Tuesday, October 13, 2009

जावे त्याच्या वंशा

अली माझा कॉम्प्युटर कोर्स मधला मित्र. कॉम्प्युटर कोर्सला मी ऍडमिशन घेतली ती नाईलाजाने, बऱ्याचशा अनिच्छेनेच. त्यात मला कोर्सला जाण्यापूर्वी प्रोग्रॅमिंगच काय साधा कॉम्प्युटर वापरण्याचासुद्धा अनुभव यथातथाच होता. १५ दिवसांच्या अभ्यासाच्या जोरावर मला दिवसभराच्या, तथाकथित ‘competitive’ कोर्सला प्रवेश कसा मिळाला हेच एक नवल होतं. तर वर्गात पहिल्याच दिवशी अलीची ओळख झाली ती ‘the guy with a funny accent’ म्हणून. हळुहळू वर्गात ओळखी वाढल्या, विषयातही थोडीफार रुची निर्माण झाली, आणि नाईलाजाने करायला घेतलेला कोर्स मी एन्जॉय करायला लागले. तरीही कोर्सपेक्षाही जास्त एन्जॉय केला, तो कोर्समध्ये मिळणारा मोकळा वेळ. या मोकळ्या वेळातल्या टवाळक्यांमध्ये लक्षात आलं, अली हे एक फार वेगळं रसायन आहे. वर्गात याचा पहिला नम्बर असला,तरी परीक्षेपलिकडच्या आयुष्यातल्याही बऱ्याच गोष्टी याला कळतात. भटकण्याची आणि निसर्गाची आवड हा एक कॉमन दुवा मला प्रथमच माझ्या ग्रूपमध्ये असणाऱ्या कुणामध्ये मिळाला होता. तर असे दोन भटके एका ग्रूपमध्ये एकत्र आल्याने आमच्या पूर्ण ग्रूपचं भटकणं भलतंच वाढलं होतं. म्हणजे ओरॅकलचं लेक्चर कॅन्सल झालं, चला नरिमन पॉईंटला. लॅबमध्ये प्रोग्रॅम चालत नाहीये - चला दहा मिनिटं समुद्रावर जाऊ या - असं अली आणि मी दिवसाच्या (आणि रात्रीच्याही) कुठल्याही प्रहरी समुद्रावर जायला निघायचो. ग्रूपमधलं निम्म्याहून जास्त पब्लिक या प्रकाराने वैतागायचं - ’आदमी नही, जानवर हो तुम दोनो - बंबई की धूप में कोई २ बजे घूमने के लिये निकलता है क्या?" म्हणून निम्मा ग्रूप वर्गातच टवाळक्या करत बसायचा प्रस्ताव मांडायचा... पण हळुहळू आम्ही ग्रूपच्या बऱ्याच सदस्यांना ‘आदमी’ मधून ‘जानवर’ मध्ये - किमान ‘animal lovers' मध्ये कन्व्हर्ट केलं ... म्हणजे ‘मी एवढ्या उन्हात बाहेर येणार नाही’ म्हणणारे हळुहळू ‘तुम्ही चालत पुढे व्हा ...मी मागून बाईक घेऊन पोहोचतो’ म्हणण्यापर्यंत सुधारले. दुपारी तीन वाजताच्या चांदण्यात अभ्यासाची पुस्तकं घेऊन नरिमन पॉईंटला समुद्रावर ‘अभ्यास' करत बसलेला ग्रूप तुम्ही बघितलाय कधी? आमचंच कर्तृत्व ते .:D

तर असं फिरायला जातांना आम्हाला काय काय गमती दिसायच्या. एकदा रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडाच्या फंदीवरून थेट आठ फूट खाली जमिनीपर्यंत जाळं बनवणारा कोळी आम्ही बघितला. नरिमन पॉईंटला समुद्रात केवढे मासे एकदम वर येतात ते बघितलं. मुंबई मला तशी नवीन होती, आणि एवढ्या माणसांच्या गजबजाटात मला फार हरवून गेल्यासारखं वाटायचं. मला बिनचेहेऱ्याच्या वाटणाऱ्या या शहरामध्ये सौंदर्याची बेटं शोधायला अलीने शिकवलं. मुंबईलासुद्धा सुंदर सूर्यास्त होतो, शोधला तर पौर्णिमेचा चंद्रही दिसतो हे त्याच्याबरोबर फिरतांना जाणवलं. एकदा नरिमन पॉईंटला आमच्या नेहेमीच्या अन्नदात्याकडून आम्ही सगळे नेहेमीसारखं ‘सॅंडविच आणि कटिंग’घेत होतो. शेजारच्या फुलवाल्याकडे बघून अली म्हणाला ... ‘see … he is having the best job in the world … he is working with flowers while listening to music all day long!’ मुंबईच्या लोकलमधल्या गर्दीने उबून जाणाऱ्या मला, किती माणसांची स्वप्नं ही नगरी साकार करते याचा साक्षात्कार त्याच्यामुळे झाला. लोकलाच्या प्रवासात खरेदीपासून ते हळदीकुंकवापर्यंत कितीतरी गोष्टी आनंदाने साजऱ्या करणाऱ्या बायांमध्ये मला एवढ्या धावपळीत आणि गर्दीतसुद्धा स्वतःची आवडनिवड जिवंत ठेवणारी, स्वतःची स्पेस निर्माण करणारी बंडखोर ठिणगी दिसायला लागली. मुंबईच्या तिटकाऱ्याची जागा कौतुकाने घेतली.

