Friday, January 8, 2010

अस्वस्थ करणारी गोष्ट

    ऍनच्या ८० व्या वाढदिवसाची बातमी पाहिली तेंव्हापासून लिहायचं होतं तिच्याविषयी. महेंद्र काकांनी शिंडलर्स लिस्टविषयी लिहिलं आणि पुन्हा आठवण करून दिली.

***********************************************

    ऍन फ्रॅंक पहिल्यांदा भेटली कॉलेजमध्ये असताना. तिच्या डायरीचा मराठी अनुवाद वाचताना. पहिल्या भेटीतच चटका लावून गेली, पण आधाश्यासारखं वाचत गेलं म्हणजे वाचलेलं पचवायला फारसा अवधी मिळत नाही. हळुहळू मी तिला विसरले.




    पुढच्या वेळी आमची भेट झाली ती स्टाइलिस्टिक्समध्ये ... भाषांतर कसं करू नये याचा उत्तम नमुना म्हणून! ऍन फ्रॅंकने तिची डायरी लिहिली डच भाषेत. डच मधून जर्मन, इंग्रजी, फ्रेंच अशी ती हळुहळू वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित होत होत जगभर पोहोचली. प्रत्येक भाषांतरकारने `ये हृदयीचे ते हृदयी' करताना थोडंफार गाळलं होतं, आणि एका भाषांतरावरून दुसरं भाषांतर अशी भाषांतरं झाल्यामुळे कानगोष्टींसारखी गत झाली होती. मूळ डयरी म्हणजे पौगंडावस्थेतल्या ऍनची जीवाभावाची सखी होती. त्यात तिने आपल्या आईवडिलांविषयी, नव्यानेच जाग्या होत असणाऱ्या लैंगिक जाणिवांविषयी मोकळेपणाने लिहिलं होतं. ही भाषांतरावरून केलेली भाषांतरं अधिकधिक सोज्ज्वळ होत गेली, आणि त्याच वेळी खऱ्या ऍनपसून दूरही. या अभ्यासाच्या निमित्ताने ऍनची डायरी इंग्रजी, मराठी, जर्मन मधून वाचली. त्या वेळी आमच्यावर हिटलर, थर्ड राईश आणि दुसऱ्या महायुद्धाविषयीच्या इतक्या पुस्तकांचा मारा होत होता, की ऍन पुन्हा एकदा विस्मृतीमध्ये गेली.

    पुन्हा एकदा वर्षभरापूर्वी ऍनच्या भेटीचा योग आला ... ऍमस्टरडॅम बघताना. इतक्या वर्षांपासून माहित असलेली गोष्ट. नुकतीच डाखाऊची छळछावणी बघितलेली. एवढ्या छळकथा ऐकल्यावर अजून काय धक्का बसणार ऍनचं घर बघताना? त्यामुळे गावातल्या टूरिस्ट ऍटॅक्शन्सपैकी एक आयटम - आलोच आहोत तर बघू या असा दृष्टीकोन होता ऍन फ्रॅंक म्युझियमला जाताना. पण ऍनने पुन्हा एकदा रडवलं. अंगावर येणाऱ्या त्या छोट्याश्या जिन्याने वर जाताना ऍनच्या डायरीमधलं वास्तव समोर आलं. एवढ्याश्या जागेत महिनोनमहिने एवढी माणसं कशी राहिली असतील? बिग बॉसचा पहिलाच एपिसोड बघून मी नवऱ्याला म्हटलं होतं ... कुणी मला कितीही पैसे दिले तरी अश्या बंदिस्त घरात मी दोन दिवसांच्या वर काही नॉर्मल राहू शकणार नाही. दिवसरात्र घरातच राहायचं. घराबाहेर पडणं सोडा, पण खिडकीचा पडदासुद्धा वर करायचा नाही. दिवसा कामगार खाली काम करत असताना पाण्याचा नळ, फ्लश असले आवाज होऊ द्यायचे नाहीत. रात्री खालच्या कारखान्यातली माणसं घरी गेली, म्हणजे थोडी फार मोकळीक जिन्याने खाली - वर करायला, थोडा आवाज करायला. देश जर्मनीच्या कब्जामध्ये. जगभर युद्ध पेटलेलं. जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा. त्यात कधी नव्हे तेवढा कडक हिवाळा. बाहेरच्यांनी जिवावर उदार होऊन त्यांना रोजच्या गरजेच्या वस्तू कश्या पुरवल्या असतील? गोष्ट एका दिवसाची नाही. महिने च्या महिने असं जगायचंय. हा अज्ञातवास कधी संपणार माहित नाही. त्यांचं मनोबल कसं टिकून राहिलं असेल? असं दिवाभीतासारखं अनिश्चिततेमध्ये जगण्यापेक्षा छळछावणीतल्या यातना परवडल्या असं नसेल वाटून गेलं या माणसांना? खिडक्यांच्या पडद्याच्या फटीतून बाहेर बघताना बारा तेरा वर्षाच्या ऍनला कसं दिसलं असेल जग?

