालच्या धुळीत टाकून दिली!

कुसुमाग्रज : स्वप्नमंजुषा

पुन्हा एकदा समिधा ...

स्वप्नमंजुषा

    आकाशात चंद्रोदय झाला.

    चंद्राचे निळसर किरण गवाक्षातून माझ्या शय्येवर आले.

    मी उठलो आणि दार उघडले.

    तू जादूगार दाराबाहेर उभा होतास!

    सहस्रावधी स्वप्नांनी भरलेली चंदेरी स्वप्नमंजुषा तू माझ्यापुढे केलीस.

    आणि मला सांगितलेस, यांतील एका स्वप्नाची निवड कर.

    मी पाहू लागलो. स्वप्नाची निवड करू लागलो.

    सागरासारखी निळी, उषःकालासारखी सोनेरी, शुक्रासारखी तेजस्वी आणि इंद्रधनुष्यासारखी सप्तरंगी अशी स्वप्ने होती ती!

    सारीच मृगजलासारखी मोहक होती!

    मी भांबावून गेलो आणि प्रत्येक स्वप्नाचे सौंदर्य पाहू लागलो.

    जादूगारा, तू तिष्ठत उभा होतास हे मी विसरलो. एका स्वप्नाची निवड मला करावयाची होती याचे मला विस्मरण झाले.

    स्वप्नामागून स्वप्ने मी पाहू लागलो, आणि त्यातच सारी रात्र संपून गेली.

    आकाशात अरुणोदय झाला आणि त्या ज्वालामय प्रकाशात, हे जादूगारा, तू आपल्या स्वप्नांसह अदृष्य झालास!

Wednesday, July 13, 2011

कुसुमाग्रज: कारागृह

कुसुमाग्रजांच्या ‘समिधा’ संग्रहातली ही एक लाडकी कविता ... जालावर कुठे दिसली नाही म्हणून इथे टाकते आहे ...

****************************

कारागृह

    या कारागृहातून मी कधी मुक्त होणारच नाही का?
    सोनेरी उन्हाचा कवडसा गवाक्षातून माझ्या अंगावर आला की रोज मला आशा वाटते.
    आज मुक्ततेचा सुवर्णदिन उगवला आहे!
    दिवसाबरोबर ती आशाही क्षणाक्षणाने मावळते.
    आणि रात्रपक्षी गवाक्षाच्या गजांवर फडफडू लागल्यावर माझे अंतःकरण रात्रीप्रमाणे अंधारमय होते.

***

    मुक्त करायचेच नाही तर या बंदिगृहाला हे गवाक्ष तरी का ठेवलेस?
    तासन् तास त्या लोखंडी गजांजवळ मी उभा राहतो आणि बाहेर क्षितिजापर्यंत पसरलेल्या स्वतंत्र जगाचे दर्शन घेतो.
    माझ्या आशा आपले पंख पसरतात.
    आणि त्या अथांग जगाच्या कानाकोपर्‍यांतून विहार करतात.
    लोखंडाच्या हिमस्पर्शाने मी शेवटी भानावर येतो.
    दूर गेलेले माझ्या आशांचे पक्षी
    जखमी होऊन माघारी येतात
    आणि अंतःकरणाच्या घरट्यात रक्तबंबाळ होऊन पडतात!

***

    केव्हा तरी मला मुक्त करणार असशील तर लौकर कर!
    मला आता भीती वाटू लागली आहे.
    या काळ्याकभिन्न चिरेबंदी भिंतींची नव्हे,
    या भयानक एकान्ताची नव्हे,
    नागाप्रमाणे विळखा घालणार्‍या या शृंखलांचीही नव्हे,
    तर या सर्वांसंबंधी मला वाटणारा द्वेष नष्ट होण्याची!
    पारतंत्र्य प्रिय होण्यापूर्वी
    स्वातंत्र्यावरील श्रद्धा नाहीशी होण्यापूर्वी
    माझ्यातील मी मरून जाण्यापूर्वी
    मुक्त करणार असशील तर मला मुक्त कर!