अली एकदम कट्टर मुस्लीम घरातला - बोहरा. त्याच्याच शव्दात सांगायचं,तर ‘शुद्ध मांसाहारी’. मी कधी एखादा चिकनचा पीस खल्ला, तर तेंव्हा मला जाणवतं ... चिकन टिक्का म्हणून पुढे आलेला छोटा तुकडा खातांना मला छान वाटतं ... हीच जर माझ्यावर ते कोंबडं मारून खाण्याची वेळ आली, तर खाऊ शकेन मी आरामात? माझ्यासाठी ते डिस्टर्ब करणारं काम माझ्या दृष्टीआड कुणीतरी करावं आणि मी ती चव एन्जॉय करावी अशी माझी यात एक दुटप्पीपणाची, बोलून न दाखवलेली वागणूक आहे. मी जर रोज नॉनव्हेज खात असेन, तर कुर्बानीचं बकरं मला स्वतःला कापता आलं पाहिजे हा प्रामाणिकपणा आणि एवढे गट्स मला अलीमध्ये बघायला मिळाले.

कोर्स सुरू असतानाच रमझानचा महिना सुरू झाला. तश्या माझ्या यापूर्वीही मुस्लीम मित्रमैत्रिणी होत्या, पण रमझान ही काय चीज आहे हे मी यापुर्वी कधी एवढ्या जवळून बघितलं नव्हतं. अफाट शरीरक, बौद्धिक आणि मानसिक क्षमता असणारा माझा हा मित्र दिवसभर पाण्याचा थेंबही न पीता नेहेमीइतक्याच एकाग्रतेने सगळे तास अटेंड करायचा, लॅब असाईनमेंट पूर्ण करायचा, नेहेमीप्रमाणे समुद्रावर फिरायलाही यायचा. रोजे पाळणाऱ्या आमच्या इतर मित्रांप्रमाणे त्याच्या चेहेऱ्यावर मरगळ आणि थकवा कधी दिसला नाही. एकदा ग्रूपच्या नेहेमीप्रमाणे टवाळक्या चालल्या होत्या. कुणीतरी अलीला म्हटलं, तू फार चहा पितोस. इतका चहा पिणं चांगलं नाही. अली म्हणाला,ठीक आहे.आता नाही पिणार. त्या दिवसापासून त्याने चहा सोडून दिला! मोठ्या मोठ्या आध्यात्मिक गुरूंना मोहातून बाहेर पडण्यासाठी झगडावं लागतं. एवढा मनोनिग्रह त्याने कुठल्या जन्मात कमावला होता माहित नाही.

एरव्ही रमझानच्या महिन्यातच काय,पण अन्यथाही मी महम्मद अली रोडवरून प्रवास शक्यतो टाळला असता. त्या रमझानमध्ये मी एक दिवस मुद्दम नेहेमीची लोकल सोडून महम्मद अली रोडने येणाऱ्या बसने घरी आले - रमजानचा बाजार बघायला मिळावा म्हणून! त्या रस्त्याने जाताना मला असुरक्षित, ‘त्यांच्या देशात’ असल्यासारखं वाटलं नाही. रस्त्यावरच्या त्या गर्दीत अजूनही काही असे अली असतील. मी जर भारतात किंवा पाकिस्तानात एका मुस्लीम घरात जन्माला आले असते तर? कितीही सुसंस्कृत वागणूक असली, उत्तम काम केलं, तरी माझ्या नावामुळे जग माझ्याकडे साशंकतेने, रागाने, भीतीने बघत असतं तर? त्या बाजूने बघतांना खूप अवघड वाटत होतं सगळंच.

15 comments:

Anonymous said...