    काही दिवसांपूर्वी जर्मन बातम्यांमध्ये ऐकलं ... ऍन फ्रॅंक आज जिवंत असती तर ८० वर्षांची झाली असती. ८० वर्षांच्या आयुष्यात बघावं लागणार नाही एवढं तिने १५ - १६ वर्षात भोगलंय. ऍन कशी म्हातारी होईल? जगायला उत्सुक असणारी एक टीनेजर मुलगी म्हणून ती मनाच्या कोपऱ्यात कायमची जाऊन बसलीय.

***********************************************

    ऍनच्या आयुष्यावर ऑस्कर विजेता हॉलिवूडपट आहे. पुन्हा एकदा तिचं आयुष्य अनुभवायची माझी तरी तयारी नाही सद्ध्या. पण तुम्हाला मिळाला तर आवश्य बघा.

(ऍनचं छायाचित्र जालावरून साभार)

11 comments:

आनंद पत्रे said...

गौरीजी, ती डायरी मराठी मध्ये पब्लिश झाली आहे का? असेल तर काय नावाने ?
२००१ साली आलेला 'ऍन फ्रॅंक: द व्होल स्टोरी' आता कुठे मिळतो का ते पाहतो.
खरंय, कशी राहिली असेल त्या परिस्थितीत ती? सुन्न करणार आहे हे........ :(

Gouri said...

आनंद, खालच्या दुव्यावर आहे मराठी भाषांतराची माहिती:

http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b86739&lang=marathi

माझ्या कॉमेंटमधले कुठलेच HTML टॅग चालत नाहीयेत :(, त्यामुळे तुम्हाला URL कॉपी-पेस्ट करावी लागेल वरची.

आनंद पत्रे said...

धन्यवाद!
मला एकेरी हाक चालेल :)

Gouri said...

मलाही ...पळेल :)

Anonymous said...

गौरी, या पोस्ट बद्दल आभार. 'ऍन फ्रॅंक' वाचायला लागेल आता.

रोहन... said...

ऐकले होते पण वाचलेले नाही अजून कधी ... वेळ काढून वाचायला हवे आता ... :)

हेरंब said...

गौरी, थोडंफार ऐकलं/वाचलं होत ऍन फ्रॅंक बद्दल. बघुया कधी जमतंय हे पुस्तक वाचायला.

भानस said...

गौरी अग खूप ऐकून आहे आहे या डायरीबद्दल पण अजून वाचलेली नाही. मात्र सिनेमा पाहिला. तिथे झलक दिसतेच. तुझ्या अनुवादाच्या लिंकवर जाऊन पाहते.बरे झाले गं लिंक दिलीस. आभार.

Gouri said...

@ दुनियदारी, ब्लॉगवर स्वागत.

दुनियादारी, रोहन, हेरंब - नक्की वाचा हे पुस्तक.

भाग्यश्री, अगं तुला तिथे मराठी अनुवाद मिळाला नाही तर इंग्रजी सहज उपलब्ध आहे.

Sonal Waikul M.D.(Alt.Med.) said...

wachaayla surwaat karun sodun dil hot he pustak. aata punha wachen. tevhahi chataka laawala hota tya pustakane.
ashich ek gosht afgan tarunichi nukatich waachali. 'the breadwinner' by Debora Elis. of course khup wegli tichi gosht. Pan sutra ekach, jagnyachi chiwat aasha. milal tar nakki wach.

Aakash said...

great! mi Dairy of Ann Frank : sahavit astan-na > marathi anuvad vachla hota. tya nantar tyachi 2-3 parayaNa pan zali. Pan hi anuvadachi gammat mahiti nhavti. aso, faar chan lihlay!