शाळेतल्या माझ्या वह्या बघितल्या, तर प्रत्येक दिवशी वर्गात बाकावर माझ्या शेजारी कोण बसलं होतं ते सांगता यायचं. कारण माझं अक्षर रोज माझ्या त्या दिवशीच्या शेजारणीसारखं यायचं! म्हणजे कधी किरटं, कधी गोलमटोल, कधी डावीकडे झुकलेलं, कधी उजवीकडे झुकलेलं - रोज नवनवे प्रयोग. मला बाकीच्यांची अक्षरं सुवाच्य वाटायची, आणि आपण सुद्धा त्यांच्यासारखंच अक्षर काढावं असं वाटायचं.
शाळेत आम्हाला वर्गपाठ, गृहपाठ, निबंध अश्या सगळ्या वह्यांना मार्कं असायचे. वर्षाच्या शेवटी सगळ्या वह्या तपासायला द्याव्या लागायच्या. तर वह्या तपासायला द्यायची वेळ आली, म्हणजे मला शोध लागायचा, की आपल्या प्रत्येक वहीमध्ये सर्व प्रकारची पेनं, वेगवेगळ्या शाया, आणि अक्षराची शक्य तेवढी सगळी वळणं यांचं एक मस्त प्रदर्शन भरलं आहे. मग मी वह्याच्या वह्या पुन्हा लिहून काढायचे. एकदा तर स.शा.च्या सरांनी वर्गात सगळ्यांना माझी वही दाखवली - बघा किती एकसारखं, नेटकं लिहिलं आहे म्हणून! आता एका वर्षभराची वही पुन्हा एकटाकी लिहून काढल्यावर एकसारखं अक्षर दिसणारच ना :D
घरातल्यांना सुरुवातीला वाटलं होतं तसा हा लेखनाचा आजार हळुहळू आपोआप बरा होण्याऐवजी जास्तच बळावत गेला. वह्या उतरवून काढण्याची पुढची पायरी होती डायरी लिहिणं, आणि त्याहूनही पुढची अवस्था म्हणजे आवडलेल्या कविता लिहून घेणं. यातून तयार झाली ‘कवितांची वही’. वर्गातही आवडत्या सरांच्या, मॅडमच्या लेक्चरला त्यांचं वाक्य न वाक्य वर्गात उतरवून घेतलं जायला लागलं. नंतर सॉफ्टवेअरच्या कोर्समध्ये तर आमच्या बॅचने मला ‘ऑफिशिअल नोट्स टेकर’ पद बहाल केल्यावर वर्गात कितीही गर्दी असली -अगदी दोन बॅचेस एकत्र असल्या तरी पहिल्या रांगेत बसायला जागा मिळायला लागली. कॉलेजजवळच्या झेरॉक्सवाल्याला माझ्या वह्या ओळखता यायला लागल्या. (इंटरव्हूसाठी तयारी करायला कुणीतरी माझी ओरॅकलची वही नेलेली अजून परत केलेली नाही !)
कवितांच्या वहीमध्ये पहिल्यांदा माझ्या अक्षराचं, खास माझं असं वळण तयार झालं. कविता लिहिण्याची जांभळी शाई, बाकी लेखनाची काळी शाई, डायरी लिहिण्याची पॉईंट फाईव्हची पेन्सील, लाडकं शाईचं पेन, हातकागद असा सगळा सरंजाम हळुहळू गोळा झाला. आप्पा बळवंत चौकात‘व्हिनस’ मध्ये गेल्यावर तर एकदम डिस्नेलॅंडमध्ये गेल्यासारखं वाटायला लागलं... इतक्या प्रकारचं लेखन साहित्य!
पहिलीमध्ये जाण्यापूर्वी मी घराजवळच्या रेल्वेच्या इंग्रजी शाळेत जात होते. इंग्रजांनी त्यांच्या दुष्ट भाषेत ‘b’,‘d’,‘p’,‘q’ अशी एकमेकांची मिरर इमेज असणारी अक्षरं निर्माण केल्यामुळे माझा फार गोंधळ उडायचा. हमखास उलटी सुलटी लिहिण्याची अजून काही अक्षरं म्हणजे ‘t’ आणि ‘j’. त्यात आणि गंमत म्हणजे मी दोन्ही हातांनी लिहायचे. उजव्या हाताने ‘b’ काढला आणि अगदी तसंच डाव्या हाताने लिहिलं म्हणजे नेमका ‘d’ व्हायचा. शेवटी यावर उपाय म्हणून शाळेतल्या टीचर आणि आई यांनी मिळून फतवा काढला, की यापुढे मी एकाच - rather उजव्याच - हाताने लिहावं. पुढे मराठी शाळेत हा गोंधळ आपोआपच संपला, पण डाव्या हाताने लिहिणं थांबलं ते थांबलंच.पुढे केंव्हा तरी लक्षात आलं, की आपली लीपी ही उजव्या हातानी लिहिणाऱ्या माणसांसाठी बनवलेली आहे - डाव्या हाताने ही अक्षरं काढताना जास्त वेळ लागतोय, पण आपण लिहितो त्याच्या उलट - मिरर इमेजसारखं लिहिणं मात्र डाव्या हाताने खूपच सोपं जातंय. (डावखुऱ्या लोकांवर अन्याय!)
हल्ली ‘डेड ट्री फॉर्मॅट’ मध्ये फारसं काही ठेवायची वेळ येत नाही. ऑफिसमध्ये तर नाहीच नाही. ऑफिसबाहेरही बरंचसं लेखन आता ब्लॉगवरच होतं. पण ब्लॉग असला, तरी डायरी मात्र लाडक्या पेन्सीलने, कागदावरच लिहावी लागते. आणि छान कविता दिसली, की पेनात जांभळी शाई भरावीच लागते. परवाच आईकडे साफसफाई करताना माझा जुना कप्पा तिने मोकळा केला ... नव्वद सालापासूनच्या डायऱ्या मिळाल्या तिथे. त्या चाळताना सहजच वीस वर्षांची सफर झाली. हा लिहिण्याचा आजार लवकर बरा न होवो अशी माझी जाम इच्छा आहे.
(खूपखूप वर्षांपूर्वी मी एक याच नावाची पोस्ट भाग १ म्हणून टाकली होती, आणि तिथे क्रमशः म्हणून पण लिहिलं होतं. तर हा अंतीम भाग आहे बरं का)
2 comments:
मस्तच...
लिहिताना पान संपत आलं की मला त्या पानावर लिहायचा खूप कंटाळा यायचा. नवीन पान कधी सुरु होतं आहे याचीच मी वाट बघायचो.
मस्त...खरचं मस्त....हा शेजारच्यासारखे अक्षर काढण्याचा आजार मला पण होता.....पुर्ण भरलेलं वहीचं पान पुन्हा पुन्हा पहाणे हा एक नाद होता मला.....माझा नवरा म्हणतो तुझे रफ वर्कही मी केलेल्या फेअर वर्क पेक्षा चांगले असते.......
पोस्ट खुपच छान झालीये.....
Post a Comment