Monday, May 23, 2011

किडे

    सॉफ्टवेअर कोर्सचे दिवस. ‘ओरॅकल’ संपत आलेलं, पुढच्या आठवड्यात ‘एंटरप्राईज जावा’ सुरू होणार असावं. ‘ओरॅकल’ संपता संपता आम्हाला शिकवणार्‍या समीरने पाच प्रॉब्लेम्स दिले. "आजवर माझ्या विद्यार्थ्यांपैकी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्यांनाच या क्वेरी बिनचूक लिहिता आल्या आहेत. तुमच्यापैकी कुणी त्या लिहून दाखवल्या, तर मी त्याला ‘ओबेरॉय’ला घेऊन जाईन". त्याने सांगितलं.

    "चलो आज इसकी नियत देखते है. बघू हा खरंच घेऊन जातो का ओबेरॉयला." मृणालच्या डोक्यात किडा वळावळला, आणि ग्रूपमध्ये कट शिजायला लागला.

    "अली, गौरी - तुमचे दोघांचेही वाढदिवस आहेत पुढच्या महिन्याभरात. तुम्ही स्वतःच्या पैश्यांनी पार्टी देणार ग्रूपला, का हे प्रॉब्लेम सोडवून समीरकडून सगळ्यांसाठी पार्टी उकळणार?"

    "अरे,पण त्याने फक्त एकाला न्यायचं कबूल केलंय."

    "ते मी मॅनेज करतो. तुम्ही कामाला लागा."

    अली, शाहिद, कौशल, गौरी ही मंडळी लॅबला पळाली.

    आता समीरबरोबर मांडवली. समीर आमच्या इन्स्टिट्यूटच्या जवळच राहतो. पाच - सहा मंडळींचं शिष्टमंडळ घेऊन मृणाल थेट त्याच्या घरीच.

    "हाय समीर, जरा एक शंका होती, म्हणून म्हटलं डायरेक्ट इकडेच भेटावं. I hope you don't mind."

    "Arre, no problem. बोला. काय शंका आहे तुमची?"

    "समीर, आजचे ते प्रॉब्लेम्स - what happens if more than one person solves these problems?"

    "I will take the first person solving the problems for party."

    "What if two persons solve it at the same time?"

    "Then I will have to take both along".

    "OK. That means if more than one person solves it at the same time, you will take all of them to Oberoy, right?"

    समीर बिचारा यावर काय बोलणार? "right" तो म्हणाला. नाहीतरी ते प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत. मग वचने किं दरिद्रता?

    इकडे लॅबमध्ये झगडणार्‍या मंडळींना खाणं पिणं पुरवण्याची जबाबदारी काहींनी उचलली. ग्रूपमधले दोन्ही फुंकणारे दीपक सगळ्यांचं टेन्शन हलकं करायला म्हणून एक एक विडी पेटवायला सटकले. बाकीचे आतल्या मंडळींना नैतिक पाठिंबा म्हणून लॅबच्या बाहेरच चकाट्या पिटत बसले.

    दुपारी तीन - साडे तीनच्या सुमाराला पहिला प्रॉब्लेम सुटला, आणि एकच कल्ला झाला. उरलेले चार प्रॉब्लेमही त्याच पद्धतीने पाच मिनिटात सुटले, आणि सगळं टोळकं समीरच्या घराकडे निघालं. वाटेत आमचा अधून मधून उगवणारा ‘गेस्ट स्टुडंट’ भरतपण भेटला, ग्रूपचा सदस्य या नात्याने सगळ्यांबरोबर तोही निघाला.

    बिल्डिंगच्या दारातच बीयरचे क्रेट घेऊन येणार्‍या समीरने आम्हाला बघितलं. ही पोरं पण ना, नको तेंव्हा खिंडीत पकडतात. समीरने नक्कीच मनातल्या मनात लाखोली वाहिली असेल. तरीही बिचार्‍याने सगळ्यांना घरात घेतलं.

    "Hey Sameer, remember you said if more than one person solves the problems at the same time, you will take all of them to Oberoy..."

    "बरं मग?"

    "ऍक्च्युअली, आमच्यापैकी प्रत्येकानी हे प्रॉब्लेम्स एकाच वेळेला सोडवलेत."

    "ओह, ग्रेट!"

    "मग, ओबेरॉय? क्वेरीज दाखवू तुला?"

    "अरे नही. आय ट्रस्ट यू गाईज, यार. हम लोग जायेगे ओबेरॉय. धिस वीकेंड."

