हल्ली पुण्यात गाढवं दिसत नाहीत फारशी. खूप दिवसांनी हे गोजिरवाणं पिल्लू बघायला मिळालं ...
पिल्लामुळे आमच्या जुन्या `गळाभेटी'ची आठवण जागी झाली.
मी दुसरी - तिसरीत असतानाची गोष्ट. आमची शाळा सकाळी सातची असायची. मोठा भाऊ तेंव्हा नुकताच स्कुटर चालवायला शिकत होता. एक दिवस शिकाऊ उत्साहाने तो मला शाळेत सोडायला तयार झाला. थोडाफार उशीरही झालेला होता निघायला. अजून त्याच्याकडे लायसन्स नव्हता आणि तेवढा सरावही नव्हता, त्यामुळे गर्दी, मोठे चौक, मामा असं सगळं टाळत आणि ‘शॉर्टकट’ने जायचं होतं. आमच्या ‘शॉर्टकट’ मध्ये एक मोठा मोकळा प्लॉट तिरपा ओलांडून जायला लागायचं. आम्ही रोज शाळेला जाऊन - येऊन तशी पायवाट बनवून टाकली होती.(हा प्लॉट म्हणजे न कसलेलं शेत होतं - खानदेशातली काळीभोर, लोण्यासारखी मऊ माती पावसाळ्यात त्याचं रूपांतर चिखलाच्या मोठ्ठ्या खड्ड्यात करून टाकायची. पण आता पावसाळा संपलेला होता, त्यामुळे तसं इकडनं जाणं सेफ होतं. तर भाऊ आणि मी निघालो स्कुटरवरून. प्लॉटपर्यंत व्यवस्थित पोहोचलो. हवेत सुखद गारवा होता. प्लॉट हिरव्यागार लुसलुशीत गवताने सजलेला होता. गवतावर पडलेलं दव अजूनच रोमॅंटिक मूडमध्ये घेऊन जाणारं. एकूण वातावरण एकदम प्रसन्न होतं.
तिथे चरणाऱ्या गाढवांच्या जोडीलाही सकाळचा हा प्रसन्नपणा जाणवला असावा. फारच खुशीत येऊन त्यांनी एकदम हिंदी सिनेमातल्या हिरो-हिरॉईनप्रमाणे एकमेकांच्या मागे पळायला सुरुवात केली. हिरोईन आमच्या स्कूटरसमोरून धावत पलिकडे गेली. पाठोपाठ येणाऱ्या हिरोला त्याच्या आणि प्रियेच्या मधली स्कूटर बहुतेक दिसलीच नाही. काय होतंय ते समजायच्या आत मी, स्कूटर आणि भाऊ जमिनीवर, आणि आकाशात हिरो अशी कोरिओग्रफी बघायला मिळाली. एक कोलांटी मारून हिरो तडक त्याच्या प्रियेपठोपाठ निघून गेला. स्कूटर चालू कशी होणार म्हणून भाऊ धडपडत उभा राहिला. ‘बजाज सुपर’वर कुठे ओरखाडा सुद्धा नव्हता. भावावरही नव्हता. माझ्यावरही नव्हता. (सायकल डबलसीट चालवायला शिकण्याच्या दुसऱ्या बंधूराजांच्या प्रॅक्टीसमुळे मला वाहनावरून पडण्याची प्रॅक्टीस होती.) दप्तरामधली पाटी फुटलेली होती या पलिकडे या घटनेला पुरावा नव्हता. पण ही‘गाढवांची परस्परभेट’ बरेच दिवस पुरली नंतर चिडवायला.
18 comments:
"सायकल डबलसीट चालवायला शिकण्याच्या दुसऱ्या बंधूराजांच्या प्रॅक्टीसमुळे मला वाहनावरून पडण्याची प्रॅक्टीस होती."
ekadam sahi... :)
हा हा हा. मजेदार. मला मात्र गाढवं रोज दिसतं आरश्यासमोर उभं राहीलं की :-)
तुझ्या पोस्ट ने जुनी आठवण जागी झाली. मी असाच एकदा सिक्स-सिटरच्या मागुन जोरात जात होतो. समोर म्हैस असल्याने सिक्स-सिटर अचानक बाजुला झाली. आणि त्यानंतरच मला त्या म्हशीचे दर्शन झाले पण तोपर्यंत फार उशीर झाला होता आणि मी गाडीसहीत दणकन म्हशीवर आदळलो. महीनाभर हात प्लास्टरमध्ये होता.
- अनिकेत
हा!!हा!!
>> काय होतंय ते समजायच्या आत मी, स्कूटर आणि भाऊ जमिनीवर, आणि आकाशात हिरो अशी कोरिओग्रफी बघायला मिळाली.