स्वच्छ मोकळं लिहिलयेस म्हणून जास्त आवडल, आणि ’अली’ असो किंवा अजून कोणी त्यांच्या नावापैकी एखादे असो माझ्या मनात अढी येत नाही, ते आपल्यासारखेच असतात हे पटवणारे अनेक भेटलेत लहानपणापासून, सुरुवात करणारा ’चाचा’ आमचा शेजारी, रामायण ही ’पाक’ कहाणी पहायला दर रविवारी ’घासफुस’ खाउन आमच्या घरी येणारा हा माणुस अधिकारवाणीने बिनचूक रामायण, महाभारत सांगायचा....हा एकच नव्हे असे अनेक. आणि आता तर मुसलमानांच्या देशात रहाताना बरेचदा मनात येते की यांच्याईतका कडवेपणा आपल्यात नाही....

भानस said...

मस्त झालयं कथन.लहानपणापासून आपण जे ऐकत आलोय पहात आलोय त्यानुसार आपले मन समोरच्याचा आढावा घेते. बरेचदा प्रत्यक्षात आपले अनुभव वेगळेच, खूप चांगले असतात.माझ्याही कॊलेजमध्ये काही मुसलमान मैत्रिणी होत्या. अनेकवेळा त्यांच्या घरीही गेलेय. अम्मी व तिचे भाईजान अगदी बहिणीसारखेच वागवायचे. आवर्जून बस मिळेतो सोबत करायचे. काही दुष्टांमुळे चांगले अलीही भरडले जातात.

Gouri said...

सहजच, खरं आह तुझं. माणसाची जितकी जास्त ओळख होईल तितकी ही अढी दूर होत जाते, तेही आपल्यासारखेच आहेत हे जाणवतं.

अब्द abd said...

पिक्चर बघितल्यासारखं वाटलं. अर्थातच चांगला पिक्चर. पोस्ट आवडली.

Raj said...

छान लिहीले आहेस. आमचे २० वर्षांपासूनचे शेजारी मुस्लिम होते..
त्यामुळे मला त्यांची संस्कृती कधीच परकी वाटली नाही.

Gouri said...

वेंधळेपणाची हद्द झाली. काल ब्लॉग प्रोफाईलवर सहज काही तरी करतांना ‘moderate comments’ ऑन केलं, आणि पोस्टवर प्रतिक्रिया का बरं दिसत नाहीयेत अजून म्हणून शोधते आहे!

भानस,पटलं तुझं म्हणणं. लहानपणापासून मनावर कळत नकळत बिंबलेला दुरावा आहे हा. माणूस म्हणून ओळख झाल्याशिवाय तो दूर होत नाही.

अब्द, पिक्चरच्या कथेएवढं ओघवतं लिहायला शिकायचंय :)

राज, नशीबवान आहेस :) आमचे जर्मन भाषेचे सर म्हणायचे, एक भाषा शिकणं म्हणजे जगाकडे बघण्याचा एक दृष्टीकोन शिकणं. तसं एका संस्कृतीची ओळख होणं म्हणजे जगायची एक पद्धत समजणं.

Sushant Kulkarni said...

आवडला पोस्ट. खूप छान.

Gouri said...

सुशांत, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तुझा (का तुमचा?) 'एक न काढलेला फोटो' खूप भावाला.

Anonymous said...

नमस्कार....मी माझा नवीन ब्लॉग चालू केला.
http://anukshre.wordpress.com/

आपले स्वागत ...

अनुजा

अपर्णा said...

छान लिहिलंय..मी प्रथमच येतेय का ह्या ब्लॉगवर? अगं मुंबईबद्द्ल अढी काय?? मला वाटतं सर्वांना सामावुन घेणारं मुंबईसारखं शहर नसेल...मी इतक्या आठवणी काढत असते ना दूरदेशात...

Gouri said...

अनुजा, नवीन ब्लॉगबद्दल अभिनंदन. ब्लॉगवर प्रतिक्रिया लिहिली आहे.

अपर्णा, ब्लॉगवर स्वागत! अगं, मुंबईकडे दुरून बघत होते, तेंव्हा पहिल्यांदा नुसती गर्दीच जाणवायची तिथली. आता मात्र पटतं ... मुंबईसारखं सगळ्यांना सामावून घेणारं शहर नसेल.

HAREKRISHNAJI said...

पुढच्या वर्षी येथे मिनारा मशिदी जवळच्या सुलेमान उस्मान ला अवश्य भेट द्या. फिरनी खाण्यासाठी, आणि अंडी खात असाल तर मग मालपुवे खाण्यासाठी

Gouri said...

हरेकृष्णजी, नक्की जाईन.

Anand said...

सर्वप्रथम, उशिरा लिहिलेल्या प्रतिक्रियेबद्दल क्षमस्व!
लेख वाचून प्रतिक्रिया लिहिणे भाग वाटले. अतिशय सुंदर लिहिले आहे.

Gouri said...

आनंद, लेख वाचल्यावर आवर्जून प्रतिक्रिया दिलीत हे महत्त्वाचं. धन्यवाद!