    कदाचित आधीच बीयर घेऊन प्रवेश करणार्‍या गुरूवर्यांना एवढ्या शिष्यांनी बघितल्यामुळे इज्जतचा फालुदा झाला होता, त्यात परत क्वेरीज चेक करून गोत्यात यायची समीरची इच्छा नसावी :). त्याने आपला शब्द फिरवला नाही.  पण आमचं बॅडलक खराब, त्यामुळे नेमका रविवारी त्याच्या मुलीचा खेळताना खांदा निखळला. ‘ओबेरॉय’ची पार्टी शेवटी त्याच्या घरीच झाली.

    कोर्स संपला, दहा दिशांनी आलेले सगळे आपापल्या दिशांनी निघून गेले. हळुहळू फोन, मेल्स थंडावल्या. अजूनही ग्रूपमधलं कुणी भेटलं म्हणजे ‘ओबेरॉय’च्या किश्श्याची आठवण हटकून निघते.

Friday, May 13, 2011

वळीव

    धड दुपार नाही, धड संध्याकाळ नाही अशी वेळ असते. कुंद वातावरण. सगळा आसमंत चिडिचुप्प. झाडाचं पानही हलत नाही. मुलंमाणसं कावलेली. सगळे त्याच्या कोसळण्याची आतुरतेने वाट बघत असतात. आभाळ भरून आलेलं ... ओथंबणार्‍या ढगांना अगदी बोट लागलं तर सरी कोसळायला लागतील असं वाटावं अशी हवा. अश्या जीवघेण्या वातावरणातच कुठेतरी दिलासा - आता थोड्याच वेळात तो येईल, पिसाटासारखा बरसेल, मातीचा वेड लावणारा गंध उधळेल, धुळीची पुटं चाढलेल्या म्हातार्‍या झाडांनाही लहान पोरांसारखा पिंगा घालायला लावेल, लहानमोठी पोरंटोरं मोका साधून भिजून घेतील, आणि तासा - दोन तासात तो आला तसा निघूनही जाईल . कधी कुणाच्या घरात शिरेल, कुठे छप्परच उडवून नेईल - पण त्याच्या येण्याचं एवढं अप्रूप असतं, की त्याला धसमुसळेपणाही माफ असतो. कारण तो संध्याकाळच्या उन्हात चमकणार्‍या सगाळ्या दिशा,अवखळ वारा यांना मागे सोडून जाणार असतो. कोरडं कुणालाच राहू देणार नसतो. तो येऊन गेल्यावरच्या मोकळ्या आकाशाची तुलना तर कशाशीच नाही.


    असाच वळीव कधी मनातही बरसतो. त्यानंतर आतलं आकाश जे मोकळं होतं, ते टिपण्यासाठी हा ब्लॉग. (‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश’ नाही, तर ‘गेला वळीव बरसून, झाले मोकळे आकाश’.) त्याचा आज तिसरा वाढदिवस आहे. तीन वर्षाचा झाला तरी तो अजून रांगताच आहे. त्याने पोस्टांची शंभरीही गाठली नाहीये. हिट काऊंटर तर मागेच हटवलाय, त्यामुळे किती हजार,किती लाख अश्या हिशोबाचा प्रश्नच नाही. तीन वर्षात ब्लॉग टेम्प्लेटमध्ये फक्त वरवरचे बदल झालेत. कधी तर महिनेच्या महिने कोरडे ठणठणीत, रखरखीत गेलेत, एवढं असूनही इथे टिकून राहिलेल्या बिचार्‍या तुमच्या सगळ्यांच्या सहनशक्तीची कमाल आहे. तुमच्यासाठी हा खास केक:


(त्याचं काय आहे, मस्त ब्लॅक फॉरेस्ट बनवायचा विचार होता ... पण मेणबत्त्या पेटवायची एवढी घाई झाली, की आयसिंग राहूनच गेलं बघा :)

G, खास तुझ्या मागच्या वेळेच्या सूचनेप्रमाणे तीन मेणबत्त्या लावल्यात बघ :D


आपला एक ब्लॉग आहे हे विसरण्याची वेळ आलीय असं वाटत असतानाच पुन्हा कधीतरी वळीव बरसतो, काहीतरी लिहावंसं वाटतं. आता ब्लॉगचं नाव बदलून ‘वळीव’ करावं असं म्हणतेय. :)