व्वा!! क्या सीन होगा... :-)
मस्त
@ महेंद्र, तो एक वेगळा किस्सा आहे ... घरात दोन मोठे भाऊ असले, म्हणजे अशी बरीच कौशल्ये आपोआप आत्मसात होतात :D
@ अनिकेत, म्हशीला काही झालं की नाही? का फक्त तूच जायबंदी? :D :D :D
@ आनंद, मघाशी मस्त हिरव्यागार वाटणाऱ्या गवतावर मी, आकाशाकडे तोंड करून, आणि आकाशात गाढव :)
@ हरेकृष्णजी, गाढवाचं पिल्लू खरंच क्यूट दिसतं की नाही? या पिलावर तर इतकी लव होती की सॉफ्ट टॉयसारखं वाटत होतं एकदम.
हा हा.. "गाढवांची परस्परभेट" एकदम आवडली.. मस्त वर्णन !!
हा हा हा....वाक्य न वाक्य छान आहे या लेखातलं...
बाकी तुझी वरची ओळ वाचुन मजाच वाटली गाढवही सॉफ़्ट टॉय सारखं वाटणं...ग्रेट बाबा...मी कुठलाही पाळीव नाहीतर मोकाट प्राणी जवळपास पाहिला की पळतच सुटते त्यामुळे हे त्यांची लव बिव पाहायला तरी सॉफ़्ट टॉयच बरं असं...ही ही....मजा आली बाकी....तुझ्या दोन्ही भावांनी तुला छान छान अनुभव दिले असतील असेच...:)
"सायकल डबलसीट चालवायला शिकण्याच्या दुसऱ्या बंधूराजांच्या प्रॅक्टीसमुळे मला वाहनावरून पडण्याची प्रॅक्टीस होती."
ekadam sahi... :)
महेंद्रंचे कमेंट जसेच्या तसे उचलतेय.....
अगं, मुलाला ’अरे गढड्या’ म्हणायची भिती वाटते आता कारण हा प्राणी दिसणे आता दुर्मिळ झालेय आणि चिरंजीव लगेच मागणी करणार दाखव गाढव कसे ते....तू टाकलेला फोटो खरच क्युट(!)आहे....
@ हेरंब :D
@ अपर्णा, अगं गाढव तसं अगदीच गरीब असतं ... फारच छळलं तरच वाटेला जातं. (अनुभवाचे बोल ;)
भावांचे असे भरपूर किस्से आहेत लहानपणीचे. भाचरांना त्यांच्या बापांचे प्रताप ऐकवताना मजा येते :)
@ तन्वी, अगं हा फोटो दाखवलास लेकाला, तर ‘गधड्या’ म्हटल्यावर खूशच होईल तो !
मस्त ! अगदी जसाच्या तसा ' सीन ' उभारला डोळ्यासमोर .आणि गाढवांची पिल्लं ' क्युट ' असतात , याच्याशी १०० % सहमत .
'लई' हसलो तुझं हे पोस्ट वाचून. अक्षरक्ष सीन समोर उभा राहीला. तुला माहीतेय का एकदा मी सायकल शिकत होतो. सायकल शिकणे हा काय भारी प्रकार नाही पण शिकताना जर मध्ये कोण आलं तर मात्र अवघड असतं. आमच्या नशिबानं(?) मध्येच डु़क्करांची आख्खी पलटण आली. युद्धात दाखवतात ना घोड्यांची पलटण तुकडुक तुकडुक (हा शब्द बोलणं सोप्प लिहीण अवघड :-) ) करत, माती उधळत जाते ना तशीच. मी बिचारा नेमका त्यात अडकलो आणि खाली पडलो. आजुबाजुला डुक्कर पळत चाललेत आणि मी बिच्चारा तिथे खाली :-)
-अजय
पहिल्या वाक्याशी पूर्णत: सहमत नाही. मला बरीच दिसतात, फक्त चित्रात आहेत तितकी गोजिरवाणी नसतात. बरेचदा पेपरात त्यांचे फोटोही येतात आणि च्यानेलवर मुलाखतीही. :)
किस्सा आवडला.
@ Snehal :)
@ Ajay, dolyapudhe ekadam dukaraanchee palatan aani madhye sharthine uthanyacha prayatn karanara tu ase chitr aale :D
@ अरे मी हे विधान गरीब गाढवांविषयी केलं आहे ... तू म्हणतोस त्या जमातीविषयी नाही ... जातीच्या गाढवांना किती वाईट वाटेल बरं तू असं म्हटल्याने ;)
मस्त झालीय पोस्ट. पिल्लू खरच गोड दिसतंय.
pillu mast aahe ekdum...
Post a Comment