Monday, February 28, 2011

Good Morning!

    सोमवारची सकाळ. तिला सकाळी उठायला नेमका उशीर झालेला. - एवढा उशीर - म्हणजे अगदी दातसुद्धा घासायच्या आधी डब्याची तयारी करायला हवीय. घासून आलेल्या भांड्यांच्या डोंगराएवढ्या ढीगातून कढई आणि झारा उपसत अर्धवट झोपेत ती मोबाईलचा अलार्म ऐकल्याचं आठवण्याचा एक क्षीण प्रयत्न करून बघते. खरंच आपण अलार्म बंद करून झोपल्याचं काही आठवत नाहीये. कधी वाजला बरं आलार्म? आजच्या सकाळला बहुतेक एक तास कमी होता एवढ्याच निष्कर्षापर्यंत पोहोचता येतंय.

    नवर्‍याच्या बसची वेळ गाठत त्याचा डबा भरल्यावर आपलं आवरायला सुरुवात. म्हणजे ऑफिसला निघायला उशीर, पोहोचायला उशीर, काम संपायला उशीर ... आज नेहेमीपेक्षा जास्तच धावपळ करायला हवीय.

    पार्किंगमध्ये गाडीसमोर दहा बारा माणसं जमलेली दिसतात. सगळी पांढर्‍या कपड्यात. मंदावलेल्या डोक्यात याचा काही अर्थ लागणार, एवढ्यात शेजारी बांबू, मडकं, कापड दिसतं. लोकांची खालच्या आवाजात चर्चा चाललीय. काय करावं हे न सुचून ती नुसतीच उभी. एवढ्यात कुणाचं तरी लक्ष तिच्याकडे जातं. गाडी काढायचीय? ते विचारतात. ती मान डोलवते. सामान बाजूला घ्यायला सुरुवात होते, आणि यांत्रिक सफाईने ती गाडी बाहेर काढते.

    रस्त्याला लागल्यावर डोकं हळुहळू चालायला लागतं. आपल्या सोसायटीमधलं कुणीतरी आज गेलं. दोन अडीचशे फ्लॅट्सच्या सोसायटीमध्ये आठ -दहा घरांपलिकडे आपण फारसं कुणाला ओळखत नाही. तिथे कुठला ओळखीचा चेहेरा दिसला नाही. विचारायला हवं होतं का कोण गेलं म्हणून? विचारून काय प्रकाश पडणार होता तसाही - लगेच उठून सांत्वनाला तर जाता येणार नव्हतं ना? एकदम ‘शीतयुद्ध सदानंद’सारखं काहीतरी वाटायला लागतं.

    कितीही उशीर झाला तरी रस्त्यावर ड्रायव्हिंग करताना घाई नाही ... ती स्वतःलाच बजावते. विनाकारण हॉर्न वाजवणं थांबतं. हळुहळू गर्दीची लय आणि तिची लय एक होते. एफ एमवर आवडतं गाणं लागतं, आणि वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. सकाळची प्रसन्न हवा जाणवायला लागते. After all, its a fresh new day. अनपेक्षितपणे ऑफिसच्या पार्किंगमध्ये सोयीची जागा मिळते. धडपडत डेस्कवर पोहोचून मेल चेक करताना लक्षात येतं ... आज ऑफिसमध्ये तसा निवांत दिवस आहे. शुक्रवारी दोन डेडलाईन्स होत्या ... आता नुसतं बसून कस्टमर फीडबॅकची वाट बघायचीय. जरा सैलावून श्वास घेणार, एवढ्यात इन्स्टंट मेसेजरवर सहकार्‍याचा मेसेज येतो."Hi, good morning! How are you?"

    काय पण प्रश्न आहे. How should I know? सकाळपासून तपासायला वेळच नाही झाला. थांब जरा बघते आणि मग सांगते.

14 comments:

aativas said...

One could safely answer "How are you?' by saying "As Usual" !! Because we generally do not have the time to know the answer. And maybe we lack the courage necessary for the real answer!

Anonymous said...

:)

कसं झालय नाही गौरी, how should I know ??? ...

कधीतरी वाटतं थांबून जरा तपासायला हवं नाही "मी कशी आहे, मला नक्की नेमकं काय वाटतय?? " वगैरे प्रश्नांची उत्तरं.....

नेहेमीप्रमाणे विचाराला वाव देऊन गेलीस तू :)

प्रशांत दा.रेडकर said...

छान लिहिले आहे :-)

माझ्या ब्लॉगचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/

Gouri said...

सविता, "As usual" ... एकदम पॉलिटिकली खरं उत्तर :D. खोटंही नाही, आणि अडचणीत पाडणारंही नाही!

Gouri said...

तन्वी, अग रूटीनमध्ये आपण इतके बुडून जातो, की खरंच आपल्याला काय वाटतंय याचासुद्धा पत्ता नसतो कधी कधी ... कुणी "कशी आहेस?" म्हटलं, म्हणजे आपसूक तोंडातून यांत्रिकपणे उत्तर जातं ना.

Gouri said...

प्रशांत, धन्यवाद!

अनघा said...

That's nice!!!
अगदी पटलं! मनापासून! मला तर असं वाटलं की हे मीच माझ्या मनातलं वाचतेय!!!
:)

Gouri said...

अनघा, आपल्यालाच पत्ता नसतो काय वाटतंय याचा ... होतं ना ग तुझंही असं!

Raj said...

छान पोस्ट. आपलं अमेरिकीकरण होतय बहुधा.. हाय हाउ यू डूइंग यांत्रिकपणे म्हणायचे आणि उत्तराची वाट न बघता पुढे चालू.

Gouri said...

खरंय राज. "हाऊ आर यू?" म्हणताना मनापासून उत्तराची अपेक्षाच नाहीये बहुतेक.

हेरंब said...

कसलं यांत्रिक झालंय ना आयुष्य? सुरुवातीच्या त्या प्रसंगातून आणि नंतर आलेल्या यांत्रिक "हाऊ आर यु?" मधून तू ती यांत्रिकता अगदी परफेक्ट पकडली आहेस !

भानस said...

एकदम पटेश.

इतके काट्यावर आयुष्य धावडतोय ना आपण की हे असले प्रश्न अव्वल पडत नाहीत किंवा पडलेच तरी त्यांच्याकडे वळून पाहायलाही वेळ नसतो. :( मग ते मनोमन हसतात आणि म्हणतात अजून वीस एक वर्षांनी रोजच पडतील हे प्रश्न... :D

मस्त लिहीलेस. आवडले.

Gouri said...

हेरंब, आपण दिवसाचे किती तास डोळे उघडे ठेवून झोपेत असतो, आणि किती तास खरोखर हाडामांसाची, जाणिवा असणारी माणसं म्हणून जागे असतो असा प्रश्न पडलाय.

Gouri said...

श्रीताई, कित्येक वेळा तर नुसती सवय म्हणूनच धावणं चाललेलं असतं. त्यातून पोहोचायचं कुठे याचा पत्ताच नसतो!